दांभिकाचारापासून सावध असावे
काही माणसांच्या अंगी खरे सद्गुण फार दुर्मिळ असतात. त्याचे जे गुण वाटतात ते ते अज्ञानाने, स्वार्थाने वा दंभाने त्याचेवर लादले जातात. बरेचवेळा स्तुती केली जाते ती बरेच फुगवून केली जाते. त्यातील यर्थाथता तपासली म्हणजे हे प्रत्ययाला येते. रसिकता व्यक्त करण्यासाठी वा प्रतिष्ठितपणा सांभाळण्यासाठी जे बोलले जाते, ती स्तुति दंभाचार असते.
व्यवहारात असे सस्तुतीपर बोलणे फायद्याचे, उपयुक्त असे वाटतेही. पण सभ्यतेपोटी, शिष्टाचार सांभाळण्यासाठी असे बोलणे निराळे आणि दंभ म्हणून स्वार्थासाठी लाचारीने बोणे निराळे. यासाठी संतांनी म्हटले आहे परमार्थमार्गातल्या साधकाने सत्याची कास सोडू नये तसेच मिथ्या गोष्टीचा पुरस्कार करता कामा नये.
व्यवहारात मिथ्या आणि असत्य हे समानार्थी वापरले जातात. पण शास्त्रदृष्ट्या यात महदंतर आहे. जे खरे नसून खर्याप्रमाणे भास, ते हे मिथ्या होय. आजच्या काळातले उदाहरण द्यावयाचे तर बेन्टेक्सचे अलंकार. हे सोन्याचे नसतात पण सोन्याचे वाटतात, भासतात. दोरीवर भासणारा साप हा मिथ्या आहे. जे वस्तुत: जसे नाही ते तसे अज्ञानाने, मोहाने, वैयक्तिक दुर्बलतेने भासणे हे मिथ्यापणाचे स्वरूप आहे.
दंभाचा पुरस्कार कधीही करू नये कारण तोही मिथ्याच आहे. सत्य ओळखावे, ते जाणण्याइतकी मन बुद्धि इंद्रिये शुद्ध सात्त्विक असावीत. सत्याचा त्याग करू नये. सत्य सत्यच आहे ते तसेच जाणले पाहिजे. जे सत्य त्रिकालाबाधित आणि निरपेक्ष तेच वास्तविक सत्य होय. सत्याला स्थलकालाचे वा पाहणार्याच्या योग्यायोग्याचे बंधन असू शकत नाही. बुद्धीमध्ये रजतमाचे प्राबल्य नसले, मनामध्ये स्वार्थ नसला, इंद्रियांमध्ये आसक्ती नसली की सत्याचे दर्शन सहजी होते. आणि अशी व्यक्ती जे पाहते, जे सांगते ते आपल्याला कळत नसले तरी सत्यच असते.
माणसाला सत्य रूचत नाही सोसत नाही. खरे बोलणाराला मित्रमंडळ फार क्वचितच सापडते. तरीही खरे बोलावे हेच शास्त्र, सर्वसंमत आहे. खरे असले तरी लोकांना आवडत नसेल तर बोलू नये, आवडते म्हणून खोटे सांगू नये, ही तारेवरची कसरत म्हणावी लागेल. प्रत्यक्ष आचरणाच्यावेळी अप्रिय सत्यही सांगावे लागते आणि प्रसंगी प्रिय असे असत्यही बोलावे लागते.
शास्त्रकारांनी सत्याची कसोटी हित अशी सांगितली आहे. हित म्हणजे स्वार्थ साधून देणारे, सुखावह वाटणारे नव्हे. जे श्रेयस्कर, परिणामी लाभदायक, कल्याणकारक ते हित होय. प्रसंगी या हितासाठी वर वर दिसणार्या असत्याचाही अवलंब करावा लागतो. मूल वेड्यावाकड्या रेघोट्या काढते तिचे कौतुक करण्यासाठी आईला ‘किती छान’ असे असे असत्य बोलावेच लागते. पण हे हिताच्या दृष्टीने बोललेले असत्य आहे.
कोणी आपल्या चुका दाखवून देत असेल, तर त्या समजून घेतल्या पाहिजेत. वस्तुत: झालेल्या चुका कोणी सांगितल्या तर मोकळ्या मनाने मान्य करणे व न संतापता, न वैतागता पुन्हा तशा चुका घडणार नाहीत, याची दक्षता घेणे हे माणसाच्या प्रगतीचे साधन आहे. परंतु हृदयात घट्ट रूतलेला अहंकार इतका बलवान असतो कि, तो सत्याचे खरे ज्ञान होऊ देत नाही. अहंकारामुळे वाटलेले ते यथार्थ नसते म्हणून ‘सत्य ते सत्य वाचे वदावे’ आणि ‘मिथ्य सोडू द्यावे’ हे समर्थ आग्रहाने सांगत आहेत.
सत्यवादाच्या नावाखाली वा स्पष्टवक्तेपणा असावा म्हणून सौजन्याचा घात करणारा फटकळपणा हे व्यवहारशून्यतेचे लक्षण मानले पाहिजे. खर्या निस्पृह व्यक्तीला काहीही शोभते. तोच आव इतर स्वार्थपरायण व्यक्तींनी आणू नये. लोकांमध्ये फटकळपणा आढळतो तो बहुधा सत्ता व संपत्तीने युक्त असणार्या अहंकारी व्यक्तींमध्ये. म्हणून सौजन्य हे आत्मविकासाला सहाय्यक आहे हे लक्षात ठेवावे लागते.
दुसर्याला सुधारणे शक्य नसते फक्त आपले आपणाला सुधारणे शक्य आहे. आपल्याबाबतीत सत्य काय मिथ्या काय याचा सूक्ष्म विचार करीत गेले असता मिथ्याचार टाळणे सहज शक्य होते.