नास्ति कामसमो व्याधिर्नास्ति कोपसमो वह्निः नास्ति मोहसमो रिपुर्नास्ति ज्ञानात्परं सुखम् संस्कृत सुभाषित sunskritsubhashit

नास्ति कामसमो व्याधिर्नास्ति कोपसमो वह्निः नास्ति मोहसमो रिपुर्नास्ति ज्ञानात्परं सुखम् संस्कृत सुभाषित sunskritsubhashit

संस्कृत सुभाषित रसग्रहण - 

sunskrit-subhashit 

संस्कृत सुभाषित रसग्रहण 

आजची लोकोक्ती - नास्ति ज्ञानात्परं सुखम्।

नास्ति कामसमो व्याधिर्नास्ति कोपसमो वह्निः।

नास्ति मोहसमो रिपुर्नास्ति ज्ञानात्परं सुखम् ॥

                          ~ चाणक्यनीती.

 अर्थ :- कामासमान दुसरा कुठलाच रोग/व्याधी नाही, काम म्हणजे विकार, वासना, विषय भोगाची वासना. आणि मोहासारखा  दुसरा कोणताही शत्रू नाही, क्रोधासमान दुसरा अग्नी नाही आणि ज्ञानासमान समाधन देणारं जगात दुसरं कुठलंच सुख नाही.

नास्ति ज्ञानात्परं सुखम्। इहलोकामध्ये ज्ञानाहून श्रेष्ठ सुख नाही. कारण 'ज्ञान' म्हणजे फक्त भौतिक विश्वाची तसेच अधुनिक विज्ञानाची माहिती देणारी वस्तू नसून, परमेश्वराची ओळख करून देणारी आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी यथार्थ सद्गुरुंनी दिलेली मार्गदर्शक सद्वस्तू होय. म्हणूनच म्हणणे सार्थ आहे की, नास्ति ज्ञानात्परं सुखम्। कारण परमेश्वराला जाणून घेण्याहून, त्याच्या प्राप्तीहून श्रेष्ठ सुख नाही, त्याहून मोठा आनंद नाही आणि त्यापरते समाधान नाही.

उर्दू कवी मोहम्मद उर्फ अल्लामा इक्ब़ाल लिहितो की,

इल्म में भी सुरूर है लेकिन

ये वो जन्नत है जिस में हूर नहीं

       शेराच्या वाच्यार्थावर जाल तर काहीतरी वेगळंच घ्यालं त्याचा गुह्यार्थ पहा. स्वर्गातल्या अप्सरा वगैरेंसोबत राहाण्यात सुख आहे आणि ज्ञानातही आनंद, सुख समाधान आहे आहे पण दोन्हीतला फरक हाच की ज्ञान हा असा परिपूर्ण आनंद देणारा स्वर्ग आहे की ज्यात अप्सरा वगैरे नाहीत. अप्सरांपासून मिळणारे स्वर्गसुख तुम्हाला परिपूर्ण आनंद देऊ शकत नाही, कारण एकदा भोग घेऊनही त्यातून समाधान मिळत नाही. 

वारंवार तो आनंद मिळावा असे वाटते आणि देहभोगातून मिळणाऱ्या आनंदाला प्राप्त करण्याच्या झटापटीत अखेर दुःखच मिळते. याउलट अप्सरा नसलेला ज्ञानाचा स्वर्ग म्हणजे आनंद कारण परिपूर्ण ज्ञान म्हणजेच आनंद होय. ज्ञानसंपृक्तता लाभल्यानंतर दुसऱ्या आनंदाची आवश्यकताच राहात नाही. ज्ञानाच्या प्राप्तीतून लाभणारा आनंद ज्ञात्याला आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य, कवीश्वरबास, महादाईसा, म्हाईंभट यांच्यासारख्या, अशाच अनेक संतसत्पुरुषांच्या अवस्थेप्रत नेतो.   

         नास्ति ज्ञानात्परं सुखम्। माणसाच्या मनाला आणि बुद्धीला ग्रासून त्याला मायाभ्रमाच्या आणि अज्ञानाच्या अंधारामध्ये बुडविणाऱ्या षड्रिपुंपैकी पहिले तीन वैरी म्हणजे काम, क्रोध आणि मोह. यांची नमुन्यादाखल ओळखच चाणक्यांनी वरील सुभाषिताच्या माध्यमातून सर्वांना करुन दिली आहे आणि त्यांच्यापासून सुटकेचा एकमेव मार्ग ज्ञान आहे हे देखील सुचवले आहे.

      वरील सुभाषितामध्ये सांगितल्यानुसार माणसाचा पहिला शत्रू म्हणजे 'काम'. बुद्धीला अंधळा करणाऱ्या,

 वासना, कामना, भोगेच्छा आणि यौनाकर्षण यांना कारणीभूत असणाऱ्या, क्षणात होत्याचं नव्हतं करणाऱ्या कामाने उत्पन्न झालेली मनाची तृष्णा कधीच भागत नाही. खरे पाहिले तर काम या जगातील सृजनाला, प्रजोत्पादनाला अत्यावश्यक आहे आणि म्हणूनच चार पुरुषार्थांपैकी एक गणला जाणारा, मात्र मनुष्य 'काम' या शब्दाला मनोविकारी यौनक्रीयेशी जोडतो आणि त्या आसक्तीत गुंतत जातो. 

मग सुरू होते फक्त कामतृषेची मागणी जी कधीच तृप्त होत नाही. म्हणूनच म्हटलं जातं कामातुरानां न भयं न लज्जा. कामाच्या विकाराने, व्याधीने ग्रस्त झालेला मनुष्य सदैव भोगरत राहाण्याची अपेक्षा करतो म्हणूनच तो शारिरीक व मानसिकरित्या स्वस्थ नसतो, सदैव अस्वस्थ असतो, त्यामुळेच अस्वास्थ्याला जवळ करतो. यासाठीच वरील सुभाषित सांगते नास्ति कामसमो व्याधिः। 

       आता अशा या कामाने ग्रासलेल्या माणसाला हवं ते सहज मिळालं नाही की आपोआपच तो अतृप्तीने तापतो, कोपतो, रागावतो आणि षड्रिपुंमध्ये दुसरा विकार जो 'क्रोध' तो त्याला आपल्या पाशात अडकवतो. क्रोधाने तापलेला माणूस स्वतःसह सर्वांना जाळून नष्ट करण्याइतकी क्रूरता बाळगून असतो. म्हणूनच सुभाषितात पुढील चरण आले आहे, नास्ति कोपसमो वह्निः। 

        असा क्रोधाच्या अग्नीत जळणारा मनुष्य मग मोह नावाच्या शत्रूच्या तडाख्यात सापडतो आणि पूर्णपणे अंध होतो. मग त्याला सुटण्याचा मार्गच उरत नाही. यातून सुटून मनुष्यजन्माचं कल्याण करून घ्यायचं असेल तर एकच मार्ग तो म्हणजे योग्य सद्गुरुंकडून या षड्रिपूंना भेदून जाऊन परमावस्था, परमसुख प्राप्त करून देणारे ज्ञान मिळविणे आणि जन्माचे सार्थक करणे.          

         नास्ति ज्ञानात्परं सुखम्। श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांख्ययोगात म्हणजेच ज्ञानयोगात श्रीकृष्ण भगवंत परमसखा अर्जूनाला हेच सांगतात,

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।

सङ्गात् संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।

स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥

          ~ २.६२-६३, श्रीमद्भगवद्गीता.

      माणूस विषयांच्या नादी लागला की त्याच्याठाई विषयांचा संग उत्पन्न होतो. जो त्याला कामप्रेरीत करतो. कामातुराला पुढे मनाजोगे काही न मिळाल्यास  त्यातून क्रोध निर्माण होतो जो मनुष्याला संमोहित करून संभ्रमावस्थेत नेतो. अशा मोहाने ग्रस्त संभ्रमित माणसाची स्मृती नष्ट होते जी नष्ट झाल्याने बुद्धीचे प्रयोजनच उरत नाही आणि असा बुद्धीनाश झालेला मनुष्य अंततः स्वतःच संपतो, नाश पावतो. ह्या सगळ्या कुटिल चक्रातून मानुष्याची सुटका कशी होते हे जाणून घ्यायचं असेल तर श्रीभगवद्गीतेच्या सांख्य(ज्ञान)योगातील श्लोक क्रमांक ६४ते ७२ समजून घेणे आवश्यक आहे. हे ज्ञान प्राप्त झाले की षड्रिपुंच्या कचाट्यात न अडकता मनुष्य प्रशांत अशी मुक्ती प्राप्त करु शकतो.

          नास्ति ज्ञानात्परं सुखम्। 

संकलन - अभिजीत काळे,         

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post