नीतिशतकम् सुभाषित
neeti shatak subhashits
पराक्रम हा स्वभावजात गुण आहे
सिंहः शिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु ।
प्रकृतिरियं सत्ववतां न खलु वयस्तेजसो हेतुः ।
मराठी अनुवाद - वामनपंडित
छंद :- शालिनी
सिंहाचा जो बाल तोही चपेटा ।
मारी त्याला जो करी मत्त मोठा ।
तेजस्वी जे वृत्ति ऐशीच त्यांची ।
तेथें नाहीं चाड कांहीं वयाची ॥ ३७॥
मराठी अनुवाद :- ल. गो. विंझे
आर्या वृत्त
'सिंहाचा छावाही तुटुन पडे मत्तही गजांवरतीं ।
प्रकृतिच ही शूरांची, अवलंबे तेज कां वयावरतीं ॥ ३७ ॥
श्लोकार्थ - सिंहाचें पिल्लुही, छावा (त्याची शक्ती ती केवढी पण तेजस्विता खुप मोठी असते, ज्यांचे गाल मदानें मलिन झाले आहेत अशा हत्तीवर ही तो छावा तुटून पडतो. हा शूरांचा स्वभावच आहे. तात्पर्य तेज वयावर थोडेंच अवलंबून असते?
विस्तृत अर्थ :-
जंगलाचा राजा सिंह बालकदशेत असला तरी मदाने मलिन झालेल्या विशाल गंडस्थळाच्या हत्तीवरच तुटून पडतो. हा समर्थांचा स्वभावच असतो. पराक्रमाकरिता वय हे कारण नसतेच.
पराक्रम हा मनुष्याच्या ठिकाणी आणि प्राण्यांच्या ठिकाणी असलेला स्वभावजात गुण आहे. तो जन्मजातच असतो हे येथे कवि भर्तृहरींनी सिंह शिशूच्या दृष्टान्त देऊन उलगडून दाखविले आहे.
सिंहाचा छावा कितीही लहान असला तरी तो सिंहाचाच छावा असतो. परिणामी त्याच्या पराक्रमाच्या कक्षा जरी थोड्या मर्यादित असल्या, तरी आकांक्षांचा परीघ मात्र तोच असतो. त्याची मनोकामना सिंहालाच शोभणारी असते. त्याला इतरांनी खाऊन फेकून दिलेल्या, कुजत पडलेल्या मृत प्राण्यांच्या मांसात रस असेल कसा? त्याला स्वतःच शिकार करण्याची ऊर्मी असते व ती देखील लहान सहान असहाय प्राण्यांची नव्हे, तर थेट हत्तीची! तोसुद्धा साधा नाही. ज्याच्या गंडस्थलावरून मद पाझरत आहे असा हत्ती. याच्या शिकारीइतकी आपली सध्याच ताकद नाही वगैरे विचारही त्याच्या मनास स्पर्श करीत नाहीत, कारण पराक्रम हा त्याच्या रक्तातच आहे. सिंहत्वाचा वारसा घेतच तो जन्मास आला आहे. त्याची इच्छाही मग तशीच असणार ना?
खरेच आहे. पराक्रमाला वयाचे अधिष्ठान लागतच नाही. अन्यथा १६ व्या वर्षी चार चार मुगलीसत्तांना आव्हान देत स्वराज्याचे 'तोरण' बांधले गेलेच नसते. पण ते झाले. कारण करणारे हिंदुहृदयसम्राट छत्रपती शिवाजी राजे होते. इतरांसाठी तो अचंबित करणारा प्रकार असेल, पण शिवरायांना वयाची बंधने कुठली असायला? ती सिंहाला नसतात. नरसिंहालाही नसतात.
तसेच कौरवांनी रचलेले चक्रव्युह भेदण्यासाठी रणांगणात उतरलेला अभिमन्यू अवघ्या सोळा सतरा वर्षाचा होता पण त्याने आपल्या पराक्रमाने कौरवांचे बरेचशे सैन्य आटवले.
द्रोण, कर्ण, कृपाचार्य, दुर्योधन, दुःशासन, जयद्रथ यासारख्या महाराज यांनाही त्याने जेरीस आणले शेवटी या सर्वांनी मिळून त्याच्यावर चढाई केली तेव्हाच तो त्यांना आवडला गेला असा भीमपराक्रम करणारा अभिमन्यू आपल्या पित्याप्रमाणेच महापराक्रमी होता तात्पर्य शौर्य पराक्रम हे उपजतच असते.