साधक पाणी शोधून का पितात? शास्त्रीय कारणे mahanubhav panth dnyansarita
पाणी शोधून का प्यावे? शास्त्रीय कारणे
महानुभाव पंथाचे साधक, भिक्षु महात्मे पाणी शोधून पीतात हे जवळजवळ सर्वांना माहीत आहे. कारण, परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्रीचक्रधरस्वामीनी आपल्या साधकांस वस्त्रपरिधान विधीच्या प्रसंगी आज्ञा दिली आहे की, वस्त्र मागून त्याचे सुडे शोधणे करावे असे स्पष्ट म्हटले आहे. श्रीनागदेवाचार्यही स्मृति स्थळामध्ये पाणी शोधून पित होते याचा उल्लेख आढळतो.
स्वतः श्री नागदेवाचार्य पाणी शोधून पीत असत.
दृष्टिपूतंन्यसत्पादम् वस्त्रपूतं जलं पिबेत् ।
( मनुस्मृति अ. ३ श्लोक ६) श्रीभागवत ग्रंथाच्या अकराव्या स्कंधात देखील मनुस्मृतीचा हाच श्लोक आढळतो यावरून पाणी शोधून प्यावे हाच संन्यास धर्म आहे. असे सिद्ध होते.
पाणी शोधून पाण्यांत केवळ अहिंसा पालन करण्याचाच दृष्टीकोण नसून शारीरिक आरोग्यतेचाहि दृष्टिकोण आहे. याला स्वास्थ्य संरक्षणाचा स्थूल नियम म्हणता येईल.
संन्यासी साधक जेव्हां परिभ्रमण करतात तेव्हां भिन्न भिन्न स्थळी जाण्याचा व विजन करण्याचा त्यांना योग येतात, त्यावेळी लहान लहान डबकी व अस्वच्छ नद्या, तलाव इत्यादि अनेक ठिकाणचे पाणी पिण्याचें प्रसंग येतात, ऋतुकालानुसार पाणी बिघडलेलेहि असते, पाण्यांत अनेक जंतू निर्माण होतात. त्यांत काही जंतू रोगवृद्धी कारक पण असतात. त्यामुळे पाणी गाळून घेतले असता सडलेले पदार्थ आणि स्थूल जंतूपासून रक्षण होऊन शरीर स्वास्थ्य बिघडत नाहीं.
गाळून घेतलेल्या पाण्यातील जंतू शक्यतो मरू न देण्याची खबरदारी घेतली तरच अहिंसाधर्माचे पालन होईल. त्याकरिता पाणी शोधण्याचे एक तंत्र आहे. त्याप्रमाणे पाणी शोधल्यास आरोग्य रक्षण व अहिंसा पालन होऊ शकते.
पाणी शोधण्याचा कपडा जाड व घट्ट असावा. त्या कपड्यांत एक ओंजळ भर पाणी थोडा वेळ तरी राहू शकते कारण पाण्यातील जंतू पाण्याशिवाय राहू शकत नाहींत काही जंतू मरणासन्न होतात, याकरिता शोधण्यांत थोडे तरी पाणी राहिलेच पाहिजे.
गळून जाणारे पाणी व त्याबरोबर जाणारे जंतू तर मरत नाहींत. जे अडकणारे पाणी त्याच्या आश्रयाने राहिलेले जंतू राहतात कारण कितीहि कपडा जाड असला तरी ज्यातून पाणी जाते त्यातून जंतू जाणारच.
स्थूल जंतू केर कचरा व मळ हे साचून राहतात. त्यामुळे नारू आदि रोग होत नाहींत. हा लाभ आहे. पाणी शोधण्याचा कपडा जरा लांब व चतुष्कोणी असावा. भिन्न पाण्यातील भिन्न भिन्न जंतू असतात. ज्या त्या आडांत, विहिरीत आणि नदीत ते ते पाणी शिल्लक असलेले एका पात्रांत घेऊन ते पाणी त्या त्या ठिकाणी सोडावे. कारण पाण्याच्या व जमीनीच्या भिन्नतेमुळे एका विहिरीतील प्राणी दुसऱ्या विहिरीत टाकले तर ते वाचतीलच असा निश्चित नियम नाहीं. एकाधे पाणी विरुद्ध असते. त्यामुळे दुसऱ्या स्थळातील जंतू मरण पावतात. म्हणून ज्या त्या ठिकाणचे जळ-जंतू त्या त्या स्थळीच सोडावे. हा नियम आचारशील महानुभाव सांभाळतात.
म्हणून महानुभावपंथीय अहिंसापालन व स्वास्थ्य संरक्षणा करिता पाणी शोधून पीतात हे स्पष्ट लक्षांत येईल.
दंडवत प्रणाम
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹
ReplyDelete