परमेश्वराला शरण गेल्याशिवाय संसारात मुक्ती नाही
ज्ञानाचा विस्तार हा एखादा अथांग व विस्तृत महासागराप्रमाणे पसरलेला आहे. नदीचे मूळ शोधणे किंवा ऋषीचे कुळ शोधणे जसे कठिनतम आहे अगदी तद्वतच ब्रह्मविद्येच्या महासागरातून ज्ञानरूपी मौक्तिके काढणे देखील महत्प्रयासाचे आहे.
मानवी जीवन जगतांना जीवाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, अनेक यातना सोसाव्या लागतात व ह्या संसाररूपी चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी ज्यावेळी मानवी बुद्धिमत्ता असमर्थ ठरते, त्यावेळी त्याला परमेश्वरीय सहाय्याची नितान्त आवश्यकता भासते व त्याचा आधार घेण्याशिवाय गत्यंतरच नसते. त्याक्षणी जीव असमर्थ ठरतो.
जीवन हा सुखाचा पेला नसून कर्तव्यांचे माप आहे. जीवन हा एक संग्राम आहे, व तो जिंकायचा असेल तर तो समरभूमिवर लढूनच जिंकावा लागेल. कुणालाही सहजासहजी विजयश्री मिळत नाही, ती खेचून आणावी लागते व त्यासाठी गरज आहे अथक परिश्रमांची. जीवनातील हेच परमतत्व भगवंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरूक्षेत्रावर सुंदर रितीने विषद केले. ते म्हणतात, “जीवनातील ही कर्तव्ये तू परमेश्वराची अनुज्ञा मानून, कसल्याही प्रकारची फलासक्ती, आकांक्षा न ठेवता पार पाड. ईश्वरार्पणबुद्धीने केलेली कर्मेच फक्त बंधनकारक नसतात. म्हणूनच भगवंत म्हणतात
"यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥” (अ. ९-२७)
अर्थातच जीवनात तू जी परमेश्वरविहित कर्मे करतोस ती सर्व स्वार्थासाठी न करता कर्तव्यभावनेने व ईश्वरार्पण बुद्धीने कर. त्या कर्मांचा कर्ता मी आहे किंवा माझ्यामुळे ते कर्म पार पाडले अशी भावना चुकूनही मनात आणू नकोस. त्याविषयी वृथा अभिमान बाळगू नकोस. कर्म करतांना ते कर्म सत्कर्म असावे, दुष्कर्म असू नये. नाही तर कोणी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी दुष्कर्म आचरेल व ते ईश्वरार्पण म्हणून, त्याने मला मोक्षप्राप्ति होईल अशी भावना ठेवेल तर ती सर्वथा चुकीची व भ्रममूलक ठरेल. ज्यावेळेला कुठल्याही कर्माविषयी म्हणा किंवा कृतीविषयी म्हणा अयोग्य भावना निर्माण होते ती भ्रमित करणारी असते. अशा ह्या भ्रमज्ञानाविषयी साहित्यशास्त्रात एक अतिशय सुंदर श्लोक आहे
"पलाश मुकुलभ्रान्त्या शुकतुण्डे पतत्यतिः ।
सोऽपि जम्बूफलभ्रान्त्या तमलिं धर्तुमिच्छति ॥”
पलाश वृक्षावर एक पोपट बसलेला असतांनाच एक भ्रमर आला. पोपटाची चोच बघून त्याला फुलाचा भास झाला व त्याने पोपटाच्या चोचीवरच मकरंदाच्या रसपानासाठी झेप घेतली आणि त्याचक्षणी पोपटाला असा भास झाला की तो भ्रमर म्हणजे एक जांभूळ आहे व मेहनतीशिवाय मी त्याला खाऊ शकेन कारण ते माझ्याकडे चालत येतेय. अशातऱ्हेने ते दोघेही भ्रमाच्या अधीन होऊन आपापला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात आहेत. ह्या अज्ञानामुळेच त्यांना भ्रम झाला होता. अशाप्रकारचा भ्रम
टाळण्यासाठीच भगवंत म्हणतात आपले जीवन हे परमेश्वरीय देण आहे व 'परमेश्वरप्राप्ति हे माझे अंतिम उद्दिष्ट आहे' असे समजून त्याच्या आज्ञेनुसार वागणे म्हणजे परमेश्वराला समर्पित होणे आहे, अशी भावना ज्यावेळी मनात उत्पन्न होते, त्यावेळी त्याला कुठल्याही कर्माविषयी आसक्ती न राहता केवळ देहाचा व्यवहार चालविणे ही एकच भावना शिल्लक राहते व त्याचक्षणी बंधनमुक्त होन कर्मयोगातून संन्यासयोगाकडे जाण्याचा व आत्मोद्धार करण्याचा त्याचा मार्ग सुकर होतो. असे हे परमेश्वरस्वरूप अनंत, अगाध आहे. त्याच्या ज्ञानानेच मोक्षप्राप्ति संभव आहे. म्हणूनच तर ते ज्ञेय तसेच ज्ञानगम्य आहे. ज्ञानगम्य अशासाठी की ते केवळ ज्ञानशक्तीने जाणणे शक्य आहे. असे हे ज्ञेय व ज्ञानगम्य परब्रह्मस्वरूप
“हृदि सर्वस्य निष्ठितम् ।”
म्हणजेच सर्वांच्या हृदयात वसलेले आहे. विचारशील मानव ज्ञानप्राप्तीनंतर परब्रह्म परमेश्वराचा अनन्यभक्त बनतो व त्याआधारेच तो परब्रह्मभावाला म्हणजेच त्याच्या स्वरूपप्राप्तीला पोहचून मुक्त होतो. मुक्तीसाठी त्याला भक्ती करणे, परमेश्वराविषयी ओढ व तळमळ असणे आवश्यक आहे. भक्ती, जी जीवनाशी निगडित असलेली गोष्ट, जीवनाचा अविभाज्य अंग आहे. जीवनात भक्ती नाही अशी व्यक्ती असणे विरळीच. कोणावरच व्य भक्ती नाही असा माणूस सापडणे कठिण. हं! त्याची भक्तीस्थाने मात्र निरनिराळी असू शकतात. मला वाटत, भक्ती हा एक जीवन-व्यवहार त आहे. फक्त त्याची पुष्टता कुठे असावी, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो एक जीवनव्यापी, जीवनस्पर्शी प्रवाह आहे. माणसाच्या
विकासावर, हा प्रवाह त्याला कुठे नेऊन पोहचवणार, हे अवलंबून असते. म्हणूनच ह्या प्रवाहाला वेळीच योग्य वळण देणे अपरिहार्य आहे. तो तुम्ही जसा वळवाल तसा वळेल. कुणी कर्मप्रवाहाला तर कुणी ज्ञानप्रवाहाला स्पर्शन आपले उद्दिष्ट गाठण्याचा प्रयास करतात, तर कुणी चित्तशुद्दीने, नि श्रद्धेने व प्रेमाच्या उपायांनी उद्दिष्टाप्रत आगेकूच करीत असतात. ही वाट काटेरी आहे, जी एकट्याने पार करणे कदापिही शक्य नाही. त्यासाठी कुणाच्यातरी सहाय्याची नितांत गरज असते आणि तोच कुणीतरी म्हणजेच नि “अलौकिक परमेश्वर." म्हणूनच एका भावगीतात म्हटले आहे
“संसार, सागर छे, एकले तराय ना।
ईशनी सहाय्यविना, पार उतराय ना ॥”
अर्थात - हा संसाररूपी सागर एकट्याने तरल्या जाऊ शकत नाही व ईश्वराच्या सहाय्याशिवाय तो पार होऊच शकत नाही. सर्वश्रेष्ठाची कास पकडल्याशिवाय तुमचे पाऊल देखील पुढे पडणे शक्य नाही. आपले मन व बुद्धि सर्वार्थाने त्याला अर्पित करा व नंतर बघा की तो कसे हळुवारपणे एखाद्या कोमल पुष्पाप्रमाणे जपतो तुमच्या केसालाही धक्का लागू न देता.
परमेश्वराची दशी पकडण्याइतपत तरी तुम्ही हात पुढे करा, बाकी परमेश्वर सांभाळतो. परंतु अज्ञानी जीवाची तितके करण्याचीही तयारी नसते. अविद्येमुळे तो संसारचक्रात गुरफटलेला असतो. हा संसारसागर पार करून आपले उद्दिष्ट गाठायचे असेल तर सुखदुःखात अविचल रहायला शिकले पाहिजे.
"मोक्षकारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयसि।” त्यासाठी गरज आहे, नितांत भक्तीची, अपार श्रद्धेची व हिंमतीची. कारण हिंमतीशिवाय सुख पचवता येत नाही आणि दुःख देखील सहन करता येत नाही. ही हिंमत त्यालाच प्राप्त होते ज्याला ईश्वरावताराचे भजन घडून तशी अधिकार निष्पत्ति होते. अध्यात्मात हिंमतीची गरज ह्यासाठी आहे की आपल्याला परमेश्वराचे शाश्वत धाम गाठायचे आहे - अक्षर, अढळ, अक्षुण्ण।
"यद्गत्वा न निवर्तन्ते, तद्धाम परमं मम।"
म्हणूनच जे मोक्षाची इच्छा करणारे मुमुक्षु जीव आहेत ते आत्मविवेचनात मन केंद्रित करतात, व परमेश्वराच्या अविनाशी पडला पोहचतात. एक गोष्ट तर सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की, परमेश्वराच्या अनन्यभक्तीशिवाय अविनाशी पदाची अपेक्षा व्यर्थ आहे आणि अनन्यभक्ती करायची तर संन्यस्तवृत्ती आचरणात आणणे पर्यायाने आलेच. संन्यस्त नव्हे तर राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह ह्या सर्व मनोवृत्तींचा त्याग करणे, अर्थात् त्यांचा न्यास करणे, सोडणे व संयमन करणे. हे आचरणात आणणे किती कठिण आहे हे त्या मार्गावरील प्रत्येकालाच माहित आहे. म्हणूनच आपल्या अंतरात सर्वप्रथम भगवत्प्रेमाची आस निर्माण झाली पाहिजे, त्याची आवश्यकता वाटली पाहिजे, तरच ईश्वरासक्ती वाढेल. या आसक्तीतूनच भक्ती वाढेल. ज्याविषयी आवश्यकताच वाटली नाही तर आसक्ती कशी वाटणार? व आसक्ती वाटली नाही तर तिथेच पुढच्या प्रगतीचा मार्ग खुंटतो. ही आसक्ती तरच ह्या अंध:कारमय वाटेवर परमेश्वरीय ज्ञानाचा व प्रेमाचा दीप आपण शोधतो व त्या दीपाच्या प्रकाशात वाट शोधत राहतो. जन्मापासून आतापर्यंत जे जे काही मोहक, रमणीय, सुखद, चांगल अनुभवतो, त्याचा नीट विचार केला व त्यात आपला हिस्सा, अधिकार किती व परमेश्वरीय सहाय्याचा व त्याने योजलेल्या दातृत्वाचा भाग किती, ह्यांचाही विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, ह्या चक्रव्यूहातून सोडविणारी शक्ती फक्त एकच आहे, “परब्रह्म परमेश्वर.” प्रत्येकाला हवे असतात त्याचे मुक्तपणे देणारे हात. जे त्याच्या दयाळूपणामुळे व कृपाशीलतेमुळे मिळतातच पण जो जीवाच्या आकांताने त्याच्या भेटीसाठी, प्राप्तीसाठी तळमळतो ना, त्याला इतरांबरोबर ते हात तर मिळतातच, पण त्याही पलिकडे जावून जी मिळेल ना ती शक्ती, कुवत. त्यासाठी केलेले श्रम असतात आपले व फळही आपलेच व ह्या फळाचे सुख उपभोगायचे असेल तर आपले मन भगवत चरणी लीन करावेच लागेल. त्यासाठी भक्ती-वृत्ती वृद्धिंगत करावी लागते. भगवंताशी नित्य युक्त असावे लागते. भगवंताचे साहचर्य प्राप्त करण्यासाठी बुद्धी दृढ ठेवली तरच त्याच्याविषयी आत्मीयता, ओढ व आकर्षण निर्माण होईल. त्याच्या निकटत्वाविषयी ममत्व वाटेल. त्याला निवेदन करा
“पुण्योऽहं तव दर्शनात् ।”
हे भगवन् तुझ्या दर्शनानेच मी पावन व पुण्यशाली झालो. भगवंताच्या अस्तित्वाची तुमच्या अंतःकरणातील जाणीव जितकी दृढ होत जाईल तितकीच भक्तीला परिपूर्णावस्था येईल. संपूर्ण जीवनातील केवळ एक
लहानसा भाग ईश्वरार्पण केल्याने नव्हे तर चिरंतन तिन्ही त्रिकाळ अंतःकरणपूर्वक नामस्मरण केल्यानेच फक्त परमेश्वराच्या विभक्तीचे भक्तीत क्षणार्धात परिवर्तन होते असे दृढ व्रतधारी भक्त म्हणजे
“येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्माणाम् ।
ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥” (अ. ७-२८)
जे लोक राग, द्वेष, काम, क्रोध, क्षुधा, पिपासा, शीत-उष्ण आदि सर्व द्वंद्वापासून मुक्त झाले, ते सुसंस्कारी जीव ज्ञान संपादून दृढ असिधारा व्रत धारण करून परमेश्वराचे चिंतन करतात त्या सर्व प्रेमार्त, भुकेल्या भक्तांचे विश्रामस्थान व अंतिम गती म्हणजे श्रीकृष्णाचे साक्षात परब्रह्मस्वरूप आणि म्हणूनच हे परमेश्वरा
“केलियाविण संकल्प, तव भक्तीचा ।
संदेह न फिटे मम, सर्वथा मनाचा।।
कर्म तुझे ठायी, तेचि माझी पूजा।
बोलणे जे माझे, तोचि माझा जप ॥
अहर्निश असो मज, तव प्रेमाची आवडी ।
वाया न जावो माझी, स्मरणाची अर्धघडी।
अनन्यशरण असे, तुज मी अनंता ।
आधार देई शेवटी, सर्वस्व तुज अर्पिता।
निरंतर वसो वाचे, नित्य तुझे नाम।
तेणेच हरेल माझ्या, अनंता जन्मांचे श्रम ॥”