प्राचिन मराठी कविता रसग्रहण -
टिळकांची कविता - tilakanchi kavita 001 knowledge
नारायण वामन टीळक यांच्या कविता -
कविता क्रमांक १
कवि आणि रसज्ञ.
दृष्टीविना दृश्य करील काय?
चैतन्य जे त्याविण रम्य काय?
रसज्ञ हो! काय तुह्मांविना मी
करूं जगी घेउन काव्य नामी ?
कमला रवि, चंद्र चंद्रकान्ता,
जल मीनाप्रति, वाक्प्रवाह अर्था,
कवितेस रसज्ञता; न झाली
क्षणही ही कधिं युग्मकें निराळी !
फुलले नवकाव्यपुष्प बोले
रसिकाला, विरहे विषण्ण झाले,
"कर जा तुजला रुचेल जे तें,
पार ये ये ! मज तोड ! ने गृहातें!"
नच भी, परि सिद्ध कुंतनातें
लंतिकेचे विसरून सर्व नाते;
न असें, तार ती रसें विहीन
फुललेली कृतका कळी सुदीन!
=========
कविता क्रमांक २
कवीची विनवणी.
[चाल-त्रिखंड हिंड्डुनि धुंडितसें. ]
पहा! उघडिले हृदयाला, यांत
सुखें घाला भाला !
कोमल, कौशल्ये नटला कर तुमचा
जरि किति असला,
तरी तयाने
माझी कवनें
जरा स्पर्शणे
सहन न होणे कधिं मजला!
याहुन जीव बरा गेला! 1
कारण, कवनें नच माझी,
नच तुमची, मी गातों जी;
हीं निःश्वसितें
कोण सोडितें
मम हृदयीं, तें
विचारुनी, भिउनी त्याला
पुढे करा मग कर अपुला. 2
रंग नभाचे कसे तरी, कसे तरी ही
मजा खरी ।
किती आपुली
फुले उमलली,
कुठे लटकली,
चिन्ता नच ही वेलीला,
सुन्दरतेची ही लीला! 3
वन्दा, निन्दा ! परि दुरुनी!
पवित्र ही कवितारमणी;
हात जोडितों,
पदर पसरितों,
दन्तीं धरितों
तृण, चुम्बीतों चरणाला!
नका शिवू मम कवनाला! 4
कविता क्रमांक ३
कवि
न कळे कोठुन होते लतिकेच्या ठायिं पुष्पपरिपूर्ति,
न कळे केव्हां कैशी होते कविच्या मनाप्रति स्फूर्ति.
न कळे कोठुन येती द्विजराज नवे वसंतकालीं ते,
न कळे कोठुन येती धांवत नव शब्द भेटण्या कवितें.
न कळे कोठुन येतें शोभा द्यायास हास्य अधराला,
न कळे कोठुन येतो प्रसाद कविच्या नवीन काव्याला.
तारांगणिं कवि खेळे, चंद्रासह करि
विनोदहास्यातें,
वाणी प्रेमानंदें चुंबी त्याच्या प्रसन्न आस्यातें.
बोलति फुलें तयासह, पक्षी करिती अनेक
गुजगोष्टी,
'ये काढ चित्र माझें'-सांगे त्या
कामरूपिणी सृष्टि.
येतां पूर नदीला थांबे तो काय दोन हातांनां ?
ऐसा कोण ह्मणे जो थांब कवीला स्वकाव्य गातांना!
आलाप कोकिलाचे इतुक्या कालांत जाहले इतुके,
निर्झरगान गणावें कोणी वर्षांत जाहलें तितुकें.
घटपट खटपट झटपट लटपट ऐशा उगाच शब्दांतें
जुळवाया कवि, न परी नरकपि खर्ची
अमूल्य अब्दांतें.
वर देवदूत बसले कविहृदयाच्या धरून कीलातें,
नाचविती करवीती कविवाणीच्याकडून लीलांतें.
याचा गर्व कशाला ? बोलविता तो धनी निराळा
हो!
कविच्या द्वारा रसिकां काव्यरसाचा करून दे लाहो.
कविता क्रमांक ४
'तुमि कवी, भिकारिण मी हो तुमच्या
दारी !'
असें ह्मणणारीसःप्रसाद आहे, प्रतिभाहि आहे,
प्रेमौष गानांतुन नित्य वाहे;
निगूढ सारे दिसते, परन्तू
येईल बाहेर ! धरी न किन्तू.
प्रकाश तिमिरांतुनी हळुहळू पुढे धावतो,
प्रसन्नपण लोक हा निरखुनी जया पावतो;
ह्मणे सकलिकां " उठा!"
हृदय तो तुझें व्यापितो,
खरोखरच तूं उषा ! दिन तुझ्यापुढे खेळतो!
अजून हृदयींच जी लपवुनी धरी चारुता,
हंसे खदखदा न, जी करि परन्तु
मन्दस्मिता;
न ठाऊक अलींप्रती उमलण्या जरी लागली
सुरम्य कळि तीच तूं ! सरसता तुझ्या पावलीं !
भरी श्वसन वाग्वधू मुरलिमाजि में, ते जगा
क्षणांत भुलवील गे! मम न बोल हा वाउगा;
खरीच कवयित्रि तूं ! हृदयिं गे तुझ्या गायनें
सदैव भरली सती! जरि न आयकीली जनें.
कवीश ह्मणशी मला, ह्मण खुशाल तूं कौतुकें
!
तुझी अनुरती पतीप्रति ह्मणेल तें तें निकें !
असंस्कृत, परन्तु तूं अतुल रत्न मी
जाणिलें ।
नको नवल मानुं की तुज यथेच्छ वाखाणिलें!
-----------------
कविता क्रमांक ५
कवीचें उद्यान.
[चाल- त्रिखंड
हिंडुनि धुंडितसें. ]
स्वर्गी जाउन पहा बरें, सांगा येउन मात्र
खरें!
कविच्या उद्यानाऐसे, नंदनवन तरि काय
दिसे ?
मधु गंधाचे
मधुर रसाचे,
सुंदरतेचें,
निधान हे विश्रामाचे
सुखशांतीचे, प्रेमाचे !,
जगी जरी ठायीठायीं पायधूळ झाडुन येई,
तरी शारदा आनंदी इथें रमे वीणानादीं;
हा शर्वाचा
हा विष्णूचा,
हा ब्रह्मयाचा,
लोक, पुराणे वदताती,
इथे शारदा परि वसती !
करील का तो कधी तरी - भावतरूची
बरोबरी ?
कल्पतरू मोठा ह्मणती, देवासम त्यास पूजिती,
सृष्टिंत नाहीं जे, तें देई
प्रसन्न राही सदैव हा ! नलगे पूजा;
पुसा कवीच्या वृत्तिस,- जा!
हा इकडे अनुरागतरु,
वर्णन याचें केविं करूं!
गोड फळे याची अमृता
करितिल हो चोथा नुसता!
छाया याची
जननी साची
शमदम यांची,
भवतप्ताची मधु मात्रा,
व्यर्थ भैषजें जगिं सत्रा !
जागजागिं पुतळे दिसती,
तक्षणपाटवसीमा ती!
हरिती विषयान्तरमनना,
अपणांसम करिती नयनां !
ही हास्याची,
ही अधूंची,
ही दोहींची!
तीन वल्लरी पाहुन घ्या !
जगी अशा नसती अवघ्या !
स्वयें शारदा जीवरती
लुब्ध अशी रससंपत्ति
ज्यांत सांठली पाट दहा
ते या उद्यानात पहा!
भिन्न वनस्पती
भिन्न यांप्रती
रस अर्पिती;
असे पाट कोठे दुसरे ? उपवन कविचे थोर
खरें!
ही कारंजी किति उडती 'स्फुरणे' यांनां कवि ह्मणती;
केलें मिश्रित रंगांनी भिन्न भिन्न यांचे पाणी !
ह्मणाल कोणी
द्रव्य कुठोनी
निर्धन आणी "
कवी ?" तरी लक्ष्यांत धरा
धनी कवीसम नच दुसरा !
स्वर्गी लभ्य न अमरांला! कशास पुसणे भूपालां?
असली झाडें कवि आणी, लावी अपुल्या
उद्यानी!
पक्षी गाती,
मोर नाचती,
मत्स्य खेळती,
विनोद नामक कासारी,
स्वर्गातिल येथे वारी!
पुन्हा एकदां ह्मणतों मीः
जरी कुणी दर्शनकामी
त्याने तार येथे यावें
सुखें शारदे भेटावें !
पावुन तुष्टि,
ही नव सृष्टि
कविच्यासाठी
हिने निर्मिली; मंदिर हे
आपुलें मनिं गणिलें आहे !