वनवासी फूल टिळकांची कविता - प्राचिन मराठी कविता रसग्रहण vanvasi phul tilakanchi kavita 002 knowledge

वनवासी फूल टिळकांची कविता - प्राचिन मराठी कविता रसग्रहण vanvasi phul tilakanchi kavita 002 knowledge

प्राचिन मराठी कविता रसग्रहण

टिळकांची कविता -  tilakanchi kavita 002 

कविता क्रमांक ६

 वनवासी फूल - vanvasi phul

मनांत किंवा जनांत किंवा वनांत सृष्टिसतीचा

मित्र खरा, जो निधीच केवळ निष्कामप्रीतीचा;

सदा कौतुका करी तियेच्या बाप जसें कन्येचें,

दिसो कशीहि, गोड करोनी दावी रूप तियेचें;

कामरूपिणी सृष्टी ज्याच्यापुढती लाजत नाही,

सदा हांसते तोष पावुनी ज्याच्या मधुवचनांहीं;

शास्त्रज्ञांच्या, तत्त्वज्ञांच्या पलीकडे संचार ,

दिक्कालाने अप्रतिहत तो ज्याच्या स्वैरविहार;

सप्त लोक, वा सप्तशत ह्मणा, सारे सांठविलेले

अन्तःसृष्टीमधे जयाच्या, तेथुन उदया आले !

आजउद्या हा भेद न ज्याच्या दिव्य विचारोच्चारां,

परमेशाने स्वयें निर्मिला सर्वरसांचा थारा;

जसे वसन्ता नवे नवे द्विज तैसे नित्य जयाला

वाग्देवीचे दूत शब्द हो आतुर सेवायाला.

विचारसागर, रम्य कल्पनालहरी उसळति जेथें,

अनर्घ्य, निर्मल वाङ्‌मुक्तांस्तव मोहक ज्यातें त्यातें;

असा एक कवि, देहीं ज्याच्या चैतन्यासह कविता,

निर्जन रानी सहज एकला पावे फिरता फिरतां ।।*।।

तेथे पाही फूल नवें,-जें कधिं न पाहिले पूर्वी;

वदे कवी, की, 'धन्य जहाली याच्यायोगें उर्वी! '

जनांत किंवा वनांत किंवा नभांत सुमनें सारी,

पायांखाली फुलेंच सारी, कमलें हृत्कासारी.

मुलें ह्मणा, वा फुलें ह्मणा, वा नक्षत्रें, मणिराशी,

ह्मणा भावना, नांवें योजा जयास रुचती जैशी ! :

परन्तु कविची फुलेंच अवघीं ! या अवघ्यांची माला

कविच्या हृदयीं रुळे सर्वदा ! सदा रञ्जवी त्याला !

जिकडे तिकडे फुलें, सुगन्धे विश्व कोंदुनी गेलें,

कविरायाला नन्दनवन हे जग अवघे झालेलें !

वन्य फुला त्या बघुनी पार तो वेडावुन कवि गेला,

इतर विषय विसरला पुरा तो क्षणांत तन्मय झाला.

--------------------------------

निर्झर धरितो ताल, धरीतो सूर वंश, पिक गातो

काव्ये कविची, उत्साह बहु केकी नर्तन करितो!

जड इतरांनां मुग्ध वाटती पदार्थ, देही ते ते

मित्र बोलके कविचे अवघे परमसुखाचे दाते!

कोण असा जो दर्शन कविचे घडतां हांसत नाही !

बोलत नाही ? डोलत नाही ? प्रेमें नाचत नाही ?

गाती पक्षी कविगानाचे प्रत्युत्तर मधु देती,

वृक्षलतांची श्रेणी वाणी त्यासह गोड वदे ती.

जातां जातां झरा कवीला पाहुन कुशल विचारी;

फार कशाला ? तृणे तयासह रमती दीन बिचारी !

असो; पाहुनी येतां जवळी कविला सुम तें बोले:

"या, कविराया!" क्षणामधे ते घरचे जैसें झालें!

व्याज न जेथें, नसे वक्रता, उपचारांची पीडा,

स्वभाव ऐसा विदित जगीं जो ग्राम्य, वन्य, वा वेडा !

दैवी पार हा स्वभाव लाधे देवदयेनें मात्र,

नाहीं जगतीं यासम दुसरें कांहीं वन्दनपात्र !

वन्य सुमें त्या निजस्वभावा अनुसरुनी त्या कविचें

स्वागत केले, कळे न हरिले आपण चित्त तयाचें !

"आलों, आलों!" ह्मणत कवीश्वर अत्युत्कण्ठित जाय

हात पसरुनी, आत्मसंयमी झाला क्षीणोपाय !

परन्तु, सुम तें तया भासले दचकुन सरलें दूरी !

मनी खोंचला! की,-ऐसें तें रसिकवरा धिक्कारी!

पुन्हां ह्मणे, की, “ स्वागत केलें किती आदरें माझें !

सुशील सुम हे; परि माझें मज वर्तन मुळी न साजे!

प्रथमदर्शनी हात पसरुनी धावत पुढती गेलों,

फुला! तुझा नच दोष ! मीच रे पुरता वेडा झालों!"

दोषांचेही गुण करणारे प्रेम, तयाचा भेला

कवि तो कोठुन दोषायाला प्रियकर वन्य फुलाला !

जाता तेथुन तसाच परतुन,-अरसिक जरि तो होता,

परि त्या रसिका कोठुन कळणे मानखण्डना आतां !

उलट तयाचा प्रेमा वाढे अनल जसा अनिलानें;

अधिक तयाला जवळ ओढिलें सुमनें, धिक्काराने !

पुन्हां पुष्प तें हासुन वदले ‘‘बसा दुरूनी बोला !

योग्य न शिवने-जगदीशाला अर्पित झाले त्याला !

दो दिवसांचे जीवित माझें दिधलें मीं परमेशा,

ध्यावे त्याला आहे तोवर, अन्य नसे मज आशा !

मला समजले, रसज्ञ आपण मित्र फुलांचे लोकी,

यास्तव अपुलें स्वागत केलें, श्रम अपणां दिधले, की.

कवीश आपण, ओळखिले की भक्तिरसाचे सिन्धु !

वनवासी मी, द्या मज दीना दोनचार तार बिन्दु !

बसा घडीभर, परमात्म्याला आपण दोघे गाऊं,

भक्तिरसाचें अनुपम, रुचिकर, बलकर भोजन सेवू.

याहुन दुसऱ्या आतिथ्याची नको कल्पना येथे,

मान्य करुन घ्या कृपा करोनी या दीना साधे तें!"

प्रेमोर्मी मधु, असंख्य, मृदु मृदु, कविच्या हृदयीं उठती,

नयनी, गाली, अधरी येउन हळूच त्या आदळती.

प्रेमयोगनिद्रेच्या घेई क्षणैक तो उपभोगा,

दचकुंनि किंचित् पुन्हां जहाला स्वयें कवीश्वर जागा.

हांसुन बोले त्या सुमनाला " पवित्र जगिं तूं साचें !

वैराग्याचे निधान दिसशी मजला भक्तिरसाचें !

परन्तु जातें वनांत तव हे यौवन मित्रा वायां,

ज्ञाते ह्मणती जन साधन हो पुरुषार्था साधाया.

निर्जन रानी जेथें न दिसे एक सख्या ! फुलझाड,

उच्च शाल्मली, देवदारु, वट, पिंपळ, दिसती ताड.

तुझ्याभोवती क्षुद्र वनस्पति माजुन तुज नाहींसें ।

करावयाला झटती,- गगनीं नक्षत्रा धन जैसे.

कधीं न येथे आला वाटे भ्रमर फुलांचा भोक्ता,

मजविण इतर न तुला भेटला दिसे गुणांचा ज्ञाता !

"तूं येथे हे कुणा न ठावें, नाही तर भ्रमरांच्या

झुंडी येत्या धांवत कविच्या स्वर्गातुन रसिकांच्या !

सर्व अप्सरा, किन्नर सारे धांनुन येथे येते,

सख्या फुला ! तुजमुळे हाच रे दुसरा स्वर्ग करीते !

कोमलता ही, रङ्ग तुझा हा, हास्य तुझें हें नामी,

सौरभ तव हा, पुरे ! मजसवें चल सखया आरामी !"

"उद्यानीं मम नाश निश्चयें !" ह्मणे कवीला फूल "

वयें तरुण तूं परी अनुभवें दिसशी अजाण मूल !"

वन्य पुष्प तें निस्पृह पुरते जगास सोडुन बसलें,

नवल कशाचे त्या मान्याला अवमानुन जरि बोले ?

'आपण' सुचवी प्रथमदर्शना, 'तुझी' परिचयालागी,

"तूं' सुचवीते दोघे झाली पूर्णपणे अनुरागी!

कळो फुलाला, न कळो अथवा, तथापि हा क्रम साचा

ओळखुनी, कविहृदय घे नवा अनुभव उल्हासाचा.

पुन्हां ह्मणे सुम " सारा स्वार्थी मर्त्यलोक हा आहे!

दर्शन राहो दूरच ! याचे नांव न मजला साहे!

थर थर थर थर पंख कांपती, उरलें नाहीं भान,

पुष्पी रत मधुपास भासतें पुष्पच पञ्चप्राण!

स्वार्थाचे हे अवघे चाळे ! अमुची वेडी जात!

भ्रमराचे मज नको पहाया मुख साऱ्या जन्मांत !

ज्या ज्या सुमनी रमेल तें तें तितक्यापुरतें त्याचा

जीवच ! परि हे प्रेम न; सगळा लोभ नवीन रसाचा !

नित्य करावें पुढे पुढे, मधु गाणे गावें, न्यावें

लुटून सुरसा, परी शेवटी ओळख विसरुन जावें !

कोण अशांच्या पाशामध्ये पडेल सांग शहाणे ?

योगी ह्मणती यास्तव, की, 'सुख दूर वनांत रहाणे!'

भ्रमर एकला मात्र नीच नच, परि जग सारें नीच!

निश्चय झाला मम, की जगतीं निवास ही हानीच !

फळे तोंवरी द्विजरायाचे गायन चाले वृक्षीं !

सरतां ती परि, परके होती वृक्ष आणखी पक्षी!

कार्य साधितो तोवर मिळती आशीर्वाद घनाला,

थोडा चुकतां शिव्याशाप मग नकोनकोसे त्याला !

"शितें तोवरी भुतें भोंवतीं' ह्मण ही साधी भारी,

परि अनुभूती सकल बुधांची हीत ओतिली सारी!

जगीं चहुंकडे स्वार्थ, नीचता, मूर्खपणा, अभिमान !

हार ह्मणोनी सापासाठी कोण पुढे करि मान ?

" उषा आणि मी परस्परांनां बघतां सस्मित होतो,

या प्रेमाचा अनुभव जगतीं कोठुन दुसरा हो तो!

दर्शन माझें हाच लाभ तिज, सद्दर्शन मज लाभ,

कधिं न ठाउका स्वार्थे केला अमुचा चित्तक्षोभ.

कोठे दिनकर, दीन कुसुम मी कोठे ! तरि कुरवाळी

सर्व उग्रता सोडुन मजला, कन्येसम सांभाळी!

दिशादिशांनां सौरभ माझा वाहुनि वारा नेतो,

नको नको मी ह्मणतां कुतुकें यश माझें पसरीतो!

सृष्टीही हिममि मनोहर नव मोत्यांची जाळी घाली

मजवर ! सजवी मजला ! माय तशी प्रतिपाळी !

सोडुन असले मित्र निधी हे निष्कामप्रेमाचे,

धूळ जगाची माथां घेणे कोण ह्मणे कामाचें ?

गायन ऐकुन तुझें वाटलें ज्ञाता तूं कविराज,

परी जगासम तूंही मोहित मोहक, समजे आज!

सुन्दर विषफल दिसे वरोनी,-जग हे केवळ तैसें !

तुज विषकृमिला पीयूषाचे निधान फल हे भासे!

जा ! जा ! जा ! जा! जा रम जगतीं, उद्यानी वा सदनी !

बुद्धिभेद मम करूं नकोरे असल्या मोहक वचनीं !"

-------------------------

विस्मित होउन उगाच कवि तो फुलाकडे त्या पाही,

जेथें प्रीती, तेथें आशा, क्षमा सर्वदा राही.

'काल जन्मल्या या पुष्पाला अनुभव काय जगाचा ?

आयकिलें तें खरें समजुनी बोले असली वाचा.

रागावांचुन सम्भव कोठुन वैराग्याचा झाला?

काय उपजतां जग हे वाइट दिसलें या पुष्पाला ?

नैसर्गिक ही बुद्धी असली कुठेच जगतीं नाही,

स्वर्ग जगाला गणिती बाळें मानुष इतरें पाहीं!

अनुभव या सुमनाने कथिले पुष्कळ, परि ते सारे

इतरांचे; नच याचे; हे तों अनुभवहीन बिचारें!

दीर्घद्वेषी या सृष्टीचा कोण असा आराति

यास भेटला अपकारप्रिय, अरसिक, निर्दय, कुमति !"

प्रश्न असे निजमना विचारी, परन्तु नच पुष्पाला;

कोमल फुल तें प्रत्याघाता योग्य न, ठाउक त्याला.

मानसशास्त्रीं पूर्णविशारद सहज कवीची जाति

कुसुमांवरती तशांत त्याची अमोघ, विमल प्रीति.

सस्मित होउन पुनरपि बोले मञ्जुल वचनीं सूरी,

त्या सुमनाचें कठिण सर्वथा रुसलेलें मन हाशी.

न लगे व्हाया बुद्धिभेद, हा पुरवे येथुन गेला,

ह्मणे पुष्पमन; तेच भुकेले तद्वच ऐकायाला !

'नको नको!' त्रासून ह्मणावें; परन्तु ध्यावे द्यावें;

हे प्रेमाचे लक्षण नाही कुणा प्रेमला ठावें ?

ह्मणा कवीला जा येथोनी, हांकलून द्या पाहूं,

करा प्रतिज्ञा तद्वचनांनां होउन बहिरे राहूं!

तरी तयाच्या वाणीसाठी केवळ वेडे व्हाल !

बघाल नच मुख ज्याचे त्याच्या खुशाल मागे जाल !

प्रभाव ऐसा कविवाणीचा, तेथें फूल बिचारें ।

काय करिल तें ? ऐकुन घेई कविचे भाषण सारें.

----------------

ह्मणे कवी "तूं, मीही होइन विशीर्ण एके दिवशीं,

निवास येथिल विवास केवळ सुमना तुजशी मजशी !

तथापि जगता परके व्हावें, जाउन दूर रहावें,

या शीलाला कसे कळेना सज्जनशील गणावे ?

भ्याडपणाचा, स्वार्थाचा वा परमावधि हा होय;

अशा नराचा मृताहुनीही मृत झालेला काय !

क्षणभंगुर वय, त्यांत फुला ! हे यौवन दो निमिषांचें,

एकवार तनु वाळुन जातां धरेस ओझें हीचे !

वृक्षलतादिक परोपकारास्तव येती जन्माला;

नद्या वहाती; अम्बुद गळती सुख द्याया लोकांला.

कृतघ्न हे जग, जें तें स्वार्थी, यांत न शङ्का कांहीं!

परन्तु तेणें प्रीतिकरांची प्रीती सरली नाही

ताडन, घर्षण, अग्निनिवेशन यांनां स्वर्ण न भ्यालें,

परन्तु यांहीं तेज तयाचें जगांत मान्य जहालें!

जों जो होई छिन्न छिन्न तो मधुर मधुर हो ऊंस,

शिव्याशापही साहुन जगती फलद करी पाऊस ,

शरीर झिजवुन चन्दन देतो परदेहाला शान्ति,

स्वयें सोसुनी ताप तरूत्तम दे इतरा विश्रान्ति !

कधिं दगडांच्या, कधिं काष्ठाच्या, कधिं शस्त्राच्या मारा

सोसुन तरुवर देई इतरां अपुल्या मधुफलभारा !

फार कशाला ? अन्यहितास्तव खांडे खांडें होतां

निजदेहाची तीच धन्यता वाटे तरुच्या चित्ता !

ती खांडे जरि अग्निंत गेली तरी तयाला काय ?

"शीत निवारी परक्याचे हा धन्य' ह्मणे तरु 'काय !'

भूगर्भस्थित हीरक सोडुन निवास बाहिर यावा,

स्वार्थिजनाच्या करांत जावा, शाणोल्लीढहि व्हावा,

कधी कुधीच्या, कधी सुधीच्या हातामध्ये यावा,

परन्तु त्याला नित्य घडावी जगामधे जनसेवा;

याविण त्याच्या त्या कान्तीचा हेतु न दुसरा कांहीं !

परमेशाचा नियम हा असा अभेद्य विश्वीं पाहीं.

--------------------------

"तुझी प्रियसखी उषा तियेला विचार पुष्पा, जा जा !

परोपकारा सोडुन करिते अन्य कोणत्या काजा ?

तुझ्याकडे ती मात्र पाहुनी हंसते, तुज हांसविते

असें न; जगता उद्बोधित ती करिते, प्रसन्न करिते.

दिनकर सुमना! तुझाच केवळ नाहीं, परि जगताचा;

तुला न ठावें वियोग पळभर नाहिं जगाचा त्याचा !

नित्य सेवितो जगास तेणें विसरुन तत्कार्याला

किती वन्दिती, किती मानिती जगदीश्वरही त्याला !

स्तुत्य खरी निष्कामप्रीती अनिलाची तुजवरती,

परन्तु वांटेकरीण हीची सुमना! अवघी जगती.

जननी सृष्टी तुझी न केवळ, अमुची परि सर्वांची;

जगास सोडुन बसली नाहीं यांत मती एकाची.

तुला सांगतों, प्रिया प्रसूना! ह्मणशी तूं जी भक्ति,

भक्ति न ती रे, परि परमेशी स्वार्थास्तव आसक्ति !

जगदीशाच्या निन्दुन कृतिला स्तोत्रं त्याला गावीं,

निर्दय होउन त्या सदयाची पदवी जवळ करावी;

कोण ह्मणे ही भक्ती ! किंवा उपासना ही कसली ?

जगञ्चालका कशी आवडे मती जगावर रुसली ?

चल जगतीं तूं , रम उद्यानी, भिऊ नको जगताला,

सेव जनाला, तेणें होशिल मान्य फुला देवाला.

---------------------

"तुला पाहुनी,-स्मरुनी विरही विरहिणिच्या गालाला

तुझेंच सुमना घेइल चुम्बन ! नको निवारूं त्याला.

ऐकुनियां तें सखी तयाची होइल वश कोपातें,

तोडिल तुजला, वाहिल वेणीकालसर्पिणीला ते !

भिऊ नको! ती नागिणही तुज सुमना ! वश होईल;

भूषणसम तुज नित्य आपुल्या फणेवरी वाहील !

तूं न जाणशिल तुझ्यामुळे तिज नवीन आली शोभा,

जपेल ती तुज परन्तु लोभी जैसा अलभ्य लाभा.

तुझ्याभोंवतीं नर्तन करुनी स्तवितिल तुज अलि, कुसुमा !

परिवर्धित ते करितिल तव ही अनुपम अभिनव सुषमा.

गुंजारव करितील, कवी तो सूर धरुन गातील,

रसाळ, सुन्दर, नवीन काव्ये रसिक जनां देतील.

पुष्पशरासन इतरां सोडुन धरील तुजला हाती,

विरक्तिला तो जिंकुन राज्यों स्थापिल मधु अनुरक्ति !

नवकुसुमासम अङ्गकान्तिनें, परि हृदयाने हीन,

जिच्या अनुनयीं कुणी जहाला पुरुषमणी अति दीन,

हताश होउन तुला फुला! तो तिच्याकडे धाडील,

विश्वासे, की तूंच शेवटी विजयश्री वरिशील !

फुला ! खरोखर तव सहवासें हृदय तिला येईल

प्रेमल, कोमल, निर्मल, धरितें पूर्णपणे तव शील.

प्रियास देइल नवें हृदय ते परत तुला देतां ती,

लहान नाहीं सख्या फुला या परोपकृतिची महती!

-------------------------------

जन्मभूमिच्या विभवरक्षणीं अर्पितदेह सदाचा,

तुला अर्पनी करितिल कोणी मान अशा वीराचा.

क्षतें तनूवर धरी भूषणे, दिसतो बहु विकराल,

तुझ्यापुढे परि तुजसम होइल तोच विपक्षा काल !

******************

"नेउन तुजला कुणी दुःखिता देतिल कुसुमवरा रे !

की सहवासें तुझ्या इरावें दुःख तयाचें सारें.

बालरवीची किरणें जैशी तमास करिती दूरी,

सहजस्मित तव तशीच त्याची हरील चिन्ता सारी.

अश्रू ह्मणजे शोकतरूची फुले फुला ! तुज बघतां

लाजुन, जागी थबकतील रे वेगें पडतां पडतां

विलाप करितां मधेच जननी फुला, तुला पाहोनी

'मूल फूल मम' ह्मणेल ' अक्षय देवाच्या उद्यानी.

' तूं शोकाचें भञ्जन कुसुमा ! रञ्जन मूर्त मनाचे,

तूं मोहाचे अञ्जन सुमना ! व्यञ्जन आनन्दाचें.

सोड, सोड वनवास, चल गडे लोकीं, हर शोकाला,

फुला ! खरोखर होशिल सौख्यद लाभ सख्या लोकांला.

*****************

पण्डित करिती अखण्डितपणे मण्डित वाक्संसारा,

फुला ! चल गडे, कर कर आधी त्यांच्या श्रमपरिहारा.

फुला ! तुझ्यासम काव्यस्फूर्ती कविनां देइ न कोणी,

 न मी गायिली इतरां कवणां जितकी फुलांस गाणी !

प्रेमल, सात्त्विक, पवित्र जितुकें त्याचे सूचक फूल,

मधुर, मधुरतर, असें न कोठे फुलांवांचुनी शील!

फुला ! शारदा निजवीणेचा सूर लावुनी ह्मणते

'गा, गा, कविनों !' कवी करीती तुझी प्रतीक्षा नुसते.

अत्युक्ती ही नाहीं नाहीं, खरेंच तुजला कथितों;

इकडे बघतों फुलें पुढे मी, तिकडे काव्ये गातों!

---------------

"साधुजनाची पूजा करितां प्रथम फुलांचा मान;

साधुसङ्गती तरि महतीची चल पुष्पा तूं मान !

सज्जनसङ्गापुढे तुक्याला इतर सुखाची भुक्ति

तुच्छ वाटली ! फार कशाला 'न लगे' बोले 'मुक्ति !'

चिन्तामणिची, कल्पतरूची, कामदुधेची महती

नाहीं नाहीं साधुसङ्गतीपुढे ! महात्मे वदती.

सुधा मुधा तोलणे जीसवें सत्सङ्गति ही ऐशी,

वनीं निर्जनी परमसुखाची दात्री मिळेल कैशी ?

तुला नेउनी वहातील रे साधुजनाच्या चरणीं;

घेइल परि तो करांत तेव्हां होउं नको अभिमानी !

----------------

फुला ! असे तव होतिल लोकी सदुपयोग बा नाना;

साधिशील तूं येउन जन्मा थोर थोर कार्यानां.

दैव तुझें परि खोटें, की, तूं रानी जन्मा येशी,

कधिं न जाणशी इतरा सोडुन तूं अपुल्या मायेशी.

फुलल्यापासुन दिशादिशांनां वाहुन तव यश नेई

वायु, परी बा फुला ! अजोनी उपभोक्ता तुज नाही.

स्यन्दमान तव मरन्द हृदयीं तुझिया वाळुन जाय,

सुरूपसौरभ दिक्कालार्पित, जन्म मोघ तव हाय !

प्रकाशदृष्टी, चन्द्रकुमुदिनी, मेघधरा, तरुवेली

शोभतील का ? नांदतील का जरी निराळी झाली ?

तसेंच अपुलें जन्म आणखी सुमना ! जग तूं मान;

चल मजसङ्गे, दे दे सोडुन आग्रह हे अज्ञान !"

--------------

परिसुनि वच हे पुष्प हांसुनी वदले "बा कविराया !

ही माझी स्थिति पाहुन वरिशी शोक कशाला वायां ?

' निवास माझा जनांत होता कारण अपकारांला,

थोडेसें मी तुला सांगते, मोज बबूं दे त्यांला.

मदीय गन्धे व्यापारांना असते जन विस्मरले,

अनाघ्रात मम शरीर मग हे कोठुन असतें उरलें ?

विमल, दिव्य, मधु सुमनें जितकी त्यांचा रस शोषावा

याविण ज्यांनां निजजन्माचा अन्य हेतु नच ठावा;

माझ्या मोहे त्या भ्रमरांच्या कुळांत भांडण होते,

इतिहासज्ञां ठाउक आहे, काय काय तें करितें.

माझ्या छन्दं फलद तरूंची करिता माळि उपेक्षा,

मींच रहावें गिरिकन्दरिं हे मज रुचते त्यापेक्षां!

कोणा ठाउक सर्प भयङ्कर वेष्टुन मजला बसता,

उद्याना मम सहज आणिता मृत्युमुखाची समता.

विकास माझा पुरा न झाला, तोच कुणी अधिराने

नेले असते मला खुडोनी लीलेने अदयाने.

वृद्ध ब्राह्मण किंवा कोणी मजला घेउन जाता,

एक एक दळ माझें तोडुन देवार्चन साधीता !

मम सौन्दर्या पाहुन मजला बुद्धिपुरःसर नेते,

प्रेतासङ्गे पुरिते मजला, किंवा दग्ध करीते !

कुणी नेउनी मला वहाता कोणाच्या हृदयाला,

गाढालिङ्गनसमयीं येता विनाश मम देहाला!

किंवा तल्पी इतर फुलांसह मजही नेउन रचिती,

जशी तयांची तशीच होती मम जन्माची माती !

विरहताप शमवाया अपुला मजला हृदयीं धरिती

कुणीतरी, तनु त्या हृदयासह माझी वाळुन जाती.

किंवा होता स्त्रीपुरुषांच्या प्रेमकलहिं मम अन्त,

येथे रानी उगा न जन्मा मजला घालि अनन्त !

"फार कशाला ? तुझ्याच हाती जरि मी येउन पडतें,

कोमुन जातां तरी मला तूं फेंकुन दिधलें असते!

एकाकी तूं बाळ कालचे, ज्ञप्ति तुझी परि मोठी !

जगांत आह्मी सदा रहातों, अमुची वचनें खोटी !

खरे सांग तुज वैराग्याची दीक्षा दिधली कोणी ?

अनुभव नाहीं तुला कशाचा, असम्बद्ध तव वाणी,

उगाच चिन्ता भलत्यासलत्या कां तव चित्त करीतें ?

हांसुन बोले कवी "तरी चल करील दैव हवें तें,

वनांत अथवा जनांत दैवीं असेल तें तें होई."

व्यर्थ कल्पना कविराया! तूं सोडुन असल्या देई;

परन्तु हे मम सुख, सार्थकता, हेच मदीय अहेव !

वनांत मी हे तुला वाटतें मम मोठे दुर्दैव,

क्षार जला त्यजि मानव, त्यांतच मौन ह्मणे मी धन्य !

काय सुखाची व्याख्या करिशी सर्व जगा सामान्य ?

व्यर्थ मृगजळामागें तृषिती त्यांनी नित्य फिरावें !

"सुख सुख ह्मणती परन्तु नाहीं सुख मनुजांनां ठावें;

येथे राहिन कसें तरी मी सेविन नित्य तयाला.

प्रफुल्ल अथवा म्लान सारखें प्रिय मी जगदात्म्याला,

कापट्याचा सागर ह्मणजे हा तुमचा संसार !

मनांत भलतें, जनांत भलतें, हा तुमचा व्यवहार !

उच्चारांसम आचारांची श्रेणी कोठे आहे ?

विचार तैसा उच्चारांचा प्रवाह कोठे वाहे ?

अनुभव परि हा आजवरी ये बहुधा सर्व फुलांनां !

ह्मणशिल नाहीं, देशिल वचनें, घेशिल शंभर आणा!

शुद्ध सुखाची आशा खोटी, नच ते जनि वा विजनी,

फोल तुझे हे बोल ! जा पहा गुरुला अपुल्या पुसुनी !

तृषेवांचुनी पाणी नाही, क्षुधेवांचुनी अन्न,

उष्म्यावाचुन चन्दन नाहीं उपभोगाई ! कदा न !

ध्वान्तावांचुन सूर्याचाही प्रकाश विश्वी नाही,

दुःखावांचुन नको सुखाची, व्यर्थ कल्पना पाहीं !

-----------------------

" क्षुधा, तृषा, शीतोष्ण उपाधी जनीं रहा, वा रानी,

चुकले नाहिंत कधी कुणाला; दुःख सौख्य वा मानी !

अखण्ड निद्रित राहुन यांनां चुकवावें ही मुक्ति,

ह्मणोत कोणी; फुला ! मृती ही ! नोहे मुक्ती ! भुक्ति !

तुला सांगतों ज्यांस सङ्कटें ह्मणती त्या बघ ऊर्मि

भवसिन्धूच्या,-पोहणार मी,मजला दिसती नामी !

विजयनाम जो दुर्ग तयाचा किंवा हा सोपान,

मला आवडे चढावया हा, कुणी ह्मणो सोपा न !

मनोवृत्तिच्या पायावरती रचिलेला हा दुर्ग,

याच्या शिखरी विराजमाना हांकेवरती स्वर्ग!

चल मजसझें! जाऊं तेथें ! ह्मणशिल मग 'हे काय !

उलटे हितकर, सुखकर, सुन्दर दिसती सर्व अपाय !"

सुख येथे नच, सुख तेथें नच, सुखदुःखाचे कर्ते

आपण! सुमना ! परमेशाच्या पूर्ण कृपेचे भोक्ते !

---------------

" अनुरागाचा सुन्दर तरुवर दुःखकर्दमी रुझतो,

अश्रुजलाच्या सारणिमाजी फोंकावत तो जातो!

परि तो कर्दम, किंवा जल तें, आणी पुष्पफलें ती,

तया तरूची कोठें हरिती कल्पतरूची महती ?

वनभूमीवर जगे न तरु हा, जनभूमीवर जगतो;

विभूतिने निज संसाराला सार जगाचे करितो!

छायेखाली याच्या वसतां जग हे सुखमय सारें,

दुःखाचा लव न दिसे कोठे, सारे रम्य पसारे!

या वृक्षाच्या शाखेमध्ये तुला निवेशित करितों,

चल ये पाहूं !" ह्मणून अपुले हात कवी पसरी तो.

---------------------

दिसेदिसेना अशा रीतिनें किञ्चित् निजशिर चळवी,

हो नाही हे नच कळवी सुम; परि सन्देहा कळवी.

स्थिती मनाची जाणुन त्याची थोड्याशा रागाने

ह्मणे कवीमज ओळखिलें नच तुझिया मुग्ध मनाने.

काम निराळा, प्रेम निराळे, सदैव वाटे ज्यातें,

कधी कल्पिलें नसे जयाने विषामृताचे नाते;

प्रफुल्ल अथवा विशीर्ण असला भेद जयाचा गेला,

प्रेम आणखी सुन्दरता ही एक सदाची ज्याला;

प्रेम विरमलें, कमी जहाले, मळलें, हरवुन गेले,

ह्मणणारे ते अजाण सारे मतें जयाच्या ठरले;

असा जरी तुज रसिक जगीं या पहावयाचा झाला

तरी फुला! तूं भेट येउनी असेन तेथे मजला !

पुन्हां सांगतों, जीवन आणि प्रेम भिन्न नच, एक !

प्रेमहीनता मृति, केवळ तो स्वार्थाचा अतिरेक !

प्रेमासाठी सुखा विसरणे हीच सुखाची पूर्ति !

प्रेमासाठी देहविसर्जन हीच खरोखर मुक्ति!

परी दयित तो कोठे गेला ठाउक कुसुमा नाही;

जरी तयाची विश्वी भरुनी उरली मूर्ती पाही.

 प्रहर लोटला, पुन्हां कवी तो फुलाजवळुनी गेला

न बोलतां तैसाच, भासला फुला जणूं रागेला.

तथापि फुल तें तसेंच तुटुनी त्याच्या हृदयीं शिरलें,

गळले ह्मणती, परि तें खोटें, कविहृदयीं तें रमलें!

अजून आहे फुललेलें तें त्या रसिकाच्या हृदयीं,

येथें तैशी परत्र रमतिल दोघे एकच समयीं.

नारायण वामन टीळक यांच्या कविता

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post