भेटकाळ ज्ञानप्रबोध आणि ऋद्धिपुर वर्णन ग्रंथ निर्मिती
भेटकाळ : महानुभाव पंथातील चार निमित्त विधींपैकी एक श्रेष्ठ विधी. आतापर्यंत महानुभाव पंथात भेटकाळांच्या अनेक मंगळावसरांचे वर्णन आलेले आहे. त्यातही भेटकाळ जर अटणक्रमे स्थित असलेल्या संत महात्मेयांचा जर असेल तर त्या अवसराचा सोहळा काही अपूर्वच असतो. महानुभाव पंथीय वृद्धाचारात अशाच एका मंगळावसराचे वर्णन येते.
दोन महापुरुष अटणक्रमे भ्रमत असता, ईश्वर शोधनी करीत असता एकमेकाला भेटतात आणि तो त्यांचा भेटकाळ वृद्धाचार लिहिणाऱ्या महानुभावांनी वर्णन केलेला आहे. त्यातले एक महापुरुष म्हणजे गुर्जर शिवबासांचे शिष्य श्रीविश्वनाथबास बाळापुरकर आणि दुसरे महानुभाव अचळ मालोबासांचे शिष्य बहाळीये नारोबास. हे दोघे श्रीगुरुंच्या वियोगानंतर नित्याटन करीत होते.
दोघंही वेगवेगळे फिरत असताना स्वस्ती वाडेगाव या गावाजवळ मळ्यात रानात त्यांची भेट झाली. त्या काळात असा भेटकाळ फार अपूर्व असे. तेव्हा भ्रमंती करणाऱ्या साधुंजवळ काहीच आलिंबन नसायचं. फक्त झोळी, पोथी, विशेष आणि अंगावरचे वस्त्रे एवढंच आलिंबन असायचं. असं अटण करत फिरायचं. महिनोन् महिने कोणा साधूचं दर्शन नसे. त्यामुळे साधू दिसला की देव भेटल्यासारखा आनंद होत असे. एवढी परमप्रीति, की आधी दुःखाचा भुडकाच उठायचा.
मग क्षेमालिंगना सवे । उतावीळपणाचेनि भावे ।
भीतरूनि येती हेलावे । सात्विक भावाचे ॥
श्रीविश्वनाथबास आणि बहाळीये नारोबास या उभयतांचा असा भेटकाळ झाला. मग दोघं गावात भिक्षेला गेले. गावात बाजारपेठेतून जात असताना श्रीनारोबासांना चणा विकतांना दिसला. त्यांना वाटलं, आपण आपल्या विश्वबानाथबसांना काहीतरी पदार्थ संपादावा, अभ्यागत वृत्ती करावी. आपल्याजवळ आहेत दोन दाम. तर पदार्थ निष्पन्न करून त्यांना भोजन घालू. त्यांच्या ठिकाणी सीतप्रवेशन करू. पण त्यांनी तो चणा तेव्हाच विकत घेतला नाही. भिक्षा करून दोघंही बिढारी आले. एकत्र खानपान करू लागले. भिक्षेत आलेले पदार्थ एकमेकांना प्रीतीने भरवू लागले. मग जेवतांना नारोबासांनी काव्यातच प्रश्न केला.
चंद्रवदना बाळी । आंगे श्यामकांत सावळी ।
तियेते प्रतिपाळी वनमाळी । ते तुम्हा रूचे हो?
विश्वनाथबास बाळापुरकरांना त्या काव्याचा गर्भितार्थ लक्षात आला. की हे हरबऱ्याविषयी म्हणत आहेत. हरबऱ्याचे घाटे साधारण श्याम वर्णाचे असतात. तिला वनमाळी म्हणजे शेतकरी पाळतो. तिला तुमच्या दर्शनाला येऊ देत का ? यावर श्रीविश्वनाथबासांनीही काव्यातच उत्तर दिलं,
सप्तरात्र विवर्जित । जयाते जन आवडी सेवित ।
तेणेस होए संयुक्त । तरी अत्यंत रुचे ॥
जरी स्नेहाचेनि पाडे । पूर्ण योग जर घडे ।
तरी अमृत होय रोकडे ते गोडी पाहुनी ।।
हो येऊ देत आमच्या दर्शनाला. पण अशी एकटी नको यायला. आठवड्यातले सातही दिवस खाता येतो असा गूळ. तो तिच्याबरोबर असेल तर जास्त आवडेल. त्याबरोबर तूप असेल तर विचारूच नका. अमृतापेक्षा ती गोडी विशेषच असेल. असे काव्यमय सुंदर उत्तर त्यांनी दिले.
नारोबासांना कळलं, यांना पुरणपोळी मानवते बरं का! मग त्यांनी कुण्या अनुकूळ सद्भक्ताच्या घरी जाऊन पुरणपोळीचे जेवण, दुध इत्यादि पदार्थ निष्पन्न करून अति प्रेमाने, आग्रहाने, दुःखपूर्वक प्रार्थना करून श्रीविश्वनाथबासांना संपादली. श्रीविश्वनाथबासांनीही त्यांना सोबत बसून जेवण करण्याचा आग्रह केला. दोघांनीही परमप्रीतीचे भोजन केले.
बहाळे नारोबासांची काव्य स्फूर्ती पाहून एक दिवस विश्वनाथ बाळापुरकर त्यांना म्हणाले, "तुमच्या ठिकाणी असामान्य काव्य प्रतिभा आहे, तुम्ही काव्य चांगलं करू शकता. एखादा ग्रंथ तयार करा न! तुम्हाला मराठीचा व्यासंग दिसतो. देवाच्या स्तुतीपर ग्रंथ करा. देवाला काव्य पुष्प अर्पण करा.
यावर श्रीनारोव्यास म्हणाले, "तुमच्यातही कवित्व शक्ती असामान्य दिसते आहे. तुम्हीही ईश्वरार्चन करा, आपण दोघंही कविता करू. विश्वनाथ भाषांनी बहाळे नारोबासांना होकार दिला. मग दोघांनीही एकत्र राहून दोन महाकाव्य निर्माण केले. एकमेकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे दोघांनीही काव्यग्रंथ केले. श्रीविश्वनाथ बाळापुरकरांनी 'ज्ञानप्रबोध', तर श्रीनारोबास बहाळिये यांनी 'ऋद्धपूर वर्णन' हे ग्रंथ केले. 'ऋद्धपूर वर्णन' ६४६ ओव्यांचा, तर 'ज्ञानप्रबोध' १२०३ ओव्यांचा ग्रंथ आहे. 'ज्ञान प्रबोध सरळ आहे. त्यात क्लिष्टता नाही. सहज समजण्यासारखा आहे.
पण श्री नारोबासांचा ऋद्धपूर वर्णन हा ग्रंथ तसा नाही. प्रत्येक ओवी कूट आहे. काही ना काही गुह्य अर्थ भरलेला आहे. एकेका ओवीत २-२, ३-३ अर्थ आहेत. म्हणून त्या ओव्या थोड्या आहेत. पण अर्थपूर्ण आहेत. त्या तयार करतांनाही त्यांना बरेच सायास पडले असतील. या दोन्ही ग्रंथाची रचना स्वस्ती वाडेगावला झाली.
ग्रंथ करताना त्या दोघांची दिनचर्या अशी होती. दोघेही प्रातःकाली उठत सकाळचे अनुष्ठान पूर्ण करून विजनाला बसून दोघं चर्चा करत. नंतर भिक्षाविधीची वेळ झाल्यावर भिक्षा करून आले की नदीकाठी एकत्र भोजन करत. आणि थोडीशी वामकुक्षी घेतल्यावर पुन्हा विजनाला जात. व विजनी बसून काव्यरचना करीत असत. असे महिना दोन महिने दोघं एकत्र राहिले. आपापला ग्रंथ एकमेकांसमोर वाचून दाखवल्यावर. मग दोघांनी परमप्रीतिने विभाग केला.
ते ज्या मळ्यात थांबलेले होते. तिथे एक शेतकरी रोज यांना पहायचा. नंतर कालांतराने दुसरे महानुभाव पंथीय भिक्षुक येता जाता त्या मळ्यात थांबायचे. तेव्हा तिथला माळी त्यांना सांगायचा, तुमचे भट मार्गीचे दोन महात्मे आले होते इथं. ते रात्री भांडायचे. सकाळी रूसायचे. एक इकडे जाऊन बसायचा, एक तिकडे जाऊन बसायचा. भिक्षा करून आले की फार प्रेमानं एकमेकांना खाऊ घालायचे.
म्हणजे या दोघांची शास्त्रचर्चा म्ह. त्याला भांडण वाटायचं. विजन करण्यासाठी वेगळे बसायचे हे त्याला एकमेकांविषयी रुसणं वाटायचं. आणि दुपारी एकत्र भोजन करणे हे त्याला एकमेकांविषयी निर्गुण प्रेम वाटायचं. असा हा महानुभाव पंथीय इतिहासात वर्णन केलेला आहे. या अपूर्व भेटकाळात महानुभाव पंथाला ऋद्धिपुर वर्णन आणि ज्ञानप्रबोध या दोन महा ग्रंथांची कवितारसाची बोनेवाटी प्राशन करायला मिळाली.
अलीकडच्या काळात असे भेटकाळ होताना दिसत नाहीत. कारण अटनविजन करणारे भिक्षुक दुर्मिळ झालेले आहेत. मग गुरुकुळांचे भेटकाळ होतात. तोही मंगळ अवसर दुर्मिळ असतो. मोठ्या मोठ्या अधिकारांचेही भेटकाळ होतात. असा मंगळ अवसर याची देही याची डोळा पाहणे असं भाग्य काही सदभक्तांनाच लाभते.
श्रीदेवदत्त आश्रम जाधववाडी येथिल मार्गातले भिक्षुक आजही अटन करतात. अटन करत असताना त्यांच्यातही असे भेटकाळ होतात. एकमेकांना पदार्थ संपादणे, वस्त्रपालट करणे, एकत्र खाणपाण करणे, शास्त्रचर्चा करणे. हे त्या भेटकाळात पाहायला मिळते. ज्या गावात भेटकाळ झाला त्या गावातल्या सदभक्तांना तो भेटकाळ पाहायला मिळतो. त्या भेटकाळात त्या सदभक्तांनाही पदार्थ प्रवेशन करण्याची अपूर्व संधी मिळते.