अन्योक्तिविलास पण्डित जगन्नाथ संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit Subhashit knowledgepandit

अन्योक्तिविलास पण्डित जगन्नाथ संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit Subhashit knowledgepandit

अन्योक्तिविलास संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit Subhashit knowledgepandit

अन्योक्तिविलास, पण्डितराज जगन्नाथ

दधानः प्रेमाणं तरुषु समभावेन विपुलं

न मालाकारोसावकृत करुणां बालबकुले!

अयं तु द्रागुह्यत्कुसुमनिकराणां परिमलै-

र्दिगन्तानातेने मधुपकलझङ्कारभरितान् !!

अन्योक्तिविलास, पण्डितराज जगन्नाथ

तरुषु = झाडांवर

समभावेन =सारखंच 

विपुलं = खूप

प्रेमाणं = प्रेम

दधानः = शब्दशः  ठेवणारा, करणाऱ्या

असौ = या 

मालाकारः = माळ्यानं 

बालबकुले = बकुळीच्या रोपट्यावर

करुणां = दया  

न अकृत = केली नाही !

तु = परंतु,

अयं = तो 

द्राग् = लवकरच 

कुसुमनिकराणां = फुलांच्या बहाराचा

परिमलैः = सुवास

उह्यत् = वहात 

मधुपकुलझङ्कारभरितान् मधुप = भुंगे, कुल = थव्यांच्या झंकारभरितान् = झंकारानं भरून गेलेल्या  दिगन्तान् = दिशा  

आतेने (पसरवल्या).

माळ्यानं इतर झाडांना प्रेमानं पाणी दिलं, त्यांची निगा राखली. पण बकुळीच्या रोपट्याकडे मात्र त्याचं दुर्लक्ष झालं. परंतु, थोड्याच दिवसात ते रोपटं वाढलं, त्याच्या फुलांचा खच पडू लागला, त्याचा मध चाखायला भुंग्यांची दाटी झाली, आणि त्याच्या सुवासानं आसमंत दरवळू लागला. राजाश्रयानं रहाणाऱ्या कवींचही असंच आहे. सुरवातीला त्यांच्या प्रतिभेची खोली लक्षात येत नाही. नंतर मात्र खूप दर्जेदार कविता करून तो रसिकांमध्ये प्रसिद्ध होतो. जगन्नाथाचंही असंच झालं असेल. त्याचं वाङ्मय आणि काही आख्यायिका हाच त्याच्या जीवनाचा मागोवा घेण्याचा पुरावा आहे.

न यत्र स्थेमानं दधुरतिभयभ्रान्तहृदया

गलद्दानोद्रेकभ्रमदलिकदम्बाः करटिनः !

स्खलन्मुक्ताभारे भवति परलोकं गतवति !

हरेरद्य द्वारे शिवशिव शिवानां कलकलः !!

(अन्योक्तिविलास, पंडितराज जगन्नाथ)

गलद्दानोद्रेकभ्रमदलिकदम्बाः (गलत् = गळणाऱ्या + दान (मदाच्या) + उद्रेक ( खूप स्रवण्यामुळे) + भ्रमत् ( रुंजी घालणाऱ्या) + अलि ( भुंग्यांचे) + कदम्बाः = थवे  

करटिनः =हत्ती

अतिभयात् = खूप भीतीमुळे 

भ्रान्तहृदया =चित्त विचलित होऊन 

यत्र = जिथे

स्थेमानं = निवास

न दधु: = करत नसत

तत्र = तिथे

अद्य =आज

हरेः = सिंहाच्या

स्खलन्मुक्ताभारे = जिथे हत्तीच्या गंडस्थलातून फोडून काढलेले मोती गळत आहेत अशा) द्वारे हरी भवति परलोकं गतवति = सिंहांचा मृत्यू झाला असता)   शिव शिव = अरेरे 

शिवानां = कोल्ह्यांचा  

कलकलः =आवाज  ऐकू येतो.

एखाद्या राजाचा दरारा खूप असतो. तो जिवंत असेपर्यंत मोठे मोठे लोकही त्याला घाबरतात. परंतु, त्याचं निधन झाल्यानंतर मात्र क्षुद्र लोकांनाही त्याच्या राजवाड्यात स्थान मिळतं. हे वास्तव मृगराज सिंहाचं उदाहरण देऊन स्पष्ट केलं आहे.

जगन्नाथाच्या श्लोकांमध्ये नवनवीन शब्द सापडत असतात. स्था ( रहाणे, निवास करणे) या धातूपासून बनलेला हा शब्द संस्कृत वाङ्मयात प्रचारात नाही. पण जगन्नाथानं तो योग्य प्रकारे उपयोजिला. कठिण समासांच्या उपयोगातली सहजताही लक्षणीय आहे. सिंहाला हत्ती घाबरत असत. ते हत्ती साधेसुधे नव्हते. करटिन् होते. 

करट म्हणजे गंडस्थल. ज्यांचं गंडस्थल विशाल आहे असे हत्ती. हत्ती वयात आल्यावर त्याचं गंडस्थल विशाल होतं, त्यातून मद वाहू लागतो. साहजिकच, मदाचा आस्वाद घेण्यासाठी भुंग्यांचे थवे घोंघावत असतात.   गंडस्थळातून मद पाझरणारे हत्ती  शक्तिशाली असतात. असे शक्तिशाली हत्तीही ज्याठिकाणी जायला घाबरतात असं ते सिंहाचं निवासस्थान. त्याठिकाणी मोत्यांचे सडे पडलेले असायचे. सिंह हत्तीचं गंडस्थल फोडतो. आणि हत्तीच्या गंडस्थलामध्ये मोती असतात ही संस्कृत कवींची आवडती कल्पना आहे. पण हरि म्हणजे सिंहाचं निधन झाल्यावर मात्र तेच घर कोल्हेकुईनं भरून गेलं.  सिंहाला पिंगट, सोनेरी आयाळ असते म्हणून तो ' हरि'. चार ओळींमध्ये एवढं सुंदर शब्दचित्र जगन्नाथच रेखाटू जाणे.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post