आजचे संस्कृत सुभाषित रसग्रहण
खालील सुभाषिताचे रसग्रहण करा
आजची लोकोक्ती - निस्पृहस्य तृणं जगत्।
उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणम्।
विरक्तस्य तृणं भार्या निस्पृहस्य तृणं जगत् ॥
~ महासुभाषितसंग्रह.
अर्थ :- उदार (दानशूर) मनुष्याच्यासाठी लिए धन हे तृणासमान (गवताच्या काडीसमान) असते, शूराला मरण तृणासमान (कवडीमोल) वाटत असते. (शूरवीर मरणाला घाबरत नाही). विरक्त व्यक्तीच्या दृष्टीने भार्या (बायको, स्री) गवतासमान (क्षुल्लक) असते (कारण तो कामापासून मुक्त झालेला असतो), तर निःस्पृह मनुष्याच्या नजरेत हे सर्व जगच तृणवत् (ज्याला काहीच किंमत नाही असे) असते (परमज्ञानप्राप्त प्रबुद्ध संतविभूती आत्मसंतुष्ट असतात त्यांच्या लेखी या जगाची किंमत शू्न्य असते.)
निस्पृहस्य तृणं जगत् । निस्पृहाला जग तृणवत् व्यवहारात ही लोकोक्ती प्रचलित आहे. ज्याने मृत्यूचे सत्य जाणलंय त्या संताच्या दृष्टीने हे जग शून्य आहे. ज्याला मोहच रहिला नाही त्याला विश्वाची काय किंमत? ह्या श्लोकाचा मराठी काव्यानुवाद करण्याचा मागे मी प्रयत्न केला होता तो असा,
उदारासी धन तुच्छ, शूरासी मरण कवडीमोल।
संन्याशासी तृणवत पत्नी, निःस्पृहासी विश्वही गवत॥
वरील श्लोकासमान अर्थ असणारा अजून एक श्लोक चाणक्य नीतीमध्ये आहे.
तृणं ब्रह्मविद् स्वर्गं तृणं शूरस्य जीवनम्।
जिमाक्षस्य तृणं नारी निःस्पृहस्य तृणं जगत्॥
ब्रह्मज्ञानी व्यक्तीच्या दृष्टीने स्वर्ग, वीराला आपले जीवन-मृत्यू, विरक्त, संयमी व्यक्तीच्या नजरेत स्त्री तसेच निस्पृहाच्या दृष्टीने हा सगळा विश्वाचा पसारा तृणवत् (तृणमोल, काडी मोल) असतो.
निःस्पृहता मनुष्यास सहज लाभत नाही तिच्यासाठी संयम, आत्मज्ञान आणि आचरणाची सांगड असावी लागते. षड्रिपुंशी वैर पत्करावे लागते. त्यांनी मार्गात पेरलेल्या प्रलोभनांना परतवून लावावे लागते. तेव्हा कुठे निःस्पृहता तुमच्या मनाला वरते. निश्चयात्मक बुद्धीत उतरते.
तुमचें येर वित्त धन। तें मज मृत्तिकेसमान॥ तुमची धन संपत्ती मला मातीसमान आहे असे इथे तुकोबाराय म्हणतात. केवळ 'मातीसमान' ही तुलना करून तुकोबाराय थांबत नाहीत तर, 'येर' हे विशेषण लावून ते आपले (माझे) नव्हेच तर परके आहे, हे ही स्पष्टपणे सांगतात. ही निःस्पृहता हवी. जीच्यामुळे लोभ वा आसक्ती मनाला आणि बुद्धीलाच नाही तर, विचारांनाही स्पर्श करत नाही. ती केवळ व्रतस्थ जीवन जगणार्या संतसज्जनांच्याच आश्रयाला असते. ह्या सज्जनांमध्ये संताहून वेगळे पण संताच्याच पंक्तीला बसण्याची योग्यता असणारे वीरही होऊन गेले.
स्पृहा म्हणजे काय? तर, इच्छेला धरून आलेला वासनांचा गंध जेव्हा मनात येऊन वास करतो आणि त्यातून निघणार्या प्रत्येक विचाराला चिकटतो तेव्हा स्पृहा जन्म घेते. आणि निःस्पृह मन तेच जे ह्या वासनामय लोभी इच्छागंधाचा त्याग करते. शिवरायांचे मावळे पहा शत्रूने दाखवलेले आमिष त्यांच्या निःस्पृह मनाला काबीज करू शकले नाही. मुरारबाजीला दिलेरखान आणि मिर्झाराजे जयसिंह म्हणाले 'अरे! मुरारबाजी, तुझ्यासारखा वीर समशेरबहाद्दर आम्ही आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये.. बादशाहाचा कौल घे.. बादशाह तुला सरदार करतील जहागीर देतील. बक्षीस देतील!"
तेव्हा निःस्पृह मुरारबाजींना ती जहागीरीही स्वामीनिष्ठेपुढे आणि स्वराज्यनिष्ठेपुढे तृणवत् वाटली. ते उत्तरले, "बादशाहाच्या बाजूला ये,असे दिलेरखानाने सांगताच मुरारबाजीने चवताळून दिलेरखानाला उत्तर दिले "अरे , आम्ही शिवाजी महाराजांची माणसे! तुझा कौल घेतो की काय? आम्हांला स्वराज्यात काय कमी आहे? तुझ्या बादशाहाची जहागीरी हवी कोणाला?"
हीच गोष्ट बाजी पासलकर, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, रायाजी बांदल, कोंदाजी फर्जंद, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहीते, नेतोजी पालकर, इ. अशा कित्येक शिवरायनिष्ठ मावळ्यांची ज्यांच्या निःस्पृहतेने स्वराज्यापुढे स्वतःचे जीवन आणि प्राण दोन्ही तृणवत मानले.
तुकोबाराय म्हणतात, ‘नरस्तुती आणि कथेचा विकरा। हें नको दातारा घडों देऊ॥’
सोने चांदी रुपे आम्हा मृत्तिकेसमान। असे म्हणणारे संत तुकाराम महाराज तर उपाध्या, मान, सन्मान यांच्याही मोहात पडत नाहीत. इतकी निःस्पृहता की शिवरायांनी पाठविलेला नजराणा पाहून ते म्हणतात, दिवट्या, छत्री, घोडे । हें तों बऱ्यांत न पडे॥ आतां येथे द्वारकाधीश राया । मज गोविसी कासया ॥ मान दंभ चेष्टा । हें तो शूकराची विष्ठा॥
तुकोबांची ही निःस्पृहता तर सगळ्या ऐहिक भोगांना, उपाध्यांना तृणवतच नाही तर त्याहूनही कःपदार्थ अशी डुकराची विष्ठा मानते. आजच्या पैशापासरी जगात ही निःस्पृहता सापडणे दुर्मिळच होय. त्यासाठी ह्या अशा संत आणि महात्म्यांची जीवनचरित्रे समजून घेतल्याविना निःस्पृहस्य तृणं जगत्। ह्या लोकोक्तीचा अर्थ कळणे शक्य नाही.
लेखक :- अभिजीत काळे सर
अप्रतिम
ReplyDelete