यादृशं वपते बीजं तादृशं लभते फलम् संस्कृत सुभाषित रसग्रहण

यादृशं वपते बीजं तादृशं लभते फलम् संस्कृत सुभाषित रसग्रहण

संस्कृत सुभाषित रसग्रहण 

            संस्कृत सुवचनानि

आजची लोकोक्ती - यादृशं वपते बीजं तादृशं लभते फलम्।

यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः।

सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम्॥

                            - महाभारत, अनुशानपर्व.

अर्थ :- शेतकरी शेतामधे ज्या प्रकारचे बीज पेरेतो तेच उगवून येते त्याचप्रमाणे  मनुष्य चांगले अथवा वाईट जसे कर्म करतो त्यानुसारच त्याचे फळ मिळते. 

      महाभारताच्या अनुशासन पर्वातील भीष्म-युधिष्ठिर संवादामधील हा श्लोक आहे. या चर्चेत धर्मराज युधिष्ठिराने भीष्म पितामहांना आपल्या काही शंका विचारल्या आहेत. त्यांचे परिमार्जन करताना पितामह भीष्मांनी धर्मराजाला जे सांगितले त्यापैकी वरील श्लोक आहे.

या श्लोकाबाबत एक महत्वाचा पाठभेद असा सापडतो,

यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य वापकः।

सुकृते दुष्कृते वाऽपि तादृशं लभते फलम्॥

                   १३.९.८, महाभारत.

        नंतर कालप्रवाहात कदाचित *वापकः* या शब्दाच्या स्थानी कृषकः, कर्षकः हे शब्द प्रक्षिप्त केले गेले असतील.

       'संस्कृत सुवचनानि ६' मधे आपण यथा राजा तथा प्रजा  ही लोकोक्ती आपण अभ्यासली होती त्या श्लोकातही यथा बीजं तथाङ्कुरः।  हे चरण होते.

      'यादृशं वपते बीजं तादृशं लभते फलम्।'  ह्या लोकोक्तीवरून प्रत्येक भाषेत म्हण प्रचलित झालेली दिसते.

Reap as You Sow

पेरावे तसे उगवते

जसे कर्म तसे फळ

जो बोओगे वही पाओगे।

जैसे कर्म तैसे फळ

ही त्याचीच उदाहरणे.

      तुकोबारायांचा हा अभंगही खूप काही सांगून जातो,

_शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।_

_मुखी अमृताची वाणी। देह देवाचे कारणी।।_

_सर्वांग निर्मळ। चित्त जैसे गंगाजळ।।_

_तुका म्हणे जाती। ताप दर्शने विश्रांती।।_

         मराठीत एक लोकगीत प्रसिद्ध आहे,

_जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर।_

         कृष्ण, बुद्ध, माहवीर अशा अनेक महान विभूतींनी सदाचरण व सत्कर्माची शिकवण सांगितली ती य‍ाचसाठी. तुमचे मन व आचरण शुद्ध असेल तर तुमच्याकडून चांगलेच कर्म होईल, प्रमाद घडणारच नाहीत आणि कार्यात चूकच झाली नाही तर कार्यनाशाची वा विपरित फळाची शक्यता नगण्यच. कारण चूक घडली तरच परिणाम भोगावे लागणार अन्यथा नाहीच. 

      रामचरितमानसामध्ये हिंदी संतकवी तुलसीदासजी लिहितात,

_कर्म प्रधान विश्व रचि राखा।_

_जो जस करहि सो तस फल चाखा॥_

_सकल पदारथ हैं जग मांही।_

_कर्महीन नर पावत नाहीं॥_

         हे अवघे विश्वच कर्मगतीवर चालते. ते कर्मप्रधान आहे. जो जसे कर्म करणार तसेच फळ चाखणार. या जगात सगळी सुखे आहेत मात्र ती मिळणे तुम्ही चांगले अथवा वाईट कसे कर्म करता अथवा कर्म करता की नाही यावरच निर्भर असते.

       महात्मा कबीर तर म्हणतात,

_करता था तो क्यूं रहया,अब तक क्यूं पछिताय।_

_बोये पेड़ बबूल का, अमवा कहाँ से पाएं॥_

        जेव्हा तू काही करू शकत होतास तेव्हा तू काहीही केले नाहीस आणि आता पश्चात्ताप करून काय होणार? तू जर बाभळीचे रोप लावलेस तर त्याला आंबे कुठून येणार?(जे कराल तेच मिळेल.)  

      हा झाले चांगल्या वाईट कर्मांच्या फळांचा विषय मात्र कबीर याही पुढे जाऊन म्हणतात,

_काल काल तत्काल है, बुरा न करिये कोय।_

_अन्बोवे लुनता नहीं, बोवे तुनता होय॥_

      काळ जो आहे तो तुमच्या करणीचे तत्काळ फळ देत असतो. वाईट कराल तर काळ तुमचा घास घ्यायला बसलेलाच आहे. एक असे की जर पेरलेच नाही तर ते उगवणार नाही आणि जे उगवेल ते कापायची वेळच येणार नाही मात्र जे पेराल ते उगवणारच आहे त्यामुळे ते कापले ज‍णारच. म्हणून जे पेरायचे ते चांगलेच पेरावे.

      भगवान श्रीकृष्णस्वारींनी अर्जूनाला गीतेच्या तिसर्‍या अध्यायात कर्मयोग सांगताना कर्म, अकर्म, विकर्म तसेच सकाम व निष्काम कर्म विशद करून सांगितले आहे. आपल्या कर्मातच भविष्याचे बीज दडलेले असते हेच खरे. समर्थांनी उपदेश केला आहे, 

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे।"

पण काहीही करण्या आधी आपल्याला काय करायचे आहे? याचा विवेकी विचार करणे महत्त्वाचे. त्यावरच आपण जे करणार आहोत ते निष्पत्तीस येते. केलेले कार्य सुकृत अथवा दुष्कृत ह्या दोनच प्रकारात मोजले जाऊ शकते. त्यामुळे आपल्या कृत्यातून आपल्याबरोबरच दुसर्‍याचे हित होते की अहित? याचा विचार होणे महत्त्वाचे कारण जसे कर्म तसे त्याचे फळ मिळणारच.  

       यादृशं वपते बीजं तादृशं लभते फलम्।

अर्थ लेखन :- अभिजीत काळे सर

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post