अवधुत गीता उर्फ श्रीदत्तात्रेयप्रभूंचे चोवीसगुरू आख्यान
यदुराजाला दर्शन देवून ज्ञान दिले.
एक वेळ परिभ्रमण करीत करीत यदुराजा सैह्याद्री पर्वतावर आला. त्या निर्जन वनात श्रीदत्तात्रेयप्रभूंनी त्याला दर्शन दीले. यदुराजाने अत्यंत विनम्र पूर्वक नमस्कार करून जिज्ञासेने श्रीदत्तात्रय प्रभूंना म्हटले, "हे प्रभो! आपण या निर्जन वनात कर्म करीत नसून ही अत्यंत सतेज प्रसंन्न आणि अलौकिक बुध्दीमान कसे?
"या संसारात प्रत्येक मनुष्य धनी वा निर्धन, आयु, यश, सौंदर्य , सम्पत्ती इ. बाळगूनच धर्म, अर्थ, काम तथा तत्व जिज्ञासेत प्रवृत्त होतो. आपण तर आपल्या शरीर कान्तिवरून व सुहास्य वदनावरून अत्यंत निपुण, अत्यंत विद्वान, सर्व कर्म करण्यास समर्थ दिसत आहात . आपल्या भाग्याचे आणि सौंदर्याचे काय वर्णन करावे? तरीही आपण बालकाप्रमाणे निरागस, दिगंबर वृत्तीने कर्म न करता व कशाचीही आशा न बाळगता सदैव मुक्त व आनंदी दिसत आहात हे आपणास कसे शक्य आहे. याचे क्रुपा करून मला ज्ञान करावे."
श्री दत्तात्रेय प्रभू त्यांची जिज्ञासा आणि भक्तिभाव पाहून प्रसन्न झाले आणि म्हणाले, "हे राजन ! तू धर्माचा मर्मज्ञ आहेस. श्रध्दासंम्पन्न आहेस. म्हणून तुला हे गुह्याति गुह्य ज्ञान सांगितलेच पाहिजे."
हे धर्म प्रेमी राजन ! मी आपल्या बुध्दीद्वारा अनेक गुरूपासून हे गुण ग्रहण केले आहेत ज्याच्याजवळ सद् विवेक आहे, जिज्ञासा आहे. गुणग्राहकता, श्रध्दा, आदर, नम्रता आणि सद् गुण आहेत, त्यांचेसाठी हे संपूर्ण जगच गुरू आहे. प्रत्येक वस्तुच्या गतीविधीपासून गुण ग्रहण करता येतो . दोष असा नसतोच मुळी. त्या दोषाचाही विचार करून त्यालाही गुणात रूपांतरीत करता येते."
माझे अनेक गुरू मी मानले आहे. त्यांचे पासून गुण ग्रहण करून या जगात मी सदैव मुक्त भावाने, स्वच्छंदरूपाने आनंदी वृत्तीने विचरतो.
माझ्या गुरूंची नावे तुला कथन केलीच पाहीजेत. हे राजा! (१) पृथ्वी (२) वायु, (३) आकाश, (४) जल, (५) अग्नि, (६) चंद्रमा, (७) सूर्य (८) कबुतर, (९) अजगर, (१०) समुद्र, (११) पतंग (१२) मधमाशी, (१३) हत्ती, (१४) शहद काढणारा, (१५ ) हरिण , (१६) पिंगळा, (१७) वेश्या, (१८) कुरूर पक्षी(टिटवी) (१९) बालक , (२०) कुमारी कन्या, (२१) बाण बनवाणारा, (२२) सर्प, (२३) कातीन व (२४) भिंगुरटी हे माझे चोवीस गुरु आहेत .यांच्या आचरणापासून गुणग्रहण करुन या लोकात मी विचारपूर्वक विहार करतो. यांच्यापासून मी जे जे शिकलो ते ते तुला सविस्तर सांगतो.
(१) पृथ्वी.. मी पृथ्वीपासून धैर्याची व क्षमाशीलतेची वृत्ती ग्रहण केली. लोक प्रुथ्वीवर किती आघात, उत्पात करतात. पण पृथ्वी ते सर्व धैर्याने सहन करते. त्याप्रमानेच संसारातील सर्व प्राणी आपआपल्या कर्मानुसार वर्तन करतात. वेळोवेळी भिन्नभिन्न प्रकारे, जाणता अजाणता आक्रमण करतात. धैर्यवान पुरूष त्यांच्या विवशतेला समजून आपले धैर्य तथा सहनशीलता नष्ट होऊ न देता क्रोधरहित व्यवहार करतो.प्रुथ्वीचा विकार हे पर्वत तथा व्रुक्ष आहेत. हे सदैव परोपकार करतात. म्हणून परोपकार वृत्ती ग्रहण करणे हे सज्जन पुरूषाचे कर्तव्य आहे.
२) वायू ज्या प्रमाणे हवा एके ठीकाणी न रहाता परिभ्रमन करीत असते. त्याप्रमाणे साधकाने अटन विजन करावे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीनी साधकाला अटन, विजन, भिक्षा, भोजन, निद्रास्मरण, प्रसाद सेवा असा संत नित्य विधी व संग सांगतात, भेटी सुश्रुषा असे चार नैमित्यिक विधी सांगीतले आहे. अशा प्रकारे वायुपासून सतत परिभ्रमण हा गुण घ्यावा तसेच जळी स्थळी, डोंगर, दर्या, नद्या, इ. ठिकाणी वार्याचा सर्वत्र संचार असतो. वार्याचा सर्वत्र संचार असला तरी तो कोठेही आसक्ति ठेवत नाही. सर्वापासून तो अलिप्त रहातो. वायु आपल्या सोबत गंधाचे वहन करीत असतांना स्वत:मात्र गंध रहित असतो. तसेच जगण्यासाठी तो सर्वांना श्वासोश्वासाच्या रूपाने सर्वांना सतत उपयोगी पडत असतो लहाण मोठा, गरीब श्रीमंत, असा भेदभाव तो ठेवत नाही .त्याप्रमाणे साधकाने प्रपंचात विहरण करत असतांनाही अलिप्त राहीले पाहिजे. शरीर इंद्रीयांचे धारण करीत असतांनाही त्यांच्या गुणदोषापासून अलिप्त राहिले पाहीजे. अलिप्तता राखत सर्वांशी सम व्यवहार पण करावा.
(३) आकाश... आकाशामध्ये हे सारे चराचर जगत सामावले आहे. तेथे गती स्थिती व प्रलय सुरू असून आकाश सर्वांना केवळ साक्षीमात्र आहे. हा गुण मी आकाशापासून घेतला द्रुश्यमान चराचरात कितीही आघात उत्पात तथा नवनिर्मिती होवो , साधकाने त्या पासून भिन्न राहून , शारिरीक.. मानसिक व्यापाराविषयीही तटस्थ राहून समभाव धारण केला पाहिजे.
(४) जल... जल हे स्वभावता मधूर , पवित्र करणारे, स्वच्छ व सलील आहे त्याप्रमाणे साधकाने स्वभावत: शुध्द , स्निग्ध , मधुरभाषी लोकपावनकारी राहिले पाहीजे.
(५) अग्नि.. हा तेजस्वी आहे. सर्व भक्षण करूनही तो त्यांच्या गुणापासून अलीप्त असतो. केंव्हा प्रकट तर सदैव अप्रकट असतो . त्याप्रमाणे साधकाने आपल्या शरीर इंद्रियाच्या प्रभावाला नष्ट करून कधी प्रकट तर कधी अप्रकट असले पाहिजे आपल्या गुणाचे प्रदर्शन करू नये. सर्व दोष ज्ञान द्रुष्टीने भस्म करून स्वत:परिशुध्द असावे.ज्याप्रमाणे अग्निमध्ये सर्व वस्तु टाकल्या असता त्या जशा जळून खाक होतात, दुसरे दिवशी काहीही शिल्लक रहात नाही त्याप्रमाणे साधकाने जे काही मिळेल त्यावर आपली एक दिवसाची उपजीविका करावी. दुसऱ्या दिवशी काही उरू न द्यावे . साधकाने नेहमी भिक्षेत जे मिळेल ते आनंदाने स्विकार करावेत. सदान्न व कदान्न असा भेदभाव करू नये. अग्नि हा तेजस्वी आहे .तसे ज्ञानाग्निने साधकाने आपले दोष भस्म करावे.
(६) चंद्रमा... कधी क्षीण होतो होतो तर कधी परिपूर्ण प्रकाशरूप होतो. सतत अवस्था बदलत असली तरी तो व्यथीत होत नाही. त्याप्रमाणे साधकाने जन्मापासून मृत्यू पर्यंन्त जे सतत अवस्थांन्तर होत असते (देहाच्या बालपण , तरूण पण, म्हातारपण,) परंतु या देहाच्या अवस्थांतरामध्ये देहामध्ये असलेला जीवात्मा काही बदलत नाही. जन्म म्रुत्यू हे देहाचे अवस्थांतर आहे, जीवात्मा हा नित्य शाश्वत आहे. उत्कर्ष.अपकर्ष, मान.. अपमान यांना समान समजून स्वस्थता समाधानी कायम रहावे. हे राजन! चंद्रपासून मी जीवाचे नित्यत्व व शरीराचा नश्वरपणा हा गुण शिकलो.
(७) सूर्य.. ज्याप्रमाणे प्रकाशमान असून सतत अंधकार नष्ट करतो त्याप्रमाणे साधकानेही चित्तव्रुत्तिच्या चक्रात येणार्या अज्ञान वृत्तीचा नाश करून सतत प्रकाश मान ज्ञानोक्त व्यवहार करावे. सर्व भौतिक व्यवहार करीत अलिप्त होऊन परोपकार वृत्तीने यथासमय ज्ञानाची वर्षा करावी.
(८) कबूतर.... हे राजन कधीही कोणाशी अंत्यंत स्नेह अथवा आसक्ती करू नये. एका कबुतराचे उदाहरण सांगतो. कोण्या एका जंगलात एक कबूतर एका व्रुक्षावर घरटे बनवून राहत होते त्या कबुतरांचे एकमेकावर खूप प्रेम होते. त्यांना पिल्ले झाली . एकदा ते पिल्लांना चारा आणण्यासाठी जंगलात गेले. इकडे पारध्याने पिल्लांवर जाळे टाकले. त्या जाळ्यात पिल्ले अडकली. ते परत येऊन पहातात तर जाळ्यात त्यांची पिल्ले आक्रोश करित होती. त्यांना पहाताच कबूतरीणच्या दुःखाला सीमाच राहिली नाही. स्नेहाने आंधळी होऊन तिने पिलांकडे झेप घेतली आणि स्वत: जाळ्यात अडकली.
पिल्लांच्या आणि कबुतरीणच्या दुःखाने कबुतर अधिकच दु:खी होऊन आक्रोश करू लागला. माझा संसार उध्वस्त झाला . मी यांच्याशिवाय कसा जगू म्हणून त्यानेही त्या जाळ्यात उडी घेतली. पारधी हर्षित झाला. सारा कबुतराचा परिवार त्याला मिळाला. हे राजन ! जो पुरूष विवेक रहित होऊन मोहाने या संसारात वावरतो त्याची अशीच दुर्गती होते.
मनुष्य देह मुक्तीचे द्वार आहे असे नाही अनमोल शरीर प्राप्त करून जो कबुतराप्रमाणे आपल्या संसारात , विषय भोगात तथा मोहात फसतो . तो अत्यंत उंचीवर चढून अध:पतीत होतो. शास्त्राच्या भाषेत त्याला "आरूढ च्युत " म्हणतात. हे राजा ! मोह व ममतेचा त्याग करण्याचा गुण मी कपोत पक्षाकडून घेतला.
(९) अजगर... ज्या प्रमाणे जे मिळेल ते मिळो न मिळाले तरी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नाही . धैर्य धारण करुन निश्चेष्ट पडून राहतो. त्याचप्रमाणे साधकानेही तसेच रूखे ,सुके, मधूर, निरस, स्वादीष्ट जेही प्रारब्धानुसार प्राप्त झाले ते ग्रहण करून न मिळाले तरी चिंन्ता न करता तसेच उदासीन वृत्तीने सदैव संतुष्ट रहावे. निद्रारहीत असून निद्रेत असल्याप्रमाणे व कर्म करण्यायुक्त शरीर असूनही कोणतीही आसक्ती रूप क्रिया न करता निश्चेष्ट पडून रहावे.
(१०) समुद्रा.. समुद्रापासून सर्वदा प्रसन्न, गंभीर, अथांग, असीम,मर्यादा पालन करणे आणि शांन्त वृत्ती हे गुण ग्रहण केले पाहीजे.
समुद्रामध्ये कितीही तुफान आले.कितीही वर्षा झाली. नदीनाल्यांनी महापूराने अमाप जल आणले तरी समुद्र त्या सर्वांना सहन करतो. शांन्त भावाने त्यांचे ग्रहण करतो आणि आपल्या मर्यादेचे पालन करतो. तसेच साधकाने कितीही दुःख प्राप्त झाले, विघ्न आले, संकट आले तरी विचलित न होता सदैव शान्त भावाने राहावे. अथांग असीम ह्रदय कक्षा वाढवावी, सर्वांना सहन करावे, सामावून घ्यावे.
(११) पतंग... पासून मी काम विकारापासून दूर रहाण्याचा धडा शिकलो . ज्याप्रमाणे पतंग दिव्याचे तेजस्वी रुप पाहून त्यालाच आपले सर्वस्व मानून त्याच्यावर झेप घेतो व स्वत:ला नष्ट करून घेतो. त्याप्रमाणे सांसारीक जीव स्त्री, पुत्र धन, यांच्यात आकर्षीत होउन शेवटी आपला नाश करतात.इंद्रियांचे अधिन असलेले कामी पुरूष विषयात स्वत:ला झोकुन देतात. रजगुणाच्या उठावाने मनुष्य कामांध होऊन विवेकशून्य होतो. विवेकशून्यतेमुळे तो आपल्या ध्येयापासून पतीत होतो. ईश्वर भक्तिपासूनही तो दुरावतो. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी आचार प्रकर्णात सांगीतल्याप्रमाणे पहिल्या २६ वचनाप्रमाणे ज्ञानीयाने आपले चारित्र्य शुध्द बनवावे.अनुसरलेल्या पुरुषासी आचाराची निपुनता आणि विचाराची संपूर्णता होआवी, तयाचे जन्म कडे पडे. समजले आणि त्यानुसार वर्तले तेचि भाग्य पुरूष झाले. अशा प्रकारचे ज्ञान हे यदुराजा!मी पतंगापासून शिकलो.
(१२) मधुकर (भ्रमर)... हे राजा मी भ्रमरापासून काय शिकलो ते ऐक!भ्रमर आपल्या उपजीविका प्रित्यर्थ अन्नाचा कधीच साठा करून ठेवित नाही. अन्न शोधण्यासाठी त्याची अखंड भ्रमंती सुरू असते. अन्न शोधतांना लहाण मोठा हा भेद त्याच्याजवळ नसतो. भ्रमराला सर्वच फुले सारखी असतात. प्रत्येक फुलातून तो थोडा थोडा मकरंद गोळा करतो. फुलाच्या मकरंदाच्या मोहामुळे तो कधीच एका ठीकाणी रहात नाही. जर तो एकाच ठीकाणी थांबला तर मात्र फुलात कोंडल्याशिवाय रहात नाही. हे राजा!माझा साधकही भिक्षेवरच उपजीविका करतो. यासाठी तो एकाच घरचे अन्न तो घेत नाही, श्रीमंत.. गरीब असा भेदभावही त्याच्याजवळ नसतो. आज या गावी तर उद्या दुसऱ्या गांवी असे त्याचे अटन सुरू असते.साधकाने आपल्याला लागेल तेवढेच अन्न मागावे किंवा थोडासा संग्रह करावा.
(१३) हत्ती... हे राजा ! हत्ति केवढा बलवान असतो. हत्तीला पकडण्यासाठी जंगलामध्ये एक मोठा खड्डा खोदतात. त्यावर पातळ लाकडे किंवा भुसा जमीनीबरोबर करून त्यावर काळ्या रंगाची हत्तीण बनवून उभी करून ठेवतात त्या हत्तीणीला खरोखरची समजून कामांध झालेला हत्ती स्पर्श सुखाला आसुसलेला असतो म्हणून पळत जावून खड्यात जावून पडतो. म्हणून साधकाने कोणत्याही इंद्रियाला वश करून आपला नाश करून घेऊ नये स्त्रीसंबंध टाळावा. पंचेद्रियाचे जे अर्थ, रुप, रस, गंध, स्पर्श, शब्द, यांचा त्याग करावा.इंद्रियार्थेषु वैराग्यम असे गीतेतही सांगीतले. हे गुण मी हत्तीपासून शिकलो.
(१४) मासा.. मोहाला बळी पडल्याने स्वत:चा नाश होतो, हे , मी माश्यापासून शिकलो. कोळी गळाच्या दोरीला एक वाकविलेला तार बांधतो. त्या तारास खाद्यपदार्थ लावल्यामुळे मासा खाद्यपदार्थ खाण्यास येतो व तो गळ अडकून बसतो. जीव्हा इंद्रिय महत्वाचे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवले तर सर्व इंद्रियावर नियंत्रण ठेवता येते. साधकाने केवळ प्राणाला आहार द्यावा इंद्रियांना देऊ नये.
(१५) हरिण.... पारधी जंगलात विशीष्ट प्रकारचे संगीत निर्माण करतात . हरिणाला विण्याचा आवाज खुप आवडतो. एरव्हि चपळ असणारे हरिण त्या संगीताने मंत्रमुग्ध होऊन देहभान विसरून जाते .व शिकार्याच्या जाळ्यात अडकते.अशा प्रकारे योगी पुरूषाने सांसारिक विषयात आपले मन गुंतवू नये नाही तर हरिणाप्रमाणे संसाराच्या मोहरूपी जाळ्यात अडकून जाल.म्हणून शब्द विषयाच्या अधिन साधकाने होऊ नये. विषय संबंधी संगीत ऐकू नये . त्यामुळे चित्तवृत्तीमध्ये उद्रेक घडून विकार भावना बळावते संसारीक मोहाचा व सुखाचा त्याग ही शिकवण दत्तात्रय प्रभूंनी हरिणापासून घेतली.
(१६) पिंगळा(वेश्या).. जनक राजाच्या मीथीला नगरीत पिंगळा नावाची वेश्या रहात होती .ती आपले शरीर विकून पोटाची खळगी भरत असे . एके दिवशी ती साजश्रुंगार करून आवडता पुरूष येण्याची वाट पहात होती .मध्यरात्र उलटून गेली तरी तो आला नाही. ती हताश झाली पलंगावर पडली तीला काही झोप येइना अनेकाना आपले सर्वस्व दिले परंतु आज सर्वच बेइमान झाले. अरेरे! हे सर्वजन शरीराचे भोक्ते होते. तीला पश्चाताप झाला. अशाप्रकारे पूर्ण विरक्ति उत्पंन्न होवून ती ईश्वर चिंतनात लीन झाली. जर मी पहिल्यापासून ईश्वराचे चिंतन केले असते तर मी जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त झाले असते. मानवाने आपल्या शरीराकडे सूक्ष्म द्रुष्टीने पाहीले तर हे शरीर मल, मूत्र, रक्त, मांस, हाडे, वीर्य यापासून बनलेले दिसेल .तसेच ते अनित्य व नाशीवंत आहे या पिंगळा नावाच्या वेश्येपासून जी शिकवण मिळते. ती म्हणजे हा काम नावाचा महान शत्रू आपल्या दु:खाला कारणीभूत आहे. तेंव्हा त्याला जवळ येऊ न देणे अत्यंत जरूरीचे आहे. म्हणून हे राजन !त्या पिंगळे प्रमाणे मनुष्यानेही जीवनात संसाराविषयी विरक्ति निर्माण केली पाहोजे.
१७) खंडण्या (धीवर पक्षी)... हा पक्षी पाण्यावर उडतांना भक्षावर लक्ष ठेवतो. अचूक नेम धरून भक्ष पकडतो. पण त्याने भक्ष पकडल्या पकडल्या इतर पक्षी त्याच्यावर तुटून पडतात. कोणी त्याला चोचीने मारतात, तर कोणी त्याचा पाठलाग करतात.शेवटी कंटाळून तो भक्ष खाली टाकून देतो .व एखाद्या झाडावर शांत बसून रहातो. सर्व खटाटोप व्यर्थ गेलेला असतो. ज्याच्यामुळे भिती होती, ज्यांच्यामूळे इतर पक्षांचा त्रास सहन करावा लागला. त्याप्रमाणे साधकाने पदार्थाचा (जड चेतन) मोह सोडला पाहिजे. पदार्थाचा मोह धरल्याने अनेक प्रकारची संकटे ,वा दु:खे जीवाला प्राप्त होतात. पदार्थाचा मोह सोडणे ही शिकवण श्रीदत्तात्रेय प्रभूंनी त्या खंड्या पक्षापासून ग्रहण केली.
(१८ ) अज्ञान बालक.... ज्याप्रमाणे लहाण अज्ञान बालकाला कोणत्याही प्रकारचे दु:ख , विकार, विकल्प, प्राप्त होत नाही ते नेहमी आनंदी असते. त्याला कसलीच चिंता नसते. तसेच त्याचे वागणे निरागस असते. विकाराचा तर तिथे पत्ताच नसतो. विकल्प तर त्याच्या सावलीलाही उभा रहात नाही. . पवित्र अपवित्र असा भेदच त्याच्याजवळ नसतो. ते निरागस, निराभिमानी असते. त्याप्रमाणे साधकाने नेहमी आनंदी रहावे. हा गुण बालकाप्रमाणेच साधकांनी अंगी बनवायला पाहीजे.
साधकाने कोणत्याही गोष्टिची चिंता न करता ब्रम्हविद्येचा अभ्यास करून अध्यात्म ज्ञा्नात आपले जीवन व्यतीत करावे. हे राजा! हे सर्व गुण मी बालकापासून शिकलो.
(१९) कुमारी कन्या.. एकापेक्षा अधिकजन एकत्र आले असता साधकाचे स्मरणानुष्ठाण बरोबर होत नाही. त्यासाठी एकटे असावे लागते. एकला विजय हा गुण मी कुमारी मुली कडून शिकलो.
एकदा एका परिवाराच्या घरी पाहूणे आले. त्यावेळी घरची मंडळी बाहेर गावी गेली होती. घरी फक्त एकटी मुलगीच होती त्या मुलीने पाहूण्यांचे सर्व आदरातिथ्य केले. आदरातिथ्य करतांना घरी कोणी नसल्याची जाणीव तीने पाहुण्यांना होऊ दिली नाही. घरी तांदुळ नव्हते , दळण नव्हते , त्यावेळी ती दळण व तांदुळ तयार करतांना हातातील बांगड्यांचा आवाज येऊ लागला . बांगड्यांच्या आवाजाने घरी कोणी नसल्याची जाणीव पाहुण्यांना होईल म्हणून तीने हातातील एक एक बांगडी काढून शेवटी एकच शिल्लक ठेवली.,नंतर तीने दळण व भात तयार केला.आणि पाहुण्यांना जेवण दिले. भगवान श्रीदत्तात्रय प्रभू सांगतात मी या कुमारी कन्येपासून ही शिकवण ग्रहण केली की, पुष्कळ लोकांची संगत केल्याने आपापसात भांडण, तंटे, होतात . दोघांमध्येही अनेक इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी होतात. म्हणून ज्ञानीयाने कोणासोबत संगत करू नये. आपल्यापेक्षा आचाराविचाराने श्रेष्ठ असलेल्या अधिकरणाची जवळीक ज्ञान मिळविण्यासाठी करावी म्हणून साधकाने एकाकी एकांतात एकटे राहून स्मरण , नामचिंतन केले पाहिजे.
(२०) सेलारा (धनुष्यबाण तयार करणारा) हे राजा! सेलारा पासून मी एकाग्रता हा गुण शिकलो. एकदा सेलारा रस्त्याच्या कडेला बसून बाण तयार करीत होता.त्यावेळी त्याच्या समोरून राजाची स्वारी मोठ्या थाटामाटात वाजत गाजत पुढे गेली. नंतर एक वरात पुढे गेली. परन्तु हा सेलारा आपल्या कामात व्यग्र होता. राजाच्या शिपायाने स्वारी कोठे गेली हे वीचारताच त्याने माहीत नसल्याचे उत्तर दिले तेंव्हा त्या शिपायाला आश्चर्य वाटले. अशा प्रकारे साधकाने सर्व इंद्रिये व मनाला काबुत ठेऊन एकांतात बसून श्रीप्रभूंचे चिंतन करावे व आपल्या ध्येयापासून , लक्षापासून दूर जाऊ नये.
(२१) कोळी किटक (कातीन) कोळी हा प्राणी आपोआप स्वतः जाळं तयार करतो. आणि त्यामध्ये अडकून स्वत:चा प्राण गमावतो. उपजीवीकेचे साधनच मृत्यूगोल ठरते. अशाप्रकारे मनुष्य सुध्दा स्वत:च आपल्या कर्माचे जाळे निर्माण करून त्या कर्मरूपी जाळ्यात अडकून त्या बंधनात पडतो.ज्ञानी पुरूषाने पाप व पुण्यरूप कर्माचा त्याग करून निष्काम बुध्दीने श्रीप्रभूंचे नामस्मरण करावे.म्हणजे तो कर्म बंधनातून सुटून मोक्षाच्या वाटचालीचा अधिकारी बनेल. जीवही अनेक हालअपेष्टा सहन करुन संसार उभा करतो. पण त्या संसारात तो एवढा गढून जातो. की, त्यातून त्याला बाहेरच पडता येत नाही. हे राजन! इ. गुण मी कातिन पासून शिकलो.
(२२) साप... साप हा प्राणी स्वत:ला रहाण्यासाठी घर तयार करीत नाही. मुंग्यांचे वारूळ, उंदीर ,बेडूक , इत्यादीने तयार केलेल्या आयत्या बिळात निवास करतो. तो स्व:ला राहाण्यासाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था करीत. नाही हे विश्वचि माझे घर अशा व्यापक द्रुष्टीने व सुक्ष्म विचाराने जगात वास्वव्य करावे. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे सुत्र हेच सांगते. एका झाडाची, एका स्थानाची सवय न करावी म्हणजे रोज वेगवेगळ्या झाडाखाली व पडक्या देऊळी निद्रा करावी.
(२३) मधमाशी.... हे राजा ! मधमाशी पासून मी संग्रह रूप गोष्टीचा त्याग करायला शिकलो . मधमाशा मोठ्या कष्टाने दूरदूरून मध गोळा करत असतात. अशाप्रकारे मोठ्या कष्टाने जमा केलेला मध मात्र त्यांना कधीही खायला मीळत नाही. मध्येच कोणीतरी येऊन तो मध घेऊन जातो. म्हणून साधकाने एकट्या पुरतीच भिक्षा मागून आपला उदर निर्वाह करावा . वाजवीपेक्षा जास्त साठा करू नये. अकारण वस्तूंचा संग्रह केला तर साधक ईश्वर चिंतणापासून वंचित होईल. शिवाय धनाचा साठा.. मध गोळा करणार्या मधमाशांप्रमाणे ते धन नष्ट होईल किंवा दुसर्या कडे जाईल.
(२४) भिंगुरटी.... हे राजन! भिंगुरटी हा माझा चोवीसावा गुरू आहे. भिंगुरटी एक सुरवंट तोंडात धरून आणून मातीचे घर बनवून त्यामध्ये त्याला ठेवते. नंतर त्या सुरवंटाला डंख मारून काटा रोवते. आत असणारा सुरवंट कीडा भिंगुरटीची सतत आठवण करीत असतो , की तो पुन्हा येईल व मला डंख मारून काटा टोचविल . अशा सततच्या चिंतनाने काही दिवसात त्याला पंख व पाय येतात. सुरवंटाचे फुलपाखरात रूपांन्तर होते कळतच नाही. तसे साधकाने परमेश्वर वियोगातव अखंड परमेश्वराचे नाम चिंतन करीत राहील्यास साधकही एक दिवस परमेश्वरासमान होतो . परंतु परमेश्वर नव्हे. परमेश्वराचा अपूर्वानंद भोगण्यास योग्य होतो .नामाचे चिंतनाने काय फायदा होतो हे मी त्या भिंगुरटीपासून शिकलो.
हे राजन हे चोवीस गुरूचे आख्यान मी तुला निमीत्य करून सर्वजनांसाठी सांगीतले आहे . या गुरूंचा आदर्श ठेऊन तु तुझे जीवन उज्वल कर. !नश्वर संपत्तीचा त्याग करून मला परमेश्वराला शरण ये! मला अनन्य भावाने शरण आलेल्यांचे मी रक्षण करतो. भगवान श्रीक्रुष्ण गीतेत सांगतात,
"अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम।।
य: प्रयाति स मदभांवयाति नास्त्यत्रय संशय।। गी.अ.८.श्लो ५
म्हणून गीतेत सांगीतल्या प्रमाणेच शेवटचा क्षण साधायचा असेल तर पाचव्या नामाचे स्मरण निरंतर , उठता, बसता, चालता, बोलता, शयनी, भोजनी करावे.
अशा प्रकारे गुरू निरुपणातून यदुराजाला ज्ञान प्राप्त झाले. श्रीदत्तात्रय प्रभूंचे अमोघ दर्शन झाले. परमेश्वराला गुरू करण्याची काय आवश्यकता आहे? हे मला ज्ञान देण्यासाठी चोवीस गुरूंचे निरुपण सोदाहरण पटवून दिले आहे. माझ्या अधिकारानुरूप मला प्रभूंनी ज्ञान दिले आहे. हेच माझे स्वामी, परमपिता परमात्मा आहेत मी सेवक आहे. असा स्वामी सेवकाचा भाव प्रकट होऊन यदुराजा श्रीदत्तात्रय प्रभूंचा अनन्य भक्त झाला. श्रीदत्तात्रय प्रभूंची महापुजा करून त्यांच्या आज्ञेनेच अनासक्ति योगाने कर्तव्य कर्म म्हणून राज्यकारभार पाहण्यासाठी यदुराजा आपल्या राज्यात परत आला.
श्रीदत्तात्रेयप्रभूस अर्पण