यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे - संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे - संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit

संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit

संस्कृत सुवचनानि 

आजची लोकोक्ती - यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे।

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे।

समेत्य च व्यपेयातां तद्वतद्भूतसमागम:॥

एवं भार्याश्चपुत्राश्च ज्ञातयश्च धनानि च।

समेत्य व्यवधावन्ति ध्रुवो ह्येषां विनाभवः॥

              २.१०५.२६/२७, वाल्मिकीरामायण.

अर्थ :- ज्याप्रमाणे एखादा लाकडाचा ओंडका महासागरात दुसऱ्या ओंडक्याच्या जवळ येतो आणि काही काळ जवळ आल्यावर ते पुन्हा एकमेकांपासून दूर जातात.  त्याचप्रमाणे (तद्वतच) त्याप्रमाणे जीवांचा या जगात सहवास असतो.  

   हेच बायको, मुले, नातलग आणि धन याबाबतीतही घडतं. या सगळ्यांचा काही काळ सहवास लाभून पुन्हा ते दूर जातात. त्यांचा वियोग अटळ (धृव) आहे.  ह्या संसारातील मनुष्याच्या अनिश्चित गाठीभेटी आणि जीवनयात्रेविषयी सांगताना बऱ्याचदा 

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे। ही लोकोक्ती बोलली जाते. वरील श्लोक वाल्मीकी रामायणाच्या आयोध्याकांडातील १०५व्या सर्गातील आहेत. यात असा पाठभेदही आढळतो,

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ।

समेत्य च व्यपेयातां कालमासाद्य कञ्चन॥

       वाल्मीकिरामायणातील अगदी हाच श्लोक शिवपुराणातही समाविष्ट आहे,

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ।

समेत्य च व्यपेयातां तद्वद्भूतसमागमः ॥

                     - ७.१.५.५९, शिवपुराण.

        स्कंदपुराणातही ३र्‍या खंडाच्या ४५व्या अध्यायात राम-हनुमान संवादात याच श्लोकाचा पाठभेद आढळतो,

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ।

समेत्य च व्यपेयातां कालयोगेन वानर॥४७॥

एवं भार्या च पुत्रश्च वधुक्षेत्रधनानि च। 

क्वचित्संभूय गच्छंति पुनरन्यत्र वानर॥४८॥

                 - ३.४५.४७/४८, स्कंदपुराण.

  महाकवी 'अश्वघोष' रचित 'बुद्धचरितम्' महाकाव्याच्या नवव्या सर्गात जेव्हा राजकुमार सिद्धार्थ गौतम जेव्हा संसारातून विरक्त होऊन, कोणात्याही पूर्वसुचनेविना गृहत्याग करतो, त्यानंतर महाराज 'शुद्धोदन', राजपुरोहित व राज्यमंत्र्यांना राजकुमाराला शोधण्याचे व परत आणण्याचे कार्य सोपवतात. जेव्हा राजपुरोहित राजकुमार सिद्धार्थाला भेटतात, तेव्हा सिद्धार्थ गौतम त्यांच्या करवी महाराज शुद्धोदनांकरिता संदेश देतात की संयोगानंतर वियोग अटळ आहे. त्यावेळी दिलेल्या संदेशातही वरील श्लोकाशी अर्थसाम्यता असणार्‍या श्लोकातून सिद्धार्थगौतम राजपुरोहितांना सांगतात की,

यथाध्वगानामिह सङ्गतानां काले वियोगो नियतः प्रजानाम्।

प्राज्ञो जनः को नु भजेत शोकं बन्धुप्रतिज्ञातजनैर्विहीनः॥

इहैति हित्वा स्वजनं परत्र प्रलभ्य चेहापि पुनः प्रयाति।

गत्वापि तत्राप्यपरत्र गच्छत्येवं जने त्यागिनि कोऽनुरोधः॥

                 - ९.३५/९.३६, बुधचरितम्.

        ज्याप्रमाणे प्रवासात एकत्र आलेले पथिक काही काळ एकत्र वाटचाल करतात. परंतु विशिष्ट वेळ आल्यानंतर त्यांचा वियोग निश्चित असतो. त्याचप्रमाणे बांधवांचा व परिजनांचा वियोगही अटळ असतो. जर असे आहे, तर कोणती प्राज्ञ (बुद्धिवंत, ज्ञानी) व्यक्ती स्वजन बांधवांच्या वियोगाने शोकमग्न होईल?

        जीव पुर्वजन्मातील स्वजनांना सोडून इहलोकात जन्म घेतो. इहलोकात पुन्हा तो नवीन बांधवांशी लोभ जोडून पुन्हा त्यांना त्यागून दुसऱ्या लोकात प्रस्थान करतो. त्या नव्या लोकात जाऊन तिथून परत तिसऱ्या लोकात जातो. अशा सोडून जाणाऱ्या विषयी काय प्रेम वा आसक्ती ठेवायची?

        महाभारताच्या शांतीपर्वातील राजधर्मपर्व या उपपर्वात व्यासऋषी आपला पुत्र शुकमुनींना 'अश्म-जनकसंवाद' सांगतानाही हेच म्हणतात,

मातृपितृसहस्राणि पुत्रदारशतानि च।

संसारेष्वनुभूतानि कस्य ते कस्य वा वयम्॥

                      - १२.२७.३८, महाभारत.

         मातापिता, हजारो पुत्र, शेकडो पत्नी यांचा या संसारात आपण अनुभव  घेतला आहे त्यातले ते सगळे तरी कोणाचे? आणि आपण तरी कोणाचे आहोत?

        मराठीतील एक सर्वांगसुंदर काव्यलेणं अस ज्याला म्हणता येईल ते ग.दि.मा.रचित 'गीतर‍मायण'. त्यातही वनवासाला निघालेल्या रामाला वनवासापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भरताला गदिमांनी याच ओळी प्रभूश्रीरामाच्या मुखातून ऐकविल्या आहेत, त्या कदाचित वाल्मिकी रामायणातील वरील श्लोकापासूनच सुचल्या असाव्यात,

दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा।

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा॥

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ

क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा॥

      द बर्नींग ट्रेन या हिंदी चित्रपटातील गाणंही या श्लोकाचाच आशय सांगते म्हणून हा उल्लेख,

पल दो पल का साथ हमारा पल दो पल के याराने है

इस मंजिल पर मिलनेवाले उस मंजिल पर खो जाने है

        आयुष्याच्या अनिश्चित प्रवाहात कोण, कुठे, कधी, भेटेल अथवा दूर जाईल? हे मनुष्याच्या हातात नाही. त्यामुळे

आले देवाजीच्या मना

तेथे कोणाचे चालेना

तुका म्हणे उगी राहावे

जे जे होईल ते ते पहावे

         ह्या नश्वर जगात काही काळासाठी आपण एकत्र येतो आणि कर्मभाग संपला की दूर जातो. मग अपण कोण्या जन्मीचे को हे देखील माहिती नसते. कर्मबंधनातून असलेलं कोणतं ना कोणतं ऋण फेडण्यासाठीच आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला भेटत असते. आपल्या हाती एकच खूप चांगली गोष्ट आहे ती म्हणजे 

जो जो इथे आपल्याला भेटेल त्याच्याशी चार चांगले शब्द बोलावेत कोणाचा द्वेष करू नये आणि कोणाचे वाईट चिंतू वा करू नये. ज्ञानोबाराय तर या ही पुडे जाउन सांगतात की,

जे जे भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।

हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥

         येथे जे जे काही सजीव निर्जीव चराचर आहे ते ते परमेश्वराचंच रूप आहे असे मानावे. हाच माझा खरा भक्तीयोग आहे. सर्वात्मक परब्रम्हाला सर्वांठायी पाहाण्याचा गीतेतील श्रीकृष्णस्वारींचा उपदेश यातून माउली देतात. 

         त्यामुळे जो भेटेल त्याच्याशी चार चांगल्या गोष्टींचे आदानप्रदान करावे कारण,

        यथा काष्ठं चकाष्ठं च।

लेखन आणि चिंतन :- अभिजीत काळे सर 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post