परमेश्वराचे नियोजन
वाचण्यापूर्वी... हळुवारपणे आपले डोळे बंद करा... हृदयाला साद घाला आणि साक्षीभावाने गोष्ट ऐका....
परमेश्वराचं नियोजन
एकदा देवाचा सेवक त्याला म्हणतो, “देवा-तुम्ही एका जागी उभे राहून राहून थकला असाल. एका दिवसासाठी मी आपल्या जागी मूर्ती बनून उभा राहतो, तुम्ही माझे रूप घेऊन जरा फेरफटका मारून या.”
देव मान्य करतात, पण एक अट घालतात, "जी लोकं प्रार्थना करण्यासाठी येतील त्यांची प्रार्थना फक्त ऐकून घ्यायची, काहीही बोलायचं नाही. मी त्या सर्वांसाठी योजना करून ठेवलेली आहे." सेवक ही अट मान्य करतो.
सर्वात प्रथम एक व्यापारी येतो आणि म्हणतो, "देवा, मी एक कारखाना सुरू केला आहे त्याची खूप भरभराट होऊ देत." तो जेंव्हा नतमस्तक होतो, तेव्हां त्याचे पाकीट खिशातून खाली पडते आणि तो पाकिटा शिवायच निघूनही जातो. देवाच्या रूपातील सेवक बेचैन होतो. तो त्याला थांबवण्याचा विचार करतो, सांगावसं वाटतं की त्याचं पाकीट इथे पडले आहे. परंतु देवाची ‘अट’ आठवल्यानं तो काही बोलू शकत नाही.
त्यानंतर मंदिरात एक गरीब माणूस येतो आणि प्रार्थना करतो, “देवा, माझ्या घरात खाण्यासाठी काहीही नाही, देवा माझी मदत करा.” तेव्हाच त्याची नजर त्या खाली पडलेल्या पाकिटावर जाते. तो देवाचे आभार मानतो आणि ते पाकीट घेऊन निघून जातो. आता तिसरा माणूस येतो जो खलाशी असतो. तो म्हणतो, "देवा, पंधरा दिवसांसाठी मी जहाज घेऊन समुद्रात सफरीसाठी जाणार आहे. आमच्या यात्रेच्या प्रवासात कुठल्याही अडचणीला तोंड देण्याची वेळ येऊ नये.
तेवढ्यात तिथे पाठीमागून तो व्यापारी पोलिसांना बरोबर घेऊन येतो व म्हणतो की, “माझ्या नंतर हा खलाशी आला आहे आणि त्यानेच माझं पाकीट चोरले असेल.” पोलीस खलाश्याला पकडून घेऊन जाऊ लागतात, तेव्हां मूर्तीतील सेवक बोलू लागतो, पाकीट तर गरीब माणसाने चोरलेले आहे. सेवकाच्या सांगण्यावरून, देवच बोलला आहे असा विचार करून, पोलिस खलाश्याला सोडून देतात आणि गरीब माणसाला पकडून जेलमध्ये बंद करतात.
रात्री देव परत येतात, सेवक आनंदाने पूर्ण दिवसाचा घटनाक्रम देवाला सांगतो. देव म्हणतात, “तू कोणाचे भले करण्याच्या ऐवजी गोष्टी बिघडवून नुकसानच केले आहेस. तो व्यापारी जो बेकायदेशीर धंदा करतो, त्याचे पाकीट पडल्याने काही फरक पडणार नव्हता. उलट त्याचं पाप थोडं कमी झालं असतं. आणि तेच पाकिट या गरीब माणसाला मिळालं असतं तर तो मुलाबाळांचं पोट भरू शकला असता. त्या पैशामुळे त्याची मुलं भुकेनं मरणार नव्हती.
आणि तो खलाशी जो यात्रेसाठी चालला होता, पण समुद्रात जोराचे वादळ येणार होते. जर तो जेलमध्ये राहिला असता तर त्याचा जीव वाचला असता, व त्याची बायको विधवा होण्यापासून वाचली असती. तू हस्तक्षेप करून सर्व गोंधळ करून ठेवलास.”
बऱ्याचदा, आपल्या जीवनात पण अशा समस्या येतात. आपल्याला वाटतं की, आपल्या बाबतीतच असे का घडले? परंतु त्यामागे ईश्वराचे काहीतरी नियोजन असते. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि विचार करा, समाधान माना की जे होते ते चांगल्यासाठी होते.
जर आपण आपल्या जीवनात येणाऱ्या चिंतांचा स्वीकार केला नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या त्रासांमध्येच गुरफटून राहतो, आणि त्यामुळे होणाऱ्या कष्टांना भोगत राहतो. त्याबरोबरच आपण आपल्या त्रासांमधून काहीही शिकत नाही कारण आपण आपल्या जीवनातील या चिंतांचा, त्रासाचा आपल्या जीवनात कधीही स्वीकार करीत नाही. ज्यावेळी आपण आपल्या समस्यांचा आपल्या आयुष्यामधे स्वीकार करतो, तेव्हा आपण त्यावर काम करायला सुरुवात करतो, आणि त्याच्या फलस्वरूप आपल्याला त्या समस्यांवरील समाधान पण मिळायला सुरुवात होते."*
*दाजी*
*हार्टफुलनेस मेडिटेशन*
*मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक *