प्रेरणादायी विचार
जीवनात लक्षात ठेवायच्या तीन गोष्टी
जीवनात दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा. प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजेच प्रयत्न केल्यास परमेश्वर भेटतोच अशी श्रद्धा. मग आपण प्रयत्न केले, तर आपल्याला नक्की यश येणारच, असा आत्मविश्वास बाळगायला काहीच हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात यशस्वी, सुखी, समाधानी व्हायचे असल्यास जोडीदाराला कधीच तोडू नका. कायम लक्षात ठेवा, जेव्हा जोडीदार तुम च्यासोबत असतो तेव्हा जगातील कुठल्याही समस्येवर मात करण्याचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये तयार होतो.
१. प्रयत्नांती परमेश्वर : कुणीतरी करेल आणि मग आपले जीवन बदलून जाईल, अशा आशेवर कधीही राहू नका. कारण तुम्ही प्रयत्न करणार नसाल, तर तुमचे भाग्य उजळून टाकायला कुणालाही वेळ नाही.
कारण प्रत्येकाला आपले भाग्य उजळवण्याची घाई झालेली आहे. तुमचे विचार आणि भावना कधीही लपवण्याचा प्रयत्न करू नका. तसे केल्यावर तुमचे नको ते व्यक्तिमत्त्व इतरांना दिसू लागते. तुम्हाला जे वाटते ते करा. तुम्ही समजता त्यापेक्षा तुम्ही कितीतरी शक्तिशाली आहेत. तुमच्यातील ऊर्जेची तुम्हाला कल्पना नाही. त्यामुळे भाग्यविधाता येईल, अशा आशेवर जगत बसलात, तर भाग्यविधात्याच्या ऐवजी म्हातारपण कधी येईल ते कळणार नाही.
२. जवळच्या व्यक्तींना दुखावू नका
: सगळे जग तुमच्याविरोधात गेले तरी जवळच्या मित्रांशी विशेषतः लग्नाच्या नात्यातील जोडीदाराला कधीही दुखावू नका. त्याच्यापासून दुरावण्याचा विचारही मनात आणू नका. कारण जोडीदार आणि जवळचे मित्र तुमच्या अडचणींच्या काळात तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असतात. काय बरोबर आहे, हे ठरविण्याचे अनेक मार्ग असतात. त्यामुळे तुम्ही तुमचाच मार्ग योग्य, असा हेका धरून बसू नका. स्वतःचे खरे करण्याच्या नादात जो मनस्ताप होतो त्यापेक्षा तुमच्या मनाची शांतता कितीतरी पटीने मोल्यवान आहे..
३. एका छोट्या बदलानेही आयुष्य घडते
एक कुंभार दादा मातीची चिलीम बनवित होते. त्यांनी चिलमीचा आकारसुद्धा तयार केला होता. पण, काहीतरी विचार बदलला आणि त्यांनी तो चिलमीचा साचा मोडून टाकला. त्यात त्यांनी माती वाढवली आणि एक छोटीशी घागर तयार करू लागले.
कुंभार दादा अगदी मन लावून ती घागर तयार करू लागले. अगदी त्या घागरीशी संवाद करू लागले. त्या मातीने विचारले, 'अरे कुंभार दादा, तुम्ही किती छान नक्षीदार अशी चिलीम तयार करत होतात. मग अचानक तो साचा मोडून घागर का बनवू लागला... ?'
कुंभार दादा म्हणाले, 'मी चिलीम बनवत होतो. पण, अचानक माझा विचार बदलला. तो कसा बदलला ते माहिती नाही. पण, काहीतरी अचानक घडले.' माती म्हणाली, 'कुंभार दादा, तुमची मती बदलली हे बरेच झाले. तुमची मती बदलली आणि या मातीचे आयुष्यही बदलले. '
कुंभार दादांना मातीच्या या बोलण्याचे आश्चर्य वाटले. त्यांनी मातीला याचे स्पष्टीकरण मागितले. माती म्हणाली, 'मी जर चिलीम झाले असते, तर मीही जळाले असते आणि दुसऱ्यांनाही जाळले असते. आता घागर झाल्यावर मीही थंड राहीन आणि इतरांनाही थंडावा देईन.'
तात्पर्य : जीवनात अचानक होणारे काही बदल किंवा बदललेले विचार हे स्वतःला तर आनंद देतातच शिवाय, इतरांनाही सुख मिळू शकते.