य: स्वभावो हि यस्यस्यात्तस्यासौ दुरतिक्रमः संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

य: स्वभावो हि यस्यस्यात्तस्यासौ दुरतिक्रमः संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण 

sunskrit Subhashit knowledgepandit

आजची लोकोक्ती - स्वभावो दुरतिक्रमः।   

य: स्वभावो हि यस्यस्यात्तस्यासौ दुरतिक्रमः।

श्वा यदि क्रियते राजा तत्किं नाश्नात्युपानहम्॥

अर्थ :- एखाद्याचा जो मूळ स्वभाव असतो तो त्याला मुळीच बदलता येत नाही. कुत्र्याला जरी अगदी राजा केले तरी ते चपला (पादत्राणे) चघळायचे सोडेल काय? तात्पर्य मूळ स्वभाव जात नाही हे खरं!

टीप - या श्लोकासंदर्भात पाठभेदही आढळतो. तो असा,

य: स्वभावो हि यस्य स्यात्तस्यासौ दुरतिक्रमः।

य: स्वभावो हि यस्यास्ति स नित्यं दुरतिक्रम:॥

माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. या अर्थाने ही लोकोक्ती मराठीतही बोलताना वापरली जाते. याच अर्थाने अजून काही म्हणी मराठीत वापरल्या जातात. त्या अशा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. सुंभ जळाला तरी पिळ जात नाही कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं, तरी कडू ते कडूच कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच यावरून एक उर्दू शेर आठवतो माझ्या आवडत्या शेरांपैकी हाएक शेर आहे. शायराचे नाव लक्षात नाही पण शेर असा आहे,

तहजीब सिखाती है जीने का सलीका ।

तालीम से जाहिल की जहालत नहीं जाती ।

नम्र-सुस्वभावच जगण्याची योग्य पद्धत शिकवतो. दुर्जन, दुष्ट मनुष्य कितीही शिकला तरी शिक्षणाने त्याचा दुष्टपणा जात नाही. याबाबतीत तुकोबाचा हा अभंगही अतिशय चपखल दृष्टांत देतो. इतका की यया अभंगाचे पहिले चार चरणही म्हण म्हणूनच मराठीत रूळले आहेत. पाहा,

आधी होता वाघ्या । दैव योगे झाला पाग्या ।

त्याचा येळकैट राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

आधी होती दासी । पट्टराणी केले तिसी ।

तिचे हिंडणे राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥ - संत तुकाराम.

जसा दुष्टांचा दुष्टपणा जात नाही तसा चांगल्यांचा चांगुलपणाही वाईट संगतीने किंवा परिस्थितीने जात नाही. याबद्दल हा शेर बरेच काही बोलून जातो. पाहा,

हम से तहज़ीब का दामन नहीं छोड़ा जाता ।

दश्त-ए-वहशत में भी आदाब लिए फिरते हैं । - फराग रोहवी.

माझ्याकडून माझा नम्र सुस्वभाव काही सोडला जात नाही वेडेपणाच्या भर उन्मादातही सर्वांशी आदराने (आदब) वागण्याचा शिष्टाचार आपोआपच पाळला जातोय. शेवटी काय तर मुळात ज्याचा जसा स्वभाव असतो तसाच तो शेवटपर्यंत रहातो. याच अर्थाने श्वपुच्छ प्रकृतिं गतः। ही लोकोक्तीही आपण पुढे पाहाणार आहोत. त्याचप्रकारे  स्वभावो दुरतिक्रमः। हे चरण असलेला रामायणातला आणखी एक श्लोक आहे. इथे विस्तारभयास्तव ते लिहिणे शक्य नसल्याने त्याचे थोडे विवरण आपण पुढे केव्हातरी पाहू. 

=================

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post