संस्कृत सुभाषित रसग्रहण - मराठी श्लोकार्थ
sunskrit Subhashit knowledgepandit
मणि: शाणोल्लीढ: समरविजयी हेतिनिहतो
मदक्षीणो नागः शरदि सरिदाश्यानपुलिना
कलाशेषश्चन्द्रः सुरतमृदिता बालवनिता
तनिम्ना शोभन्ते गलितविभवाश्चार्थिषु नृपा:॥७७॥
- 'नीतीशतक', राजा भर्तृहरी.
छंद
शास्त्र :- वृत्त : शिखरिणी.
गणक्रम : य म न स भ लगा
{राजा भर्तृहरी कृत नीतीशतक अर्थपद्धति विषयविभाग (लृ) - धन, दान, याचना, धनाचे कर्तृत्व, दारिद्र्य.}
अर्थ
:- सहाणेवर घासले गेलेले रत्न, युद्धात जखमांमुळे क्षीण झालेला विजयी वीर, मद वाहून वाहून थकलेला हत्ती, शरद ऋतूत वाळवंट (तीर, किनारे) थोडे उघडे
पडलेली,
रोडावलेली नदी, चंद्राची कलाक्षयेनंतर उरलेली कोर, सुरतश्रमाने (चुंबनादी मुखमर्दनाने) थकलेली नवयुवती, याचकांना दान देऊन आपले वैभव गमावलेला राजा; या सर्वांना त्यांची निम्नता, क्षीणता (कमीपणा) अलंकाराप्रमाणे शोभिवंत होते.
टीप- काही प्रतींमध्ये, पहिल्या चरणातील 'हेतिनिहतो' च्या स्थानी 'हेतनिहतो' असा पाठभेद आढळतो, तर दुसऱ्या चरणात 'सरिदाश्यानपुलिना' ऐवजी 'सरिताः श्यानपुलिना'
असा पाठभेद आढळतो.
तिसऱ्या चरणातही 'बालवनिता' च्या ठिकाणी 'बालललना' असा पाठभेद आढळतो. तसेच शेवटच्या चरणातील 'नृपाः' या शब्दाच्या जागी 'नराः', 'जनाः' असे शब्द योजले
गेले आहेत. या श्लोकामध्ये
भर्तृहरीने कुणाकुणाचे सौंदर्य स्वत:जवळचे काहीतरी गमावल्यानंतर, कमीपणामुळे वाढते ते सांगितले आहे.
एखाद्या रत्नाला पैलू पाडण्यासाठी
घासले जाते पण त्यामुळे ते झिजले तरी लकाकी येते, त्याची शोभा वाढते. रणांगणावर प्राणपणाने लढून विजयी झालेल्या
योद्ध्याचा अभिमान, सौंदर्य त्याच्या
शरीरावर झालेल्या तलवारीच्या (हेति-तलवार) घावांमुळे वाढते. ज्याच्या गंडस्थळातून मद
पाझरला आहे असा क्षीण झालेला हत्ती (नाग-हत्ती) शोभून दिसतो. शरद ऋतूमधल्या (चांदण्या
रात्री) नद्या त्यांच्या सुकलेल्या/आटलेल्या किनार्यांमुळे शोभून दिसतात. कृष्णपक्षामध्ये
कलेकलेने कमी होत गेलेला चतुर्दशीचा एकच कला शिल्लक राहिलेला चंद्र (चंद्राची कोर)
शोभून दिसतो, रतिप्रसंगामुळे थकलेली नवतरुण
विवाहित स्त्री
आणि आपले
सर्व धन याचकांना दान करून गलितविभव झालेले पुरुष हे या सर्वांखालोखाल शोभून दिसतात.
याच श्लोकाच्या अर्थाशी जुळणारी एक हिंदी कुण्डलिया (रोला+दोहा) रचना आहे ती अशी,
छोटो हु नीकी लगे, मणि खरषाण चढ़ीसु ।
वीर अंग कटि शस्त्रसो, शोभा सरस बढ़ीसु ।।
शोभा सरस बढ़ीसु, अंग गज मदकर छिनहि ।
द्वैज कला शशि साह, शरदि सरिता जिमि हीनहि ।।
सुरत दलमली नार, लहत सुन्दरता मोटी ।
अर्थिं को धन देत, घटी सो नाहिन छोटी ।।