कुतर्कापासून तर्कटपणापासून दूर रहा sunskrit Subhashit knowledgepandit

कुतर्कापासून तर्कटपणापासून दूर रहा sunskrit Subhashit knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण

कुतर्कापासून तर्कटपणापासून दूर रहा

३) दुस्तर्कात् सुविरम्यताम् ।

अर्थ.. कुतर्कापासून, तर्कटपणापासून दूर रहा.. ते थांबवा !

    चिंतन.. मानो, करो, तब समझो ही खरी ज्ञानप्राप्तीची योग्य प्रक्रिया आहे. जे आपल्याला कळत नाही, समजत नाही, प्रत्ययाला येत नाही, आपल्या आकलनाच्या बाहेर आहे ते सर्व अयोग्य, टाकाऊ, निरुपयोगी आहे, ते असूच शकत नाही. अस्तित्वात येऊच शकत असं समजणं हे निव्वळ अहंकाराचं, अज्ञानाचं, बालीशपणाचं, अल्पबुद्धीचं प्रदर्शन आहे!

    त्यापेक्षा समोर आहे ते स्वीकारणं, मान्य करणं आणि मग त्याचा सकारात्मकतेतून विचार करणं.. ते कळावं म्हणून पूर्वजांनी, पूर्वसूरींनी सांगितलेल्या मार्गावरून चालणं हा चांगला मार्ग आहे. याद्वारेच ते नेमकं काय आहे ते कळेल. पण मला(च) सर्व(च) कळतं(च) या अहंकाराच्या भरवश्यावर राहून माणूस किती तरी चांगल्या, उपयुक्त, हितकारी गोष्टींना गमावून बसेल. एका बिंदूतून ज्याप्रकारे अनेक रेषा निघू शकतात त्याप्रमाणे एका घटनेचे प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे अनेक अन्वयार्थ लागू शकतात.. तिच्याबद्दलच्या अनेक कार्य कारण मीमांसा मांडता येतात! त्यातली नेमकी कोणती स्वीकारार्ह मानणार?

         त्यातल्या त्यात त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी वा त्या घटनेतच गुंतलेले. संबंधित असे जे कुणी असतील ते सांगतील तेच स्वीकारार्ह, विश्वासार्ह धरले गेले पाहिजे.  भगवंताबद्दल, परब्रह्मा बद्दलही तसंच आहे! ज्या संतसत्पुरुषांनी, भगवद्भक्तांनी, सिद्धांनी भगवद्दर्शन घेतलंय, ज्यांना भगवदनुभूति मिळाली आहे, ज्यांना भगवत्साक्षात्कार झालाय ते जे सांगतील त्यावर विश्वास ठेवायला हवा ना!

         ज्या मार्गानं जाऊन, ज्या साधनेला स्वीकारून.. ती निष्ठेनं करून त्यांना भगवंताची प्राप्ति झाली, भगवत्ज्ञान झालं त्याच मार्गानं त्यांच्यावर विश्वासून, परम श्रद्धा ठेवून गेलं पाहिजे तर भगवंत आपल्यालाही मिळेल! मिळेलच मिळेल !! आत्मप्रचिति ही सर्वात शेवटची पायरी आहे. त्या आधीच्या शास्त्रप्रचिति व गुरुप्रचिति या पायर्या कोणतेही तर्क - कुतर्क - दुस्तर्क न लढवता त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा, निष्ठा ठेवून जर ओलांडल्या तर आत्मप्रचितिपर्यंत पोहोचता येईल.

    भूमीमध्ये धान्याचा कण पेरल्यावर तो कसा अंकुरतो, वाढतो याची आपल्या बुद्धीनं शहानिशा करण्याच्या नादात रोज जर ते उपटून निरीक्षण करून पुन्हा लावलं तर अंकुरणंही घडणार नाही आणि अंकुरलं तरी वाढणार नाही.. त्याचं फुलणं.. फळणं दूरच राहील! बीज पेरलंय त्याला नियमित पाणी देणं..

    अनावश्यक तण काढून टाकणं हे जसं कर्तव्य आहे  तसं भगवत्प्राप्तीच्या इच्छेचं.. तळमळीचं बीज अंतःकरणात पडल्यानंतर त्यावर रोज श्रद्धेनं साधनाजल शिंपत राहणं  दुस्तर्कांचं, कुतर्कांचं संशयोत्पादक अहंकारजन्य तण काढून टाकणं हे साधकाचं कर्तव्य आहे! म्हणून आचार्य सांगतात..

    दुस्तर्कात् सुविरम्यताम् .. दुस्तर्क नुसते थांबवा नव्हेत.. तर नीट थांबवा!  त्यांच्यापासून खूप सुरक्षित अंतरावर रहा.. जराही त्यांचा संसर्ग होऊ देऊ नका. जर साधना सुरळीत, वाढत्या प्रमाणात व अपेक्षित परिणाम देणारी घडावी असं वाटत असेल तर आपला बुद्धिभेद करणारं.. त्यातून तर्कटं रचण्याच्या मोहात पाडणारं..

    कुतर्क दुस्तर्काकडून संशयाकडे नेणारं काहीही न वाचता, पाहता, ऐकता केवळ आपले सद्गुरु व त्यांनी दिलेली साधना यावरच एकाग्रचित्त होऊन भगवत्प्राप्तीची तळमळ वाढती कशी राहील इकडे लक्ष द्यायला हवं! लष्करात, सैन्यात वरिष्ठ अधिकार्यांचा हुकूम, त्यांची आज्ञा शिरसावंद्य समजून तंतोतंत पाळणं हे जसं सैनिकाचं कर्तव्य असतं.

    there is no question WHY but either Do Or Die.. तसं साधकानं वागायला हवं! आचार्यांचीच नव्हे तर सर्व संतसत्पुरुषांची मनुष्य म्हणून जन्मलेल्या प्रत्येक जीवा कडून हीच अपेक्षा आहे की त्यानं साधक व्हावं. साधनासिद्ध व्हावं. गुरुनिष्ठ असावं! पण त्यासाठी एकच पथ्य पाळायला हवं दुस्तर्कात् सुविरम्यताम् !

----------

 

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post