बोधकथा - अनुभव सर्वात मोठा गुरु
रामधन नावाचा एक
म्हातारा व्यापारी होता. जो त्याच्या व्यापारी अनुभवामुळे
दोन्ही हातांनी खुप पैसा कमवत होता. व्यापारात
त्याच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नव्हते. तो दूरदूरवरून धान्य
आणायचा आणि त्याच्या शहरात विकायचा, त्यातून
त्याला भरपूर नफा मिळत असे. त्याच्या यशाने तो खूप खूश होता. त्यामुळे व्यवसाय अजून वाढवावा, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्यांनी
शेजारच्या राज्यात जाऊन व्यवसाय करण्याचा त्याने विचार केला.
दुसर्या राज्यात जाण्याच्या मार्गाचा नकाशा त्याने
बारकाईने पाहिला. त्यात त्याला वाटेत मोठे
वाळवंट असल्याचे स्पष्ट होते. आणि ऐकीव घटनांनुसार त्या
ठिकाणी अनेक दरोडेखोर, लुटारू, वाटमारे आहेत. असे त्याने
ऐकले होते. पण वृद्ध व्यावसायिकाने त्या वाळवंटा पलिकडच्या प्रदेशात
व्यापार करून पैसा मिळवण्याची अनेक स्वप्ने पाहिली होती. त्याच्या मनात दुसऱ्या राज्यात जाऊन पैसे कमवण्याची इच्छा प्रबळ होती. त्याने आपल्या
अनेक शेतकरी साथीदारांसह तिथे जाण्याचा निर्णय घेतला. शे-पन्नास
बैलगाड्या सज्ज करून त्यावर धान्य भरले गेले. त्या सर्वांजवळ एवढा माल होता की, जणू काही
एखाद्या राजाची शाही स्वारी असते.
म्हाताऱ्या
रामधनच्या गटात अनेक लोक होते, ज्यात तरुण जवान होते आणि वृद्ध अनुभवी लोक होते, जे वर्षानुवर्षे रामधन
सोबत काम करत होते. पण तरुणांमध्ये मतभेद होते. त्या पराक्रमी तरुणांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या
तरुणाने या व्यापारी गटाचे नेतृत्व केले असते तर बरे झाले
असते, कारण हा वृद्ध रामधन फारच हळू
हळू कासवगतीने जाईल आणि त्यामुळे सर्वांना त्या वाळवंटात काय काय पहावे लागेल सांगता येत नाही.
त्यानंतर काही नव
तरुणांनी मिळून स्वत:चा वेगळा ग्रुप बनवला आणि स्वत:चा माल
घेऊन दुसऱ्या राज्यात जाऊन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. रामधनच्या आवडत्या लोकांनी या गोष्टीची माहिती रामधनला
दिली. तेव्हा रामधनाने कोणतीही गंभीर प्रतिक्रिया दाखवली नाही,
‘‘तो म्हणाला, बंधुनो!!
प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा स्वतंत्र अधिकार
आहे. जर त्यांना माझ्यासोबत काम करायचे नसेल तर ही त्यांची
मर्जी. त्यांनी हे माझे काम सोडून स्वतःचे काम
सुरू केले असेल तर माझी काहीच हरकत
नाही. आणि आपल्या गटातीलही ज्यांना त्यांच्यासोबत जायचे असेल ते जाऊ शकतात. मी कोणालाही मनाई करणार नाही.’’
आता दोन वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचे दोन गट तयार झाले होता, ज्यामध्ये
एकाचे नेतृत्व वृद्ध पण महान अनुभवी व्यापारी रामधन करत होते
आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व ‘गणपत’ नावाचा तरुण करत होता. दोघांच्याही गटात वृद्ध आणि तरुण व्यापारी
होते.
प्रवास सुरू झाला रामधन आणि गणपत आपापल्या गटासोबत निघाले. काही अंतरापर्यंत सर्वजण एकत्रच प्रवास करत होते. पण नंतर तरुण व्यापारी गणपतच्या टोळीने रामधनच्या
गटाला मागे टाकले त्या जलदगतीने पुढे निघून गेले. आणि रामधन व त्याचे साथीदार मागे राहिले. या
रामधनच्या संथ गतीने रामधनच्या गटातील तरुण व्यापारी अजिबात खूश नव्हते आणि ते आपसात चर्चा करू लागले, ‘आपण किती मागे राहिलो
आहोत, गणपतचा तरुणांचा गट कधीच शहराची हद्द
ओलांडून काही दिवसांत वाळवंट पार करेल’’, असे बोलत रामधनवर वारंवार टीका करत होते. आणि ‘‘या म्हाताऱ्या
रामधनमुळे आपण सगळे उपाशी मरणार आहोत.’
हळुहळू रामधनचा गट शहराची
हद्द ओलांडून वाळवंटाच्या जवळ पोहोचला. तेव्हा रामधन
सगळ्यांना म्हणाला, ‘‘मित्र हो! हे
वाळवंट खूप लांब दुरवर पसरलेले आहे आणि या वाळवंटात पाण्याचा एक थेंब सुद्धा दिसणार
नाही, त्यामुळे शक्य तितके पाणी आपल्या हेल्यांमध्ये भरून
घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे
वाळवंट दरोडेखोर आणि डाकूंनी भरलेले आहे, त्यामुळे येथे न
थांबता प्रवास करावा लागतो. तसेच प्रत्येक वेळी सतर्क राहावे लागते.’’
थोडे पुढे गेल्यावर त्यांना वाळवंटाच्या आधी अनेक पाण्याचे खड्डे दिसतात, ज्यातून ते भरपूर पाणी भरून घेतात. तेव्हा
त्यांच्यापैकी एकाने विचारले की, ‘‘ रामधन, या मार्गावर आधीच इतके पाण्याचे खड्डे केलेले आहेत,
आपल्याला एकही खड्डा
तयार करावा लागला नाही.’’ यावर रामधन
मिशीवर ताव देत म्हणाला, ‘‘म्हणूनच मी
त्या गणपतच्या तरुण गटाला पुढे जाऊ दिले. त्यांनीच हे पाण्याचे झरे स्वतःसाठी तयार केले असावेत, ज्याचा फायदा आपल्या सर्वांना मिळत आहे.’’ हे ऐकून रामधनचे विरोधी खजिल झाले. आणि इतर रामधनच्या अनुभवाचे कौतुक करू लागले.
रामधनने सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था करून पुरेसे पाणी बरोबर घेऊन आणि विश्रांती घेऊन ते पुढे निघाले.
पुढे जाताना, रामधनने सर्वांना इशारा केला की, आता
आपण सर्वजण वाळवंटात प्रवेश करणार आहोत. जिथे पाणी नाही, खायला
फळं नाहीत, राहायला जागा नाही आणि हे
वाळवंटही खूप लांब आहे. हे पार करताना आपल्याला बरेच दिवस लागू शकतात. प्रत्येकजण रामधनच्या बोलण्याशी सहमत होऊन त्याच्या
सुचनांचे पालन करू लागला.
आता ते सर्व वाळवंटात दाखल झाले होते. वाळवंट
उन्हाने खूप तापले होते, ते जणू काही बरोबर शेगडी घेऊन चालत होतो. पुढे जात
असताना त्यांना समोरून काही लोक येताना दिसले. त्या लोकांनी
रामधनसमोर नतमस्तक होऊन नमस्कार केला. खुशाली विचारली,
व त्यातला एक म्हणाला, ‘‘तुम्ही सगळे व्यापारी
दिसता, इतक्या दूरवरून येताय, आम्हाला तुमच्या सेवेची संधी मिळाली तर बरे होईल. आम्ही तुमच्या
सेवेस तयार आहोत. त्याचे बोलणे ऐकून रामधन हात जोडून म्हणतो की, ‘‘भावांनो !!, आम्ही सर्व चांगले आहोत, आमच्याकडे अन्नपाणी पुरेसे आहे. आणि तुम्ही आमची विचारपुस केली
त्याबद्दल खुप धन्यवाद. आम्हाला काहीच नको.’’ आणि
रामधनने सर्वांना चलण्याचा इशारा केला. पुढे गेल्यावर गटातील काही तरुण पुन्हा रामधनला जाब विचारू लागले की,
‘‘ते भले लोक आम्हाला मदत करत आहेत, त्यात
तुम्हाला काय अडचण आहे?’’ यावर रामधन काहीच बोलला नाही.
काही अंतर चालून गेल्यावर समोरून पुन्हा काही
माणसे येताना दिसली. त्या लोकांचे कपडे
ओले होते आणि ते रामधन आणि त्याच्या साथीदारांना म्हणाले की, ‘‘तुम्ही सर्वजण या उष्ण वाळवंटाच्या
प्रवासाने आणि थकल्यासारखे वाटत आहात. तुमची जर इच्छा असेल
तर आम्ही तुम्हाला जवळच्याच जंगलात घेऊन जाऊ.
जिथे भरपूर पाणी आणि फळे खायला मिळतील. तसेच सध्या तिथे
खुप मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आम्ही
सगळे भिजलो आहोत. तुम्हा सर्वांना ताजे पाणी हवे असल्यास तुमच्याच जवळचे सर्व पाणी फेकून द्या
आणि त्या जंगलातून नवीन पाणी भरा आणि पोटभर जेवून विश्रांती
घ्या. मग पुढे जा’’ पण रामधन काहीच बोलला नाही आणि त्याने साथीदारांना पटकन पुढे चालायला सांगितले.
आता गटातले अनेक तरुण रामधनवर खूप चिडले
आणि त्यांनी रामधनजवळ जाऊन आपला सर्व राग काढला आणि त्याला विचारले की, ‘‘तो त्या चांगल्या लोकांचे का ऐकत नाहीये? तुम्ही आमच्यावर असा जुल्म का करत आहात? आम्ही सर्व
थकलो आहोत.’’
तेव्हा रामधन हसत
हसत म्हणाला, ‘‘ अरे! मुलांनो ते सगळे दरोडेखोर आहेत मागे
जे आले तेही दरोडेखोर होते. ते आपल्याजवळील
पाणी फेकायला लावून, आणि आपल्याला असहाय करून आपल्याला लुटण्याचा विचार करत होते.’’
हे ऐकून त्यातला एक तरूण रागाने दात चावत म्हणाला, ‘‘सेठ जी, तुम्हाला असे का
वाटते?’’ तेव्हा रामधन म्हणतो की, ‘‘तुम्हीच विचार करा, या वाळवंटात किती उकाडा आहे,
इथं आजूबाजूला कुठलंही जंगल असू शकतं का? इथली
जमीन इतकी कोरडी आहे की, दूरवर पाऊस पडत नसल्याचं सूचित
होतं. इथे पक्ष्याचे घरटेही नाहीत तर फळे आणि फळांची झाडे कशी असतील बरं? आणि एक नजर क्षीतिजावर टाकून वर बघा, ना दूरवर पावसाचे ढग आहेत, ना हवेत पावसाचा गारवा आहे, ना
ओल्या मातीचा गंध आहे, मग त्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास
कसा ठेवायचा? काहीही झाले तरी माझ्यावर विश्वास ठेवा,
तुमच्या जवळचे पाणी फेकू नका आणि कुठेही थांबू
नका.’’
काही वेळ चालल्यानंतर त्यांना वाटेत अनेक प्रेतं
दिसली आणि तुटलेल्या बैलगाड्या दिसतात. ते सर्व प्रेतं गणपतच्या गटातील लोकांचे होते. त्यापैकी एकही जिवंत राहिला नव्हता. त्या सर्वांची
अवस्था पाहून सगळे भेदरले, रडू लागले,
कारण ते सगळे त्यांचे मित्र-नातेवाईक
होते. तेव्हा रामधन म्हणाला की, ‘‘पहा,
या लोकांनी या दरोडेखोरांचे म्हणणे ऐकले, त्यांना आपले साथीदार मानले आणि परिणामी आज त्यांना आपला जीव गमवावा लागला.’’ सर्वांचे सांत्वन करत रामधन म्हणाला, ‘‘आपण
सर्वांनी लवकरात लवकर येथून निघावे कारण
ते सर्व दरोडेखोर अजूनही आपल्या मागावर आहेत. आपण सगळे इथून
सुखरूप बाहेर पडण्यासाठी देवाची प्रार्थना करून प्रवास
सुरू करू.’’ आता सर्वांना रामधनच्या शब्दावर पुर्ण विश्वास बसला. रामधनच्या अनुभवापुढे
त्याचे विरोधकही नतमस्तक झाले. आणि पुढचा प्रवास रामधनच्या म्हणण्यानुसारच वागून सुखरूप
दुसऱ्या राज्यात पोहचले.
तात्पर्य :- अनुभवाचा कंगवा तेव्हा कामात येतो जेव्हा डोक्यावर एकही
केस राहत नाही, म्हणजेच वय उलटून गेल्यावर आणि
आयुष्य जगल्यावरच अनुभव मिळतो, असं म्हणतात. तसा कधीच अनुभव मिळत नाही. या कथेतल्या तरुणांमध्ये जोश
होता, उत्साह होता, पण अनुभव नव्हता, अनुभव रामधनकडे होता, तो अनुभव त्याने योग्य वेळी पणाला
लावला आणि सर्वांना आपत्तीतून बाहेर काढले. म्हणून अनुभवासह अतिउत्साहाने
काम करावे. घरातील थोऱ्या मोठ्यांचे ऐकावे.