संस्कृत सुभाषित रसग्रहण
sunskrit Subhashit knowledgepandit
स्थानभ्रष्टाः न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः ।
इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत् ।।
स्थानभ्रष्टाः न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः ।
इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत् ।।
अर्थ :- दात केस नखं आणि माणसं ही आपल्या स्थानावरून ढळली की शोभून दिसत
नाहीत. सत्ता, पद गेले की त्यांची किंमत उरत नाही. हे जाणून शहाण्या बुद्धिवान् विचारवान् माणसानं स्वस्थान
कधीही सोडू नये.
चिंतन..
कुणीही शहाणा मनुष्य कापलेली नखं.. कापलेले केस वा पडलेले / पाडलेले / काढलेले
दात हौशीनं जवळ बाळगत नाही.. कौतुकानं चार लोकात मिरवत नाही!
उलट त्या गोष्टी कचरा म्हणून फेकून दिल्या जातात..
रस्त्यात पडलेल्या दिसल्या तर त्याची किळस येते..
त्याबद्दल घृणा वाटते!
अलिकडच्या काळात काही नवकलावाद्यांनी त्या टाकाऊ गोष्टी वापरून..
योजकस्तत्र दुर्लभः या न्यायानं.. स्वतःच्या सौंदर्यदृष्टीनं विविध प्रदर्शनीय कलावस्तु तयार करता
येतील असा एक विचार मांडला हा अपवादाचा भाग!
माणसाच्या बाबतीतही स्थिति त्या काढून टाकलेल्या दातकेसनखां सारखीच आहे!
माणूस ज्या अधिकारपदावर राहून काम करतो..
ज्या भूमिकांमधे राहून व्यवहार करतो..
तिथून तो सुटला,ढळला, पडला, पदच्युत झाला की त्याची किंमत शून्यावर येऊन थांबते.. कधी शून्याच्या
खालीही जाते! काळ प्रवाही असल्यानं माणसाची स्थितीही स्थिर राहू शकत नाही!
हे लक्षात घेऊन विचारी माणसानं त्या त्या पदांवर..
भूमिकांमधे असताना कधीही अहंकारानं..
ताठ्यानं.. वागू नये..
आपल्याला स्थानच्युत.. पदच्युत व्हायला लागेल असं वर्तन करू नये!
विचारी माणसानं नेहमी असा विचार करायला हवा की मी कुठून आलो..
इथे किति काळ राहणार आहे..
राहू शकेन.. इथून पुढे कोणत्या दिशेला, कोणत्या पदी.. स्थानी केव्हा जायचंय..
जावं लागेल?
नाथमहाराजांना वयाच्या आठव्या वर्षी जो प्रश्न पडला होता तो १८- २८ - ३८ - ४८ - ५८ - ६८ - ७८ - ८८ - ९८ या वयोगटातल्या
लोकांना लवकरात लवकर पडायला हवा! कस्त्वं कोऽहं कुत आयातः
का मे जननी को मे तातः? अशी जिज्ञासा त्याच्या अंतःकरणात निर्माण व्हायला हवी.
आपल्या जीवाचं हे देहरूपी घर.. पद.. स्थान मिळालेलं आहे की मिळवलेलं
आहे?
किति काळापुरतं?
हे भाड्याचं आहे की स्वामित्वाधिकारानं मिळालंय? या सर्वांचा साकल्यानं व सखोल..
मूलगामी विचार केला तर लक्षात येऊ शकेल..
यायला हरकत नसावी की हा जगड्व्याळ पसारा माझा नाही व मीही माझा
नसून जे आहे.. दिसतंय.. भासतंय ते सर्व
भगवंताचं आहे.. जे घडतंय बिघडतंय ती सर्व भगवंताची करणी..
इच्छा.. आवड असून त्याप्रमाणेच सर्व चालू आहे.
त्यानं ज्या स्थानी आपल्याला ठेवलंय,
नेमलंय तिथे त्या स्थानी त्याला अपेक्षित असलेलं आपलं कर्तव्य
चोख बजावून आपण स्थानभ्रष्ट / पदच्युत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे..
वास्तविक मनुष्यजीवाचं स्वस्थान म्हणजे आनंदस्वरूप परब्रह्म हेच आहे. पण हा जीव प्रपंच पैसा स्त्री, घर, बंगला गाडी संपत्ती, या सर्वांच्या
मोहामुळे देवाला विसरला देवाशी फारकत घेत जीव मनुष्य देहात येऊन
ज्ञान गमावून आणि आपलं मूळ स्वरूप
विसरला. अहंकाराने, अविवेकाने,
मोहीत होऊन, स्वतःलाच ब्रम्ह मानायला लागला. ‘मीच ब्रम्ह आहे’ असं म्हणायला लागला.
आणि जन्म-मरणाच्या चक्रात भटकू लागला.
जीव
आत्मविस्मृत झाला! त्यामुळे परब्रह्माच्या ठिकाणी असलेल्या अखंडता,
अद्वयता, एकरसता, अभिन्नता, निरवयता इ. गुणांना जीव मुकला!
अज्ञानवश कर्तृत्वाचा..
भोक्तृत्वाचा अभिमानी होऊन विविध योनींमधे ...
भरकटत सुष्टदुष्ट, पापपुण्यात्मक कर्मांचे फलभोग घेत निर्भेळ सुखाला पारखा झाला
आणि दुःखभोगी ठरला!
अपूर्णता, असमर्थता,
एकदेशित्व यांचा धनी झाला..
हक्काच्या घरातून बाहेर पडला आणि भाड्याची घरं बदलत राहिला.
माणूस म्हणून मिळालेल्या विवेकबुद्धीचा वापर करून जेव्हा वरील
स्थिति लक्षात येईल व स्वस्थानाची ओढ लागेल तेव्हा खरे प्रयत्न सुरू होतील..
साधना सुरू होईल.. त्या सर्वांचं फळ मिळेपर्यंत आपणच आपल्याला समजत रहावं..
स्वस्थानं न परित्यजेत्
!