शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण 

sunskrit Subhashit knowledgepandit

शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः ।

वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ।।

अर्थ :- शेकडो माणसांमधे एखादाच शूर असतो, हजारांमधे एखादाच पंडित.. विद्वान असतो, दहा हजारांमधे एखादाच उत्तम वक्ता असतो आणि दाता.. दानशूर  मात्र होईल मिळेलच असं नाही!

चिंतन......

शालेय जीवनात ..अगदि प्राथमिक संस्कृतशिक्षणात.. हे सुभाषित अनेकवार शिकवलं जात असेल / गेलं असेल. पण या साध्या अर्थामागे खूप मोठा आशय.. विचार दडलेला असू शकतो असं दीर्घचिंतनांती वाटतं. शतेषु जायते शूरः यातील शूर हा केवळ भौतिक शस्त्रांनीच लढणारा असायला हवा..

व्याघ्र सिंहादिक हिंस्र पशूंशी किंवा चोर लुटारू दरोडेखोरांशी दोन हात करणाराच असायला हवा असं नाही. शस्त्रं निहन्ति पुरुषस्य शरीरमेकम् या न्यायानं एखादा शूर शरीरंच मारत सुटेल! पण स्वतःचं मन मारणं.. मनावर आधिपत्य गाजवणं.. मनाची खेच जिकडे आहे तिकडून मागे आणून अन्यत्र.. भगवंताकडे वळवणं यासाठी वेगळंच शौर्य गरजेचं असतं!

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं संत तुकाराम म्हणतात. त्यांच्यासारख्या टाळवीणाधारी माणसाला कसलं युद्ध खेळायला लागत असेल? असा विचार येणं स्वाभाविक आहे! पण संतांना अभिप्रेत असलेलं युद्ध शस्त्रानं लढण्यातलं नसून शास्त्रानं लढण्यातलं आहे... ज्ञानेश्वरीच्या ओवीतलं संसारजिणते शास्त्र! स्वसंयमनशास्त्र! जितं सर्वं जिते रसे! ।। आत्मसंयमन साधायचं तर केवळ रसनाजयच नव्हे तर ज्या ज्या इंद्रियांनी जो जो विषयरस सेवला जातो त्यासर्वांवर विजय मिळवणं! तेच सर्वात कठीण! संतांना अभिप्रेत असलेल्या युद्धातला मुख्य शत्रु म्हणजे देहात्मबुद्धि... त्याची पिलावळ म्हणजे काम क्रोधादि षड्रिपु..

भगवद्गीतेच्या भाषेत रजोगुणसमुद्भव महापापी.. महावैरी.. नरकाची त्रिविध द्वारं.. यांना जिंकायचं तर  मोठं शौर्यच हवं! समोर सर्व विषय विपुलतेनं, अधिकारानं उपलब्ध असतानाही इंद्रियांमधे उपभोगसामर्थ्य असतानाही उपभोगार्थ आवश्यक, पुरेसा, विपुल काळ हाती असूनही स्वतःला त्यांच्या भोगापासून दूर ठेवणं यासाठी मोठं शौर्य लागतं. असा शूर शेकडो माणसांमधे शोधूनही एखादाच सापडतो! पण असे हजारो हजारो शूर एकत्र आणले तरी त्यातून एखादाच पंडित हाती लागेल.

पंडित म्हणजे भरपूर पुस्तकं कोळून प्यायलेला वा भरपूर पदव्यांच्या कागदांची भेंडोळी पिशवीत कोंबून राहिलेला छातीवर किंवा नावाच्या मागेपुढे लांबलचक उपाध्या लावणारा नव्हे! समर्थांच्या शब्दातला तो फार तर पढतमूर्ख असेल/ठरेल! पंडा नाम आत्मबुद्धिः.. तया युक्तः पंडितः। पुस्तकं वाचून वा न वाचतांही ज्याची देहबुद्धि मावळली व आत्मबुद्धि जागृत झाली तो पंडित!

असा पंडित आत्मबुद्धीनं सुसंपन्न असला तरी स्वतःचा अनुभव ... आत्मानुभव योग्य, समर्पक शब्दात मांडणं हे कौशल्य अभावानंच आढळणारं! न सोऽस्ति प्रत्ययो लोके यः शब्दगमात् ऋते असं अन्य सामान्य, इंद्रियगम्य अनुभवांबद्दल जरी असलं तरी शब्दांनी वर्णन करण्या योग्य नाही असा अनुभव अशाच शब्दात आत्मानुभूतिबद्दल सांगता येईल.

ते तत्त्व स्वसंवेद्यच आहे... त्याचं दान करता येत नाही! आत्मानुभवी फार तर त्या अनुभवात मस्त राहील.. आत्ममग्न राहील! अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम्.. मूकास्वादनवत् या देवर्षि नारदांच्या सूत्रानुसार केलेल्या परमप्रेमरूपा भक्तीचं वर्णन आत्मानुभूतीलाही लागू पडतं. पण समोरील जिज्ञासूच्या बौद्धिक,वैचारिक पातळीवर उतरून त्याला समजेल उमगेल अशा शब्दात आत्मानुभवाचं  वर्णन करणारा उत्तम वक्ता अनेकवार दहादहा हजार शूर पंडितांचे जत्थे बाजूला  सारले तरी एखादाच मिळेल!

कारण यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह असं त्या आत्मानुभूति बद्दल सांगितलं जातं! असे आत्मानुभूतिसंपन्न शूर पंडित वक्ते कितीही लक्षांच्या संख्येत उपलब्ध झाले... मान्य न करता गृहीत धरूनही... तरी शब्दांनी सांगितलेल्या आत्मानुभवाच्या वर्णनाबरहुकूम.. तंतोतंत तसाच्या तसा अनुभव देणारा... अनन्यसाधारण दाता.. सद्गुरु उपलब्ध होईलच असं मात्र ठामपणे.. सुनिश्चितपणे सांगता येणार नाही!

दाता भवति वा न वा! कारण आत्मानुभवप्राप्ति हे केवळ सद्गुरुकृपेचंच फळ असून कृपा हा करण्याचा वा देण्याचा विषय नसून तो होण्याचा विषय आहे. सच्छिष्याची आत्मानुभवसंपन्न सद्गुरुविषयक निष्ठा, श्रद्धा.. सद्गुरुचरणांची सेवा., सद्गुरूंप्रति असलेलं उत्कटतापूर्ण सर्वस्वसमर्पण.. शरणागति याचा "सद्गुरुकृपा"हा साक्षात परिणाम आहे! असा भाव वरील सुभाषितातून शोधला तर एरव्ही सामान्य पातळीवर असल्याचं भासणारं हे सुभाषित वाचकाला / विचारवंताला एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर नेऊन बसवते!

----------

 

 

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post