अनायासेन मरणं संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

अनायासेन मरणं संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

 sunskrit Subhashit knowledgepandit

संस्कृत सुभाषित रसग्रहण

अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम्

देहि मे कृपया कृष्ण तव भक्तिरचंचला ।।

अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् 

देहि मे कृपया कृष्ण तव भक्तिरचंचला ।।

    अर्थ :- हे श्री कृष्णा भगवंता !! मला तू देणारच असशील तर... प्रयास, कष्ट, दुःख, वेदना इत्यादि नसलेलं मरण दे, ते येण्या आधी दैन्य दरिद्रताविरहित जीवन दे आणि या दोन गोष्टी सहज मिळाव्यात यासाठी अचंचल, अव्यभिचारी, नैष्ठिक अशी त्वद्विषयक भक्ति दे!

चिंतन... देवाकडे मागावं का? मागायचंच झालं तर काय मागावं? तो जर सर्वज्ञ आहे तर आपल्याकडे काय आहे वा काय नाही याची जाण त्याला नसेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जरी विवादास्पद असली तरी एखाद्यानं मागायचंच ठरवलं तर त्याच्यासाठी वरील श्लोकातलं मागणं कसं  आदर्श मागणं ठरेल हे पाहू याया त्यांच्या एका उपदेशकाव्यात म्हटलंय...

जगी येतसे तीनदा संधिकाल,

खरा थोर, तो साधितो जन्मकाल।

परी धन्य तो साधतो अंतकाल,

घडे त्यास हे साधिता मध्यकाल।।

    इथे संधि म्हणजे opportunity...not joint! जसा आपल्या इच्छेनं जन्म मिळत नाही तसं मरणही आपल्या इच्छेनं मिळत नाही... असं असलं तरी माणसाला आपला मृत्यु सुधारणं शक्य आहे... जरी तो कधी, कसा व कुठे येणार आहे हे अत्ता ठाऊक नसलं तरी! त्यासाठी वरील श्लोकाच्या आशयाचं चिंतन अंतरात नित्य चालू असणं आवश्यक आहे! माणसाचं संपूर्ण जीवन जन्म व मृत्यु या दोन बिंदूंमधील अंतरातच सामावलेलं असतं. जन्माला येण्यापूर्वी आपल्यातल्या "मी" चं अस्तित्व नसतं आणि मेल्यानंतरही तो "मी" उरत नाही.

    जो काही आपल्यातला.. माझ्यातला.. "मी" म्हणून असतो तो या दोन ठिपक्यांमधल्या अवकाशातच असतो! पण हा "मी" इतका नाचवतो.. विविध भोगांच्या, वासनांच्या मागे की शरीराची चाळणी होते.. शरीरं व्याधिमंदिरम् वा भोगे रोगभयम् या न्यायानं! या "मी" मुळेच अतिरेकी, अनैसर्गिक, अयोग्य, अविरत भोगमालिकांच्या नादी लागणं घडून नाना विकृति, विकार, आजार, रोग, व्याधी शरीरात शिरतात, अपघातांनी शरीर विकलांग होतं, परस्वाधीन होतं आणि नको हे जीवन असं वाटू लागतं..

    मृत्यु परवडला अशीही भावना मूळ धरू लागते. छोटे क्षुल्लक आजार थोड्याशा दुर्लक्षानं, उपेक्षेनं, सहनशीलतेनं अंगावर काढले तरी काही दुर्धर, सुदीर्घ आजारात सेवा करणारे कंटाळून जातात, तिरस्कार उपेक्षा करतात. मग रुग्णशय्येवर पडल्यापडल्या भूतकाळात भोगलेले भोग त्या भोगण्याच्या तऱ्हा, भोग घेताना दुखावलेले आप्तस्वकीय इ. इ. सर्व एखाद्या चलच्चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून तरळून जायला लागतं!

    आणि मग देहव्याधींबरोबर मानसिक आधीही (वेदनाव्याधि) त्रास देऊ लागतात.  मग नाईलाजानं, अगतिकतेनं मरणाची वाट पहात बसणं.. तिष्ठत राहणं.. बिछान्यात / रुग्णशय्येवर खितपत पडणं कपाळी येतं. पण अनायास.. विनाकष्ट.. विनादुःख मरण मिळणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे.. हे भाग्य आपल्याच कर्मानं घडत असतं.. ते कर्म म्हणजे विनादैन्येन जीवनम्। मिळालेलं जीवन सतत दुसर्याचं भलं चिंतत, गरजूंना / अडल्या - नडल्यांना मदत करीत, त्यातच आनंद मानत निःस्वार्थी बुद्धीनं जगणं हेच विनादैन्य जगणं!  वैचारिक, बौद्धिक, भावनिक संकुचितता हेच खरं दैन्य! ते गेलं की आर्थिक दैन्य असलं नसलं तरी त्याची तमा रहात नाही!

    मन तणावमुक्त.. स्वस्थ राहतं.. असं मनच तन.. देह.. शरीर सुदृढ, रोगमुक्त, सर्व सुखभोगांसाठी योग्य, आणि व्यसनांपासून दूर ठेवू शकतं! असं मन असेल तरच  "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।  उदास विचारे वेच करी।।" हा संत तुकारामाचा उपदेश व्यवहारात.. प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शरीराला राबवणं शक्य होतं! तन मन धनानं दैन्य दारिद्र्य घालवायलाच हवं कारण बर्‍याचशा विपत्ति ते असल्यानं येतात व ते जाताच संपत्ति येतातही!

    पण संपत्तिविपत्तींचं खरं स्वरूप या श्लोकात सांगितलंय... विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः। भगवंताचं विस्मरण हीच विपत्ति आणि त्याचं स्मरण हीच खरी संपत्ति! भगवन्नामस्मरणरूप संपत्ति जर भरपूर व अखंड असेल तर जीवनात कोणतंच दैन्य येणार नाही.. आलं तरी आत पोहोचणार नाही.. आणि मरणही विनायास शांतपणे आनंदात येईल.. भगवत्स्मरणात मृत्यु येणं हा सर्वांगसोहळा ठरेल..

    आपुले मरण । पाहिले म्या डोळा । तो सुखसोहळा । काय वानु ।। अशी अवस्था प्राप्त होईल. भगवंत एकवेळ बुद्धियोग देईल पण भक्तियोग देईलच असं नाही.. जरी "बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि प्रभुनामी आवडी" या म्हणीला अनुसरून भक्तियोग मिळेल असं गृहीत धरलं तरी भगवंत सर्वप्रथम आपण भक्तीला पात्र आहोत का याची कठोरपणे परीक्षा घेणारंच!

यस्याहमनुगृह्णामि हरिष्ये तद्धनं शनैः।

ततोऽधनं त्यजन्त्यस्य स्वजना दुःखदुःखितम् ।।

स यदा वितथोद्योगो निर्विण्णस्यात् धनेहया।

मत्परैः कृतमैत्रस्य करिष्ये मदनुग्रहम् ।। (भाग. स्कं. १० / अ. ८८ /श्लो. ८-९)

    भगवंत स्वतःच सांगतात.. मला ज्याच्यावर अनुग्रह करायचाय त्याचं हळुहळु सर्व धन हरण करतो.. त्या निर्धनाला त्याचे स्वजन टाकून जातात.. स्वजन वियोगानं तो दुःखी होतो आणि मग तो धनेच्छेतून मुक्त होऊन.. अन्य उद्योग टाकून मत्पर अशा भक्तांची कास धरतो तेव्हा मी त्याच्यावर अनुग्रह करतो! हेही एक प्रकारे भगवंत आपल्या भक्ताची कठोरपणे कसोटीच पाहतो! पण एकदा खऱ्या अर्थानं भगवद्भक्ति प्राप्त झाली..

    ती अव्यभिचारी, निश्चल, अचंचल, निष्काम अशी होत गेली की मग त्याला अन्य प्राप्तव्य काहीच उरत नाही.. त्यामुळे तो नित्य तृप्त, तुष्टच राहतो.. दरिद्रो यस्तु असंतुष्टः या व्याख्येच्या बाहेर राहतो.. जीवनातलं सर्वप्रकारचं दैन्य सरतं.. जीवन धन्य होतं. मरणकाळी पूर्वकर्मभोगांमुळे यदाकदाचित दुःखकष्टसायास वाट्याला आलेच तरी भगवत्कृपेनं मिळालेल्या भगवन्मयतेमुळे ते आत पोहोचत नाहीत.. त्यांची तमा उरत नाही!

    अशाप्रकारे परमप्रेमारूप भक्ति जरी कामयमाना नसली तरी.. तिचं वर केलेलं वर्णन बघता.. अनायास मरण व विनादैन्य जीवन ही तिची प्रभावक्षेत्रं... पाहता आणि ती भगवत्कृपेनंच प्राप्त होत असल्यानं भगवंताकडे एवढं व असं मागायला काहीच हरकत नाही, की श्रीकृष्णा, देवा मला फक्त तुझी अचंचल भक्तिच दे रे बाबा!

--------

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post