महानुभाव पंथीय ज्ञानसरिता
नश्वर शरीरात आसक्ती नसावी
रजोगुणाची आसक्ती
रजोगुणाच्या वृद्धीमुळे भौतिक सुखोपभोगात आसक्ती निर्माण होते. भौतिक जगात धनसंपत्तीरूप ऐश्वर्य प्राप्त झालेला मनुष्य सामान्यपणे तीन गोष्टींना बळी पडतो : नशा, मैथुन आणि जुगार. भौतिक ऐश्वर्याने समृद्ध मनुष्य जवळच्या धनसंपत्तीचा मद चढून इतका निर्दयी बनतो की तो कत्तलखाने काढून प्राण्यांची कत्तल करतो. अशा मनुष्यांना वाटत असते की, आपल्याला कधी मृत्यू येणारच नाही. असे मूर्ख लोक प्रकृतीच्या नियमांना विसरून देहभावनेने उन्मत्त होतात.
जीवनाच्या अंतिम लक्षाचा विसर
ते हे विसरतात की, कितीही भौतिक सुधारणा झाली तरी अगदी देवीदेवतांच्या स्तरापर्यंतदेखील भौतिक देहाची अखेर राख किंवा विष्ठाच होत असते आणि जिवंतपणीदेखील, मनुष्याच्या शरीराची बाह्य स्थिती काहीही असो, त्याचे शरीर केवळ मल, मूत्र, मांसादीने तसेच अनेक प्रकारच्या किड्यांनी भरलेले असते. अशा तऱ्हेने दुसऱ्यांच्या शरीराबाबत द्वेष आणि हिंसा करण्यात गुंतलेले भौतिकवादी लोक जीवनाचे अंतिम लक्ष्य जाणू शकत नाहीत आणि जीवनाच्या ध्येयाबाबत अज्ञानी राहूनच ते दुसऱ्या जन्मात नारकीय स्थितीत अवनत होतात.
शरीर आपले नसून स्वतःचे म्हणणे
असे मूढ लोक या मर्त्य देहाकरिताच सर्व प्रकारची पापकर्मे करतात. हा देह वस्तुतः आपला आहे काय, याचा विचार करण्यातही ते असमर्थ असतात. सामान्यतः शरीराचे पोषण करणाऱ्या व्यक्तीचे ते विशिष्ट शरीर समजण्यात येते. मात्र मनुष्याने विचार करावा की शरीर त्याचे स्वतःचे आहे की, आपण ज्याची चाकरी करतो त्या धन्याचे आहे. गुलामांचा मालक गुलामांच्या शरीरांवर आपला पूर्ण हक्क सांगत असतो, कारण तो त्या गुलामांचे पोषण करतो.
त्याचप्रमाणे हे शरीर पित्याच्या मालकीचे आहे की मातेच्या मालकीचे आहे, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो, कारण पिता बीज प्रदान करणारा मालक आहे तर मातेने गर्भात शरीराचे पोषण केलेले आहे. पंचभौतिक शरीरालाच आत्मा समजण्याच्या अशा देहात्मधारणेमुळे मूढ लोक सर्व प्रकारची पापे करण्यात व्यस्त असतात; परंतु हे शरीर आहे कोणाचे? हे समजण्याकरिता मनुष्याने पुरेसे बुद्धिमान असायला हवे.
एक मूर्ख स्वतःच्या उदरभरणासाठी प्राण्यांची हिंसा करू लागतो; परंतु हे शरीर त्याचे स्वतःचे आहे, की पित्याच्या मालकीचे आहे, की मातेचे आहे, अथवा आजोबाचे आहे, याचा तो विचार करीत नाही. कधीकधी एखादा मनुष्य आपल्या मुलीचा पुत्र आपल्याला वारसदार पाहिजे या अटीवर तिचे लग्न एखाद्या पुरुषाशी लावून देतो.
हे शरीर एखाद्या सामर्थ्यवान मनुष्याचेदेखील असू शकते, कारण तो त्या शरीराचा वापर स्वतःसाठी करीत असतो. कधीकधी गुलामाचे शरीर दुसऱ्या धन्याला विकले जाते आणि त्या दिवसापासून ते त्याच्याच मालकीचे होते. जीवनाच्या शेवटी शरीर अग्नीचे असते, कारण ते त्यात जाळले जाते व त्याची राख बनते किंवा ते पशुपक्ष्यांना खाण्यासाठी रस्त्यावर फेकले जाते.
पोट भरण्यासाठी सर्व पापकृत्ये
शरीर-पोषणाकरिता अशी सर्व पापकृत्ये करण्यापूर्वी मनुष्याने हे शरीर कोणाच्या मालकीचे आहे हे निश्चितपणे जाणून घ्यावे. हे शरीर भौतिक प्रकृतीचे उत्पादन आहे आणि अखेर ते भौतिक प्रकृतीतच विलीन होते; म्हणून निर्णय असा की, शरीर भौतिक प्रकृतीचे आहे; कोणीही या शरीराला चुकीने स्वतःच्या मालकीचे समजू नये. असे जर आहे तर अशा खोट्या मालकीकरिता मनुष्याने काय म्हणून हत्या करावी? शरीरपोषणासाठी निरपराध प्राण्यांना का मारावे ?
भौतिक ऐश्वर्याचे आकर्षण
भौतिक ऐश्वर्याच्या खोट्या सन्मानाने उन्मत्त झालेला मनुष्य कोणत्याही सदाचाराची पर्वा न करता मांस, मदिरा, मैथुनात रत होतो. अशा परिस्थितीत, अशा मनुष्यापेक्षा कधीकधी गरिबीने गांजलेल्या मनुष्याची अवस्था चांगली असते. तो इतरांच्या शरीराला पीडा देण्याची इच्छा करीत नाही, कारण त्याने स्वतः वेदनांचा अनुभव केलेला असतो. मनुष्य खोट्या प्रतिष्ठेने फारच मत्त झालेला असतो. तो पाप पुण्य काही पाहत नाही.
ज्याला टाचणी टोचल्यावर होणाऱ्या वेदनांचा अनुभव आहे, तो इतरांना टाचणी टोचावी अशी इच्छा करीत नाही. गरीबी अनुभविलेला विचारी मनुष्य इतरांनादेखील तशा स्थितीत टाकले जावे अशी इच्छा धरीत नाही. सामान्यपणे असे पाहावयास मिळते की, गरिबीतून श्रीमंत झालेली माणसे गरीब लोकांच्या कल्याणार्थ धर्मादाय संस्था काढतात.
थोडक्यात, दयाळू अकिंचन मनुष्याला दुसऱ्यांच्या सुखदुःखाबद्दल सहानुभूती असते. असे निर्धन मनुष्य गर्विष्ठ असल्याचे क्वचितच आढळून येते. तसेच त्याला कोणताही ऐश्वर्यमद असत नाही. भगवदिच्छेने निर्वाहापुरते जे काही मिळेल त्यातच तो संतुष्ट राहतो.
गरीब स्थितीत राहणे ही एक तपस्या असल्यामुळेच परमेश्वराचा वासनिक स्वतःला भौतिक ऐश्वर्याच्या मदापासून वाचविण्याकरिता परिपाठ म्हणून निर्धन स्थितीतच राहतो. भौतिक ऐश्वर्यातील उन्नतीमुळे होणारा वृथा अभिमान पारमार्थिक उन्नतीच्या पथावरील फार मोठा कंटक आहे. अकिंचन मनुष्य वाजवीपेक्षा अधिक खाऊन कृत्रिमरीत्या स्थूल होत नाही. आवश्यकतेपेक्षा अधिक खाण्याची सवय नसल्यामुळे त्याची इंद्रिये सहसा प्रक्षुब्ध होत नाहीत आणि ज्याची इंद्रिये प्रक्षुब्ध नसतात ती हिंसेला प्रवृत्त होत नाहीत.
अकिंचनावस्थेचा दुसरा गुण असा की, अशा अकिंचन मनुष्याच्या घरी साधुसंत सहजपणे येऊ शकतात आणि अशा रीतीने तो त्यांच्या संगतीचा लाभ उठवितो. धनवान मनुष्य कोणालाही आपल्या घरात प्रवेश करू देत नाही, त्यामुळे साधुसंत तेथे प्रवेश करीत नाहीत. वैदिक पद्धतीत साधुसंत भिक्षेच्या योगाने गृहस्थ माणसांच्या घरी जात असतात.
कौटुंबिक व्यवसायात व्यस्त असल्याने जे गृहस्थ सामान्यपणे आध्यात्मिक जीवनापासून दूर गेलेले असतात, ते अशा साधुसंतांच्या संगतीने लाभान्वित होत असतात. अकिंचन मनुष्याला साधूंच्या संगतीने मुक्त होण्याची मोठी संधी प्राप्त होत असते. भौतिक धनसंपत्ती आणि प्रतिष्ठा यांमुळे गर्विष्ठ बनलेले लोक जर त्यामुळे साधुसंत किंवा भगवद्भक्त यांच्या संगतीपासून वंचित राहात असतील तर त्यांच्या जीवनाचा काय उपयोग ?