श्रीकृष्ण चरित्र यमलार्जुन उद्धार भाग 02

श्रीकृष्ण चरित्र यमलार्जुन उद्धार भाग 02

श्रीकृष्ण चरित्र 

यमलार्जुन उद्धार भाग 02 

 

पहिल्या भागावरून पुढे 

नलकूवर आणि मणिग्रीव या दोन कुबेर-पुत्रांना मिळालेला शाप आणि महर्षी नारदांच्या मंगल इच्छेतून त्यांचा झालेला उद्धार याबाबतचे कथन येथे प्रस्तुत करण्यात येत आहे.

नलकूवर आणि मणिग्रीव हे देवांचे कोषाध्यक्ष कुबेर यांचे पुत्र आहेत. कुबेर हा भगवान शिवांचा मोठा भक्त होता आणि शिवांच्या आशीर्वादाने त्याच्या भौतिक ऐश्वर्याला सीमाच नव्हती. सामान्यतः श्रीमंत मनुष्यांची मुले सुरा आणि स्त्रीमध्ये आसक्त होत असतात. त्याप्रमाणे नलकूवर आणि मणिग्रीव हे कुबेर-पुत्र मद्य-मैथुनाच्या आहारी गेले होते. 

एकदा हे देवता आनंद-विलास करण्याच्या इच्छेने कैलासातील मंदाकिनीच्या तीरावरील शिवांच्या उपवनात गेले. ते वन अनेक प्रकारच्या सुगंधी फुलांनी भरलेले होते. तेथे गेल्यावर या कुबेर पुत्रांनी मनसोक्त मद्यपान केले. त्यांच्या सोबतच्या सौंदर्यवती स्त्रिया मधुर गायन करू लागल्या. अशा प्रकारे मत्तावस्थेत ते प्रफुल्लित कमळांनी भरलेल्या मंदाकिनीच्या जळात उतरले आणि ज्याप्रमाणे एक हत्ती जळामध्ये हत्तीणींसोबत विहार करतो त्याप्रमाणे ते तरुणींबरोबर क्रीडा करू लागले.

अशा रीतीने, नलकूवर आणि मणिग्रीव तरुण स्त्रियांबरोबर मंदाकिनीच्या जळात क्रीडा करण्यात दंग झाले असताना त्या मार्गाने देवर्षी नारदांचे आगमन झाले. ते कुबेर-पुत्र नशेने अतिशय मत्त झाले होते आणि नारद मुनी तेथून गमन करीत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले नाही. ते अतिशय मत्त झालेले असल्याचे नारदांनी ओळखले. त्या कुबेर-पुत्रांच्या सोबत असलेल्या तरुणी मात्र झिंगलेल्या अवस्थेत नव्हत्या आणि आपण महर्षी नारदांसमोर विवस्त्रावस्थेत आहोत याची त्यांना लाज वाटली. 

त्या घाईघाईने आपली शरीरे झाकून घेऊ लागल्या; परंतु कुबेर-पुत्र मात्र इतके मत्त झालेले होते की, महर्षी नारद तेथे आलेले असल्याचे त्यांना समजलेच नाही आणि त्यांनी आपली शरीरेही झाकली नाहीत. त्या कुबेराच्या पुत्रांचे असे पतन झाल्याचे पाहून त्यांचे कल्याण करण्याच्या हेतूने नारदांनी त्यांना शाप दिला.

महर्षी नारद नलकूवर आणि मणिग्रीव यांच्याबाबत विचार करू लागले, "यांना आता भौतिक ऐश्वर्याचा आणि प्रतिष्ठेचा मिथ्या गर्व होणार नाही अशा स्थितीत घालणे माझे कर्तव्यच आहे." नारदांना त्यांची किव आली होती आणि ते त्यांना त्यांच्या पतित जीवनापासून वाचवू इच्छित होते. ते कुबेरपुत्र तमोगुणाने प्रभावित झाले होते आणि त्याकारणे इंद्रिय-संयम करण्यात असमर्थ होऊन विषयभोगात अत्यासक्त झाले होते. 

त्यांना अशा घृणित अवस्थेतून वाचविणे नारदांसारख्या संतांचे कर्तव्यच होते. पशुजीवनात आपण नग्न आहोत हे समजण्याची बुद्धी असत नाही. तथापि, कुबेर देवतांचा खजिनदार होता; एक जबाबदार स्वर्गीय देव होता आणि नलकूवर व मणिग्रीव हे त्याचे पुत्र होते. असे असूनही ते मद्यपानामुळे अतिशय बेजबाबदार अगदी पशूंप्रमाणे बनले होते. आपण नग्नावस्थेत असल्याचेही त्यांना भान नव्हते. शरीराचा अधोभाग झाकणे हे मानवी संस्कृतीचे तत्त्व आहे; आणि जेव्हा स्त्री-पुरुष हे तत्त्व विसरून जातात तेव्हा ते पशूंपेक्षाही अधम होतात आणि म्हणून नारदांनी विचार केला की, त्यांना स्थावर योनीत जन्म मिळाला पाहिजे आणि त्यांच्या दृष्टीने हीच शिक्षा त्यांना योग्य होती. वृक्ष-वनस्पती या निसर्गाच्या नियमानुसार 'अचल' आहेत. त्या एका 

ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. वृक्ष-वनस्पती या तमोगुणाने आवृत असल्या तरी त्या दुसऱ्यांना इजा पोहोचवीत नाहीत. नारदांनी कुबेर-पुत्रांना वृक्ष होण्याची शिक्षा केली होती, तरी त्याचबरोबर, वृक्षाच्या योनीतदेखील त्यांची स्मरणशक्ती नष्ट होणार नाही आणि आपल्याला का करण्यात आली आहे याचे त्यांना सदैव स्मरण राहील, असा कृपाशीर्वादही दिला. सामान्यतः जीवाने शरीर बदलल्याबरोबर त्याचे गतजन्माचे स्मरण नष्ट होते; परंतु भगवत्कृपेने नलकूवर आणि मणिग्रीवांसारख्या काही विशिष्ट जीवांच्या बाबतीत देह बदलला तरी स्मृती नष्ट होत नाही.

तदोपरांत महर्षी नारदांनी नंतर असा विचार केला की, हे कुबेराचे पुत्र देवांच्या शंभर वर्षांपर्यंत वृक्षयोनीत पडून राहतील आणि नंतर पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या कृपेने त्यांना भगवान श्रीकृष्णांचे साक्षात दर्शन करण्याचे सौभाग्य लाभेल. ते पुन्हा देवत्वाला प्राप्त होतील आणि भगवद्भक्तीचा लाभ होऊन ते भगवंतांचे थोर भक्त होतील.

इतके झाल्यावर नारदांनी तेथून नारायणाश्रमाला गमन केले. इकडे कुबेर- पुत्र नंदराजांच्या अंगणात दोन जुळे अर्जुन वृक्ष होऊन पडले.  श्रीकृष्णांचे समोरासमोर दर्शन करण्याकरिता नंदांच्या अंगणात उगवण्याची संधी देण्यात आली. जरी यशोदा मातेने बाळकृष्णांना लाकडी उखळाला बांधून टाकले होते, तरीदेखील भक्तश्रेष्ठ नारदांची वाणी सत्य करण्याकरिता ते अंगणातील अर्जुन वृक्षांकडे रांगत रांगत चालले. 

समोरील दोन्ही जुळे अर्जुन वृक्ष वस्तुतः कुबेराचे पुत्र असल्याचे श्रीकृष्णांना माहीत होते. त्यांनी मनात विचार केला, 'नारदांची वाणी मला आता सत्य ठरवलीच पाहिजे." असा विचार करून त्यांनी दोन वृक्षांच्या मधून मार्ग काढला. बाळश्रीकृष्ण त्या दोन वृक्षांमधील लहानशा जागेतून पलीकडे निघाले; परंतु त्या उखळाच्या दोन्ही बाजू मात्र त्या वृक्षांच्या खोडांत अडकल्या. 

ते पाहून बाळश्रीकृष्णांनी संधी घेतली आणि जोर लावून दोर ओढायला सुरुवात केली. त्या वेळी एकदम मोठा आवाज होऊन ते दोन वृक्ष उन्मळून खाली पडले. त्याच्या शाखा सर्वत्र पसरल्या. त्या मोडून पडलेल्या वृक्षांमधून दोन महान पुरुष बाहेर आले. त्यांचे तेज प्रदीप्त अग्नीसारखे होते. त्यांच्या उपस्थितीने सर्व बाजू प्रकाशित झाल्या. ते नयनरम्य दृश्य होते. ते निर्दोष पुरुष तात्काळ बाळकृष्णांसमोर आले; त्यांना नम्र प्रणाम केला आणि त्यांची प्रार्थना करू लागले.

" हे भगवंता, आपण आदिपुरुषोत्तम आहात, अखिल देवतासृष्टीचे स्वामी आहात. हे सृष्टीसृजन आपल्या शक्तींनी अर्थात मायेने केले आहे हे विद्वान ज्ञानियांना उत्तम प्रकारे माहीत आहे. या शक्ती कधी व्यक्त असतात तर कधी अव्यक्त असतात. आपण सर्वव्यापक, सगळ्यांना देवतांचे अविनाशी नियंत्रक आणि शाश्वत काळ असणारे मूळ परमेश्वर भगवान आहात. ब्रम्हा विष्णू महादेव नारायण आदि सर्व देवता आपल्या सेवक आहेत. 

आपण विश्व सृजनाचे स्रोत आहात. ही अखिल सृष्टी भौतिक आणि देवता प्रकृतीच्या सत्त्व, रज आणि तम अशा त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहे. आपण प्रत्येक योनीतील सर्वच जीवमात्रांच्या हृदयांतरी परमात्मा म्हणून वास करता. तसेच त्यांच्या देहांत आणि अंत:करणात काय चालले आहे हे आपण उत्तम रीतीने जाणता. आपण सर्व जीवमात्रांचे उद्धारक आहात. भौतिक जगातील देवता प्रपंच, वेद पुराण आदि सर्वच ज्ञान, सर्वच गोष्टी त्रिगुणांनी प्रभावित आहेत आणि त्यांच्यामध्ये अवस्थित राहूनही आपण अशा दूषित गुणांनी प्रभावित होत नसता. 

त्रिगुणांच्या कक्षेत असणारा कोणीही आपले दिव्य गुण जाणू शकत नाही. आपले दिव्य गुण तर सृजनापूर्वी आणि नंतर देखील सदैव अस्तित्वात असतात. यामुळे आपणाला परम दिव्यत्व समजले जाते. आपल्या अंतरंग शक्ती सदैव आपले यशगान करीत असतात. आपण परम ब्रह्म वासुदेव आहात. आपल्या श्रीचरणकमळांशी आम्ही सादर नमस्कार करतो.

“या भौतिक जगात आपण केवळ आपल्या अवतारांद्वारे स्वतःची जाणीव करून देता. आपण जरी अनेक शरीरे धारण करीत असता तरी अशी शरीरे प्राकृतिक सृजनाचा भाग नव्हेत. अशी रूपे अनंत ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, यश, श्री, सौंदर्य अशा दिव्य ऐश्वर्य शक्तींनी पूर्ण असतात. आपण आपल्या मूळ दिव्य मायामुर्तीने अवतरित होता. आपण अवतरित होता तेव्हा आपण अद्भुत चरित्रे करून आपण भगवंत असल्याचे कळवून देता. 

या भौतिक जगात अशा अद्भुत लीळा संपन्न करण्यास कोणीही समर्थ नाही. जगाचे परम कल्याण करणारे, परम मंगल प्रभो! आपल्या श्रीचरणी आमचा नमस्कार. आपण सर्वव्यापक परमेश्वर आहात, शांततेचे स्रोत आहात; आणि यदुवंशात अवतीर्ण स्वयम् भगवंत आहात. 

प्रभो, आमचे पिता कुबेर आपलेच सेवक आहेत. त्याचप्रमाणे ऋषिश्रेष्ठ नारददेखील आपले सेवकच आहेत आणि केवळ त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही आपले दर्शन करू शकलो. आम्ही सदैव आपल्या दिव्य कीर्तीचे गान करण्यात आणि दिव्य चरित्रांचे श्रवण करण्यात मग्न राहावे हीच आमची प्रार्थना आहे. आमचे हस्तपादादी अवयव आणि इंद्रिये सदैव आपल्या सेवेत संलग्न राहावीत तसेच मन आपल्या श्रीचरणकमळांच्या चिंतनात लागलेले असावे. आमचे मस्तक सदैव आपल्या सर्वव्यापी विश्वरूपापुढे विनीत असावे."

स्वर्गीय देव नलकूवर व मणिग्रीव यांनी अशा प्रकारे प्रार्थना केल्यावर यशोदा मातेने दोराने उखळाला बांधलेले गोकुळेश्वर भगवान बाळकृष्ण स्मितहास्य करू लागले. ते कुबेर-पुत्रांना म्हणाले, "मला हे अगोदरच ज्ञात आहे की, नारदांनी, देवकुळात अमाप संपत्ती आणि अनुपम सौंदर्य प्राप्त असल्याने मदांध झालेल्या तुम्हाला वाचवले आहे. 

 त्यांनी घोर नारकीय स्थितीत पतन होण्यापासून तुम्हाला वाचविले आहे. या सर्व वस्तुस्थितीची मला जाणीव आहे. तुम्ही फारच भाग्यवान आहात, कारण त्यांनी तुम्हाला शापच दिला असे नाही तर त्यांच्या दर्शनाची मोठी संधी तुम्हाला लाभली. माझे यथार्थ दर्शन ज्याला होते, तो बद्ध जीव तात्काळ मुक्ती मिळवितो, कारण ज्ञानरुपी स्वच्छ सूर्यप्रकाशात दृष्टीला कोणताही अडथळा येत नाही. 

म्हणून नलकूवर, मणिग्रीव, तुम्ही माझ्याबद्दलचे प्रेम विकसित केले असल्याने तुमच्या जन्माचे सार्थक झालेले आहे. हा भौतिक जगातील तुमचा शेवटचा जन्म समजा. आता तुम्ही स्वर्गात आपल्या पित्याच्या निवासस्थानी जा आणि तेथे भक्तिभावाने राहा म्हणजे तुम्ही याच जन्मात मुक्त व्हाल. " तदोपरांत त्या देवतांनी भगवंतांना अनेक प्रदक्षिणा करून आणि वारंवार दंडवत प्रणाम करून स्वर्गाकडे प्रस्थान केले. बाळकृष्ण तेथेच उखळाला दोराने बांधलेल्या अवस्थेत बसून राहिले.

यमलार्जुन वृक्ष वज्रासारखा कडकडाट करीत भूमीवर उन्मळून पडले तेव्हा नंदराजांसहित सगळेच गोकुळवासी तात्काळ त्या ठिकाणी गोळा झाले. ते अर्जुन वृक्ष असे अचानक कोसळून पडल्याचे पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटू लागले. वृक्ष पडण्याचे त्यांना कोणतेच कारण सापडत नव्हते आणि त्यामुळे ते अतिशय गोंधळून गेले. जेव्हा त्यांनी श्रीकृष्णांना उखळाला बांधलेल्या अवस्थेत पाहिले तेव्हा हे कार्य निश्चितच कोणा असुराचेच असायला पाहिजे असा त्यांनी विचार केला. अन्यथा असे कसे घडेल ? 

आणि त्याच वेळी ते या घटनेने अतिशय व्यथित झाले; कारण श्रीकृष्णांबाबत अशा विलक्षण घटना सतत होऊ लागल्या होत्या. गोकुळवासी जनांचा या घटनेबाबत तर्कवितर्क चालू असताना तेथे खेळत असणाऱ्या मुलांनी त्यांना सांगितले की, बाळकृष्ण रांगत रांगत दोन वृक्षांमधून चालले असताना उखळ दोन्ही वृक्षांमध्ये अडकले. म्हणून त्यांनी दोर ओढला आणि त्यामुळे वृक्ष खाली पडले आणि जेव्हा वृक्ष खाली पडले तेव्हा त्यांच्यातून दोन प्रकाशमान पुरुष बाहेर आले आणि त्यांनी बाळकृष्णांना काहीतरी सांगितले.

अनेक गोपजनांनी बालकांच्या कथनावर विश्वास ठेवला नाही. अशी गोष्ट कधी शक्य होईल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. काही जणांनी मात्र बालकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि नंदराजांना म्हणाले, 'आपला पुत्र इतर मुलांहून वेगळा आहे. त्याने हे कार्य केलेही असेल.” नंद महाराजांना आपल्या पुत्राच्या असामान्य शक्तींविषयी ऐकून हसू आले. त्यांनी आपल्या अद्भुत मुलाला मोकळे करण्यासाठी दोराची गाठ सोडली. 

नंद राजांनी बाळकृष्णांना सोडल्यानंतर वयस्क गोपिकांनी त्यांना मांडीवर घेतले आणि टाळ्या वाजवून त्यांनी त्यांच्या अद्भुत कार्याचे गुण गायिले.

पहिला भाग वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇

श्रीकृष्ण चरित्र यमळार्जुन उद्धार भाग 01

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post