श्रीकृष्ण चरित्र
यमळार्जुन उद्धार ! भाग ०१
एकदा यशोदामाता आपली दासी वेगवेगळ्या घरकामात व्यस्त असल्याचे पाहून स्वत:च दहीमंथन करू लागली. दहीमंथन करते वेळी तिने भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांची गीते गायिली आणि आपल्या मुलांच्या स्मरण- सुखाचा आनंद घेतला.
दही घुसळीत असताना तिच्या साडीचा पदर कमरेला घट्ट बांधला होता. आपल्या मुलाबद्दलच्या स्नेहाधिक्यामुळे तिच्या स्तनांतून आपोआप दूध पाझरू लागले होते आणि दोन्ही हातांनी रविदोर ओढताना ते खाली ओघळू लागले व तिच्या हातातील चुड्यांचा आणि कंकणांचा एकमेकांच्या घर्षणामुळे मधुर आवाज होत होता. तिच्या कानांतील कुंडलांचे आणि स्तनांचे संचलन होत होते. श्रमामुळे तिच्या मुखावर स्वेदबिंदू चकमत होते.
तिच्या केसांतील मालतीची वेणी स्खलित होऊन तिच्यातील फुले भूमीवर विखुरली होती. अशा सुंदर दृश्यात भगवान श्रीकृष्ण तेथे उपस्थित झाले. त्यांना भूक लागली होती आणि आपल्या मातेचे प्रेम वृद्धिंगत करीत त्यांनी तिला दहीमंथनापासून थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटत होते की, मातेने प्रथम आपल्याला दूध पाजावे आणि त्यानंतर दहीमंथन करावे.
यशोदा मातेने आपल्या मुलाला मांडीवर घेतले आणि त्याच्या मुखात स्तन दिला. भगवान श्रीकृष्ण स्तनपान करीत असताना ती त्यांचे सौंदर्य न्याहाळून पाहू लागली आणि तिच्या मुखावर स्मित झळकू लागले. आपल्या मुलाचे अनुपम मुखसौंदर्य पाहून ती अपार सुखाचा अनुभव करू लागली. अचानक चुलीवर तापत ठेवलेले दूध अधिक उकळू लागल्याने उतू जाऊ लागले. यशोदा मातेने बाळरूपधारी श्रीकृष्णांना बाजूला ठेवले आणि दूध उतरवून ठेवण्यासाठी घाईघाईने चुलीकडे गेली.
मातेने आपल्याला दूध पिताना तशा स्थितीत ठेवले म्हणून भगवान श्रीकृष्णांना अतिशय राग आला. क्षुब्ध झाल्यामुळे त्यांचे श्रीनेत्र आणि श्रीअधर लाल झाले. त्यांनी दात ओठ चावले आणि एक दगडाचा तुकडा घेऊन लोण्याचा माठ फोडला; त्यांनी त्यातून लोणी काढले; डोळ्यात लटकेच अश्रू आणले आणि एका बाजूला जाऊन ते लोणी खाऊ लागले.
चुलीवरील दुधाचे भांडे बाजूला ठेवून यशोदा माता दहीमंथनाच्या ठिकाणी आली. तेथे आल्यावर दहीमंथन करते वेळी लोणी काढून ठेवलेला माठ फुटला असल्याचे तिच्या लक्षात आले. तिला आपले बालक कोठे दिसले नाही आणि म्हणून हे माठ फोडण्याचे कर्तृत्व त्याचेच असावे, असा तिने कयास बांधला. तिला हसू आले. तिने विचार केला "बालक मोठे हुशार आहे; त्याने माठ फोडला आणि शिक्षा होईल या भीतीने येथून पळ काढला आहे."
सगळीकडे शोध केल्यानंतर तिला आपला पुत्र एका उलट्या ठेवलेल्या मोठ्या लाकडी उखळावर बसला असल्याचे आढळून आले. छताला टांगलेल्या शिंक्यावरील माठातून लोणी काढून बाळश्रीकृष्ण माकडांना खाऊ घालीत होते आणि आपण खोडकरपणा केला असल्याची जाणीव असल्यामुळे ते मातेच्या भयाने चंचल श्रीनेत्रांनी इकडे तिकडे पाहात होते. आपला पुत्र अशा कार्यात व्यस्त असल्याचे पाहून यशोदा माता मागील बाजूने अगदी हळूहळू त्यांच्याकडे जाऊ लागली. तथापि, बाळश्रीकृष्णांची नजर
अचानक आपल्या मातेकडे गेली; ती हातात काठी घेऊन त्यांच्याकडे येत होती. माता आपल्याकडे येत असल्याचे पाहून ते उखळावरून खाली उतरले आणि भयभीत होऊन पळू लागले. यशोदा माता, मोठमोठ्या योग्यांनादेखील योगाद्वारा दुर्लभ आहे जो अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना पकडण्याचा प्रयत्न करीत सर्वत्र त्यांच्या मागून धावू लागली. दुसऱ्या शब्दांत, अन्य देवतेच्या योग्यांना आणि तार्किकांना कधीही प्राप्त न होणारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यशोदा मातेसारख्या अनन्य भक्ताकरिता एका बालकाची भूमिका करीत होते.
यशोदा बाळश्रीकृष्णांचा पाठलाग करीत होती; तथापि, आपली पातळ कंबर आणि मोठे शरीर यामुळे ती त्यांना सहजासहजी पकडू शकली नाही; परंतु तरीही ती होता होईल तितक्या वेगाने त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागली. तिचे केस सैल झाले. केसांतील फुले खाली गळून पडू लागली. ती थकली होती तरी अखेर आपल्या खोडकर मुलापर्यंत जाऊन पोहोचली आणि त्याला पकडले. अशा प्रकारे जेव्हा बाळश्रीकृष्ण मातेच्या हाती सापडले तेव्हा ते अगदी रडण्याच्या बेतात होते. ते काजळाने माखलेले आपले श्रीनेत्र चोळू लागले. जेव्हा त्यांनी समोर उभ्या असलेल्या मातेकडे पाहिले तेव्हा त्यांचे डोळे भयाने कावरेबावरे झाले.
यशोदा मातेला वाटले की, बाळश्रीकृष्ण उगाचच घाबरून गेला आहे आणि त्याच्या कल्याणार्थ तिला त्याचे भय दूर करावयाचे होते. आपल्या मुलाचे परम हित चिंतणाऱ्या यशोदा मातेने विचार केला, "हे मूल जर माझी इतकी धास्ती धरीत असेल तर त्याचे काय होईल कोणास ठाऊक ?" आणि असा विचार करून तिने हातातील काठी टाकून दिली; परंतु त्याला काही तरी शिक्षा केलीच पाहिजे म्हणून तिने त्यांचे हात दोराने बांधण्याचे ठरविले.
पूर्ण परब्रम्ह परमेश्वर श्रीकृष्ण भगवंतांना बंधनात टाकणे कसे शक्य होते ? तिला श्रीकृष्ण म्हणजे आपले एक लहान बालक वाटत होते. ते मूल सीमारहित असल्याची तिला जाणीव नव्हती. तिच्या मुलाच्या बाबतीत अंतर्बाह्य असा भेदच नव्हता, तसेच त्याला आदि-अंतही नव्हता! ते अनंत, सर्वव्यापी होते. ते बालक स्वतः सर्व विश्वसृष्टीच होते. काही झाले तरी यशोदा श्रीकृष्णांना आपले लहान मूलच मानीत होती.
भगवान श्रीकृष्ण इंद्रियातीत असले तरी ती त्यांना उखळाला बांधण्याचा प्रयत्न करू लागली. जेव्हा ती हातातील दोराने त्यांना बांधू लागली, तेव्हा तिच्या हातातील दोर दोन बोटे कमी पडत असल्याचे तिला आढळले. तिने घरातील दोर आणले आणि मूळच्या दोराला जोडले तरीही तिला ते दोर कमीच पडू लागले. मग तिने घरातील सर्वच दोर आणून जोडले; परंतु अखेरची गाठ देताना पुन्हा दोर दोन बोटे कमीच पडले. यशोदा मातेला हसू येत होते त्याचबरोबर हे असे का होते, याचे आश्चर्यदेखील वाटत होते.
आपल्या मुलाला बांधण्याच्या प्रयत्नात ती श्रमली. तिच्या मुखावर स्वेदबिंदू चमकू लागले. केसातील वेणी खाली पडली. आपल्या मातेला झालेले कठीण परिश्रम श्रीकृष्णांनी पाहिले आणि त्यांना तिची करुणा आली. त्यांनी तिच्याकडून दोराने बांधून घेण्याचे मान्य केले. भगवान श्रीकृष्ण यशोदा मातेच्या घरी बालकाची भूमिका करतेवेळी आपल्या निवडक बाल-लीला संपन्न करीत होते. अर्थातच, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांवर कोणीही प्रभुत्व गाजवू शकत नाही. एक शुद्ध भक्त स्वतःला भगवंतांच्या श्रीचरणकमळांशी समर्पित करतो; मग ते त्याचे रक्षण करोत अथवा त्याचा निःपात करोत. काही झाले तरी भगवद्भक्त स्वतःची शरणागतीची स्थिती कधीही विसरत नसतो. त्याप्रमाणेच भगवंतदेखील आपल्या आश्रित भक्ताच्या रक्षणात स्वतःला पूर्णपणे समर्पित करतात. आणि हे तथ्य श्रीकृष्ण आपल्या मातेला शरण जाण्याच्या प्रसंगावरून प्रमाणित होते.
भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांसाठी सर्व प्रकारच्या नित्यमुक्तींचे परम प्रदाता आहेत; परंतु यशोदा मातेला प्राप्त असलेल्या वरदानाचा अनुभव ब्रह्मा विष्णु महादेव किंवा सर्वात श्रेष्ठ देवता चैतन्य माया हिलादेखील कधी करता आला नाही.
नंदराजे आणि यशोदा यांचे पुत्र म्हणून सुविख्यात असलेले पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे योग्यांना अथवा तार्किकांना कधीही पूर्णपणे जाणता येत नाहीत; परंतु ते त्यांच्या अनन्य भक्तांना मात्र सहजसुलभ आहेत. तसेच योग्यांना आणि तार्किकांना ते आनंदाचे परम भांडार आहेत याचीही जाणीव होत नाही.
यशोदा मातेने आपल्या पुत्राला दोराने उखळाला बांधले आणि ती घरकाम करू लागली. बाळश्रीकृष्ण समोर अंगणातील दोन वृक्षांकडे पाहात होते. त्या वृक्षांना 'अर्जुन' म्हणून ओळखले जात असे.
बाळश्रीकृष्णांनी विचार केला : “सुरुवातीला, माता मला पुरेसे दूध पाजण्याऐवजी टाकून गेली..., म्हणून तर मी लोण्याचा माठ फोडला आणि सर्व लोणी माकडांना वाटून दिले. आता तिने मला उखळाला बांधून टाकले आहे. ठीक आहे. आता मी पहिल्यापेक्षा अधिक खोडकरपणा करीन." आणि अशा रीतीने त्यांनी अंगणातील त्या दोन प्रचंड अर्जुन वृक्षांना पाडून टाकण्याचा विचार केला.
या दोन अर्जुन वृक्षांमागे एक पुरेतिहास आहे. गतजन्मात हे दोन वृक्ष कुबेराचे पुत्र होते. त्यांची नलकूवर आणि मणिग्रीव अशी नावे होती. सौभाग्याने ते भगवंतांच्या दृष्टिपथात आले. मागील जन्मात त्यांना नारदांकडून उःशापातून भगवंतांचे दर्शन करण्याचे मोठे वरदान प्राप्त झालेले होते. हा उःशाप त्यांना त्यांच्या उन्मत्तपणामुळे मिळाला होता.
क्रमशः पुढील भागात
पुढील दुसरा भाग वाचनासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇