अपयश ही यशाची पहिली पायरी
आहे.. असं
अनेकदा सांगितलं जातं.. कारण थोड्याशा
अपयशानं सुद्धा खचून जाणारी, निराश,
हताश होणारी माणसं असतात! ज्यांनी
आयुष्यात केवळ यशच पाहिलंय, अनुभवलंय त्यांना तर क्षणिक अपयश मृत्युदंडाची शिक्षाच वाटते! यशापयशाच्या कारणांची सखोल मीमांसा न करताच अनेकजण
हुरळून वा खचून जातात!
योग्य दिशेनं, आवश्यक त्या
जोरानं, सामर्थ्यानं, अढळ
आत्मविश्वासानं व परमेश्वरावरील अविचल, निभ्रान्त निष्ठेनं
हाती घेतलेल्या कामात नक्की यश मिळतं.. मिळेल! पण यातील कोणत्याही बाबतीत कमतरता
असेल वा एखादी बाब अनुपस्थितच असेल तर भाळी अपयश नक्की लिहिलं जाईल! अपयशी
माणसांनी आत्मचिंतन अवश्य करावं तो चिंतन जरी
यशस्वी माणसाचे करीत असेल तरी
अनुकरण निश्चितच अपयशी माणसाचे करत असतो व एकदा का या दुर्गुणाला कवटाळायची वा
चुचकारायची सवय लागली ती सर्व व्यसनापेक्षा वाईट !
त्यामुळे नेमकं ओळखावं की आपण कोणत्या
प्रवृत्तीचे अनुकरण करत आहोत! अनेकदा माणसं यशाचं श्रेय स्वतःकडे देतात.. ईश्वराला
वा अन्य सहकार्यांना न देता! आणि अपयशाचा ठपका ईश्वरासकट अन्य सर्वांवर ठेवतात! म्हणूनच अपयश पोरकं असतं व यशाचे अनेक बाप असतात, असं
शहाणी माणसं म्हणत असतात.. अहंकार ठासून भरलेला असल्यामुळे आपल्यात सुद्धा अपयशाला
कारणीभूत ठरू शकणार्या काही त्रुटी, दोष असू शकतात हेच ती
माणसं स्वीकारू वा मान्य करू शकत नाहीत..अहं करोमीति
वृथाभिमानः हे धुडकावण्याकडेच त्यांचा
कल असतो!
यत्ने
कृतेऽप्यदि न सिद्ध्यति कोऽत्र दोषः अशी अन्वेषणात्मक बुद्धि
असेल व मोकळ्या मनानं प्रामाणिकपणे विचार केला तर अंगीकृत कार्यात आलेल्या अपयशाची
कारणं लक्षात येऊन सुधारणा घडवून आणण्याची नक्कीच शक्यता असते! पण असं न करता.. आलेल्या
अपयशानं जर केवळ रडणं,
चिडचिड करणं, हताश निराश होणं, वैतागणंच जर घडत असेल तर अशांच्यासाठी वेगळ्या मृत्यूची आवश्यकताच नाही!
अपयशच त्यांचा मृत्यु असतो! यश मिळवणं तुलनेनं सोपं असलं तरी ते दीर्घकाळासाठी किंवा नित्य टिकवून ठेवणं वा वाढवणं हे खूप कठीण असतं.. अशावेळी अपयश यदाकदाचित पदरी पडलं तर ते संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते। या गीता वचनानुसार मरणाहूनही भयंकर व दुःखकारक ठरतं! मरण वेदनादायक अपयश टाळायचा खात्रीशीर उपाय म्हणजे मानावा परमेश्वर सर्वथा कर्ता ही वृत्ति स्वीकारावी. अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने.. म्हणून ‘मारावा तो समूळ ईश्वरनामाने ।’ परन्तु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान आवश्यक वाटावं व ते ओळखावं म्हणजे अपयश येणारही नाही!
यदाकदाचित अपयश आलंच
तर ते आत.. चित्तापर्यंत न पोहोचता त्यानं येऊ शकणार्या मरणांतिक वेदनांची झळ
लागणार नाही! अन्यथा एकदा जरी एखाद्या बाबतीत अपयश आलं तरी त्यामुळे भविष्यात
नित्य व अनेक प्रकारांनी मरणं भोगण्याची पाळी येऊ शकेल! आलेल्या अपयशाचा.. त्याचं
दैहिक वा मानसिक मरणात पर्यवसान होऊ न देण्यासाठी... सिद्धस्य गतिश्चिंतनीया या
न्यायानं सकारात्मक विचार करावा हे उत्तम!