लीळा चरित्रातील जीवनमूल्ये - महानुभाव-पंथिय-ज्ञान-सरिता- lilacharirtatil jivanmulye - Mahanubhavpanth-dnyansarita

लीळा चरित्रातील जीवनमूल्ये - महानुभाव-पंथिय-ज्ञान-सरिता- lilacharirtatil jivanmulye - Mahanubhavpanth-dnyansarita

 लीळाचरित्रातील जीवनमूल्ये -  

महानुभाव-पंथिय-ज्ञान-सरिता-Mahanubhavpanth-dnyansarita

    सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं जीवन समजावं, ते आपल्यात उतरावं व आपणही त्यांच्या सारखं निरामय व्हावं, कारण प्रभुंच्या चरित्रात व विचारात शाश्वत जीवनमूल्ये दडलेली आहेत. आपलं कोमेजलेलं, भरकटलेलं जीवन त्यामुळे विकसित होईल. मोक्षानुभूतीचा, सुखाचा आरंभ येथेच आपल्या जीवनात होऊ शकतो.

    चुकीच्या मार्गाने आपली वाटचाल असल्यामुळे आपलं जीवन भकास व उजाड होत चाललं आहे. पाण्यासारखा पैसा ओतूनही त्यात हिरवळ येण्याची शक्यता नाही. मानसन्मानाच्या आसनावर बसून पाहिलं. यथेच्छ विषयांचं सेवन केलं, तरीही सुखाची व आपली भेट होत नाही. म्हणून उमेद क्षीण होत चालली आहे. वैफल्यग्रस्त झाल्यामुळे आत्महत्येच्या काठावर आपण उभे आहोत. नको त्या विचार-आचाराने पैशांच्या ढिगात 'दुःख' भोगणारे आपण किडे-माकोडे झालो आहोत. सुखी जीवनाचा पाया असलेलं शरीर व्याधीग्रस्त झालयं. चुकीची जीवनशैली, भरकटलेले विचार व पथभ्रष्ट आचार पद्धती याला कारणीभूत आहे.

मग हे असंच चालणार का ? धर्म काय फक्त मोक्ष आणि परलोकांचाच विचार करतो काय ? धर्माने इथल्या जीवनाची दखल घेतली नाही काय ? ह्या सगळ्या प्रश्नांची अचूक व समाधानकारक उत्तरे श्रीचक्रधर प्रभूंच्या जीवनशैलीत सापडतात. त्यांचे विचार म्हणजे व्यक्ती आणि मोक्ष यांना सांधणारा पूल आहे. लीळावैभव हा ग्रंथ आपली जीवनगाडी त्या पुलावर नेऊ शकतो अन् मग आपलं अमोल जीवन शाश्वत मूल्यांच्या बळावर अनमोल व्हायला वेळ लागणार नाही.

काही ठळक मूल्यें

उपहूड - स्वामी सकाळीच उठत असत व म्हणत सुर्योदयापूर्वी पश्चातप्रहरीं झोपेतून उठावं. तो सारस्वत काळ असतो. त्या नीरव व शांत समयी हृदयात दिव्य व तेजस्वी विचार येतात. ईशचिंतनाने देव हृदयात येतो. इथं आपण चुकलो की सकाळच्या प्रसन्नतेला मुकतीच समजा. दिवसाचा आरंभ चुकला की दिवस चांगला जाणार नाही.

पहूड - स्वामी वेळच्या वेळी झोपत असत. लीळाचरित्रात पहुड व उपहूड हे शब्द वारंवार येतात आणि ते महत्वाचे पण आहेत. लवकर झोपलं की सकाळी माणूस ताजातवाना असतो. पूर्ण विश्रांती मिळते. मन प्रसन्न होतं. गाढ झोपेत ऊर्जानिर्मिती होते. पडताक्षणी झोप लागावी एवढं मन ताणरहित असावं. नियमितपणा ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. श्री दत्तायि महाराजांचं जीवन शिस्तबद्ध आहे. भोजन, स्नान, श्रवण व निद्रा यांच्या वेळा निश्चित आहेत. म्हणून तर तो चिरायू आहे.

आपली झोपेची वेळ अनिश्चित आहे. रात्री उशिरापर्यंत जागणे. मन कलुषित करवून घेणे. तणावग्रस्त मन असल्यामुळे विचारांचं वादळ डोक्यात चालतं. निद्रादेवीची आराधना करूनही झोप लागत नाही. परिणामी चिडखोरपणा, अस्वस्थता व आपलं शरीर व्याधींचं माहेरघर होऊन जातं. विहार - स्वामी दररोज विहरणासाठी म्हणजे फिरायला जात असत. अटण म्हणजे पायी चालणे, यावर त्यांचा भर असायचा. चालल्याने सर्वांगाचा व्यायाम होतो. चालण्यात सातत्य असावं म्हणून नित्याटन करावे असं त्यांचं एक सूत्रच आहे. त्यामुळे अंगातली चरबी झडते. शरीर बेढब न होता आकारात राहते. आळस जाऊन स्फूर्ती येते.

आज आपल्या अनंत गरजा वाढल्यामुळे जीवन धावपळीचं झालं आहे. वाहनाने प्रवास तर खूप होतो. पायी चालणं होत नाही व शरीर बेढब होऊन जातं, व्याधी जडतात, शारीरिक व मानसिक हानी झाल्यामुळे अल्पायुषी होतो. व्यायामे वायु तुटे या सूत्रातून स्वामींनी व्यायाम हा देवपूजेइतकाच महत्वाचा आहे, असं सांगितले आहे.

वाचा - चित्ताच्या प्रसन्नतेवर वाचेतलं सामर्थ्य अवलंबून असत. स्वतः स्वामी प्रिय बोलत असत. त्यांची वाणी म्हणजे माधुर्याचा झराच होता. सशासारख्या प्राण्याला ते म्हणतात महात्मे हो आता जा. अगदी

एकातांतही आपलं कार्य अव्याहत करते ती करूणा स्वामींच्या वाणीत होती. वाणी हा तर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा आत्माच आहे. म्हणून परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामी आपल्याला सांगतात, महात्मेयाने प्रियवक्ता असावे. सर्वांशी गोड बोलावे. जीवनप्रणाली कशी आहे यावर आचार, विचार व उच्चार अवलंबून असतात. हृदयात कोप निर्माण झाला की, वाणी कडकलक्ष्मी होते व हृदय शांत असेल तर गंगा प्रवाहासारखी असते.

अनियमितपणामुळे आपली संपूर्ण शरीरयंत्रणाच बिघडली आहे... गाडी खराब झालीकी फायरिंगचा आवाज बदलतो, तशी आपली वाणी कठोर झाली. त्यातलं माधुर्यच नष्ट झालं आहे. बोलून काम होण्याऐवजी बिघडतेच हा आपला अनुभव आहे. आपल्या जीवनात मौन नाही. वाचाळता वाढली आहे. फार बडबड्या विद्वानही नकोसा वाटतो. तोंडात सतत साखर व डोळ्यावर बर्फाचा खडा असावा. वाणीत विष असेल तर एकाच वाक्याने महाभारत घडू शकतं. पदम्नाभीचं खोचक बोलणं देवाला आवडलं नव्हतं.

व्यवहार - धर्म वेगळा व व्यवहार वेगळा. दोघांची भेसळ करू नये. जिन्याच्या दोन पायऱ्या वेगळ्याच असाव्यात. त्यांचं वेगळेपण एकमेकीला पूरक असतं. व्यवहार हा व्यवहारानेच साधावा यावर स्वामींचा कटाक्ष होता. व्यवहार म्हणजे धर्माची पूर्वतयारी चुकत असलेल्या धार्मिकापेक्षा व्यवहारदक्ष माणूस हजारपट चांगला आहे. स्वामींचा व्यवहार नेक होता. प्राप्त परिस्थितीत जगायचं. जगणं हे क्षमतेवर आधारित असावं. अडचणीच्या प्रसंगी अडकित्ता गहाण ठेवायचे पण कर्ज काढत नव्हते. खर्च हा उत्पन्नावर आधारित असला की, माणसाचा स्वाभिमान शाबूत राहतो. असा सरळ रस्त्याने चालणारा माणूसच धर्माला हवा आहे. व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगा जाय म्हणून तर देव म्हणाले.

आपण उत्पन्न कमी, खर्च जास्त करतो इथच आपलं व्यवहाराचं गणित चुकलेलं असतं. खोट्या मार्गाने स्वार्थ सिद्धी होते, म्हणून आपण अनेकांना अडचणीत आणतो. शेवटी समाजात आपली प्रतिमा डागाळते व उपेक्षित अपमानित जीवन वाट्याला येतं. व्यवहारात पराभूत झालेला माणूस सुखी कसा राहणार ?

धैर्य : लोण्याहून मऊ हृदयाचे श्री चक्रधर स्वामी धर्मकार्यात येणाऱ्या अडचणीवर मात करताना धैर्यवान होत असत. ध्येयप्राप्तीसाठी त्या मार्गावरून चालताना त्यांची गती कधीच मंदावली नाही व मार्गावरून कधीच विचलित झाले नाहीत. हा निश्चयाचा महामेरू अखेरपर्यंत अभंग राहिला. समाजकंटकांनी मार्गावर काटे अंथरले, कुणाला दोष न देता ते काटे पायात घेऊन गेले व मागच्यांचा मार्ग निकोप केला. पथिकांना सल्ला देताना ते म्हणतात धीरवीर होआवे.

थोडीशी प्राप्ती झाली की हुरळून जाणं व थोड्याशा हानीनं खचून जाणं असं आपलं जीवन झालं आहे. ध्येयाला घट्ट न पकडता आपल्याकडून सतत धरसोड होत असते. अहंगंड व न्यूनगंड सतत समतोल बिघडून टाकतात आणि मग आपण अस्थिर होता. नावाडी नसलेल्या नावेप्रमाणे विषयांचा वारा आपल्याला फडकवतो आणि मग जगच वाईट आहे असं म्हणून आपल्या दोषाचं खापर जगाच्या माथ्यावर फोडतो.

ज्ञान - सर्वज्ञ हे सर्वजाण होते. यापेक्षा ज्ञान देण्याचं औदार्य त्यांच्याजवळ होतं, हे विशेष आहे. उत्तम शिक्षकाचे सर्वच गुण स्वामींमध्ये आपल्याला दिसतात. परिवाराला घडवितांना पालकाची भूमिका उत्कृष्ट रीतीने ते पार पाडीत असत. श्रोत्यांची बौद्धिक क्षमता पाहून विषय: समजावून देण्याची त्यांची हतोटी विलक्षण होती. ज्ञानाशिवाय जगात काहीच श्रेष्ठ नाही; आणि ते जवळच्या लोकांना पालकाने सांगायलाच पाहिजे. म्हणून तर त्यांनी ज्ञानमोचक म्हटलं आहे.

आपण आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष तर करीत नाही ना; यांच निरीक्षण करावं. एक तर फाजील लाड किंवा नको तेवढं दडपण याचा आपण प्रयोग करतो. दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. शाळा - कॉलेजमध्ये पाठविलं की, जबाबदारी संपली असं आपल्याला वाटतं व आपल्या जवळ शिकविण्यासारख काय आहे ? असा न्यूनगंड असतो. आणखी काही ज्ञान असतं याचं भान आपल्याला राहत नाही. अनुभवज्ञान तुमच्या जवळ आहे. तुमच्याजवळ संस्कार आहेत. संस्कृती आहे. हे देणं तुमच्या पाल्यांना तुम्ही देऊ शकता व स्वामींच्या मार्गावर चालू शकता.

सर्वज्ञांमध्ये असलेला सद्गुणांचा काही अंश जरी आपल्यात निर्माण करता आला तरीही आपण त्यांच्या जवळ जाऊ शकतो. प्रसन्नता, बहुश्रुतता, समता आपल्यात अवतरली तर इथलं जीवनही सुगंधी बहारदार होईल. म्हणून लीळाचरित्र हा ग्रंथ नीतीमूल्य, जीवनमूल्य, आचार, विचारांचा खजिना आहे.

लेखक :- पू. म. बाभुळगांवकर बाबा शास्त्रीजी

==========================

हेही वाचा !

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post