या ५ ठिकाणी मनुष्याने मौन धारण करावे !
एका गुरुचा शिष्य होता. त्याला जास्त बोलण्याची सवय होती. त्याला हे कळायचेही की, आपल्या जास्त बोलण्यामुळे आपल्याला समाजात कवळी मोलाचीही किंमत नाही, पण तरीही त्याची ती सवय अजिबात मोडत नव्हती, त्यामुळे तो खूप चिंतित होता. त्याला कोणी विचारो अथवा न विचारो पण तो आपल्या अवतीभवती प्रत्येक गोष्टीविषयी आपले काहीनाकाही विचार / मत प्रकट करत असे आणि न विचारता सल्ले देत असे. आश्रमातल्या प्रत्येक विद्यार्थ्याविषयी आणि शिक्षकांविषयी त्याचे सकारात्मक नकारात्मक आपले स्वतंत्र मत होते. ते मत तो काहीही विचार न करताच लोकांसमोर मांडत असे.
आश्रमात राहणारा कुणी दुसरा विद्यार्थी आपल्या शंका कुशंका घेऊन त्याचे मत जाणण्यासाठी यायचा, तेव्हा तो त्याचे बोलणे पूर्ण न ऐकताच आपला सल्ला देणे सुरू करायचा. तो नेहमी आपल्या मित्रांना असे म्हणायचा की, तुम्ही हे काम असे करायला पाहिजे, ते काम तसे करायला पाहिजे. त्याला आपल्या अवतीभवती असलेल्या वस्तूंविषयी जे काही अपूर्ण अर्धवट ज्ञान होते. ते तो मित्रांसोबत गप्पा मारताना प्रकट करायचा बोलायचा व ‘मी फार मोठा ज्ञानी आहे’ असे द्योतवून देण्याचा प्रयत्न करायचा.
त्याच्या या असल्या वागण्यामुळे आश्रमातला कोणीही विद्यार्थी
किंवा शिक्षक त्याला आणि त्याच्या विचारांना गंभीरतेने घेत नव्हते. त्याच्यासोबत
अभ्यास करणारे विद्यार्थी नेहमी त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचे
त्याला टाळायचे. कारण तो प्रत्येक गोष्टीवर आपला सल्ला देण्याचा प्रयत्न करायचा कोणीही
त्याला मित्र बनवण्यासाठी तयार नव्हते. सर्व
त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचे आणि आश्रमातले इतर विद्यार्थी
त्याच्या पाठीमागे त्याच्या या सवयींविषयी त्याची निंदा करायचे. त्या
विद्यार्थ्यालाही हे कळायचे की, आपल्या जास्त बोलण्याचा
सवयीमुळे आपण कोणालाही आवडत नाही. त्यालाही वारंवार वाटायचे की, आपणही सवय मोडली पाहिजे पण प्रयत्न करूनही त्यात यश येत नव्हते.
एके दिवशी तो आपल्या गुरूंजवळ गेला आणि आपली समस्या गुरूंना सांगितली गुरूंना माहीत होते पण जोपर्यंत शिष्य पूर्ण पणे नम्र होऊन विनंतीपूर्वक विचारत नाही तोपर्यंत कोणीही गुरु सल्ला देत नाही कारण शिष्य उपदेश ऐकण्यासाठी सादर असला पाहिजे. गुरु त्याला म्हणाले, ‘‘ बेटा जास्त तोच मनुष्य बोलतो ज्याला असे वाटते की, ‘मी सर्व ज्ञानी आहे, मला सर्व काही कळते’ अशा माणसाला जास्त बोलण्याची सवय असते. आणि ज्या मनुष्याला वाटते की, ‘मला फार थोडे ज्ञान आहे आणि जाणून घेण्यासारखे अजून बरेच काही आहे, ते सर्व ज्ञान मला अवगत करायचे आहे,’ असा मनुष्य कधीही जास्त बोलत नाही. आणि तो न मागता सल्लाही देत नाही. म्हणून सर्वात आधी आपल्या अंतःकरणातील हा अभिमान झटकून टाक की ‘मला सर्व काही माहिती आहे मला सर्व काही येते.’
शिष्याने
गुरूंना नम्र पूर्वक नमस्कार केला. पुढे गुरुवर म्हणाले, ‘बेटा मी एकाच दिवसात तुझी ही जास्त व निरर्थक बोलण्याची सवय मोडू शकत नाही.
तुलाच हळूहळू प्रयत्न करून ही सवय मोडावी लागेल. पण मी तुला हे नक्की सांगू शकतो
की कोण कोणत्या प्रसंगावर तू शांत राहायला पाहिजे. त्यामुळे तू कधीही दुःखी होणार
नाहीस आणि कोणत्याही मोठ्या संकटात सापडणार नाहीस. शिष्याने नम्रतापूर्वक गुरूंना
विचारले की मला आपण सांगा, मी कोणत्या कोणत्या
प्रसंगांवर शांत रहावे मौन धारण करावे? गुरूंनी
सांगितले की, पाच प्रसंग असे आहेत त्या वेळेला
मनुष्याने मौन धारण करावे.
कुणी समजून घेणारे नसते तेव्हा मौन असावे
१) जेव्हा तुम्हाला असे वाटते की, कोणीही तुमच्या भावनांना शब्दाने समजू शकत नाही. त्या वेळेला तुम्ही शांत राहिले पाहिजे मन धारण केले पाहिजे. नेहमी आपण लोकांना आपल्या आयुष्यात येणारे संकट दुःख याविषयी सांगत असतो भावनांना वाट मोकळी करून देत असतो. परंतु सत्य हे आहे की आपल्या आसपासच्या लोकांना आपल्या दुःखा संकटांबद्दल काही घेणेदेणे नसते सर्व आपापल्या जीवनात मस्त असतात. प्रत्येकाला फक्त स्वतःविषयीच काळजी असते कारण जीव हा स्वार्थी आहे. प्रत्येक जण फक्त स्वतःविषयीच बोलू इच्छितो स्वतःचीच प्रशंसा ऐकू इच्छितो, लोकांना आपल्या जीवनातील दुःखांची काहीही घेणेदेणे नाही.
आणि ते आपले बोलणे ऐकूही इच्छित नाहीत असेही होऊ शकते की एकदा किंवा दोनदा ते तुमची दुःख भरी दास्ता ऐकूनही घेतील, पण त्यानंतर ते तुमच्या पासून दूर दूर राहण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला टाळतील. कारण कोणीही मनुष्य दुःखी असहाय माणसाशी मैत्री करू इच्छित नाही. दुःखी माणसासोबत राहू इच्छित नाही. हे जग सर्व सुखामागे धावते आहे. आणि आणि लोकांच्या अशा वागण्याने तुम्ही आणखीनच जास्तच दुःखी व्हाल. म्हणून कधीही आपल्या जवळच्या मित्र शिवाय किंवा आपल्या घरातील परिवाराशिवाय आपल्या मनातील गोष्टी किंवा आपल्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींबद्दल सांगू नये. जर आपण सांगितले तर पुढील व्यक्ती आपले दुःख तर समजून घेणार नाहीच उलट आपल्या दुःखांवर हसून आपला मजाक करील.
अर्धवट माहितीच्या आधारे बोल नये.
२) जर तुम्हाला हे
माहिती नसेल की, समयोचित
प्रसंगानुसार काय बोलले पाहिजे. किंवा तुम्हा एखाद्या गोष्टीबद्दल अर्धीच माहिती
असेल तर अशा वेळेला तुम्ही मौनच असायला पाहिजे. जो
मनुष्य अर्धेच ज्ञान, अर्धीच माहिती असल्यावरही त्या विषयावर बोलतो आणि आपले मत प्रकट करतो तो नेहमी लोकांसाठी गमतीचा
विषय ठरतो. लोक त्याला गांभीर्याने घेत नाहीत. समाजात त्याचे नेहमी हसे होत राहते. आपले मत प्रभावशाली विचाराने तोच
मनुष्य लोकांसमोर मांडू शकतो ज्याला त्या घटनेबद्दल किंवा त्या विषयाबद्दल पूर्ण
माहिती आहे. म्हणून कधीही अर्धवट ज्ञानाने किंवा इकडून
तिकडून जमा केलेल्या अर्धवट माहितीने लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये.
मित्रांनो ! प्रभावशाली मनुष्य बनणे आणि सर्वांशी सुसंवाद साधने हीपण एक कला आहे. ही कला प्रत्येक मनुष्य शिकू शकतो तुम्हीही शिकू शकता फक्त आपल्याला लोकांशी संवाद करायचा आहे आणि सुसंवाद साधण्याचे सिक्रेट जाणून घ्यायचे आहेत.
कुणी निंदानालस्ती करत असेल तर मौन असावे
३) जर एखादा व्यक्ती
तुमच्यासमोर कोण्या तिसऱ्या माणसाची निंदा करतो,
त्याचे दोष सांगतो अशा वेळेलाही तुम्ही
मौन असायला पाहिजे. आपण कधीही अशा नकारात्मक गोष्टींना
दुजोरा देऊ नये. कारण आज जी व्यक्ती तुमच्यासमोर
तिसऱ्या व्यक्तीची बदनामी करत आहे, निंदा करत आहे. उद्या तीच व्यक्ती कोण्या तिसऱ्या माणसासमोर तुमची बदनामी करेल, तुमची निंदा करेल. आणि या गोष्टीची संभावना
शंभर टक्के वाढते की, तुम्ही त्याच्याकडून तिसऱ्या
माणसाची निंदा ऐकत असताना, त्याच्या गोष्टीला होकार
दिला तर उद्या त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे संबंध त्या व्यक्तीशी चांगले झाले तर तो तुमची निंदा त्या तिसऱ्या व्यक्तीजवळ करेल यात काही शंका
नाही. आणि तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काय काय म्हटले
होते ते सर्व तो त्या माणसाला मिरची मसाला लावून
सांगेल. म्हणून जेव्हा केव्हा कोणी तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीची निंदा करत असेल
किंवा त्याच्या वाईट अवस्थेवर हसत असेल तेव्हा तुम्ही फक्त त्याचे म्हणणे म्हणून
ऐकून घ्या. त्याच्या म्हणण्याला अजिबात दुजोरा देऊ नका. जर तुम्ही दुजोरा दिला तर भविष्यात तुमच्यासमोर संकट उभे राहू शकते. अनेक समस्या उभ्या राहू शकतात. आणि संबंध खराब
होऊ शकतात.
कुणी आपल्यावर रागवत असेल तेव्हा मौन असावे
४) जर कोणी तुमच्यावर निष्कारण क्रोध करेल तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही गप्प राहून समोरच्याच्या घृणेला, क्रोधाला कमी करू शकता, आणि तुम्ही त्या परिस्थिती आणखीनच खराब होण्यापासून वाचवू शकता. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या क्रोधाचे उत्तर क्रोधाने न देऊन शांत राहता, तेव्हा ही गोष्ट त्या रागवणाऱ्या माणसाला अस्वस्थ करते, मनाला टोचते. त्याचा क्रोध शांत झाल्यावर त्याला आपल्या चुकीबद्दल पश्चाताप होतो आणि जास्त संभावना वाढते की, तो स्वतःच्या चुकीबद्दल तुमच्याकडे माफी मागायला येऊ शकतो. आणि त्याने क्षमा नाही जरी मागितली तरी तो मनातल्या मनात स्वतःला अपराधी समजत असतो आणि तो पुढच्या वेळेस तुमच्यावर क्रोध करण्याविषयी, राग-राग करण्याविषयी शंभर वेळा विचार करेल.
मग तुम्ही प्रत्येक परिस्थितीत मौनच राहावे असे नाही. कारण या समाजात काही असेही लोक आहेत ते आपला मौन असण्याचा अर्थ आपल्याला दुर्बळ समजायला लागतात, आपण कमजोर आहोत असे मानू लागतात आणि जास्त त्रास देतात. अशा वेळेला गप्प राहणे देखील हानिकारक असते क्रोधाच्या वेळेस गप्प राहण्याचा हा नियम फक्त आपल्या परिवाराविषयी व जवळच्या मित्रांविषयी नातेवाईकांविषयीच लागू होतो सर्वांविषयी हा नियम लागू होत नाही जर तुम्ही प्रत्येक वेळेला मौन धारण केले तर तुम्हाला लोक त्रास देऊन तुमचा वापर करू शकतात, फायदा उचलू शकतात.
कुणी व्यक्त आपल्याजवळ मनमोकळे करत असेल तेव्हा शांतपणे ऐकून घ्यावे.
५) जेव्हा कोणी मनुष्य/व्यक्ती तुमच्यासमोर आपल्या जीवनातील दुःखद प्रसंग मांडत असेल, आपले मन हलकं करत असेल, अशा परिस्थितीत तुम्ही मौन गप्प राहून फक्त त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घ्यायचे आहे. बरेच लोक असे असतात की, कोणी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या की, लगेच सल्ला देण्यास सुरू करतात. पूर्ण विषय ऐकूनही घेत नाहीत. पण वास्तविकता ही आहे की, कोणी व्यक्ती आपल्यासमोर मन हलके करत असेल तर त्याला आपल्याकडून सल्ल्याची आवश्यकता नसते. आपण फक्त त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकायचे असते. कारण आपण लक्षपूर्वक त्याचे बोलणे पूर्ण ऐकून घेतले तर त्या व्यक्तीला एक प्रकारे आत्मिक शांतता मिळते, त्याचे मन हलके होते. त्याला असे वाटते की ‘चला कुणीतरी मला समजून घेतले.’
बरेच लोक फक्त आपले मन हलके करण्यासाठी आपल्याला मनातल्या गोष्टी सांगत असतात तेव्हा त्यांना अजिबात असे वाटत नसते की, ‘या व्यक्तीने आपल्याला काही सल्ला द्यावा.’ कारण आपण जे काही सांगणार आहोत ते त्या व्यक्तीला आधीच माहीत असते. त्याला फक्त आपले मन हलके करायचे असते. तेव्हा आपण मौन राहून फक्त ऐकून घ्यायचे असते. हा पुढच्याला सांत्वन करण्याचा फार प्रभावी उपाय आहे. आपण सल्ला न देता पुढच्याची गोष्ट ऐकून घेतली तर त्याच्या मनात आपल्याबद्दल एक प्रकारचा आदर, आत्मीयता निर्माण होते, त्याच्या मनात आपल्याबद्दल गंभीर समजदार आणि शांत मन असलेली व्यक्ती अशी भावना निर्माण होते.
म्हणून हे लक्षात ठेवा की कोणीही आपल्यासमोर मनातली गोष्ट सांगत असेल मन हलके करत असेल तर तेव्हा आपण फक्त शांतपणे ऐकून घ्यायचे असते आणि त्याने मागितला तरच सल्ला द्यायचा असतो न मागता सल्ला देऊ नये.
पुढे गुरु म्हणाले माझी एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तुम्ही कमी बोलता
तेव्हा तुम्ही एक गंभीर व्यक्तिमत्व म्हणून समाजावर प्रभाव पाडत असतात शिष्य
गुरूंचे बोलणे समजले होते. त्याला हेही कळून चुकले होते की कमी बोलून मून राहून
आपण पुन्हा आश्रमात प्रतिष्ठा प्राप्त करू शकतो समाजात मान मिळू शकतो. शिष्याने पुढे त्याप्रमाणेच वर्तन केले. व तो एक यशस्वी व्यक्ती म्हणून
प्रसिद्ध झाला.
अभंग
मौन हेचि अस्त्र । मौन हेचि शस्त्र
मौनाचेचि वस्त्र । पांगुरावे ।।
मौनाने बोलावे । मौनाशी बोलावे
मौनाने जिंकावे । औघेयासी ।।
झणी वोळखावे । मौन हीच युक्ती
मौनातली भक्ती । शक्तीयुक्त ।।
गोविंद प्रभूंचे । मौन ते अगम्य
अद्भुत रहस्य । ऋषी म्हणे ।।