परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधरोक्त सूत्रातील आरोग्य चिंतन
सर्वज्ञांचे सूत्रातील आरोग्यदर्शन
परात्पर परमेश्वर भगवान श्रीचक्रधर स्वामींना सर्वज्ञ ही सार्थ व समर्पक उपमा लावण्यात येते. भारतात होऊन गेलेल्या कोणत्याही अवतारी महापुरुषाला ‘सर्वज्ञ’ ही उपमा लावल्याचे ऐकीवात नाही. पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांना ‘योगेश्वर' म्हटले आहे. परंतु सर्वज्ञ ही उपमा केवळ श्रीचक्रधर स्वामींना लावण्यात येते. ती उपमा कशी योग्य आहे हे त्यांचे जीवन चरित्राकडे नजर फिरविली तरी सहज लक्षात येते.
ते एकांकात भ्रमण करीत असतांना एके ठिकाणी घोड्याचे व्यापारी भेटतात तेव्हा ते त्यांना घोड्यांच्या जाती किती हे समजावून सांगतात. स्वामींची त्या संबंधीची माहिती ऐकून ते व्यापारी चकीत झाले होते. त्यांनी इतक्या सुक्ष्म वर्गीकरणाची माहिती कधी ऐकीली नव्हती. शालीवाहनास योग्य विद्येची किंवा शिकारीची माहिती स्वामींनी सांगितली होती. ती ऐकून तो योगी म्हणविणारा योग विद्यातज्ञ स्तंभीत झाला होता. कुठे चुन्याच्या जाती तर कुठे दगडाची पारख सांगणाऱ्या श्रीचक्रधर स्वामींनी जीवनभर विविधांगी ज्ञान भांडार उघडे करून ठेवलेले दिसून येते.
साडे सोळाशे लीळांचे चरित्रांत जागजागी त्यांचे सर्वज्ञतेचे दर्शन घडते. असे असले तरी त्यांच्या अवतारणाचे मूल कारण 'ब्रह्मविद्येचा' करणे हेच होते. संस्कृत भाषेच्या कडीकुलूपात बंदीस्त करून सुकाळ ठेविलेल्या गीतोक्त ब्रह्मविद्या शास्त्रातील गुह्यज्ञान सर्वसामान्य जनांना कळणे अशक्यच होते. ते सामान्य स्त्री शूद्रादी जनांना सुलभपणे कळावे म्हणून श्रीचक्रधर स्वामींनी आपले ब्रह्मविद्या शास्त्र सोप्या, सुलभ आणि स्पष्ट भाषेत महाराष्ट्रभर गावोगावी फिरून 'आर्ताते गिवसत गिवसत' सर्वत्र सांगितले.
ते सूत्रबद्ध ब्रह्मविद्या शास्त्र जीवोद्धारक होते आणि आजही ते जीवोद्धारक, तारक तसे जीवनाच्या सर्वांगिण विकसनाचे दृष्टीने बहुमोलाचे आहे. त्यांच्या सूत्रांचे बहुआयामी अर्थ जनकल्याणाचे दृष्टीने अमृतासमान आहेत. त्यांच्या सूत्रातील गुह्यार्थ जीवनाचे सोने करणाऱ्या परिसा समान आहेत. त्यामुळे स्वामींच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ समजावून घेणे, आणि त्या अर्थांचा बहुविध अंगानी मतीतार्थ समजावून घेणे गरजेचे आहे.
स्वामींच्या सूत्रातील गुह्यार्थ समजून घेत गेलो तर असे लक्षांत येते की स्वामी आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवितात. त्यांचे शब्दाशब्दातून मानवाच्या जीवनात अभ्यूदयाची प्रभा फाकत जाते. त्यामुळे 'निःश्रेयस' अशा मोक्षाची वाट प्रशस्त होत जाते. त्या वाटेने जाणे सुकर व्हावे ती म्हणून इह लोकीची जीवन यात्रा सुलभ, निर्विघ्न आणि विनाताप व्हावी म्हणूनही त्यांनी आपल्या आचरणीय सूत्रांत भरपूर मार्गदर्शक तत्त्वे सांगितलेली आहेत.
ती सवयीने अंगात मुरविलीत आणि आचरलीत तर आधी व्याधी डे रहीत जीवन यापन करणे सुलभ होऊ शकते, असे थोडा सुक्ष्म अभ्यास केला तर दिसून येते. स्वामींच्या जीवनोद्धारक तत्त्वचिंतनाचा अंतीम मोक्ष सिद्धीची तयारी करून घेणे हे असले तरी त्या चिंतन वृक्ष-लतांना वेगवेगळी जीवनोपयोगी फळे आलेली आहेत. त्यांचे आचरण करणाऱ्या साधकाचा जीवनप्रवास सुखदायी, आरोग्यदायी, निर्विघ्न आणि आधी व्याधी रहीत होऊ शकतो असे सखोल चिंतन केले तर दिसून येते.
स्वामींच्या उपदेशाचा मुळ हेतु निश्चितपणे 'मोक्षसिद्धी' हा आहे, परंतु त्यांच्या उपदेशाचे आनुषंगिक लाभ जीवन यात्रा सुकर, सुलभ आणि सुखदायी होण्यासाठी पदरात पाडून घेता येतात असे जाणवते. मोक्ष सुखानंदाने लाभान्वित होण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या साधकाला स्वामींच्या आचारपर उपदेशाने वागल्यास अकल्पीत, बहुविध लाभाची फळे आपोआपच पदरात पडतात. मोक्षाचे मुद्दल मिळवू पहाणाऱ्या आचारशील साधकाला आरोग्यदायी जीवनानंद आणि खऱ्या सुखदायी जीवनानुभूतीचे भरपूर व्याज आपोआपच पदरात पाडून घेता येते. त्यासाठी त्याला वेगळेकाही करण्याची गरजही नसते, असेही थोडे चिंतन केले तर सहज लक्षात येते. त्या दिशेने मी केलेले चिंतन आज आपणासमोर मांडणार आहे.
आहारशुद्धी
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात, “शरीरासी आहार देयावा इंद्रियांना नेदावा.” या एकाच मूल्यवान सूत्रामुळे आपल्या जीवनामध्ये मूलगामी परिवर्तन घडून येऊ शकते. आहार घेणे ही शरीराची गरज आहे. उपास-तापास करणे हे शरीर आणि इंद्रियांच्या स्वाभाविक व्यापाराचे दृष्टीने विपरित क्रियेसारखे आहे. म्हणून स्वामी स्वाभाविक शरीरधर्म सांभाळण्यासाठी नित्य आहार घेण्याचे समर्थन करतात. बोणेबाई गोकुळअष्टमीचा उपवास करते म्हणाली तेव्हा स्वामींनी त्या उपवासाला विरोध केला. तिला उपवास सोडायला सांगितला. आहार घेण्याचे समर्थन स्वामी करतात परंतु आहारात इंद्रियाचे आवडीचे चोचले पुरविण्याचे मात्र ते समर्थन करीत नाहीत.
जिभेला आवडते. म्हणून 'तिखट-मीठ' घालून चमचमीत पदार्थ करून खाण्याचे ते समर्थन करीत नाहीत. 'लवण विखो' म्हणतात. आजचे वैद्यकशास्त्र एका सूरात सांगते की मिठ खाणाऱ्याचे ब्लड प्रेशर वाढते. मीठ वर्ज्य करावे. केवळ भारतातच अतिशय 'खारे खाण्याचा' शौक आहे. युरोपभर कुणी फारसे मीठ खात नाही. युरोपाच्या सर्व बाजूनी मोठा समुद्रकिनारा असूनही तिथे मीठ खाण्याचा सोस नाही. 'नमकीन' खाणारे लोक आपल्याकडेच आहेत. स्वामींनी मीठ वर्ज्य करायला सांगितले त्याचा आरोग्यावर उत्तम परिणाम दिसणार आहे. जीवनात आरोग्यदायी स्वस्थता लाभण्यासाठी मीठ वर्ज्य करणे ही लाभदायी बाब आहे. उत्तम आरोग्य असेल तरच धर्मसाधना सुकर होऊ शकते.
'शरीर माध्यम खलु धर्मसाधनम्' असे सुभाषित आहे. शरीर थकलेले आहे, व्याधीने जर्जर झाले आहे, खोकला पडसे झालेला आहे, स्वास लागला आहे. थोडे चालू लागले किंवा वर चढले तर धाप लागते आहे. कुणीही एक चित्त होऊन नामस्मरण करू शकणार नाही. चित्त एकाग्र न करता केलेले नामस्मरण हे फलप्रद होत नाही. म्हणून चित्ताची एकाग्रता, शरीराची स्वस्थता धर्मसाधनेसाठी अरिहार्य गरज आहे. मिठाबरोबरच 'घृत' विखो सांगणाऱ्या स्वामींनी आजच्या वैद्यकशास्त्राच्या आधुनिकतम शोधाचे रहस्यच सांगितलेले दिसते. आज असे मानल्या जाते, नव्हे आज असे सिद्ध झालेले आहे की 'चर्बी' वाढविणारे तूप वा लोणी हे शरीरात अनावश्यक चर्बीचा संग्रह वाढविते.
त्याचबरोबर रक्तात दुषीत अशा 'क्लोरोस्टॉल' नावाच्या द्रव्यालाही वाढविते. क्लोरोस्टॉल हे रक्ताच्या धमण्यात जाऊन बसले की मग रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात आणि अडथडे वाढता वाढता अशी व्यवस्था येते की हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या सर्व धमन्या क्लोरोस्टॉलचा कचरा अडकून बंद होतात. त्यामुळे हृदयाला रक्त पुरवठाच होणे बंद होते. हृदयाची पाणी ओढणाऱ्या पंपासारखी रचना असते. पंपाला पाणी पुरवठा सुलभ नसेल तर किंवा पुरवठा करणारी नळी चोक झाली असेल तर पाणी वर फेकण्याचे कार्य पार पाडणे पंपाला शक्य होत नाही.
तसेच हृदयाचेही होते. रक्त पुरवठा करणाऱ्या धमण्या बंद झाल्या तर हृदयावर ताण पडतो व त्या तानाने रक्तदाब वाढल्याचे दिसून येते व हा दाब अवास्तव झाला तर हृदय क्रियाच बंद पडते. तसेच तेल आणि तूप हे स्निग्ध पदार्थ शरीरात क्लोरोस्टॉल तर वाढवितातच त्याचबरोबर सर्व विषयांच्या भोगास उत्तेजीत करणारे हे 'गाळोत्तर रस' आहेत. म्हणून स्वामी म्हणतात संयमाची कास धरून भोगाच्या मोहापासून होऊ प्र पाहणाऱ्या साधकांना ते सर्वथैव वर्ज्य आहेत. हे विदारक सत्य श्रीचक्रधरस्वामींनी सुचविले ते आजचे वैज्ञानिक संशोधक आता सिद्धांत म्हणून मांडू लागलेले आहेत.
हृदय रोग तज्ञ डॉ. अभय बंग या तरूण डॉक्टरांनी लिहिलेल्या 'माझ्या साक्षात्कारी हृदय रोग' या स्वानुभावावर आधारीत पुस्तकांत म्हटलेले आहे की, “तेल आणि तूप हे दोन्ही वर्ज्य केल्याशिवाय हृदय रोगावर उपायच करता येत नाही. शिवाय त्यांनी बिनातेलाच्या भाज्या पुस्तकांत छापलेल्या आहे. या पुस्तकांत त्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्वानुभव दिलेला आहे. तोही विचारात घेणे 'साधकांना' आपल्या साधनेच्या यशस्वीतेसाठी आवश्यक आहे. डॉ. बंग म्हणतात, "मी भोजनातून तेल वर्ज्य केले. तूप हद्दपार केले आणि खूप पालेभाज्यांचे सलाद आणि माफक कार्बोहायड्रेडस् घेऊ लागलो त्यामुळे माझे वजन कमी झाले. लठ्ठपणा जाऊन मी खप्पड दिसू लागलो. क्लोरोस्टॉल १५० च्या आंत आले. ब्लड प्रेशर नॉर्मल झाले. हृदयाचे ठोकेपण नार्मल झाले. या लाभाबरोबरच एक उपलब्धी अजून मला झाली ती ही की माझी कामवासना एकदम निमाली.
हा लाभ पदरात टाकणारा स्वामींचा मोलाचा संदेश आपण आचारात आणला पाहिजे. 'तूप तेलादिचा रस वर्ज्य करावा हा संदेश त्यांच्या 'इंद्रियार्थ रसु न सेवावा:' या महान सूत्रातून लाभतो. तो संदेशवजा आज्ञा आपण काटेकोर पाळली तर अनेक आरोग्यदायी लाभाबरोबरच आध्यात्मिक साधनेचा मार्ग अधिक प्रशस्त होतो, हे यावरून स्पष्ट होते. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी म्हणतात तसे आपण साधे बिनाफोडनीचे उकळलेले अन्न खावे. चटक मटक खाऊ नये. आपल्या भोज्य रसाची मर्यादा ठेवावी, त्यातच आपल्या साधनेचे यश आहे.
परंतु या चारानी जमत नसेल तर थोडे 'चवदार' पदार्थ द्यावेत, परंतु ते अपवादभूतच असावेत. कारण 'निरसे-विरसे' कोरडे अन्न खाल्यामुळे जीव 'त्रसो' लागला तर 'त्रसला सांता जीव विषया कारणे दूर जाईल' ही स्वाभाविक भिती दूर व्हावी म्हणून अन्न सेवनात थोडे शैथिल्य असावे असे स्वामी म्हणतात. वास्तविक 'मिठ मिरची साखर मसाले' हे पूर्णपणे वर्ज्य केले तरी माणूस चांगले आरोग्यदायी भोजन घेऊ शकतो. म्हणून सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी म्हणतात, रसरहीत ते निरसे अन्न सेवावे तसेच खूप मोठ्या आशांची स्वप्ने पाहू नयेत. तेही दुःखकारकच असतात सुखासीन आश्रयही नसावा ही त्रिसुत्री आचारावी.
भारतीय उपमहाद्विपापासून आपण जसे जसे पश्चिमेकडे जावे तस तसे हे चवदार मानले जाणारे पदार्थ वर्ज्य केल्या गेलेले आहेत. युरोपीनय लोकांची लालबुंद कांती, कामाची स्फुर्ती आणि शारीरिक शक्ती आपल्याकडच्या पेक्षा कमी नाही उलट जास्त आहे. म्हणून आपण 'विरसे निरसे' अन्न सेवन करण्याची सवय करायला हवी आहे. तसे केले तर आपण खूप मोठे आध्यात्मिक लाभ आणि आयुरारोग्याची प्राप्ती करू शकू. मित आहार भय, निद्रा, मैथून आणि आहार जेवढा वाढवाल तेवढा वाढून जातो असे एक सुभाषित आहे.
सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी स्वामी म्हणतात पोटाची मोट लवचिक आहे. म्हणून त्यात कमी अन्नपाणी भरावे अशी स्वामींची आज्ञा आहे. साधकाने हूळहळू अन्न कमी कमी करण्याचा अभ्यास करायला हवा. 'अर्धभूक्त सदा रोग मुक्त' 'एक भूक्त सदा रोग मुक्त' ही सुभाषिते प्रसिद्ध आहेत. स्वामी म्हणतात तुम्ही इतके जेवा की अजून भरपूर भूक शिल्लक आहे अशी जाणीव व्हावी. बोणेबाईला उपवास वर्ज्य करायला सांगणारे स्वामी म्हणतात की आपण भरपेट यथेच्छ, सादिष्ट, चमचमीत खाद्य पदार्थ खाण्याचे मागे लागलो तर पोटाचे व म्हणून सर्व शरीराचे विकार मागे लागतील. ‘भोगी रोग भयं’ किंवा भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता ।। या शुभाषिताप्रमाणे अहितकारी अन्न सेवनाचा ब्रह्मराक्षस तुमच्या शरीर आणि प्राणाचा ग्रास घेण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतो.
मनुष्य देहात 'पोट स्वच्छ' असेल तर शारीरिक रोग होत नाही. ८०% रोग हे पोटाच्या वितभर भागातील अस्वच्छतेमुळेंच होतात. म्हणून पोट जपलं पाहिजे. त्यातून आयुरारोग्याचा लाभ होतो आणि मग आध्यात्मिक साधकाला आपल्या साधनेचा मार्ग प्रशस्त झाल्याचे दर्शन होते. असे आपण पोट स्वच्छ ठेवण्याचे, त्याद्वारे पचन संस्था निरोगी राखण्याचे स्वामींनी सांगितलेले उपाय काटेकोरपणे पाळले नाही तर “तुम्हाला महारोग होणार नाहीत” या आश्वासनाच्या पूर्तीची अपेक्षा ठेवणे हे चूकीचे नाही कां होणार? म्हणून आपण मिताहारी, हिताकारी आणि रिताहारी झाले पाहिजे.
- हेही वाचा 👉निरामय आरोग्याची ८ सुत्रे
निसर्गोपचार
निसर्गोपचाराचे शास्त्र भारतात फार प्राचीनकाळापासून विकसित झालेले आहे. त्यात एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. तो निट लक्षांत घ्यायला हवा आहे. डॉ. ट्रॉल या पाश्चात्य डॉक्टरांनी आपल्या प्रसिध्द भाषणामध्ये सांगितले होते, की शरीरात नाना प्रकारचे रोग उद्भवतात. अनेक रोगांची लक्षणे दिसून येतात, कॉलऱ्यात हगवण लागणे, खाज आणि गजकर्णात चामडीवर विद्रुप फोड येणे. थंडीतापात ज्वर येणे, कॅन्सरच्या गाठी येणे, वा अनेक रोगात अनेक लक्षणे दिसणे भिन्नभिन्न असले तरी त्या सर्व रोगांचे कारण मात्र एकच आहे. शरीरात विजातीय विषाक्त पदार्थ साचून राहणे, आणि ते बाहेर पडण्याची प्रक्रिया होण्यात अडथळा येणे त्यामुळे तो मळ शरीरात कायम रहाणे, हे एकमेव कारण सर्व प्रकारच्या शारिरीक रोगाच्या निर्मितीमागे असते.
'रोग अनेक परंतु त्याचे कारण मात्र एकच' हा महत्त्वपूर्ण सिद्धांत निसर्गोपचाराने मांडला आहे. असा मळ, अशी घाण, असे अतिरिक्त विषाक्त विजातीय पदार्थ शरीरातून बाहेर फेकण्याचे काम आपली त्वचा, मुत्रद्वार, नाक, गुद्द्वार या प्रमुख इंद्रियाद्वारा होत असते. ते काम करण्याची त्या त्या अवयवांची क्षमता कमी पडली तर ती घाण शरीरात साचून राहते. अशी साचलेली घाण जंतुना नियंत्रण देते. त्या जंतुच्या शरीरातील उपस्थितीमुळे, वेगवेगळ्या जंतुमुळें, वेगवेगळी रोग लक्षणे दिसू लागतात. शरीरात घाण नसेल तर ते जंतु मूळ स्वाभाविक शरीराला काहीही इजा पोहचवू शकत नाही.
डॉ. ट्रॉल यांनी आपल्या भाषणाचे शेवटी अनेक प्रकारच्या रोग जंतुंनी भरलेला पेला सर्व श्रोत्यांसमोर पिवून टाकला. त्यांना त्यापासून कसलीही इजा झाली नाही. त्याचे शरीरावर कोणतेही रोग लक्षणे दिसली नाहीत. हे वास्तव लक्षात घेतले तर आपल्या या 'घाण स्वच्छ करणाऱ्या यंत्रणेची कार्यक्षमता वाढविणे, त्यावर ताण येऊ नये म्हणून घाण होणार नाही असे वागणे आवश्यक आहे. तसी घाण दिसून आली तर ती स्वच्छ करून घेण्याचे उपचार म्हणून करायला काय हरकत आहे? रोज सकाळी आपण दंत धावनाने मुखमार्जन करतो. शरीरावर साठलेली घाण वा मळ साबण लावून चोळून साफ करतो. सौज्याविधीनंतर शरीर स्वच्छ करून घेतो तसेच, आणि त्याच कारणासाठी आपण शरीरातील इतर घाणही स्वच्छ करून घेणे ही एक स्वाभाविक गरज आहे. त्यातल्या काही क्रिया मी येथे सांगतो.
शरीराचा महत्त्वपूर्ण मानेच्या वरचा डोक्याचा भाग आहे. त्यात नित्य साठणारी घाण नाकाद्वारे स्लेष्माचे स्वरूपात बाहेर पडत असते. ती साफ करून घेतली तर डोके हलके होते आणि चेहऱ्यावरची त्वचा नितळ, ताण रहीत होते. ती साचून राहिली तर मात्र सर्दी पडसे, डोकेदुखी होऊन अस्वस्थता येते. म्हणून नाक स्वच्छ करून घेण्याची क्रिया तिला योगात 'नेती' म्हणतात.
तोंडापासून जठरापर्यंतचा भाग अन्न पचविण्यासाठी पोटाकडे अन्न वाहून नेणारा महत्त्वाचा भाग आहे. तो स्वच्छ असेल तितके हे कार्य पचनाचे दृष्टीने उत्तम असते. म्हणून ती अन्ननलिका स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. ती स्वच्छ करून घेण्यासाठी "धौती" क्रिया करून घेण्याची सोपी पद्धती आहे. पुढे गुद्द्वाराकडे घाण वाहून नेणारी वा ती साठवून ठेवणारी ५ फूट लांबीची मोठ्या आतडीची मोठी नळी असते.
ती नळी फार अस्वच्छ असते नेहमीच आपण ती जर स्वच्छ केले नाही तर तेथील घाणेवर जगणाऱ्या अनेक जंतुचे तेथे आगमन होते. त्यांचे येण्यामुळे अनेक रोगाची लक्षणे जाणवू लागतात. म्हणून या भागाची स्वच्छता करावी लागते. ती केली तर आरोग्यदायी पोटात रोग राहत नाही व स्वस्थ जीवन जगता येते. त्यासाठी गुद स्वच्छ करणाऱ्या 'बस्ती' किंवा एनीमा करून घेणे आवश्यक असते या तीन क्रिया शरीर स्वच्छतेसाठी आवश्यक असल्यामुळे सर्वांनीच कराव्यात म्हणजे आरोग्य चांगले राहून मनःस्वास्थ्य लाभेल. त्यामुळे साधकाला प्रसन्न चित्ताने आपली साधना करता येईल. प्रसन्नतेने सर्वप्रकारच्या कार्याची सिद्धी होते.
प्रसन्नतेने चित्ताची स्थिरता शिघ्रपणे होते अशी गीता सांगते. मनोकायिक आरोग्य आजवर बऱ्याच लोकांनी अशी समजूत होती की शरीरालाच व्याधी होतात. शारीरिक व्याधींमुळेच माणूस दुःखी, कष्टी आणि जर्जर होतो. यातला 'च' आता नवनव्या शोधामुळे निघून गेलेला आहे. शारीरिक विकृतींमुळे हा देह दुःखी, कष्टी आणि जर्जर होतो, हे जितके खरे आहे तितके हेही खरे आहे की माणसाचे मन त्याला खुपच दु:खात, तिव्र कष्टात आणि व्याधीग्रस्त आणि जर्जर करते. स्वस्थ जीवन जगणाऱ्या माणसाला आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूची बातमी कळली तर, आपल्या आर्थिक नुकसानीची वार्ता कानावर पडली तर किंवा कुणी त्याचा अपमान केला तर तो माणूस पार खचून जातो.
इतकेच नव्हे तर आपल्या प्रतिस्पर्धी माणसाचा उत्कृर्ष झाल्याची बातमी कळली तरी तो दुःखी कष्टी होतो. मनाला असे अस्वस्थ करणारे प्रसंग, ध्येयपूर्ती न होणे, आपल्या चांगल्या कामाला समाजाकडून मान्यता मिळण्याऐवजी त्या कामाची चेष्टा होणे, अकस्मात आर्थिक नुकसान होणे, लैंगिक भावनांचे योग्य समायोजन न होणे, या गोष्टींमुळे माणूस खचून जातो. त्यावेळी माणूस 'राग, द्वेष आणि मत्सराच्या तिव्रतर आवेगात येऊन तो स्वाभाविक वर्तनाऐवजी बराचसा विकृत वर्तन करू लागतो. या वर्तनामुळेंही त्याचा मानसिक तोल खचून, राग, द्वेष, काम, क्रोध आणि लोभ या मनोविकृती वाढविणाऱ्या भावनांच्या आहारी जातो व त्यामुळे त्याच्या समस्या तर सूटत नाहीच उलट त्या समस्या वाढत जाऊन त्याचे व्यक्तिमत्त्वात विविध दोष निर्माण होतात.
राग, द्वेष, मत्सर, संशय, संभ्रम, भिती इत्यादि भाव भावनांनी मन सतत पोखरून निघू लागते. त्यातून खूप मोठे ताणतणाव निर्माण होतात व त्या ताणतणावांचा आपल्या आरोग्य आणि वर्तनावर फार विकृत परिणाम होतो. हे ताण सहन करण्याची ज्यांची मानसिक शक्ती नाही. यातून निर्माण होणारे चिंताचे जाळ्यात तो अधिकाधिक आवळल्या जातो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही आजारी होतात. मग त्याचे मनाचे संतुलन लहान लहान गोष्टींच्या प्रतिकुल आघातानीही ताबडतोब बिघडते.
यातून मनोविकृतीचा दोष शरीर आणि मनावर खूप मोठा विपरित परिणाम घडवून आणते. म्हणून मनाला या ताण-तणावांचे आघात सहन करण्याची आणि हे ताणतणाव निर्माणच होणार नाहीत असे वागण्याची सवय करणे असा दुहेरी उपाय करावा लागतो. तसे झाले तरच माणूस आध्यात्मिक उन्नयनाच्या मार्गावर निर्वेधपणे पुढे वाटचाल करू शकतो. यासाठी श्रीचक्रधर स्वामींनी मूलभूत आचार संहिता आपल्या बहुमोल अशा एका सूत्रात सांगितली आहे.
ते मोलाचे मनोकायिक आरोग्य राखून धर्मसाधनेत आपल्याला निर्वेधपणे पुढे नेणारे मार्गदर्शक तत्त्व आपण सर्व जगाला सांगावे असे आहे ते सूत्र आहे. विकार विकल्प शून्य होण्यासाठी ते म्हणतात, तसे "काम क्रोध लोभ ही तिन्ही नरकद्वारे आहेत. त्या दारातून जाऊन निःश्रेयस जे मोक्ष वा अढळ शांतीचे, निरामय आनंदाचे अंतीम साध्य, त्याकडे जाण्याचा मार्गापासून साधक विचलीत होतो. त्याची मोक्षाच्या दिशेने होणारी वाटचाल वाममार्गी होऊन जाते. म्हणून स्वामी म्हणतात, 'काम, क्रोध आणि लोभ' हे तिन्ही सोडणे ही साधकासाठी पहिली आणि अपरिहार्यपणे आचरावयाची 'अट' आहे. ही अट पाळल्या गेली नाही तर साधक आपल्या आध्यात्मिक साधन मार्गापासून च्यूत होतो. ही त्याची आध्यात्मिक हानी आहे.
त्याचबरोबर माझे आजच्या भाषणाचे विषयाचे अनुषंगाने विचार केला तरी त्या तिन्ही मानसिक विकृतीकडे नेणाऱ्या दोषामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अपरिमित हानी होते, असे आजचे वैज्ञानिक शोध एकमताने आणि कंठरवाने सांगतात. कामभावना ही तशी मानव वंशाचे सातत्यासाठी उपायकारक आहे, हे खरे आहे परंतु त्यामुळे शरीराची अपरिमित हानी होते. विर्य संग्रहामुळे चमत्कारिक शारीरिक मानसिक शक्तीचा स्त्रोत आपल्या हाती येतो.
शरीर आणि मन दोन्हीकरिता लाभदायी अशा 'यौवनावस्थेचा अखंड लाभ राहावा म्हणून विर्य संग्रह ही शारीरिक स्वास्थासाठी उपयुक्त अशी 'गरज' आहे. एक अद्भुत विचारवंत म्हणून मी रजनीशांचे चिंतनाकडे पाहतो. त्यांनी एका भाषणात असे म्हटले आहे की, "जीवनको उसके सभी स्तरो पर दो भांती देखा जा सकता है। वे दो पहलू है जीवनको एक उसका पौदगलिक, मटेरियल, पदार्थगत पहलू है, दुसरा उसका आत्मगत, स्पिरिच्यूअल पहलू है। यौनकोभी दो दिशाओ से देखना आवश्यक है। एक तो यौनका जैविक, बायोलॉजिकल पहलू, पौदगलिक, पदार्थगत, शरीरसे जुडा हुवा, शरीर अणुओंसे जुडा हुआ। दुसरा है शक्तिगत, आत्मिक पहलू है, मनसे चेतनासे जुडा हुवा।”
यातल्या दोन्ही पहलूचा विचार करता असे दिसून येते 'जैविक उर्जा जी मनुष्याचे जीवकोषाशी संबंधीत आहे. ते शरीराचे अभिन्न घटक आहेत. हा बायोलॉजिकल भाग आम्हास प्रत्यक्षांत दिसतो. ज्याला आम्ही वीर्य म्हणतो, यौन उर्जेचा स्त्रोत, म्हणा की यौन उर्जेचा प्रवाह म्हणा. प्रत्यक्षांत आहे. ते वास्तव आहे. परंतु याशिवाय आणखी एक महत्त्वपूर्ण पहलू आहे. तो 'आत्मगत' आहे, शक्तीगत आहे. तो मानसिक आहे. यालाच आपण मानसिक यौन उर्जा असेही म्हणू शकतो. ती 'उर्जा' प्रत्यक्ष अनुभवात येणारी आहे. तिलाही आपण वास्तव मानणे भाग आहे.
जसे एक लोखंडाचा तुकडा घ्या. तो स्वाभाविक स्थितीत असेल तर त्यात फारशी शक्ति दिसत नाही परंतु त्यात 'चुंबकीय' शक्तिचा संचार केल्या गेला तर ती चुंबकीय शक्ती डोळ्यांना दिसत नसली तरी ती अनुभवता येते. ती अनुमानाने अनुभवता येते. त्या 'चुंबकीय शक्तीने' चार्ज झालेल्या लोहखंडाचे संपर्कात येणारा साध्या लोखंडाचा तुकडा त्याकडे आकर्षिल्या जातो, हे आपण अनुभवतो. लोखंड हे भौतिक तर ती आकर्षण शक्ती ही अदृश्य असलीतरी ती वास्तव आहे. काही वेळाने त्या चुंबकीय लोखंड तुकड्यातील चुंबकत्व नाहीसे केल्या गेले तर ते कोण्याही वस्तूला आकर्षिक करू शकणार नाही.
त्या तुकड्याची रचना, त्यातले भौतिक घनत्व यत्किंचितही न बदलविता केवळ ती शक्ति आपण नाहीशी करू शकतो. त्यामुळे स्वामी म्हणतात तशी, 'मेदशक्ती आणि तेज शक्ती' ही सर्व शरीरभर व्यापून आहे. त्यातील तेजशक्ती अधिक प्रभावी आहे. ती 'दर्शनमात्रे' माजवू शकते. अशी शक्तिशाली आहे. रक्तामासाचा गोळा मृत झाल्यावर त्यात ती तेजशक्ती रहात नाही. 'कामोत्तेजना' ही शरीरातल्या 'तेजशक्ती'मुळे निर्माण होते. मेदशक्तीपेक्षा ही प्रभावी असते. म्हणूनच स्वामी म्हणतात, ‘यंत्रारूढा व्हावे हा उसिटा विखो' प्रथमावृत्तीचा विखो ‘मनात' पैदा होतो. तो मनाला मोहीत करतो. तसे मोहीत झालेले मन काम भावाने उत्तेजित झालेले मन-बुद्धीच्या सर्वथैव नाशास कारण ठरते. असे भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात,
“ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषुपजायतेः ।
सङ्गात्सञ्जायते कामः कामाक्रोधोऽभिजायतेः ।।
क्रोधातभवति संम्मोहः सम्मोहातस्मृति विभ्रमः ।
स्मृति भ्रंशात् बुद्धि नाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ।।
म्हणून श्रीकृष्णचक्रवर्ती म्हणतात विषयाची मनाला आवडी निर्माण झाली तर तो माणूस रागाच्या आहारी जातो आणि त्या रागाच्या यानातून त्याचा वेगवान प्रवास 'जीवन नष्ट' करणाऱ्या अपघाताकडे सुरू होतो. असा साधकच काय साधा माणूसही आपले जीवन, आपले आरोग्य आणि आपले सर्वस्व गमावून बसतो म्हणून शरीरापेक्षां मनाचे रोग अधिक धोकादायक, भयावह आणि विचित्र वेगाने वाढणारे असतात.
केवळ 'काम भावनेमुळेंच जीवन नष्ट करणारा प्रवास सुरू होतो असे नाही तर मनाचे सर्वच विकार हे माणसाचे साधारण जीवन अस्वस्थ करीत असतात. कोणत्याही विकारवश करणाऱ्या विषयाची गोडी ही मोहात पाडणारी व त्यातून क्रोधाला जन्म देणारी ठरते व मग बुद्धीभ्रंश होतो व तो बुद्धीभ्रंश माणसाचे जीवन नष्ट करणारा ठरतो त्यामुळे श्रीचक्रधरस्वामींची 'विकार विकल्प शून्य होवावे' ही आज्ञा आधात्मिक साधनेसाठी जितकी आवश्यक आहे तितकीच सामान्य माणसाच्या आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक अट आहे. सुखदायी संसार करण्याची इच्छा ठेवणाऱ्या प्रत्येक माणसाला 'मन' काबूत ठेऊन संयमाने वागण्याची शिस्त लागली तर त्याचे मनःस्वास्थ चांगले राहते व त्यातून शारीरिक स्वास्थ लाभ होऊन त्यातून यशस्वी जीवन यापन होण्याचा मार्ग प्रशस्त होत जातो.
आपले जीवनात विकार जेवढे मनाला बिमार करतात तेवढेच 'विकल्प' सुद्धा मनाचे आरोग्य बिघडविण्यास कारण करतात. मी श्रेष्ठ आहे. तो शूद्र आहे. ही मनाची भावना असेल तर त्यामुळे असा माणूस समाजातल्या 'बहुजनांच्या' पासून दूर दूर जातो. त्याचे मनात अहंकाराची रोपटी वाढीस लागतात. त्या रोपट्यांचे 'बेशरम' सारखे अवास्तव, अस्ताव्यस्त आणि उपद्रवी बन वाढावे तसे ते वाढू लागते म्हणून ती 'अहंतेची' रोपटी समूळ उपटून टाकावीत अशी स्वामींची आज्ञा आहे. ही रोपटी समूळ उपडली नाही तर पुन्हा पुन्हा अंकूरतात आणि पुनश्च अहंतेची बने तयार आहेत म्हणून ही अहंकार पोषणासाठी पोषक अशी रोपटी समूळ नाहिशी करून तेथे शांतीची रोपे लावावीत अशी श्रीचक्रधर स्वामींची आज्ञा आहे.
ती आध्यात्मिक जीवन जगण्याची, त्यातून आत्मिक उन्नयनाची प्रक्रिया गतीमान करण्याचे व्रत घेतलेल्या साधु-संत जनासाठी जशी आवश्यक बाब आहे, तशीच आणि तितकीच ती सामान्य जनांच्या सुखकर, आनंदी आणि यशस्वी जीवनाची गरज आहे. यातूनच 'मनो विकृतीच्या' धोक्यापासून आपला बचाव होऊन आपण जीवनभर निरामय आरोग्यदायी जीवनयापन करू शकू. यातून जो आध्यात्मिक लाभ आपल्याला होईल तो आपण व्याजात मिळालेला लाभ समजून त्याकडे पहावे तशीच आरोग्यदायी जीवनाची ती अपरिहार्यता समजून आपण स्वामींच्या या 'महानसूत्राचे' पालन केले पाहिजे.
स्वामींच्या या महान 'आचार संहितेच्या' महान सूत्र वचनात पुढे एक अतिशय महत्त्वाचा शब्द आलेला आहे. ते म्हणतात, "मनुष्यमात्र होऊनी असावे:” या सूत्राचा कुणी कोणताही अर्थ करोत परंतु माझे विषयप्रतिपादनाचे दृष्टीने एक अतिशय चांगला अर्थ मला, माझे मनाला भावला आहे, तो आपले समोर मांडतो.
स्वामी म्हणतात, "आपण 'मनुष्यमात्र' होऊनी असावे” किंवा ‘स्वभावमात्रे' असावे असाही एक पाठ आलेला आहे. मनुष्यमात्रासारखे रहावे किंवा मनुष्याची स्वाभाविक अवस्था जशी आहे तिच्यानुसार वागावे असा अर्थ मी बऱ्याच विचारांती घ्यायला लागलो आहे. त्याचा आपण थोडा विचार करू.
मनुष्य स्वतःला अस्वाभाविकपणे ब्राम्हण वा क्षत्रीय समजून स्वतः उच्चतेचा अहंकार बाळगतो, किंवा स्वतःला शुद्र समजून न्यूनगंडाची भावना मनात पोसतो किंवा उच्च कनिष्ठतेच्या आजच्या नवनव्या कल्पनांनी आपण आपल्या स्वाभाविक अवस्थेला सोडतो. आपल्या स्वाभाविक मनोधर्माला सोडून देतो. मन आणि कायेवर अस्वाभाविक गोष्टींची आच्छादने आपण अस्वाभाविकपणे वा कृत्रीमपणे घेऊन मिरवितो. जसे 'तू' कोण आहेस? या प्रश्नाचे उत्तरात आपण अनेकाकडून अनेक उत्तरे ऐकतो. कुणी धंद्यावरून आपली ओळख देतो. कुणी जातीवरून आपली ओळख देईल, कुणी म्हणेल मी पुरूष आहे मी स्त्री आहे.
कुणी म्हणेल मी भारतीय आहे, मी पाकिस्थानी आहे. मी चिनी आहे. ही भेदांना जन्म देणारी ओळख ही आपली खरी ओळख आहे का? मी कोण? याचे उत्तर मला द्यायला सांगितले तर मी म्हणेल, "मी 'पुरुषोत्तम' आहे. मी विनायक आहे.” ही तरी माझी खरी ओळख आहे का? जन्म झाले तेव्हा ही नावे होती का? नाव ठेवण्यापूर्वी किंवा ती आपण समजून स्वीकारण्यापूर्वी स्वाभाविकपणे आपण जे होतो तिच आपली खरी ओळख आहे. त्या ओळखीत आपण उत्तरकाळात स्वीकारलेल्या वेगवेगळ्या भेदाभेदांना जन्म देणाऱ्या नावांचे दुरावे जोडलेले असतात.
त्यामुळे आपण आपल्या स्वाभाविक मळू अवस्थेचे भान ठेऊन जगणे सुरू केले तर माणसातला 'मी' पणा मरून जाण्यास मदत होते. असा मीपणा गेला की 'माझे माझे' म्हणण्याचे वैफल्य ध्यानी येते ते लक्षांत आले तर 'स्वार्थ' आणि 'अहंतेचे' मूल उच्चाटन करण्यासाठी आवश्यक ते मानसिकतेचे बळ आपल्याला मिळते आणि त्यातून खरे वैराग्य, आत्यंतिक त्यागाची भावना आपल्या मनात खोलवर रूजते. ती तशी रूजावी म्हणून श्रीचक्रधर स्वामींनी 'स्वभाव मात्रे' जगण्याचा महान उपदेश आपल्या मौलिक सूत्रातून दिलेला आहे.
परवा डॉ. अभय बंग यांचे 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' हे चमत्कारिक अनुभवाचे कथन करणारे भाषण ऐकले. त्या प्रसंगी त्यांनी एक मौलिक स वाक्य उच्चारले की 'आपण मी आणि माझे' या भावनेचा त्याग करून 'विश्व कुटुंबकम्' ची भावना हृदयात वाढीस लावू शकलो तर मानसिक विचाराने येणाऱ्या ‘हृदय रोगाचा’ निरास सहज करता येईल.' या अर्थाने त्यांचे कथन एक मोलाचा संदेश देऊन जाते की 'हृदयाची शारीरिक आणि मानसिक अवस्था निरोगी ठेवायची असेल तर 'मी, तू आणि माझे तुझे' ला जन्म देणाऱ्या सर्वभाव भावनांचा मनातून त्याग केला पाहिजे. तो करण्यासाठीच स्वामींच्या या आचार संहितेतील शब्द अन् शब्द मौलिक संदेश देणारा आहे, असे मला मनोमन वाटते.
त्यामुळे आध्यात्मिक उन्नती बरोबरच शारीरिक आणि मानसिक उन्नत अवस्थेप्रद जाण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. त्यासाठी सर्वज्ञाच्या शब्दा शब्दांचे मोल आहे. त्यांच्या उपदेशातील शब्दांचे आशय विविधांगानी आपण समजून घेत गेलो तर आपले मन स्तंभीत होत जाते आणि वाटते की माझे स्वामी खऱ्या अर्थाने 'सर्वज्ञ' होते. त्या करचरणवत ब्रह्म स्वरूपास समजून घेण्याचा माझा हा प्रयत्न आहे.
सर्वज्ञांनी काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि दंभ या भाव भावनांचा त्याग करायला सांगितला आहे, तोहि यशस्वी सन्यस्तांच्या साधनेसाठी जसा उपयुक्त आहे तसाच आरोग्यदायी सुखकर जीवन जगणाऱ्या गृहस्थासाठीही आवश्यक आहे. राग द्वेषामुळे उद्भवणारे संघर्ष आणि मत्सर लोभ आणि दंभामुळे निर्माण होणारे व्यक्तिगत आणि सामाजिक वितुष्टामुळे मनुष्याचे जीवन दुःखी कष्टी आणि निराशापूर्ण होते, ते होऊ नये असे वाटत असेल, तर, मन निरोगी ठेवण्यासाठी या प्रकारच्या भाव भावनांचा सर्वथैव त्याग करण्याची गरज आहे. मन निरोगी राहून जीवन सुखदायी होते.
मानसाचे मन निरोगी नसेल तर माणूस स्वास्थ्य हरवून बसतो. मन खचले तर शारीरिक स्वास्थ्य नष्ट होते असा अनुभव आहे. या संदर्भात मनोविज्ञान शास्त्रज्ञांनी एक चमत्कारिक प्रयोग केलेला आहे. एका माणसाला सांगितले की आम्ही तुझे पायातून रक्त काढून घेणार आहोत. तुझे संपूर्ण रक्त निघून गेले तर तू मरूही शकतोस परंतु आमचा प्रयोग यशस्वी झाला तर तुला स्वास्थ्य लाभ होईल. त्या माणसाला पलंगावर झोपविण्यात आले. त्याचे पायाला एक. बांधण्यात आली. दोरीला एक दगड बांधला. त्याचे पायाखाली एक टिनाचे भांडे ठेवण्यात आले. त्याचे पायात टाचणी टोचली. त्याचवेळी त्या टीनाचे भांड्यात थेंबथेंब असे काही पडू लागले. व त्याचा 'टप टप' असा आवाज रूग्णाचे कानी जाईल अशी व्यवस्था केली. रूग्णाचे डोळ्यावर फडके बांधले होते. त्याला सांगितले की तुझे पायातून आता रक्त जात आहे. तो पहा आवाज होतो आहे. रूग्णाचे मनात धास्ती भरली की आता आपले रक्त निघून जात आहे. सर्व रक्त निघऊन गेल्यावर आपला मृत्यू होईल. जसजसा 'टप टप' असा थेंब पडण्याचा आवाज येत होता तसतसा तो माणूस खचत होता. एकही थेंब न गळता तो रुग्ण मृत्यूकडे वाटचाल करीत गेला व काही वेळातच त्याने शेवटचा श्वास टाकला. त्याचा मृत्यू हा त्याचे मनाचे अवस्थेमुळे झालेला होता. असा हा मनाच्या अवस्थेचा, परिणाम शरीरावर होतो हे आता मनोविज्ञान शास्त्राने सिद्ध केलेले आहे. त्यामुळे मनाला अस्वस्थ करणारी प्रत्येक गोष्ट माणसाचे प्रकृतीवर विपरित परिणाम करीत जाते. म्हणून 'स्वस्थे चित्ते बुद्धय संभवन्ति' या स्वामींचे वचनाप्रमाणे मनःस्वास्थ्य बिघडविणाऱ्या सर्व विकल्प आणि विकारांचा त्याग करणे हे जसे आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे तितकेच शरीर स्वास्थ्यासाठीही आवश्यक आहे हे स्पष्ट आहे.
मन चिरतरुण असते. मन हे स्वाभाविकपणे कधीही जीर्ण वा जुने होत नाही. तुमचे शारीरिक वय वाढण्याशी मनाच्या जीर्ण होण्याचा काहीही संबंध नसतो. ते सदैव तरूण ठेवण्याचा प्रयत्न ह्या मनोविकारावर नियंत्रण ठेवण्याने सफल होऊ शकतो. तसा प्रयत्न करण्यासाठी मनाला विकरीत करणाऱ्या विकार व विकल्पावर ताबा मिळविणे आवश्यक आहे. हा सर्वज्ञांचा संदेश आहे. त्यातून आयुरारोग्याचा लाभ होतो.
वैद्यकशास्त्राचा एक मौल्यवान संदेश लक्षांत घेण्यासारखा आहे. तो असा
समदोषः समाग्नीश्च समधातु मलक्रिया ।
प्रसन्न आत्मा इंद्रिय, मनःस्वस्थ इत्यभिदियते ।।
शरीर स्वास्थासाठी वात पित्त कफ ह्या तीन दोषांची साम्यता वा संतुलन राखल्या गेले पाहिजे, पंचाग्नी, सप्तधातु आणि सप्त मार्गाने मलनि:सारण झाले पाहिजे या क्रिया आपल्या आहार नियंत्रणावर आणि सम्यक विहार-वर्तनावर अवलंबून आहेत. त्या स्वास्थ्यासाठी जशा आणि जितक्या आवश्यक आहेत तशाच नव्हे त्यातून अधिकच आवश्यक आहे. मन, इंद्रिय आणि आत्म्याची प्रसन्नता राखण्यासाठीही स्वामी म्हणतात, भक्त योगी, विषया यांना धातु साम्य असते.
'प्रसन्नतेने सर्व दुःखे जाती झडोनिया' हा गीतेचा अमौलिक मंत्र आहे. तो आपण ध्यानी घेतला पाहिजे. तसा तो ध्यानी घेतला तर मनुष्य प्रसन्नचित्त होऊन आधी व्याधी रहीत दिर्घायुरारोग्य सहज मिळवू शकतो. तुकोबाराय म्हणतात, 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।' असे दीर्घजीवित्व हे बरेच वाढविता येणे ही आपल्या स्वामींनी सांगितलेल्या आचार संहितेच्या नैष्ठिक आचारणावर अवलंबून राहणार आहे. स्वामींनी वयस्तंभन स्वीकारलेले होते. ते करणेही नैष्ठिक आचारशील आचारणावर अवलंबून आहे. माणसाचे मन हे स्वभावतः कधीच म्हातारे वा जुने-जीर्ण होत नाही. ते माणसाच्या मानसिकतेवरच अवलंबून असते. तसेच आचारशील महात्म्यांना वयस्तंभनही सहज साध्य होऊ शकते.
कारण शरीरही जुणे वा जीर्ण होत नाही. ते माणसाच्या मानसिकतेवरच अवलंबून असते. तसेच आचारशील महात्म्यांना वयस्तंभनही सहज साध्य होऊ शकते. कारण शरीरही जुणे वा जीर्ण होण्याची प्रक्रिया थांबविणे शक्य आहे. असे आजचे वैज्ञानिक प्रयोग सांगू लागलेले आहेत. शरीरात ८०% पानी असते. ते रोज बदलण्याची प्रक्रिया सुरू असते त्यामुळे शरीचाचा ८०% भाग हा नित नुतन ठेवण्याचे कार्य सुरूच असते. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. उर्वरीत १९% भागात मास, रक्त, अस्थी, पेशी आणि वीर्य या गोष्टी सुद्धा सतत बदलत असतात.
४५ दिवसात शरीरातील रक्ताचा थेंब अन थेंब बदलण्यात येतो. तसेच शरीरातल्या जीवंतपेशी या रोजच जुन्या मरतात आणि नव्या जन्मतात. त्याचप्रकारे मास आणि अस्थीही बदलत जातात. तीसवर्षानंतर केवळ दरवर्षी एक टक्का भाग जीर्ण होऊ लागतो असे शरीर विज्ञानशास्त्र सांगते. तेवढा पूर्वस्थितीत राखण्याचे कार्य आपण साधु शकलो तर वयस्तंभन सहज साध्य आहे. कारण श्रीचक्रधर स्वामी म्हणतात, माणसाचे शरीरात विश्वातील सर्व पिंडस्था वास करतात. या वैश्विक पिंडस्था ब्रह्मांडाचा भाग आहेत. ब्रह्मांडातील देवता या जशा अमर अक्षय अविनाशी आणि नित्य आहेत तशाच आपल्या शरीरातील या पिंडस्थाही अविनाशी असल्याच पाहिजेत. त्यांचा नाश होत नाही. त्यांचे स्वरूप कायम ठेवण्यासाठी आपण 'स्वभावमात्रे' जगण्याचा मार्ग धरला पाहिजे. म्हणून स्वामींनी अस्तीपरीत 'स्वभावमात्रे' असा सार्थ शब्द प्रयोग केलेल्या आहेत. ही गोष्ट लक्षणीय आहे.
आता अमेरिकेसारख्या प्रगत पाश्चिमात्य देशांत गीताप्रणीत जीवनदृष्टीचे भरपूर आकर्षण निर्माण झालेले आहे. गीतेतील जीवन तत्त्वज्ञान इहवादी अमेरिकन लोकांना आवडू लागलेले आहेत. याचे कारण विचारांत घेण्यासारखे आहे. आजच्या वेगवान व ताणयुक्त जीवनात झालेल्या मन:स्वास्थाचा मार्ग गीता दाखविते असा त्यांचा आहे. गीता आता व्यावसायिक यश मिळविण्याचा मंत्र सांगते अशी त्यांची दृढ समजूत झालेली आहे. भावनिक प्रज्ञा विकसनाचा उत्तम मार्ग गीता दाखविते म्हणून त्यांना गीतेचे महात्म्य वाटू लागलेले आहे. व्यक्तीचे आणि तिचे भोवतीच्या जगाचे नाते कसे असावे हे गीतेने ५००० वर्षापूर्वी सांगून ठेवले.
गीतेतून ही जी जगाशी नाते जोडण्याची दिव्य तितकीच व्यावहारिक दृष्टी अर्जुनाप्रमाणे आजच्या संभ्रमावस्थेत, मोहावस्थेत जगणाऱ्या माणसांनाही लाभू शकते. तीच दृष्टी श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या सूत्रातून स्पष्टपणे सांगितलेली आहे. जग एकदीर्घ स्वप्नातल्या अनुभवासारखे आहे. त्याला सत्य मानून दुःखी कष्टी होऊ नये तसेच ते भ्रामक मानून त्याकडे डोळे झाकही करू नये. असा स्वामींचा हितोपदेश स्पष्टपणे या जगाचा आणि आपला संबंध कसा असावा याचे मार्गदर्शन करते.
त्याप्रमाणे आपण आपली जीवनदृष्टी ठेवली तर या जगातील कटु गोड अनुभव सारख्याच समतोल वृत्तीने स्वीकारणे आपल्याला शक्य होईल आणि मग 'दुःखाने आपण दुःखी होणार नाही आणि सुखाच्या अनुभवाने हुरळून जाणार नाही. असा मन आणि बुद्धीचा समतोल साधण्याची सवय झाली तर तो साधक 'स्थितप्रज्ञ' या संज्ञेस पात्र ठरेल व त्यातून त्याचे इहपरलोकीचे कल्याण होऊ शकेल. ही महान आध्यात्मिक दृष्टी जशी अंतीम कल्याणासाठी आवश्यक आहे.
तशीच ती इहलोकीचा जीवन प्रवास सुखकर करणारी संजिवनी ठरणारी आहे. असे हे चिंतनगर्भ स्वामींचे ज्ञान स्थल, काल निरपेक्ष असून त्यातून अक्षय वैश्विक कल्याणाचा महामार्ग प्रशस्त होत जाणारा आहे. या महान सत्याचे दर्शन होते. तेव्हा स्वामींचे चरणी अनन्य भावाने नतमस्तक व्हावे आणि तशाच अवस्थेत सतत राहावे असे वाटते. त्यासाठी देवा तू आमचे 'वयस्तंभन' करण्याची तू युक्ती आम्हास दे अशी मनोभावे प्रार्थना करून माझे विचार येथे थांबवितो.
प्रा. श्री. पुरुषोत्तमराव नागपूरे