क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां - संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit Subhashit knowledge

क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां - संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit Subhashit knowledge

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit Subhashit knowledgepandit 

क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां

स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात्प्राप्तेन सन्तुष्यताम् ।

शीतोष्णादि विषह्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यतां

औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपानैष्ठुर्यमुत्सृज्यताम् ॥४॥

अर्थ :-

१) प्रतिदिन भूक आणि रोग, आजार यांची चिकित्सा करा.. यांचं निदान करा

२) प्रतिदिन भिक्षान्नरूपी औषधाचं सेवन करा

३) मधुर.. चविष्ट अन्नाची याचना करू नका

४) यदृच्छेनं.. दैववशात् जे मिळेल त्यावर समाधान माना..संतुष्ट रहा

५) शीतोष्णादि.. अनुकूल प्रतिकूलतादि द्वंद्वं सहन करा

६) निरर्थक, निष्प्रयोजन, व्यर्थ, निरुद्देश बडबड करू नका. बोलू नका. avoid loose talking

७) उदासीन, तटस्थवृत्ति धारण करा, पक्षपाती वृत्ति टाळा

८) लोकांच्या प्रेमाचा हव्यास वा निष्ठुरपणा टाळा..

चिंतन...१ व २

१) क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यताम् ।

अर्थ..

१) प्रतिदिन भूक आणि रोग, आजार यांची चिकित्सा करा.. यांचं निदान करा

२) प्रतिदिन भिक्षान्नरूपी औषधाचं सेवन करा

चिंतन :- साधकाची आचारसंहिता कशी असावी या विषयी आचार्य मार्गदर्शन करतायेत.. संस्कृत मधील च या उभयान्वयी अव्ययाचा अर्थ "आणि" ! या चरणात हे "क्षुधा च व्याधिश्च।" अशाप्रकारे किंवा / आणि "क्षुध्व्याधिश्च विचार्यतां, भिक्षौषधं भुज्यतां च।"  अशाही प्रकारे घेता येईल. प्रतिदिनम् हेही नित्य निरंतर नेहमी या अर्थानं सर्व चरणांच्या संबंधानं घेता येईल / घेतलं जावं! योग्य काळी / वेळी योग्य प्रमाणात भूक लागणे हे उत्तम आरोग्याचं लक्षण असून अजिबात.. मुळीच भूक न लागणं किंवा अतिरेकी / अवाजवी अयोग्य काळी / वेळी भूक लागणं हा विकार, रोग आहे.. ती शारीरिक  व्याधि आहे! त्यांची चिकित्सा होऊन आवश्यक व योग्य ते वैद्यकीय उपचार व्हायला हवेत!

त्याही आधी या व्याधींचं निदान व्हायला हवं. तेही नादानाच्या हातून होता कामा नये तर दानत चांगली असणार्या तज्ज्ञ अशा कुशल वैद्याकडून व्हायला हवं! एका सत्पुरुषानं म्हटलं आहे... भूख लगे तो क्या करें और क्या करें की भूख लगे.. इसका खयाल रखना चाहिये! पण भूक, क्षुधाही वेगळ्या प्रकारांची असू शकते व ती शमवण्याचं अन्नही तशाच प्रकारे निरनिराळ्या प्रकारचं असू शकतं! ते अन्न कसं मिळवावं याचाही विवेक हवा!

आप मिला सो दूध बराबर माँग लिया सो पानी।

खींच लिया सो खून बराबर कह गयी कबीरबानी।।

    याचा नीट विचार करूनच योग्य प्रकारे योग्य ती भूक.. क्षुधा शमवली पाहिजे! साधकानं भुकेची, भुकेमुळे निर्माण होणार्‍या व्याधींची, भूकरूपी व्याधीची रोजच्या रोज योग्य व ज्ञानी व्यक्तीकडून चिकित्सा करून घेतली पाहिजे! शरीरमाद्यं खलु सर्व / धर्मसाधनम् हे लक्षात घेऊन निरोगी.. आरोग्यसंपन्न शरीरात तसंच निरोगी व आरोग्यसंपन्न मनही नांदेल यासाठी सद्गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे...

    त्यांनी केलेल्या निदानाप्रमाणे व सांगितलेल्या उपचारांप्रमाणे नेमकी औषधं.. त्यांची मात्रा, वेळा, अनुपान सांभाळून घेतली पाहिजेत व ती व्याधी सत्वर रोखली जाऊन समूळ नाहीशी होईल यासाठी आवश्यक ते पथ्यसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पाळलं पाहिजे! भिक्ष्यौषधं भुज्यताम् चं मर्म यातच साठलेलं आहे! साधकानं पदरचं खावं पण नजरचं खाऊ नये! कुक्षिस्थं यादृशं अन्नं बुद्धिर्भवति तादृशी.. या न्यायानं स्वकष्टार्जित, सुसंस्कारसंपन्न, भगवंत अतिथि दीन दरिद्री आणि कृमि कीटकादींना संतुष्ट करून.. त्यांचा भाग त्यांना देऊन उरलेलं अन्न भगवत्प्रसाद म्हणून सेवावं! कारण

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।

प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ।। (गीता.)

ब्रह्मचाऱ्याला, ब्राह्मणाला, अपरिग्रहवृत्तीनं राहणं आणि भिक्षान्नसेवन करणं ही वैदिक धर्माची आज्ञाच आहे! पण सर्वसामान्य साधकाला सुद्धा भिक्षान्न हे औषधिसमानच आहे असं आचार्य सांगतात.

भिक्षा व भीक यात जमीन अस्मानाइतकं अंतर आहे. स्वतःची कष्ट, श्रम करून पोटापुरतं अन्न मिळवण्याची क्षमता असूनही आपली उपासना, भक्ति साधना, समाजसेवेचं व्रत यासाठी पुरेसा वेळ देता यावा यासाठी पाच घरी भिक्षा मागून मिळालेलं अन्न भगवत्प्रसाद  म्हणून आणि जनताजनार्दनाप्रति कृतज्ञतेचा भाव मनात बाळगत खाणं वेगळं!

तिथे भिक्षा मागणं हे मागणाऱ्याचं कर्तव्य असतं व गृहस्थानं भिक्षा देणं हा गृहस्थधर्म आहे. भिक्षान्नावर जगणार्यालाच दीक्षा व शिक्षा.. उपदेश देण्याचा अधिकार प्राप्त होतो! ब्राह्मणवर्णाला, ब्रह्मचार्याला यासाठीच कर्तव्य म्हणून भिक्षा, मधुकरी मागायला  सांगितली आहे!

प्रथम मागितली पाहिजे भिक्षा ।..

ॐभवति या पक्षा सोडोचि नये ।।..

असा रामदासांचा आदेशच आहे! आणि दुसरीकडे स्वतःची क्षमता असून वा नसून स्वतःची नालायकी पत्करून / स्वीकारून दुसऱ्याकडे याचना करणं.. लाचारीनं हात पसरणं.. आणि नाईलाजानं, कुवासनेनंही दिलेल्या अन्नावर गुजराण करणं ही भीक आहे!

सामाजिक बांधिलकी हा आजकाल गुळगुळीत झालेला शब्द त्याच्या खर्‍या अर्थानं तेव्हा जिवंत होता जेव्हा विद्यार्थी समाजाच्या आश्रयानं व भिक्षान्नावर उदरनिर्वाह करून विद्यार्जन करीत होते आणि गृहस्थाश्रमी लोक अशांना कर्तव्य म्हणून पुरेसं व चांगलं अन्नही देत होते!

ज्याला भगवत्प्राप्तीची ओढ, तळमळ लागली आहे. जो मुमुक्षु साधक आहे त्यानं साधनेसाठी, भक्तीसाठी, उपासनेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी भिक्षान्नावरच आपला देह ठेवायचा आहे. तोही अशा रीतीनं की एखाद्या ठिकाणी खूप प्रमाणात व रुचकर अन्न भिक्षेत मिळतं म्हणून तिथेच पुन्हापुन्हा नाही जायचं! ज्या पाच घरी भिक्षा मिळाली त्या घरी पुन्हा भिक्षा मागायची नाही. संन्यासालासुद्धा भागवत ११व्या  स्कंधाच्या १८व्या अध्यायात एक दंडक घालून देतं..

अलब्ध्वा न विषीदेत काले कालेऽशनं क्वचित् ।

लब्ध्वा न हृष्येत् धृतिमान् उभयं दैवतन्त्रितम् ।।

अन्न मिळालं म्हणून आनंदितही व्हायचं नाही व नाही मिळालं म्हणून खिन्न उदास दुःखीही व्हायचं नाही! कारण अन्न मिळणं.. न मिळणं हे दोन्ही दैवतंत्रानं घडणारं आहे! जितं सर्वं जिते रसे । रसना जिंकिली त्यानी जग जिंकले या दृष्टीने रसना जिंकण्याचा पहिला टप्पा आचार्य आपल्याला सांगत आहे!

जिभेच्या चोचल्या करीता खाण्यापेक्षा शरीराच्या आवश्यकते करिता अन्न ग्रहण करावे. आपल्या साधनेत उपासनेत भक्तीत त्यामुळे खंड पडता कामा नये! त्या दृष्टीनं भिक्षेत मिळणारं अन्न हे औषधाप्रमाणेच ठराविक मात्रेतच व वेळीच सेवन करावं ज्यामुळे मन स्वीकृत ध्येयापासून, उद्दिष्टापासून, ईप्सित परम साध्यापासून ढळणार नाही, भरकटणार नाही व मन अमनावस्थेत स्थिर राहून भगवन्नमनार्थ सदैव सज्ज व सिद्ध राहील. म्हणून आचार्य या चौथ्या श्लोकाच्या प्रथम चरणात सांगतात..

क्षुध्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्ष्यौषधं भुज्यताम् ।

-----------

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post