मी देह आहे ही देहात्मबुद्धि दूर फेकून द्या संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

मी देह आहे ही देहात्मबुद्धि दूर फेकून द्या संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

देहेऽहंमतिरुझ्यताम्

अर्थ :- मी देह आहे ही देहात्मबुद्धि दूर फेकून द्या

चिंतन..

मी देह आहे ही सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच  येणारी कल्पना.. भावना! हिला धरूनच माणसाचे या जगातले सर्व व्यवहार घडत असतात. सुखदुःखांच्या कल्पनाही देहाला धरूनच असतात.. अनुकूलवेदनीयं सुखं, प्रतिकूलवेदनीयं दुःखम्.. या व्याख्येत देहाच्या अनुकूल प्रतिकूलतेलाच सुख दुःख म्हटलं आहे!

आचार्यांचं म्हणणं आहे ज्या स्थानी इंद्रियं आणि विषय यां वाचूनही आणि दुःखमिश्रणविरहित सुख मिळतं ते स्थान गाठायचं असेल तर देहात नित्य नांदणारी अहंमति फेकून द्या! आचार्यांनी "उज्झ्यताम् "असा शब्दप्रयोग केला आहे नुसता दूर सारा, टाका असा भाव तिथे अपेक्षित  नाही!  झुरळ ज्या तिरस्कारानं, घृणेनं झटकलं जातं किंवा लूतभरल्या लोचट कुत्र्याला जसं हाकललं जातं तसं या अहंमतीला..

देहात नांदणाऱ्या मीपणाला झटकून टाका, फेकून द्या, मनात त्याची इतकी घृणा बसली पाहिजे, इतका तिरस्कार आला पाहिजे की पहिल्याच अपमानानं ती बुद्धि तो भाव परत म्हणून जवळ येणार नाही.. असं आचार्यांना ठसवायचं आहे! श्रीमद्भागवतातही पहिल्या स्कंधात पहिल्याच अध्यायात वर्ण्यविषय जो धर्म त्याचं विशेषण सांगताना "प्रोज्झितकैतवः" असा शब्दप्रयोग आला आहे. तिथेही हाच भाव आहे!..

"प्रकर्षेण उज्झितः नाम त्यक्तः तिरस्कृतः" इति प्रोज्झितः।

आचार्यांनी नुसतं उज्झ्यताम् असं म्हटलं असलं तरी त्यात त्या फेकण्याच्या टाकण्याच्या क्रियेतला प्रकर्षच.. जोरच तिथे अपेक्षित आहे! जितकी देहाबद्दलची मीपणाची भावना प्रबळ, वजनदार त्यापेक्षा तिला दूर फेकायचं, टाकायचं, तिचा तिरस्कार करायचा, तिची घृणा वाटून घ्यायची.. तर त्याहून अधिक जोर, ताकत, बळ, शक्ति वापरणं अत्यावश्यक आहे!

व्यवहारातही हे नेहमी अनुभवायला मिळतं. पण मन असं विचित्र आहे की ते निर्विषय राहूच शकत नाही! मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् असं असलं तरी ते निर्विषय करायचं म्हणजे सामान्य लौकिक प्रापंचिक पंचविषयांच्या जागी त्याहूनही मोठं आकर्षणमूल्य असलेलं असं काही आणून बसवणं!

सर्वव्यापी सर्वसमर्थ सर्वज्ञ ईश्वरावाचून, भगवंतावाचून परब्रह्मावाचून असा सर्वात मोठं आकर्षणमूल्य असलेला दुसरा कोणताच विषय नाही असं जर सर्व संतसत्पुरुष स्वानुभवातून ठामपणे सांगत आहेत तर त्यालाच  तिथे आणून बसवणं स्वतःला बुद्धियुक्त, विचारशील माणूस समजणाऱ्यांनं केलं पाहिजे नाही का?

अर्थात ही भाषा केवळ भाव समजण्यापुरतीच आहे! मी देह नसून ब्रह्म आहे ही भावना सतत मनात बाळगणं म्हणजेच देहातली अहंमति फेकून देणं आहे. याच श्लोकाच्या आधीच्या चरणात आचार्यांनी ब्रह्मास्मीति विभाव्यताम् असं सांगितलेलंच आहे.. त्याचाच अनुवाद.. अनुबंध देहेऽहंमतिरुज्झ्यताम् हा आहे.

देहात सर्वत्र असलेली मीपणाची जाणीव जर बुद्धिपुरस्सर, विवेकानं आणि दैनंदिन व्यवहारातले अनुभव पाहून काढून टाकली... मनातला तो एक मोठा मळ जर धुवून टाकला तरच चित्तात भगवद्दर्शन घडणं शक्य आहे! या देहातल्या अहंमतीनंच.. रजोगुणसमुद्भूत अशा कामक्रोधांना आग्रहपूर्वक निमंत्रण मिळून ज्ञानावर अज्ञानाचं आवरण घातलं जातं! आरशावरच्या धुळीनं आपलं प्रतिबिंब अस्पष्ट होतं किंवा धुरामुळं.. साचलेल्या राखेमुळं.. मुळातला अग्नि झाकला जातो किंवा गर्भावर असलेलं आवरणच त्याच्या बाहेर येण्याला अडसर ठरतं.. तसं या कामक्रोधादि ज्ञानवैऱ्यांमुळे मुळातच असलेलं विशुद्ध ज्ञान झाकलं जातं..

आणि विविध वासनांनी वेढलेला मनुष्यजीव देहालाच आत्मा मानून दुःखाच्या खाईत लोटला जातो! गीतेच्या तिसऱ्या अध्यायात भगवन्मुखातूनच हा विषय अर्जुनाला सांगण्यात आलाय! माणसाला कधीही आत्मवंचना झालेली, स्वतःची फसगत झालेली सहन होत नाही.. खपत नाही! मिळालेलं.. अनुभवलेलं सुख आभासीच होतं.. खरं नव्हतं.. असं कळलं की त्यापासून दूर जाण्याची त्याची वृत्ति असते!

कितीही स्वप्नं पाहिली तरी ती सत्यात उतरवण्याची त्याची नेहमीच धडपड असते.. त्यासाठी तो अधीर, उत्सुक असतो! वृत्तपत्रातून वाचायला मिळणाऱ्या, आप्तमित्रांकडून ऐकायला मिळणाऱ्या नाटकंचित्रपटांवरील अभिप्रायांमुळेच तो नाट्य चित्रपटगृहांकडे वळतो.. किंवा तत्सम दुसऱ्या कोणत्याही सुखदायक बाबींकडे वळतो! काही वेळा फसगत होते.. मनात उभ्या केलेल्या.. झालेल्या कल्पनांना धक्का बसून प्रत्यक्षातल्या अनुभवानं दुःखीकष्टी होतो.. निराशहताश होतो.. संतापतो किंवा याच्या उलटही घडून त्या सुखाच्या वारंवार प्राप्तीसाठी त्याच्या मागे धावतो.

वास्तविक देहेन्द्रियं आणि त्यांचे विषय यांच्या संपर्कापुरताच सुखाचा अनुभव असतो.. म्हणजेच भौतिक.. लौकिक विषयजन्य सुख हे क्षणिक, अनित्य दुःखपर्यवसायीच असतं.. अशा सुखाची एकच एक ठाम अशी, स्थल, काल, वस्तु, व्यक्ति  परिस्थितिनिरपेक्ष सर्वव्यापक व्याख्या करताच येत नाही.. तरीही मनुष्य अशा विषयसुखामागे लागून दुःखी होतो.. आयुष्य त्या नादात व्यर्थ निघून जातं !

तरीही माणसांचं संत, सत्पुरुष निःस्वार्थीपणे, निरपेक्षवृत्तीनं स्वानुभवातून निरतिशय आनंदाचा जो मार्ग  दाखवतात.. बुडती हे जन देखवेना डोळा या कळकळीतून सांगतात.. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती या मातृवत्सलतेतून सांगतात.. तिकडे लक्ष जात नाही! व्यासमहर्षीही निराशेतून उद्गारतात

 "ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष कश्चित् श्रुणोति मे।"

पण ज्याला कुणाला नित्य निरतिशय अक्षय्य आनंदाची अनिवार तहान लागली असेल ज्याला त्या सच्चिदानंदस्वरूप परब्रह्माचा स्वतःमधे अनुभव घेऊन जीवनाचं सार्थक करण्याची तीव्र इच्छा झाली असेल अशा साधकाला आचार्य  सांगतात.. देहेऽहंमतिरुज्झ्यताम्

---------

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post