संस्कृत सुभाषित रसग्रहण
sunskrit Subhashit knowledgepandit
बुधजनैर्वादः परित्यज्यताम् ।
अर्थ :- ज्ञानी जनांशी
वादविवाद करू नका.. टाका.. टाळा !
चिंतन :- वादे वादे जायते तत्त्वबोधः असं वचन आहे... त्याप्रमाणं तुल्यबळ विद्वानांमधे, समविचारी साधकांमधे शास्त्रचर्चा निखळ ज्ञान लालसेतून खरंच घडत
असेल व काही ज्ञानकण झोळीत पडत असतील तर तो वाद... वाद कसला संवादच तो.. हितकारीच म्हणायला
हवा!
पण वाद वितंडवादाकडे वळून नुसतं आकांडतांडव आणि डोकेफोडी होणार
असेल व ज्ञानाची ठोस फलनिष्पत्ति न होता केवळ कंठशोषः हाच त्याचा परिणाम असणार असेल
तर तो नक्कीच वेळच्यावेळी थांबवला पाहिजे.
आघातांतून नादही निर्माण होतो व गोंगाटही निर्माण होतो.. पण नाद मधुर स्वरजनक सुसंवादी चित्तरंजक मनःशांतिदायक असू शकतो
व गोंगाट नेहमीच डोकेदुखी
निर्माण करणारा,
अशांतिकर, अस्वास्थ्यकर अहितकर असतो! तुटे वाद, संवाद.. तो हितकारी असं
समर्थ मनाला सांगतात ते ज्यातून वाद फुटतो तो अहंकार टाकण्यासाठी व समन्वयकारी संवाद
प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक तो विनम्रभाव अंगीकारण्यासाठी!
वादे वाढत वैरवह्नि बहुधा... वादी तो न वळे, न वादहि खळे, होती खुळे आंधळे असं कै. ल. रा. पांगारकरांनी मनाच्या
श्लोकांवरील विवेचनातच आपलं निरीक्षण नोंदवलंय. देवर्षि नारद आपल्या भक्तिसूत्रातही.. वादो नावलम्ब्यः
। असं सांगतात! सर्वांचा हेतू एकच आहे की एकदा आपण परब्रह्मप्राप्तीसाठी... भगवत्प्रेमप्राप्तीसाठी गुरूपदिष्ट साधनामार्ग स्वीकारला...
(तोही स्वेच्छेनं... जगद्व्यवहाराचं खरं स्वरूप बघितल्यावर...
आत्यंतिक दुःखनिवृत्तिपूर्वक केवळ निर्भेळ विशुद्ध सुखानंद मिळवण्यासाठी!) की आपण कोणत्याही
प्रकारे वादात शिरू नये! जिथे वाद चालू असेल तिथे
थांबू नये,वादाग्नीत आपल्या मतीनं मताचं तेल ओतू नये!आपलं चित्त केवळ आपल्या
लक्ष्यावर केंद्रित करावं! फक्त एक करावं... मोरोपंत म्हणतात त्याप्रमाणे...
धर्मप्रभुनिंदेतुनि झाकुनि कर्णा उठोनिया जावे
।
शक्य जरी तद्रसना छेदावी वा असूंसि वर्जावे ।।
असा प्रसंग स्वामी विवेकानंदांच्या जीवनात आला होता. विदेशवारीत
हिंदूधर्माची निंदानालस्ती करणाऱ्या ख्रिस्ती धर्मोपदेशकाची गचांडी पकडून समुद्रात
फेकून देईन असा सज्जड दम त्यांनी दिला होता! पण कोणत्याही प्रकारे वाद करू नये. सामान्यतः वाद करूच नये.. त्याची आवश्यकताच नसते! कारण भर्तृहरि नीतिशतकात म्हणतात त्याप्रमाणे
अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ।
ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि नरं न रंजयति ।।
जो ठार अज्ञानी आहे तो तुमचं म्हणणं सहज मान्य करतो. आणि जो
विशेषज्ञ आहे त्याला तुम्ही काय सांगताय ते कळत असल्यानं तिथेही वाद संभवतच नाही. प्रश्न
उरतो तो अर्ध्या हळदखंडात पिवळ्या झालेल्या तथाकथित बुद्धिप्रामाण्यवादींचा. चार पुस्तकं वाचून स्वतःला विचारवंत समजणाऱ्यांचा. मूलगामी विचार करतो असं म्हणत स्वतःला सोयिस्कर असेल तिथंच थांबून
तेच मूलकारण म्हणून इतरांवर राजसत्तेच्या आश्रयानं थोपविणाऱ्यांचा. अशा लोकांशी वाद
घालणं हे दगडावर डोकं आपटून घेऊन आत्महत्या करणंच आहे..
निरर्थक आहे आपला बुद्धिभेद होऊन भलत्याच मार्गावर पाऊल पडण्याची
शक्यता निर्माण करणारं आहे. आपल्या शक्तीचा, काळाचा अपव्यय आहे! शिवाय जे आपल्याच साधनामार्गावर आपल्या पुढे चालत आहेत... पुढच्या मुक्कामावर पोहोचलेत किंवा अन्य कोणत्या मार्गानं प्रवास
करत आपण जिथे पोहोचू पाहतो आहोत तिथे आधीच पोहोचलेले आहेत असे जे कुणी बुधजन, आत्मसाक्षात्कारी, संतसत्पुरुष असतील
त्यांच्याकडून मिळेल तेवढं मार्गदर्शनच घ्यावं. आपल्या तोकड्या, अपुऱ्या साधनेच्या, बुद्धीच्या, वैचारिकशक्तीच्या बळावर उगीच त्यांच्याशी वाद घालू नयेत! नुकसान
आपलंच होईल!
अशा लोकांशी
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यंति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः
।।
या गीतावचनानुसार वागावं व आत्मकल्याण साधावं! म्हणून या श्लोकाची समाप्ति करताना आचार्य साधकाला आग्रहपूर्वक
सांगतात. बुधजनैर्वादः परित्यज्यताम् ।
श्रीपादजी केळकर, कल्याण