संस्कृत सुभाषित रसग्रहण
sunskrit Subhashit knowledgepandit
औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपानैष्ठुर्यमुत्सृज्यताम्
।
अर्थ :- उदासीन, तटस्थवृत्ति धारण करा, पक्षपातीवृत्ति टाळा. लोकांच्या प्रेमाचा हव्यास वा निष्ठुरपणा टाळा..
चिंतन
:- जीवन जगत असताना बाहेरचे संघर्ष कुणालाच टळले नाहीत. ते लढावेच
लागतात. आहार निद्रा भय मैथुन या सामान्य धर्मांसाठी दुसऱ्याचा जीव घेण्या इतका वा स्वतःचा जीव गमावण्या इतका संघर्ष करावा
लागतो. कदाचित एखाद्या सुदैवी सद्भाग्यवंताला यातील सर्व आपोआप विनासायास मिळतही असेल
पण ती अपवादात्मक बाब म्हणावी लागेल!
पण ज्यांनी काही विशेष जीवनध्येय समोर ठेवलंय, राष्ट्रसेवा, समाजसेवा, दीनदलितसेवा, भगवत्प्राप्ति, त्यांना या सामान्यधर्मांच्या साधनेत वेळ दवडून नाही चालत! ज्यावेळी जे मिळेल त्याच्यासह वा जे मिळणार नाही त्यावाचून आपल्या
ध्येयाप्रत अखंड अविरत वाटचाल करत राहणं एवढंच त्यांच्या हाती राहतं!
न जातु कामान्न भयान्न लोभात् धर्मं त्यजेत् जीवितस्यापि
हेतोः ।
धर्मो नित्यः सुखदुःखे त्वनित्ये,जीवो नित्यो हेतुरस्य त्वनित्यः ।।
महाभारतान्तर्गत भारतसावित्री स्तोत्रात महर्षि व्यास वरील श्लोकाद्वारे
सांगतात. जे नित्य आहे त्या धर्माची व धर्मपालक जीवाची कास धरा आणि जे अनित्य क्षणजीवी
आहे त्या सुखदुःखांच्या किंवा जीवाला पुनःपुन्हा ज्यामुळे जन्म घ्यायला लागतो त्या
कारणांच्या मागे लागू नका!
औदासीन्यमभीप्स्यताम् असं सांगण्यामागे आचार्यांचा हेतूच हा आहे की त्या सर्व अनित्य गोष्टींपासून साधकानं
पूर्णतः अलिप्त रहावं,
मुक्त रहावं! पण ती अलिप्तता
साधण्यासाठी सर्व अंतःशत्रूंपासून म्हणजे वासना, एषणा, कामना, इच्छा, आकांक्षा भय धाकधपटशा
मोह लालुच सत्तास्पर्धा,
चुरस, ईर्ष्या या सर्वांपासून
दूर रहायला हवं!
काम करते रहें नाम जपते रहें..
पापकी वासनाओंसे डरते रहें...
सद्गुणोंका परम धन कमाते चलें..
धर्मधनका खजाना लुटाते चलें...
तरीही औदासीन्यमभीप्स्यताम्
हे सांभाळालायलाच हवं! श्रीमद्भागवताच्या
८व्या स्कंधात भगवंतांनी देवादिकांना असुरांबरोबर तह करायला. समझौता करायला सांगितलं
आणि अमृतोत्पादनार्थ असुरांच्या साह्यानं क्षीरसागराचं मंथन करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्यांनी देवांना. उच्चकोटीचे जीव असं ज्यांचं स्वरूप
आहे त्यांना. एक महत्त्वाची बाब सांगितली! ते म्हणाले ..
न भेतव्यं कालकूटात् विषात् जलधिसंभवात्
लोभः कार्यो न वो जातु रोषः कामस्तु वस्तुषु।।
आजच्या भाषेत सांगायचं तर अमृतोत्पादनार्थ क्षीरसागरमंथन हा
The
most difficult task होता. Highly dangerous
and unachievable target/goal होतं! अंतिम ध्येयप्राप्ति जरी अमृत होती तरी ती हाती पडेपर्यंत कालकूटासारखं
भयंकर विष,
कौस्तुभमणि, ऐरावतासारख्या
लोभजनक गोष्टी,
साक्षात् मोहिनीसारखी कामोद्दीपक स्त्री आणि असुरांचं रोषसंतापजनक
आचरण अशा कितीतरी गोष्टी आड येणार होत्या..
देवासुरांना नको तो अमृताचा नाद असं वाटायला लावणाऱ्याच होत्या! पण भगवंतांनी भय काम लोभ रोष इ. सर्वांवर नियंत्रण ठेवायला सांगितलं म्हणजेच देवांना
उदासीन रहायला सांगितलं! साधकाच्या जीवनात हे सर्व
येतंच! कौतुक,
मानसन्मान, टिंगलटवाळी, कुचेष्टाअपमान, भयचिंता, हताशानिराशा अशांना तोंड द्यायला लागतं!
समोर अशा काही वस्तुपदार्थ व्यक्तिघटनापरिस्थिती उभ्या राहतात
की तिथे वरील सर्व प्रकारातून साधकाची त्याच्या उदासीनतेविषयक कसोटी लागते! उत् म्हणजे वर आसीन म्हणजे राहणारा. विकारांना विचार विवेकाच्या
बळानं खाली चेपूनदाबून टाकणं व त्यांच्यावर आपण राहणं ही उदासीनता.. समर्थ ज्याला हेंकाडपिसे म्हणतात ते नव्हे! हताशाउद्वेग आक्रस्ताळेपणाही
नव्हे!
समोर आलेल्याचा विरोधविहीन सहजस्वीकार तोही भगवदिच्छा, भगवत्प्रसाद, भगवदाज्ञा या भावनेतून हेच आचार्यांच्या भाषेत औदासीन्यमभीप्स्यताम्
!
यातच तटस्थता, निःपक्षपातित्व
यांचाही अंतर्भाव होतो. ज्यावेळी चित्तचांचल्यजनक
वा ध्येयापासून विचलित करणारं काही घडतं त्यावेळीच कुणाला तरी आपल्या पक्षात. बाजूनं
बोलवावंसं वाटतं किंवा आपण उठून कुणाचा तरी तटगट वा पक्ष स्वीकारावासा वाटतो!
पण हे सर्व टाळून इकडेतिकडे न बघता एकला चालो रे या पद्धतीनं
ध्येयप्राप्तिपर्यंत मार्गक्रमणा करीत राहणं म्हणजेच औदासीन्यमभीप्स्यताम्
चं पालन करणं! आणखी एक गोष्ट
साधकहितार्थ आचार्य सांगतात.. ती म्हणजे जनकृपा
नैष्ठुर्य यांचा त्याग करणं! शास्त्र, सद्गुरु इत्यादि जरी असले तरी ध्येयमार्गाची वाटचाल ज्याची त्यालाच
करायची असते.. करावी लागते!
तिथे आपल्याऐवजी दुसरा कुणी आणि फळ घ्यायला आपण अशी व्यवस्था
नाही!
ज्याचा तो... यस्य सः! असा षष्ठी बहुव्रीहीचा प्रकार असतो. त्यामुळे आप्तजन, सगेसंबंधी, मित्रगोत्रज इत्यादींपैकी आपल्याला कुणी मदत करील साह्य करील
अशी अपेक्षा करणंही चूक आणि अशी कोणत्याही रूपानं जनकृपा होत आहे अशी शक्यता जरी दिसली
तरी साधकानं ती टाळली पाहिजे. टाकली पाहिजे.
आपल्या श्रमांवर, कष्टांवर विसंबूनच
साधना व्हायला हवी! दुसऱ्यांनी काहीही मदत केली तरी ती नम्रतापूर्वक. त्यांना न दुखवता. त्यांचा अपमान, अनादर न करता वा त्यांना कमी न लेखता अशी मदत साभार नाकारली
पाहिजे!
अशा वेळी चित्ताची कोमलता लोपून अहंकारानं निष्ठुरता येण्याची
शक्यता असते.
साधकानं अशी निष्ठुरता टाळलीच पाहिजे. आपल्या साधनेत व्यत्यय
येऊ न देता.. खंड न पडू न देता..
झालेला शक्तिसंचय अनाठायी खर्ची पडू न देता होईल तेवढी जनकृपा
निरपेक्ष भावनेनं अवश्य करावी! शिवभावे जीवसेवा
करताना आवश्यकता वाटली तर स्वतःशी अत्यंत कठोर, निष्ठुर जरूर रहावं!
पण कोणत्याही परिस्थितीत साधनाभंग होता कामा नये या उद्देशानं आचार्य साधकाला या चौथ्या
श्लोकाची अखेर करताना सांगतात. औदासीन्यमभीप्स्यतां
जनकृपानैष्ठुर्यमुत्सृज्यताम् ।।
--------