मुस्लिम महानुभाव संत - शहामुनी
mahanubhav-panth-history
शहागडचे महानुभावीय मुस्लीम
संत कवि शहामुनी
धर्म संस्थापर्णाय संभवामि युगे युगे या आपल्या श्रुतीनुसार १२ व्या शतकात महाराष्ट्रात परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाचे प्रवर्तन केले. तत्कालीन प्रस्थापित वर्णव्यवस्था झुगारून देऊन त्यांनी समाजातील सर्व जाती - वर्णाच्या स्त्री पुरूषांना धर्माची द्वारे सताड उघडून दिली. शास्त्राध्यायनाचा व अध्यापनाचा सर्वांना समान अधिकार बहाल केला. एकनिष्ठ ईश्वर भक्तीचा समाजाला उपदेश केला. त्रिगुणात्मक देवता भक्ती , कर्मकांड, व्रत- वैकल्य, पशु-पक्षाचे बळी, आदी उग्र हिंसा प्रधान अधोगामी देवता भक्तीचा त्याग करायला सांगितले. सप्त व्यसनापासून अलिप्त होऊन मनुष्य मात्र व्हायला सांगितले.
परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधरस्वामींच्या या ज्ञानमार्गाचा महाराष्ट्रात सर्वत्र प्रचार व प्रसार झाला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार अखिल विश्वातील मानवासाठी होते. त्यात जातीभेद, वर्णभेद , वंशभेद , भाषाभेद , प्रांतभेद अशा विषमतावादी मानसिकतेला थारा नव्हता. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींचे हे विचार सर्वाच्याच उद्धारासाठी होते. त्यामुळे श्री चक्रधरस्वामींच्या तत्वज्ञानाचा हा प्रवाह उत्तरोत्तर विस्तारत गेला. समाजातील विविध जातीतील साधू संत महानुभाव पंथात निर्माण झाले.
या साधू संतांनी अनेक ग्रंथ निर्माण केले. ते ग्रंथ समाजाला आदरणीय व मार्गदर्शक ठरले. आजही त्या ग्रंथाद्वारे समाजाला मार्गदर्शन मिळत आहे. त्या अनेक महान संतांपैकीच शहागडचे १७ व्या शतकाच्या शेवटच्या काळात होऊन गेलेले महानुभावीय मुसलमान संतकवी शहामुनी हे एक होते. या संतश्रेष्ठ महानुभाव मुस्लीम संतकवी शहामुनींनी सिद्धांतबोध ग्रंथाची रचना केली. त्यांनी रचलेल्या या मूळ सिद्धांतबोध ग्रंथाचे ३० अध्याय आहेत. त्यांच्या नंतर अजून एक दुसरे शहामुनी होऊन गेले.
ते हिंदू राजपूत होते. त्यांनी २० अध्याय रचून त्या ग्रंथात भर घातली व मूळ ग्रंथाचा ५० अध्यायापर्यंत विस्तार करून वैचारिक व तात्विक गोंधळ उडवून दिला. हे दुसरे शहामुनी कोण ? कुठले ? त्यांचे जन्म गाव कुठले? तसेच महानुभावीय मुसलमान संतकवि शहामुनी कोण ? त्यांचे गाव कोणते ? त्यांचा जन्म कोणत्या वंशात झाला ? आदी बाबींचा आपण या लेखात विचार करणार आहोत. प्रथम आपण महानुभावीय मुस्लीम संतकवि शहामुनींचा विचार करू या...
१) शहागडचे महानुभावीय
मुसलमान संतकवी शहामुनींचे चरित्र
शके १७ व्या शतकाच्या अखेरीस शहागड (जिल्हा जालना) येथे महानुभावीय मुस्लीम संत कवी शहामुनी होऊन गेले. यांनी सिद्धांतबोध ग्रंथाची रचना केली आहे. सिद्धांतबोध या ग्रंथाचे मूळ ३० अध्याय आहेत. हा ग्रंथ महानुभाव पंथात अत्यंत लोकप्रिय आहे. हा ग्रंथ आजही चातुर्मासात वाचला जातो. थोर साहित्यसंशोधक शं गो. तुळपुळे "महानुभाव पंथ व त्याचे वाङमय" या ग्रंथात पृष्ठ ३१० वर "इस्लामी सिद्धांतबोध या ग्रंथाचा कर्ता शहामुनी हे धर्माने मुसलमान होते.
पण सांप्रदायाने महानुभाव ! त्यांचे स्वतः चे नाव शहा आणि त्याच्या गुरुचे नाव मुनींद्र यांचा जोड करून तो स्वतःला शहामुनी म्हणवितो." असे वर्णन करतात. तर डॉ अप्पासाहेब देशपांडे,यवतमाळ यांनी त्यांच्या "महानुभाव मराठी वाङगमय" या ग्रंथात महानुभावीय मुसलमान संतकवी शहामुनी हे सिद्धांतबोध ग्रंथाचे रचयिता असून ते शहागड येथील रहिवासी असल्याची नोंद करतात. या शहामुनींनी मुनी नामक महानुभावीय साधूचा उपदेश घेतला होता. या बद्दल शहामुनी म्हणतात -
मुनींद्र स्वामी गुरू पूर्ण ।
त्याचा सेवक शहा जाण ।।
ग्रंथ आरंभीला गुरू आज्ञेन ।
बोध होईल तो परिसा ।।
(सि.बोध अध्याय १ ओवी १५ )
शहामुनींचे मूळ नाव "शहा" असे होते. ते स्वतःच्या "शहा" या नावापुढे गुरूचे "मुनी" हे नाव जोडून स्वतःचा उल्लेख ते "शहामुनी" असा करीत असत. गोदावरीच्या काठावरील श्रीपूर (शीरपूर) हे त्यांचे गाव. शहामुनींच्या वास्तव्या वरूनच श्रीपूरला शहागड हे नाव पडले. शहामुनींच्या साधुत्वाचा व विद्वत्तेचा प्रभाव त्यावेळचा बिदरच्या मुसलमान राजावरही पडला होता. या राजाचा ताटकाड्याने (भोजन कक्षातील सेवकाने ) शहामुनींना राहण्यासाठी शहागड येथे गड किल्ला बांधून दिला होता.
असे "दोन शहामुनी आणि शास्त्रीय संवाद" या शोध ग्रंथात माहिती मिळते. या गड किल्ल्यातील शहा पीर दर्गाह नावाने ओळखले जाणारे स्थळ म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे "श्रीपुरी तायश्वरी आसन" हे तीर्थस्थान होय. या तीर्थस्थानाजवळ शहामुनीना रात्री स्वप्नात येऊन श्री दत्ताने कर्णात मंत्र फुकला असे वर्णन सिद्धांतबोध ग्रंथात आले आहे. या तीर्थस्थानाच्या दर्शनाला आजही महानुभाव पंथीय संत महंत अनुयायी जातात व येथील मुसलमान पुजार्यांनी दिलेला चुरमा - मलिदाचा प्रसाद घेतात.
शहामुनी हे जन्माने मुसलमान होते.स्वताच्या जन्माची माहीती देताना शहामुनी म्हणतात-
नव्हे यातीचा ब्राह्मण ।
क्षत्रिय वैश्य नव्हे जाण ।।
शुद्रापरी हीन वर्ण ।
अविंधवंशी जन्मलो ।।१२९।।
ज्याचा शास्त्रमार्ग उफराटा।
म्हणती महाराष्ट्र धर्म खोटा ।।
शिवालय मूर्ती हटा ।
देवद्रोही हिंसाचारी ।। १३०।।
ऐसे खाणी जन्मलो ।
श्रीकृष्ण भक्तीस लागलो ।
तुम्हा संतांचे पदरी पडलो ।
अंगिकारावे उचित ।।१३१ ।।
(सि.बोध अध्याय २ रा )
शहामुनी म्हणतात की मी "अविंधवंशी" म्हणजे यवन वंशात जन्मलो आहे व "श्री क्रुष्ण भक्तीस" लागलो आहे. अर्थात महानुभाव झालो आहे असे म्हणतात. महानुभाव पंथाला १६ व्या १७ व्या शतकात "श्रीकृष्णाचे उपासक" म्हणून ओळखले जात होते. खणेपुरी, पाचोरा, सिन्नर , अशा अनेक महानुभावीय तीर्थस्थानाच्या सरकारी कागदोपत्रात "किसननाथ - कृष्णनाथ" अशा नोंदी या काळात केलेल्या आढळतात.
महानुभाव पंथाचा पंजाब पेशावर पर्यंत तर अफगाणिस्तानात काबूल कंदाहार अटके पर्यंत जयक्रुष्ण सांप्रदाय नावाने प्रसार व प्रचार झाला होता.आजही उत्तर भारतात महानुभाव पंथाला "जयकृष्णी पंथ" या नावाने ओळखले जाते. १८ व्या शतकात एलिचपूरचे सय्यद अमजद हुसेन खातीब यांनी लिहिलेल्या "तारिखे अमजदी" या ग्रंथात महानुभाव पंथीयाच्या श्रीकृष्ण भक्तिचा पुढीलप्रमाणे उल्लेख केला आहे.
" किशन (श्रीकृष्ण) नावाच्या एका मुख्य देवाला सोडून इतर देवतांची हे लोक पूजा करीत नाहीत. किशनवर त्यांची श्रद्धा पराकोटीची आहे..." असे शं गो. तुळपुळे लिखित "महानुभाव पंथ आणि त्याचे वाङमय" प्रुष्ठ- ६७ यावर सांगितले आहे. महाराष्ट्रात महानुभाव पंथाला "श्रीकृष्णाचे उपासक " या नावानेच ओळखले जात असे हे वरील विवेचनावरून स्पष्ट झाले आहे. म्हणूनच सिद्धांतबोध ग्रंथातही शहामुनी "श्रीकृष्णभक्तीस" लागलो असा श्रीकृष्णभक्तीचा श्रद्धेने उल्लेख करतात.
शहामुनींच्या मनात उत्कट गुरूश्रद्धा व एकनिष्ठ ईश्वर भक्ती होती. मुनींद्र स्वामी नामक महानुभाव गुरूच्या सान्निध्यात त्यांचे शास्त्र अध्ययन परिपूर्ण झाले होते. शहागड येथील गोदावरीच्या तीरावर असलेल्या श्री चक्रधरस्वामींच्या तीर्थस्थानाजवळ ते नामस्मरण साधना करीत.
एके दिवशी रात्री श्रीदत्तात्रेय प्रभूंचे विरहपूर्वक नामस्मरण करीत असतांना त्यांना झोप लागली व स्वप्नात श्री दत्तात्रेयप्रभूंनी त्यांना दर्शन देऊन त्यांचे कानात मंत्र फुकला.तो प्रसंग सांगताना संतकवी शहामुनी म्हणतात -
बहू भ्यालो जीवाशी ।
आलो काकुळती देवाशी ।।
श्री दत्त येऊनी रात्रीशी ।
मंत्र कर्णाशी फुंकीला ।।१३।।
( सि.बोध अध्याय ७ वा )
हे सांगून शहामुनी पुढे म्हणतात की श्री दत्तात्रेय प्रभूंनी मस्तकी हात ठेवला. त्यांचे क्रुपेचा पूर्ण बोध झाला व हा सिद्धांतबोध ग्रंथ रचला. म्हणजे हा ग्रंथ रचायला श्री दत्तात्रेय प्रभूंनी मला बोध दिला. त्यांचे क्रुपेनेच मी हा ग्रंथ विस्तारला आहे असे शहामुनी सांगतात -
तो श्रीदत्तात्रेय जगद्गुरू ।
मुख्य परमेश्वर अवतारू।।
तेणे करूनी अंगीकारू।
मस्तकी हस्त ठेविला ।।२९।।
त्यांचे क्रुपेचा पूर्ण बोध।
ह्रदयी जाहला अनुभव सिद्ध।।
तोचि विस्तारिला सिद्धांतबोध ।
आज्ञा होता श्री गुरूची ।।३०।।
(सि.बोध अध्याय १७ वा )
सिद्धांतबोध ग्रंथाची रचना शहागड येथे गोदावरी नदीच्या काठावर झाली असली तरी त्यांची शीष्य परंपरा सर्वदूरपर्यंत पोचल्याचे दिसते. राहाटोडा (जि.लातूर ) व तोरणा ( जि.बिदर ) येथे शहामुनींच्या गुरूपरंपरेतील मुनींद्र महानुभाव यांचे शीष्य शाखेतील ब्राह्मण मठ आजही आहेत. ते आजही महानुभाव पंथाची आचाराची व ज्ञानाची परंपरा पाळतात.
शहागड, श्रीआत्मतीर्थ पांचाळेश्वर , बळ्हेग्राम , पैठण हा गोदावरीचा रम्य व पावन परिसर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व श्री दत्तात्रेय प्रभूंची श्रीचरणांकित तीर्थस्थाने या भूमीवर आहेत म्हणून ही भूमी पवित्र व पावन झालेली आहे. श्री आत्मतीर्थ हे तर युगानुयुगापासून श्री दत्तात्रेय प्रभूंचे भोजन स्थान. त्यामुळे या परिसरात अनेक साधू-संत नामस्मरण साधना असतीपरीचा आचार करून देह क्षेपायला येत.
आचार्य श्रीकपाटे नागराजव्यास यांनी पांचाळेश्वर येथे श्रीदत्त दर्शनासाठी कपारित बसून कठोर अशी नामस्मरण साधना केली होती व त्यांना साक्षात श्री दत्तात्रेय प्रभूंनी मुसलमान फकिराच्या वेशात दर्शन दिले होते व त्यांचे जवळील भीक्षा भोजनही केले होते अशी माहीती कपाटे नागराज व्यास गादी परंपरेचे महंत श्री नागराज बाबा महानुभाव औरंगाबाद हे सांगतात.
तसेच श्री मुरलीधर कोळपकर महानुभाव लिखित "महानुभावांचा इतिहास" या ग्रंथात पांचाळेश्वर राक्षसभुवन येथे भीक्षेला जाताना पूर्वज श्रीकपाटे नागराज व्यास या महानुभाव आचार्यांना श्री दत्तात्रेय प्रभूंनी फकीराच्या वेशात दर्शन दिल्याची माहिती येते. श्री दत्तात्रेय प्रभूंनी कपाटे नागराजव्यासांना मुसलमान फकिराच्या रूपात दर्शन देणे व शहामुनींना स्वप्नात कानात मंत्र फुकून सिद्धांत बोध ग्रंथ रचण्याची स्फुर्ती देणे या दोन्ही प्रसंगातील योगायोग चिंतनीय आहे.
महानुभावीय मुसलमान संत कवी
शहामुनीकृत सिद्धांतबोधातील ३० अध्यायात
मांडलेले द्वैत तत्वज्ञान
सिद्धांतबोध ग्रंथात पूर्वार्ध १६ व उत्तरार्ध १४ असे एकून ३० अध्यायाचे आपण दोन भाग करून त्यावर विचार करू या. पूर्वार्धात अनेक ठिकाणी खंडन - मंडणात्मक द्वैत - अद्वैत तत्वज्ञानाचा १६ व्या अध्यायापर्यंत परामर्ष घेतल्याचे आपल्या लक्षात येईल. १७ व्या अध्यायापासून ते ३० व्या अध्यायापर्यंत उत्तरार्ध समाप्त होतो.
महानुभावीय मुस्लीम संतकवी शहामुनी यांनी सिद्धांतबोध ग्रंथात महानुभावीय द्वैत मताचे तत्त्वज्ञान प्रतिपादन केले आहे. ग्रंथाच्या आरंभी निराकार परमेश्वराचे वर्णन करून "स्तब्ध झाल्यावर" त्यांच्या हृदयात श्री दत्तवरप्रसादाने ग्रंथ रचण्याची स्फुर्ती झाल्याचे सांगतात. तोच ज्ञानांकूर उगवला. त्यानंतर त्यांनी श्रीकृष्ण चरणकमलास वंदन केले व श्री दत्तात्रेयाला नमस्कार करून ग्रंथाची पायाभरणी केली व शेवटी श्री गुरूच्या आज्ञेचे महत्त्व सांगितले आहे. (सिद्धांतबोध अध्याय १ ओवी ११ ते १५)
अ.२ ओवी १२७ मध्ये त्यांनी श्री दत्तात्रेयांनी रात्री येऊन कानात मंत्र फुकल्याचे व ओवी १३२ मध्ये "मी श्रीकृष्णभक्तीस लागलो" असे स्पष्ट कबूल केले आहे. अ. १२ ओवी १मध्ये त्यांनी श्री गुरूस वंदन केले आहे. इतर ग्रंथात त्या त्या कवींनी प्रारंभी श्री गणेश, सरस्वती, सद्गुरू, श्रोते, सभाजन, संत, कविश्वर, यांना नमन करुन ग्रंथ आरंभ केला आहे. असे सांगून शहामुनी म्हणतात मी तसे केले नाही तर महानुभावीय कवींनी जसे ग्रंथारंभी पंचावतारास व गुरूस वंदन केले आहे. काही महानुभावीय कवींनी ग्रंथारंभी श्री दत्त , श्रीकृष्ण व श्री गुरूसही वंदन केले आहे त्याप्रमाणे मी वंदन करण्याची महानुभावीय परंपरा स्वीकारली आहे असे सांगतात -
अनेक ग्रंथाचे प्रारंभास ।
आधी नमीती गणेश ।।
मग वंदीती सरस्वती ।
तिचे पाठी सद्गुरू ।।३।।
गुरू मागे संत सज्जन ।
संत जाहलीया श्रोतया लागून ।।
श्रोतया पाठी सभा मंडण ।
कविश्वर स्तविताती ।।४।।
तैसे येथे नाही केले।
धरीली श्री कृष्णाची पाऊले ।।
ज्याचे क्रुपेने मती चाले ।
कविताशक्ती वदावया ।।५।।
(सि.बोध अध्याय ४ था)
आपण इतर कवी सारखे अनेक देव का नमत नाही हे सांगतांना महानुभावीय मुसलमान संत कवी शहामुनी परखडपणे सांगतात--
इतर कवींचा अनुभव।
नमनी स्तवनी अनेक देव।।
माझा एकची भाव ।
मुख्य देव नमीयेला ।।७।।( सि. बोध अध्याय २५ वा)
सिद्धांत बोध ग्रंथातील १ ल्या अध्यायापासून १६ व्या अध्यायापर्यंतचा नमनाचा आढावा पाहू गेल्यास अ.१ ते ११ व १४ व्या अध्यायामध्ये श्री क्रुष्णाला नमन केले आहे.अ. १ , १३ व १६ या तीन अध्यायामध्ये निराकार परमेश्वरास वंदन केले असून अ.१२, ९ व १ या तीन मध्ये श्री गुरूस वंदन केले आहे. तसेच अ. १,७,१०,११ व १४ या पाच अध्यायात निराकार परमेश्वरास व गुरूस तीन तीन वेळा नमन केले असून श्री दत्तात्रेयास ६ वेळा तर श्रीकृष्णास १३ वेळा नमन केले आहे. यावरून शहामुनींचे एकनिष्ठ महानुभावीय ईश्वरभक्तीचे तत्व दिसते व ते एकनिष्ठ श्रीक्रुष्णोपासक होते हे पटते.
१ल्या अध्यायापासून १६ व्या अध्यायापर्यंत पूर्वपक्षाचा सिद्धांत दाखवून पूर्वार्ध पूर्ण केला आहे. पुर्वार्धाचा इत्यार्थ हाच आहे की अद्वैत, विशिष्टाद्वैत, शाक्त, सौर , गाणपत्य, चंद्र, सूर्य, पंचमहाभूते, आदी तत्वांचा शास्त्र उपशास्त्रांचा परामर्श घेऊन शहामुनीस जो विषय अभिप्रेत होता त्याचा पुढे १७ व्या अध्यायापासून आरंभ केला आहे.
आता उत्तरार्ध अ.१७ ते ३० या १४ अध्यायाचा आपण विचार करू या. पूर्वार्धात नमनाची जी प्रथा आहे तीच उत्तरार्धाच्या प्रारंभी दिसते. १७ व्या अध्यायाच्या १ ल्या ओवीपासून ते ३१ व्या ओवीपर्यंत पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. १ ल्या ओवीत क्रुपावंत परमेश्वराला आश्रय मागून माहिंभटाने अनुष्ठानानंतर प्राप्त केलेल्या मोक्षदात्या नामाचा अनुभवी जगद्गुरू श्री दत्तात्रेय परमेश्वराचा मुख्य अवतार त्याने माझा अंगीकार करून माझ्या मस्तकी हात ठेवला . त्याच्या क्रुपेने जो बोध झाला तो अनुभव "सिद्धांत बोध" ग्रंथात विस्तारला आहे. ज्या श्रीगुरू आज्ञेने हे केले त्या श्री गुरूस नमन केले आहे. अव्यक्त परमेश्वर , श्री दत्तात्रेय व श्री गुरू या तिघास पूर्वीप्रमाणेच नमन केले आहे.
अ.१८ व १९ मध्ये श्री कृष्णास नमन केलेले आहे. अ. २० मध्ये श्रीदत्तात्रेय सद्गुरूच्या कृपेचा अंकूर माझे ह्रदयी प्रकट झाला असे सांगितले आहे. अ.२१, २२ व २३ मध्ये परमेश्वराचे वर्णन केले असून अ. २४ मध्ये निराकारा सह श्रीदत्तात्रेयप्रभू , श्रीहंसअवतार, श्रीकृष्ण व परमपुरूष ज्यांनी भट्टास उपदेश केला ते श्री चक्रधर या चार परमपुरूषास नमन केले आहे. अ. २५, २६, २७, २८, २९ व ३० या सहा अध्यायाचा आरंभ अव्यक्त परमेश्वराला नमस्कार करून केला आहे.
पूर्वार्धाचे १६ व उत्तरार्धाचे १४ असे एकून ३० अध्याय होतात. यावरून तीसाव्या अध्यायापर्यंत उत्तरार्ध समाप्त होणेच इष्ट आहे. पूर्वार्धात अनेक ठिकाणी खंडन -मंडण व द्वैत -अद्वैत तत्वज्ञानाचा परामर्ष घेतल्याचे अ.१६ वरून लक्षात येईल.
ती परमेश्वराची वचने ।
द्रवतील मुक्त परीची रत्ने ।।
तुम्ही श्रोते चातक होऊन।
वरच्यावरी झेलावी।।१०७।।( सि. बोध अ.१६ )
या ओवीवरून उत्तरार्धात शहामुनीला अभिप्रेत असलेला महात्मपंथाचे प्रतिपादन करून उत्तरार्धाची इतिश्री करायचे अभिप्रेत आहे.
महानुभावीय मुसलमान संत कवी शहामुनी अ.१ ते ३० अध्यायापर्यंत अत्यंत सुलभतेने महानुभावीय तत्वज्ञानातील अन्यव्याव्रत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, असतीपरी, महावाक्य , जीव, देवता, प्रपंच, परमेश्वरादी तत्वज्ञान मांडतात. एकनिष्ठ ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवतात. देव श्री चक्रधर व ब्राह्मण माहिंभट यांच्या संवादातून अध्यात्म ज्ञानाची अत्यंत कुशलतेने उकल करतात. ३० व्या अध्यायात ते म्हणतात-
कृती हंस त्रेती दत्त।
द्वापरी श्रीकृष्ण समर्थ।।
कलीमाजी अनंत।
श्रीचक्रधर नाम माझे ।।६१।।
या श्रीचक्रधर नामाची प्रौढी ।
ज्याचे वाचेमाजी गडबडी।।
तो उभवील मोक्षाची गुढी ।
कली त्यासी बाधीना ।।६२।।
या श्रीचक्रधर नामापुढे।
भूत पिशाच्च पळे बापुडे ।।
देवतांचे विघ्न उडे।
अंगी जोडे ज्ञानकवच ।।६३।। (सि.बोध अ.३० वा)
अशा प्रकारे ३० अध्यायाचा सिद्धांतबोध ग्रंथ रचना करणारे महानुभावीय मुसलमान संत कवी शहामुनी यांनी शहागड येथील गड किल्ल्यातील श्रीचक्रधर स्वामींच्या तीर्थस्थानाजवळ श्री चक्रधर स्वामींचे नामस्मरण करीत आपला देह त्यागला. त्यांचे वंशज मुस्लीम लोक त्या तीर्थस्थानाची परंपरेने आजही सेवा करीत आहेत. आजही शहागड येथील या गडकिल्ल्यातील मंदीरात मुसलमान पुजारी आहेत. काही लोक इतिहास माहित नसल्यामुळे या तीर्थ स्थानाला शहामुनींचा दर्गाह समजतात. परंतु ते श्री चक्रधरस्वामींचे तीर्थस्थान आहे हे वरील विवेचनावरून लक्षात येते.
२) सिद्धांतबोध ग्रंथाचे अ. ३१ पासून ते ५० चे कर्ते हिंदू राजपूत शहामुनी
आपण वर महानुभावीय मुसलमान संतकवी शहामुनी यांच्याबद्दल माहिती घेतली तसेच शहामुनींचे मुसलमान वंशज शहागड येथील महानुभाव देवस्थानाचे पूजारी असून ते आजही तेथे पूजा अर्चना करीत आहेत हे पाहिले. आता या दुसर्या शहामुनीबद्दल आपण माहिती घेऊ या...
सिद्धांतबोध अ.३६ मध्ये दुसरे शहामुनी यांची वंशावळी पुढीलप्रमाणे आहे. अवंती येथील शहाबाबा व त्यांची पत्नी अमिना हे दुसर्या शहामुनींचे पणजे व पणजी. हे शैव उपासक होते. शहाबाबा यांना महाराष्ट्र व फारशी अशी उभयपक्षी विद्या अवगत होती. या शहाबाबाचे पुत्र जनाजी व सून मंडूबाई. पूत्र जनाजीचा जन्म प्रयाग येथे झाला होता व हे विष्णूचे उपासक होते. या जनाजीचे पुत्र मनसिंग व सून अमाताई हे होते. मनसिंग यांचा जन्म सिद्धटेक येथे झाला होता.
हे अन्य देवतग णेश उपासक होते. हे मनसिंग व अमाताई यांच्या उदरी भीमा नदीच्या तीरावरील सरस्वती संगमाजवळ पेडगाव शहरात शहामुनींचा जन्म झाला. शहामुनीचा हा परीवार राजपूत हिंदू होता असे श्री सिद्धेश्वर शास्त्री संपादित "मध्ययुगीन चरित्र कोश" या ग्रंथातील नोंदीवरून सिद्ध होते. अशी माहिती इ.स. १९७२ साली यशवंत प्रकाशन, ७५३, सदाशिवपेठ, पुणे -३० या संस्थेने प्रकाशित केलेल्या "श्री संत शहामुनीक्रुत सिद्धांतबोध " या ग्रंथाचे प्रस्तावनेत संपादक श्री विश्वनाथ केशव फडके यांनी दिली आहे.
श्री विश्वनाथ केशव फडके आपल्या प्रस्तावनेत सिद्धांतबोध ग्रंथातील शेवटचे अध्याय ३१ ते अध्याय ५० असे एकून २० अध्यायामधे मांडलेले अद्वैत तत्वज्ञान ग्रंथकर्त्याचे सारभूत तत्वज्ञान आहे असे सांगतात. त्याचबरोबर त्यांनी मुसलमान शहामुनींशी हिंदू शहामुनींच्या वंशावळीचा संबंधही जोडला आहे. परंतु वस्तूस्थिती भिन्न आहे. वर केलेल्या चिकित्से वरून महानुभावीय मुसलमान संत कवि शहामुनी हे शहागडचे आहेत. तर मनसिंग व अमाताई या राजपूत हिंदू दांपत्याचे उदरी भीमातीरी सरस्वती संगमाजवळील पेडगाव येथे जन्मलेले शहामुनी वेगळे आहेत हे सिद्ध होते.
शहाबाबा, शहा व अमीना या मुस्लीम पद्धतीच्या नावामुळे हिंदू शहामुनी व शहागड येथील महानुभाव पंथीय मुसलमान शहामुनी एकच समजल्या जाऊ लागले व या नाम साम्यामुळे घोटाळा झाला.
शहागडचे महानुभावीय मुसलमान संत कवि शहामुनी हे धर्मांतरीत मुसलमान असल्याची शंका येणे स्वाभाविक आहे. परंतु ते स्पष्टच "अविंधवंशी जन्मलो" असे सांगतात. म्हणजे मुसलमान वंशात जन्मल्याचे सांगतात म्हणून ते धर्मांतरित नव्हते हेही स्पष्ट होते.
मग हिंदू लोकामध्ये शहाबाबा, शहा, अमिना अशी मुस्लीम पद्धतीची नावे कशी ठेवल्या जात ? अशी मनात शंका येणे साहजिक आहे. त्याचे उत्तर असे की त्या काळात हिंदूमध्ये मुसलमानी पद्धतीचे नावे ठेवण्याची प्रथा होती. उदा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडीलांचे नाव शहाजी असे होते. शहाजी व शहाबाबा यातील साम्य लक्षात घेण्याजोगे आहे. पीराला दर्ग्याला नवस केलेले हिंदू लोक त्याकाळी मुसलमानी पद्धतीची मुलांना नावे ठेवत असत.शहाबाबा, शहा, अमीना हे त्याचेच उदाहरण आहे. हसनराव , हुसेनसिंग पिराजी अशी मुसलमान पद्धतीची नावे ठेवण्याची पद्धत हिंदूमध्ये आजही आहे.
शहा, जनाजी, मानसिंग व शहा हे सारेच हिंदू म्हणून त्यांचे उपास्य दैवतेही हिंदू देवता असणे क्रमप्राप्त आहे. या सर्वांचे जन्मस्थान एक नाही. बहुधा ते सर्व सरदारी नोकरीवर असावेत व बदलीनुसार त्यांचे स्थानांतर होत गेले असावे.
याच हिंदू राजपूत शहामुनीने १७ व्या शतकात चांबळी ग्राम पठारी मंडण येथे सिद्धांतबोध ग्रंथातील शेवटचे अ.३१ पासून ते अ.५० पर्यंत २० अध्याय लिहून ग्रंथ पूर्ण केला. व नंतर लेखक भगवान नारायण पांढरकवडे यांनी पाडळी धायगुडे या गावी हे २० अध्याय जोडून ५० अध्यायी सिद्धांत बोध ग्रंथ लिहून पूर्ण केल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा महानुभाव परिषद, लातूर द्वारा प्रकाशित "दोन शहामुनी आणि शास्त्रीय संवाद" लेखक जयतीराज महानुभाव उपाख्य भाऊसाहेब पाटील तोंडोळीकर यांच्या शोध ग्रंथात सापडते.
अ.१ पासून ते अ.३० पर्यंत महानुभावीय मुसलमान संत कवी शहामुनींनी प्रत्येक अध्यायात महानुभावीय प्रथेप्रमाणे श्री क्रुष्ण, श्री दत्तात्रेय , श्री हंस , श्रीगुरू , निराकार चैतन्यापर श्री चक्रधर अनंतास वेळोवेळी नमन केले. ही वंदनाची परंपरा हिंदू शहामुनींनी पुढे पाळली नाही.
अ.३१ पासून ते अ. ५० पर्यंत त्यांनी अद्वैत मताचे प्रतिपादन केले आहे.
अ.३४ मध्ये निर्विकार सद्गुरूस नमन केले आहे.
अ.३५ मध्ये "ओं नमोजी गणनायका,
अ.३६ मध्ये वंदन सद्गुरू स्वामी,
अ.३७ -कोटी अवताराचा मुगूटमनी ।
श्री क्रुष्ण अवतार प्रतापतरणी ।
पांडव दिशापूर्व भूवनी ।
उदैला प्रकाश ब्रह्मांडी ।।१।।
अ.३८-पंढरीस माझे नमन।
घालोनी संताशी लोटांगण।
श्री गुरुचे पाय पाहून।
अर्थ गीतेचा आरंभिला।।१२।।
अ.३९- कबीर माहात्म्य.
अ.४०- आता नमु एकाकी एक।
अवघा आपणची प्रकाशक।
श्रोत्र चक्षु वदन नासिक।
एके अंगी शोभा।।१।।
जाहला ग्रंथाचा सेवट।
आहे तेची बोलीलो स्पष्ट।
अनुभवे उघडीला स्पष्ट।
उठविला लोट ज्ञानाचा।।१८०।।
ग्रंथ समाप्त येथून ।
हर्षे करितो गुरूचे स्वप्न ।
ते परिसावे सज्जन ।
कैसा उपदेश मज जाहला।।२०२।।
एका एकी एक ।
मुनींद्र गुरूचा हस्तक।
प्रकाशला ज्ञानदीपक।
सबाह्य चिन्मय कोंदले।।२०३।।
अ.४१-श्री गुरु वंदीती हरिहर।
तेथे मी काय किंकर।
गुरू अनादी सिद्ध निर्विकार।
म्हणोनी पूज्य सर्वाशी।।
अ.४२- श्री दत्तास नमन।
अ.४३- गणेश सरस्वती श्री गुरु।
एकरूपे आत्मा साचारू।।
अ.४४-आवडी नमू संतसज्जन।
जे जगावर दयावंत पूर्ण।।
अ.४५- ओं नमो निरामया।
अपार अमुपा सुखसागरा ।।
अ.४६- नमू श्री नारायणा ।
गणेश सरस्वती जनी जनार्दना ।।
परिपूर्णा । अंतर्बाह्य तूची।।
अ.४७-ओं नमो ब्रह्मांडकर्त्या --
अ.४८-पूर्वानुसंधान
अ.४९-ओं नमोजी नारायणा।
नामरूपी अवघा तुची।।
अ.५० आला ग्रंथ समाप्तीस ।
श्रोतया ओतला स्वानंदरस।
ऐकोनि कामादीवंत पुरूष ।
ब्रह्मानंदे डुलती ।।२८२।।
एके ताळी सात अगस्थीचा जन्म।
लोपामुद्रेस उपदेश परम।
रावण मंदोदरी संवाद सुगम।
विवेक विचार कथियेला।।२८३।।
बेचाळीसा माझारी।
आनुसया अत्री संवाद कुसरी।।
कौशल्येचे चरित्र भारी।
मदालसा आख्यान लिहिले।।२८४।।
त्रेचाळीस चव्वेचाळीसात।
कथीली गोपीचंद जालंधराची मात।
मत्सेन्द्र गोरखनाथ समर्थ।
त्याचेही अन्वय मांडिला।।२८५।।
पंचेचाळीस भरतास जनकाचा बोध।
धर्म द्रोपदी संवाद।
शुके परिक्षिताचा हरिला खेद।
धर्मास भीष्मे शिकविले।।२८६।।
सेहेचाळीस भरत भेट भीष्म झुंज।
सत्तेचाळीसात कर्दम ऋषीचे चोज।
कपिल अवतार सांगितला साच।
महाराज बोध केला मातेसी।।२८७।।
आठ्ठेचाळिसावा मुख्य कळस।
जैसा मेरूमाथा किंवा वारानसीस।
येने भागिरथीस।
अथवा सुवर्णी कोंदन हिर्याचे।।२८८।।
सर्वात पवित्र आनंदवन।
त्यात सदाशिव विराजमान।
तेवी ग्रंथाचे भूषण।
आठ्ठेचाळीसावा होय की।।२८९।।
या ठिकाणी ४९ व ५० व्या अध्यायाचा उल्लेख असावयास हवा होता तो नाही.
महानुभावीय मुसलमान संत शहामुनींना शहागड येथे श्री दत्ताने "मंत्र कर्णासी फुंकीला (अ.७ओवी१३) असे ते म्हणतात. महानुभावीय मुसलमान संत शहामुनी महाराष्ट्राबाहेर गेल्याचा उल्लेख नाही. परंतु हिंदू शहामुनी यांचा परिवार अवंती, प्रयाग, सिद्धटेक, पेडगाव असे फिरतीवर असल्याचे आपण मागे पाहिले आहे. त्यामुळे हिंदू शहामुनींना श्री दत्ताने वारानसीत उपदेश केला असल्याचे पुढील ओव्यात दिसून येते -
दत्ताचा उपदेश मुनीस।
मुनीने उपदेशीले शहास ।
अवलंबुनी योग्यतेस ।
केली क्रुपा गुरूराये ।।३५४।।
वारानसीत गंगातिरी।
प्रहर रात्र लोटल्यावरी।
आयुष्यमान योग नक्षत्री।
अनुग्रह केला स्वामीने।।३५५।।
महानुभावीय मुस्लीम संतकवी
शहामुनींची साहित्यिकांकडून अवहेलना
-----------------------------------------------
अविंधवंशी अर्थात मुसलमान धर्मात जन्मलेल्या शहामुनींनी महानुभाव पंथाचा स्वीकार केला व हिंदू धर्मशास्त्र वेद, उपनिषद, महाभारत, रामायण, श्रीमद्भग्वद्गीता, पुराणे, लीळाचरित्र, ब्रह्मविद्या आदी शास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्यांनी रचलेला सिद्धांतबोध ग्रंथातील अ.१ पासून ते अ.३० पर्यंत एकेश्वरवाद व द्वैत तत्वज्ञान मताची सुलभ व विद्वत्तापूर्ण केलेली मांडणी पाहून त्यांच्या विद्वत्तेचा, पांडित्याचा व प्रतिभेचा प्रभाव श्रोत्यांवर व वाचकावर पडतो. त्यांच्यानंतर दुसर्या हिंदू शहामुनींनी सिद्धांतबोध ग्रंथातील ३० अध्यायातील द्वैतवादी, एकेश्वरवादी, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वरादी चार पदार्थाचे ज्ञानाशी विपरित अर्थात विरोधी अद्वैतवादी मत प्रतिपादन करणारे अ.३१ पासून ते अ.५० पर्यंत रचना करून ते २० अध्याय मूळ सिद्धांतबोध ग्रंथात सामाविष्ट केले व वैचारिक गोंधळ उडवून दिला आहे. त्यामुळेच आजच्या साहित्य संशोधकाच्या मनात महानुभावीय मुस्लिम संतकवी शहामुनीं विषयी चुकीच्या समजूती निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे शहामुनींवर अन्याय होत आहे असे वाटते.
"महानुभाव पंथ आणि त्याचे वाङमय" या ग्रंथात प्रुष्ठ - ३११ वर शं गो. तुळपुळे लिहितात -
"असा हा ५० अध्यायांचा व सुमारे दशसहस्र ओव्यांचा 'सिद्धांतबोध' ग्रंथ पांगारकरांना 'मराठी भाषेतल्या पहिल्या प्रतिच्या ग्रंथात मोडण्यासारखा ' वाटतो , तर 'महाराष्ट्र सारस्वत ' कार भावे त्याला 'आठरा धान्याचे कडबोळे' समजतात. पैकी दुसरे मतच अधिक बरोबर दिसते . कारण ग्रंथ भाषेच्या व निरूपण पद्धतीच्या द्रष्टीने सरस असला तरी उत्क्रुष्ट साहित्याला अवश्य असणारी जी विचाराची एकता किंवा ऐक्य तेच त्यात नाही. आणि असे होण्याचे कारण म्हणजे ग्रंथकाराचे मतांतर. महानुभावांच्या द्वैताकडून तो वारकरी संतांच्या अद्वैतभक्तीकडे गेला आहे, पंचक्रुष्णांना सोडून तो पंढरिच्या पांडुरंगाकडे वळला आहे. कदाचित हीही त्याच्या व्रूत्तीची एक लहर असेल; कारण देखल्या देवास दंडवत घालणे हा त्याच्या भटक्या मनाचा स्वभावच असावा"
खरेतर देखल्या देवा दंडवत घालने हा शहामुनींवरील आजच्या साहित्य संशोधकाचा आरोप तर मनाला वेदना देणारा आहे. १७ व्या शतकात महाराष्ट्रात मुसलमानी राजवटी होत्या त्यामुळे मुसलमानी प्रभाव समाजात असताना शहामुनी सारखा प्रतिभावान संतकवि हिंदूधर्मांतर्गत महानुभाव पंथाचा स्वीकार करून तत्वज्ञानावर ग्रंथ निर्माण करतो.यातून शहामुनींची ईश्वर प्रतीती, गुरू प्रतीती, आत्मप्रतीती, वैचारिक द्रुढता, निर्भयता व सत्य सांगण्याचे धाडस दिसून येते. असा हा तत्वज्ञानी संतकवी लहरी व देखल्या देवा दंडवत घालणारा लहरी असणे शक्य वाटत नाही. साहित्य संशोधकांनी आपल्या वरील मताचा पुनर्विचार करावा ही नम्र विनंती आहे.
जन्माने मुसलमान असूनही हिंदू धर्मशास्त्राचा सखोल व चिकित्सक अभ्यास करणाऱ्या विद्वान, ज्ञानी, भक्तह्रदयी, संतकवि शहामुनींच्या वाट्याला आलेली ही मानहानी मनाला वेदना देणारी आहे. जर महानुभावीय सांकेतिक लिपीत त्यांनी हा सिद्धांतबोध ग्रंथ लिहिला असता तर कदाचित त्यांनी प्रतिपादन केलेले द्वैत तत्वज्ञान सुरक्षित राहिले असते व आजची ही अवहेलना त्यांचे वाट्यास आली नसती असे वाटायला लागते.
एकंदरीत पाहू जाता सिद्धांतबोध या ग्रंथाची अ.१ पासून अ.३० पर्यंतची रचना महानुभावीय मूसलमान संत कवी शहामुनी यांनी केली आहे व अ.३१ पासून ते अ.५० पर्यंतची रचना हिंदू शहामुनी यांनी केल्याचे आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून सिद्ध होते. मराठी साहित्यात वरीलप्रमाणे दोन शहामुनी झाले आहेत. एकाच नावाने दोन, तीन किंवा चार-चार संत होऊन गेल्याचे मराठी साहित्यात अनेक उदाहरणे आहेत. त्यातलेच हे एक उदाहरण आहे.
संदर्भ ग्रंथ -
१) सिद्धांतबोध ,संपादक, महंत हरिराज उदरभरी
२) सिद्धांतबोध, संपादक श्री विश्वनाथ केशव फडके
यशवंत प्रकाशन,७५३,सदाशिव पेठ, पुणे-३०
३) लीळाचरित्र, संपादक, पुरूषोत्तम नागपुरे
४) दोन शहामुनी व शास्त्रीय संवाद,लेखक
जयतीराज महानुभाव
टीप :-
व्हाट्सअपवर आलेला हा लेख फारच अभ्यासपूर्ण आहे. लेखकाला दंडवत प्रणाम. लेखक महोदयांचे नाव आम्हाला कळले नाही. म्हणून इथे देता आले नाही याचा खेद व्यक्त करतो. तरीही कोणाला लेखकाचे नाव माहीत असेल तर खाली कमेंट करून कळवावे ही विनंती.