संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya
आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 23
कस्यास्ति नाशे? मनसो
हि मोक्षः ।
क्व सर्वथा नास्ति भयं विमुक्तौ ।।
शल्यं परं किं? निजमूर्खतैव
।
के के उपास्याः गुरुदेववृद्धाः ।।२३।।
आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी.. २३
अर्थ..
प्रश्न :- कोण
नष्ट झालं/कोण बाधित झालं असता मोक्ष मिळतो? उत्तर :- मन!
प्रश्न :- सर्वथा
भय कुठे नसतं? उत्तर :- मोक्षावस्थेत..
विमुक्तीत!
प्रश्न :- सर्वात
मोठं शल्य कोणतं? कशाची सर्वाधिक टोचणी लागते? उत्तर :- स्वतःच्याच
मूर्खपणाची!
प्रश्न :- कोणाकोणाची
उपासना करावी? उत्तर :- गुरूंची.. देवाची आणि वृद्ध साधुंची !
चिंतन... मोक्ष.. मुक्ति
म्हणजे सुटका, सोडवणूक..
कोणाची?
तर जो बांधला गेलाय त्याची! का?
तर बांधलं जाण्यामुळं सर्व हालचालींना मर्यादा येतात,
बंधनं करकचून आवळलेली असल्यानं जाचक दुःखद वाटतात...
जिथं बांधली जातात तिथे वळ उठतात,
जखमही होऊ शकते, त्रास होतो म्हणून! पण ही सर्व बंधनं अन्य कुणी सोडवली व आपण मोकळे झालो की
होणारा मुक्ततेचा आनंद अनिर्वचनीय,अवर्णनीय असतो!
मुक्त होण्याची इच्छा कधी होईल?
तर बंधनांची जाणीव होईल, ती बंधन दुःखकारकच आहेत असं अनुभवायला मिळेल तेव्हा!
जीवाला देहाचं बंधन, देहाला मनाचं बंधन, मनाला वासनांचं.. इच्छा आकांक्षांचं.. कामक्रोधादि षड्रिपूंचं.. बंधन!
मुळात सर्वतंत्र, स्वतंत्र असलेला... परब्रह्माचा अंश असलेला..
नित्य बद्धमुक्त असलेला.. जीव. देहाची बंधनं स्वीकारून
जन्माला येतो,
तिथेच दुःखाला सुरवात होते!
पण अज्ञानवश, आपण
दुःखी आहोत, ही
जाणीवच होत नाही. कारण मुक्तिसुखाची चवच मिळालेली नसते.. चाखलेली नसते! दुःखालाच सुख मानून जीवाचे व्यवहार देहाच्या माध्यमातून
चालू असतात! मन जर निर्विषय, निर्विचार, निर्विकार
झालं..
निःसंकल्प, निर्विकल्प झालं तर त्याला अस्तित्वच राहणार नाही! ते आहे
म्हणजे या सार्या गोष्टी आहेत! याच सगळ्या गोष्टी पापपुण्यात्मक कर्म देहाकडून करवून
घेतात.. कर्तृत्वभोक्तृत्वादि अहंकारांना त्या कर्मांच्या बुडाशी ठेवतात आणि मग
त्यांचे सुखदुःखादि भोग वाट्याला येऊन ते भोगण्यावाचून गत्यंतर नसतं!
प्रारब्धकर्मणां भोगात् एव क्षयः। अनेक मनुष्य जन्मातील
कर्मांच्या फळांचं संचित नामक जे गांठोडं.. बोचकं.. त्यातील परिपक्व कर्मफळंच
पुढच्या पुढच्या मनुष्ययोनीत जन्मापासून मरेपर्यंत भोगण्यासाठी वाट्याला येतात व
ती भोगत असतानाच किंवा ती भोगण्यासाठी नवीन कर्मांची प्रवृत्ति होऊन ते संचिताचं
गांठोडं कायम फुगतच राहतं. रिकामं, शून्यवत् होतच नाही!
पण अशाच कुठल्यातरी पुण्यकर्मफलाच्या परिपाकात संतसत्पुरुष
सज्जन भेटून आपण कोण आहोत, इथं का, कशासाठी,
किति काळासाठी आलो आहोत आणि इथून पुढे कुठे जायचंय याविषयी
विचार करण्याची प्रेरणा मिळते, जिज्ञासा जागृत होते..
बंधनांची जाणीव होऊन दुःखाचं खरं मूळ समोर दिसायला लागतं व
बंधनांपासून मुक्त होण्याची इच्छा जन्माला येते.
संत सत्पुरुषांच्याच कृपेनं..
मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः।
बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ।।
ही मुक्ति मिळवण्याच्या..
मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे नेणारी दिशा.. वाट दिसते!
त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते व जीव अमन होण्याचा
प्रयत्न करतो.. सर्वत्र संचारणारं, सतत हवं नको जपणारं मन अक्षय्य सुखाच्या आनंदाच्या लालसेनं जेव्हा हळुहळु एकाच
जागी स्थिर होऊ लागतं.. त्या एकमेवाद्वितीयाचा ध्यास घेऊ लागतं, तसतसं
ते आनंदनिधान हाती येत असल्याचं जाणवू लागतं. खऱ्या शांतीची अनुभूति मिळू लागते!
श्रीमद्भागवतकार संन्यासधर्माचं दिग्दर्शन करताना स्कंध
११मधे १८व्या अध्यायात सांगतात..
अन्वीक्षेतात्मनो बंधं मोक्षं च ज्ञाननिष्ठया।
बंध इंद्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः।।
वरील दिग्दर्शन जरी संन्यासी लोकांसाठी सांगितलं असलं तरी
सामान्य जनांनाही ते तितकंच आवश्यक व उपयुक्त आहे!
जसं परमार्थप्राप्तीसाठी अत्यावश्यक आहे तसंच लौकिक
जीवनातही स्वेच्छेनं, परेच्छेनं, अनिच्छेनंही
स्वीकारलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी साह्यकारीच आहे!
वस्तुनिष्ठ, आत्मनिष्ठ बुद्धीनं आत्मपरीक्षण करून बंधक कोण व बंधविमोचक
कोण याचा विचार केला तर लक्षात येईल की इंद्रियांची ओढ जशी विषयांकडे अनिर्बंध
असते तशीच एकदा मिळालेल्या सुखाची चटक लागल्यावर अधिकाधिक सुखाच्या हव्यासापोटी
मनच इंद्रियांना तिकडे पिटाळतं.. कर्मप्रवण करतं!
इंद्रियांवर संयम,नियंत्रण हाच मोक्षाकडे नेणारा मार्ग असतो व त्यासाठी
मनःसंयमन हाच एक उपाय असतो! देहरूप रथाला जोडलेल्या इंद्रियरूप अश्वांचे मनरूपी लगाम
बुद्धिरूपी सारथ्याच्या हाती असून आत्मारूपी स्वामीच्या आदेशाप्रमाणे तो रथ
सारथ्यानं चालवायचा असतो.. मनाचे लगाम सैल सोडून रथ इंद्रियांच्या इच्छामर्जीवर ठेवला
तर त्याची धूळधाण उडेल व आत्म्याची
परमात्म्याकडे जायची गति व दिशा संपुष्टात येईल!
अनिवार ओढी असलेल्या मनाला विवेकानं संयमित केलं तरच प्राप्य
वस्तूचा लाभ होईल..
मोरोपंत म्हणतात ना
मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनीकडे धावे
यास्तव विवेकपाशे कंठी वैराग्यकिष्ठ बांधावे।।
सैरावैरा धावणार्या मनरूपी गुराच्या गळ्यात विवेकरूपी
लोढणं बांधलं तरच त्याची गति रोधता येईल.. विषयरूपी चिखलात ते रुतवायचं की जीवशिवाच्या आनंदरूप गंगा यमुनांच्या
संगमाकडे वळवायचं हे ठरलं पाहिजे. मोक्षमुक्ती तिथेच आहे.. शांति तिथेच आहे.. पण त्यासाठी मन
अमन व्हायला हवं.. म्हणजेच मनाचा बाध व्हायला हवा.. नाश व्हायला हवा!
अशी अमन अवस्था झाली तरच भय, तज्जन्य चिंता इ. नष्ट होतील.. सगळ्या विषयांमधे जोपर्यंत मन अडकलेलं राहील तोपर्यंत ते
मिळवण्याच्या प्रयत्नातून भय निर्माण होईल, मिळालेले विषय टिकतील का, त्यापासून दीर्घकाळपर्यंत सुखप्राप्ती होईल का ही चिंता
मनाला पोखरत राहील! पण विषयांपासून मन सुटं केलं, त्यांच्या बंधनातून मन मोकळं केलं की जन्ममृत्यूच्याही
भयापासून जीव मुक्त होईल!
निःस्पृहस्य तृणं जगत् या न्यायानं सर्व काही कस्पटासमान वाटून जीव भयमुक्त होईल!
पण त्या ऐवजी विषयांचं मूळ स्वरूप समजून न घेता,
खर्या सुखाची.. आनंदाची यथार्थ जाणीव करून न घेता मन
इकडेतिकडे जर भरकटू लागलं तर तो मूर्खपणाच ठरेल.. अशा मूर्खपणाच्या कृतीतून
पश्चात्तापच वाट्याला येईल व दुःखसागरात जीव गटांगळ्या खात बसेल...
जन्ममरणाच्या चक्रात फिरत बसेल!
ते टाळायचं असेल तर गुरूंची.. खर्या देवाची.. परब्रह्माची
उपासना करणंच हिताचं ठरेल.
ती करत असताना अंवतीभंवतीच्या वृद्धांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही! वयोवृद्ध.. ज्ञानवृद्ध.. तपोवृद्ध अशांचे अनुभव हे गुरूंची, देवांची, परब्रह्माची उपासना,भक्ति, सेवा करायला अतिशय चांगले मार्गदर्शक व साह्यकर्ते असतात! सामान्य क्षुद्र कामनांची पूर्ति करायची तरी तदनुकूल देवांची आराधना करावी लागते कारण माणसाच्या बुद्धीला, इंद्रिय सामर्थ्याला, मनबुद्धीला, विचारशक्तीला काही मर्यादा असतात. अशावेळी वृद्धांचे अनुभव उपयोगात येतात!
सर्वद्वंद्वातीत, त्रिगुणातीत परब्रह्म परमात्म्याची ओळख, प्राप्ति, त्याच्याशी सात्म्य घडून येणारी मुक्तावस्था ही केवळ सद्गुरुकृपेनं, त्यांनी करवून घेतलेल्या योग्य साधनेनं, उपासनेनं, भक्तीनंच मिळते! म्हणून आचार्यांनी प्रथम क्रमांकावर गुरूंची उपासना ठेवली असून अशक्त वृद्धांचीही उपासना आवश्यक असल्याचं सुचवलंय! देवाचे हे मीपणानं आकळत नाही त्यासाठी त्याचं ज्ञान नित्य नवीन, ताजं.. टववीत ठेवणार्या युवा गुरूंचं मार्गदर्शन हवं व शिष्य हा प्रदीर्घ साधनेनं वृद्ध रहायला हवा..
वृद्धाः शिष्याः गुरुर्युवा
..तरच
गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तु
च्छिन्नसंशयाः
हे घडेल.. मन मरेल, मुक्तिजन्य अभयता प्राप्त होईल व स्वतःचा मूर्खपणा संपून जीव शल्यहीन होईल.. सुखसंपन्न होईल!
लेखक :- श्रीपादजी केळकर (कल्याण)