आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 22 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 22 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya 

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 22 

किं मंडनं? साक्षरता मुखस्य

सत्यं च किं? भूतहितं सदैव।

किं कर्म कृत्वा ? न हि शोचनीयं

आत्रेय कंसारि समर्चनाख्यम् ।।

आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..२२

अर्थ..

प्रश्न :- मुखाची शोभा.. मुखाचं मंडण कशात आहे? उत्तर :- विद्वत्तेत!

प्रश्न :- सत्य.. सत्कर्म म्हणजे काय? उत्तर :- नित्य भूतमात्रांचं हित!

प्रश्न :- कोणतं कार्य.. कर्म केलं असता शोक पश्चात्ताप करायला लागत नाही? उत्तर :-  आत्रेय(श्रीदत्तात्रेयप्रभु महाराज) आणि कंसारि (श्रीकृष्ण) यांची पूजा..भक्ति!

चिंतन.. आपण नित्य सुंदर दिसावं.. आपला प्रभाव इतरांवर पडावा.. आपल्याला सर्वांनी चांगलं म्हणावं असं सर्वच स्त्रीपुरुषांना वाटत असतं. त्यासाठी सर्वजणच चेहर्यावर चूर्णलेपरंगरोपणादिक सौंदर्यप्रसाधनांचा मारा करतात.. विविध प्रकारचे सोन्याचांदीचे अलंकार वापरतात... तऱ्हे तऱ्हेचे रंगीबेरंगी.. विविध रंगसंगतीचे.. आकारप्रकारचे कपडे परिधान करतात! पण देहाच्या या बाह्य सजावटीवर पाणी पडतं ते माणसांनी तोंड उघडलं की!

कारण त्यांच्या तोंडून दुसऱ्यावर चांगला प्रभाव.. चांगली छाप पडेल असं काहीच कानावर पडत नाही... तर्कदुष्ट विधानं, बेतालबेसूर असंबद्ध बडबड यावरून त्या स्त्रीपुरुषांचं चरित्र, त्यांचे स्वभाव, त्यांची नियत, दानत यांचं नेमकं दर्शन घडतं.. पण जो खरा ज्ञानी आहे.. आपल्या विषयातलं साद्यन्त, अद्ययावत ज्ञान ज्याच्याकडे आहे, त्याच्या डोळ्यातून त्या ज्ञानाची, ज्ञानातून येणाऱ्या आत्मविश्वासाची चमक दिसते व अंतरंगापुढे बाह्यरंग फिकं पडत जातं!

आचार्यांनी साक्षरता शब्द वापरलाय.. अक्षर म्हणजे जे क्षरण पावत नाही.. नष्ट होत नाही.. असं अक्षर ज्याच्या अधीन आहे.. अक्षरानं जो युक्त आहे. तो साक्षर! सामान्यतः साक्षर म्हणजे ज्याला स्वतःचं नाव लिहिता वाचता येतं.. सही करता येते तो! पण इतक्याच अक्षरज्ञानावर तो साक्षर उलटतोही व राक्षस बनतो! साक्षर.. राक्षस! आचार्यांना असा साक्षर अभिप्रेत नसून.. अक्षर.. नित्य.. निरंतर असणारा भगवंत ज्याच्या जवळ आहे.. असा साक्षर.. भगवद्भक्त अभिप्रेत हे.. असा भगवद्भक्त बाह्य अलंकार, वस्त्रप्रावरणं, चेहऱ्याची रंगरंगोटी या वाचूनही छान दिसतो.. त्याच्या डोळ्यात भगवंत नाचताना दिसतो..

अनंताला नजरेत सामावून घेण्यासाठी उत्सुक असलेले त्याचे डोळे हेच त्याच्या मुखाचं खरं मंडण.. खरी शोभा! हीच मोक्षकरी विद्यायुक्त विद्वान असा तोच शोभून दिसतो.. असा आचार्यांचा अभिप्राय आहे! वेष असावा बावळा परि अंतरी असाव्या नाना कळा। असं एक वचन आहे.. नाना कळा एकवेळ नसल्या तरी भगवंत मिळवण्यासाठी जी उरात एकच कळ.. भक्तीप्रेमाची.. ती असली तरी सर्व मुख उजळून निघेल! यद्भूतहितमत्यंतं तत्सत्यम्। अशी महाभारतात सत्याची व्याख्या केली गेली आहे..

नुसतं सत्य स्वीकारून चालत नाही तर त्या सत्याला अनुसरून माणसाचं कर्म व्हायला हवं.. म्हणून आचार्यांनी सत्य काय याचं उत्तर "भूतहितं सदैव" असं दिलं असलं तरी त्यात कृतीचा.. कर्माचाही समावेश आहे! सत्याच्या व्याख्येत भूतांचं अत्यंत हित असा जो उल्लेख आहे.. तो सर्वसमावेशक आहे.. प्राणिमात्र, मनुष्यमात्र, पंचमहाभूत असा विशिष्ट वा मर्यादायुक्त उल्लेख नाही! जे जे म्हणून जन्माला आलं.. सृष्ट झालं त्या प्रत्येकाचं अंतिम,आत्यंतिक हित ज्यात आहे ते "सत्य" असा अर्थ तिथे अभिप्रेत आहे..

यत् सृष्टं/दृष्टं/जातं तन्नष्टम् हा प्रकृतिचा नियम आहे.. ते नष्ट होऊन पुन्हा सृष्ट होणं हाही प्रकृतीचाच नियम आहे.. पदार्थाच्या, शक्तीच्या, ऊर्जेच्या अविनाशित्वाचा नियम व तिच्या अवस्थांतराचा, रूपांतराचा नियम आजचं आधुनिक विज्ञानही स्वीकारतं.. मांडतं! पण त्यातल्या मनुष्य या बुद्धि.. धर्म यांनी युक्त अशा जीवमात्राचा विचार करायचा झाला तर पुनरपि जननं पुनरपि मरणम् किंवा जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च

अशा प्रकारे.. ज्ञानेश्वरमाउलींच्या शब्दात सांगायचं तर घटिकायंत्रासारखं... जन्ममृत्युरूप चक्रात  फिरत राहणं एवढंच त्याचं जीवनसर्वस्व नाही.. आचार्यांनीच या प्रकरणाच्या सुरवातीच्या एका श्लोकात म्हटलंय की जो पुन्हा जन्माला येत नाही तोच खरा जन्मला व जो पुनःपुन्हा मरत नाही तोच खर्या अर्थानं मेला! ते जे परम सत्य आहे... ज्याला व्यासमहर्षि श्रीमत् भागवताच्या प्रारंभीच मंगलाचरणात नमन करतात..

आपल्या बुद्धीचा तो विषय व्हावा अशी "सत्यं परं धीमहि" अशा शब्दात प्रार्थना करतात.... त्या सत्यात माणसाच्या जीवाचा लय व्हावा व त्याचसाठी अत्यावश्यक असलेली कर्मं आयुष्यभर त्याच्याकडून व्हावीत..घडावीत असा आचार्यांचा "भूतहितं सदैव" या उत्तरात अभिप्राय असावा! म्हणूनच शेवटच्या प्रश्नात ते विचारतात की असं कोणतं कार्य..कर्म आहे की जे केल्यानंतर माणसाला शोक करावा लागत नाही?..

पश्चात्ताप करावा लागत नाही? भविष्यातल्या गोष्टींबद्दल चिंता वा भय निर्माण होत नाही?वर्तमानातल्या गोष्टींबद्दल मोह निर्माण होत नाही? त्या प्रश्नाचं उत्तरही तेच देतात.. की आत्रेय म्हणजे श्रीदत्तात्रेय प्रभुमहाराज व कंसारि म्हणजे श्रीकृष्ण भगवंत यांचं समार्चन नावाचं कर्म!

श्रीदत्तात्रेय महाराज हे ज्ञानवैराग्यरूप आहेत.. त्यांची उपासना करणंत्यांची भक्ति करणं हे एक कर्म आहे. किंवा.. कंसारि श्रीकृष्ण जे, परब्रम्ह परमेश्वराचे साकार रूप आहे त्यांची भक्ति करणं हे दुसरं कर्म आहे.. भगवान श्रीकृष्ण हेही ज्ञानस्वरूपच आहेत.. म्हणून तर त्यांनी अर्जुनाला ज्ञान दिलं.. ज्ञानी असलेल्या उद्धवाला ज्ञानाची परिसमाप्ति ज्यात होते त्या भक्तीचं.. प्रेमाचं ज्ञान दिलं... गोपींकडे पाठवून!

भगवान श्रीकृष्ण केवळ ज्ञानस्वरूपच होते असं नाही तर मूर्तिमंत वैराग्यही होते..तसे ते नसते तर सोळाहजार एकशे आठ जणींमधे अडकले असते, गोपींमधे अडकले असते.. पण तसं झालं नाही!  उलट गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा  अशा वृत्तीनं ते राहिले.. कुठेही आसक्त राहिले नाहीत... ना कुणाचा द्वेष केला ना कुणाला विशेष प्रिय म्हणून जवळ केलं...

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन।

नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि।।

असं म्हणत अनासक्तवृत्तीनं कर्म करीत राहिले... का? तर लोक अकर्मण्य वृत्तीचे होऊ नयेत म्हणून!... यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः या न्यायानं! आचार्यांनी दोन्ही पर्याय दिले आहेत.. ज्यानं त्यानं आपली प्रकृति, स्वभाव, आवड ओळखून श्रीदत्तात्रेय महाराज व श्रीकृष्णभगवंत या दोन परमेश्वर अवतारांची भक्ति, उपासना करावी.. ते ते कर्म स्वीकारावं असं त्यांना सुचवायचं आहे!

न हि ज्ञानात् ऋते मोक्षः! या वचनाचा अनुभव घ्यायचा असेल तर शोक करावा लागणार नाही असं श्रीकृष्णांचं समार्चन..सम्यक् अर्चन करावं असं आचार्यांना सुचवायचं आहे! कंस हा अहंकाराचं प्रतिक आहे व काम हा अहं आहे म्हणूनच अस्तित्वात येतो.. या दोघांमुळे शोक मोह भय चिंता यांचा त्रास माणसाला होतो.. भागवतात शोक मोह भयापहा असं ज्या भक्तीचं वर्णन केलंय तिचाच एक प्रकार अर्चन असा आहे. आचार्यांनी योजलेल्या समार्चन या शब्दात प्रह्लादाच्या मुखातून वर्णिलेल्या

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।

अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।।

या नऊही प्रकारांचा समावेश होतो! ज्याला जिची आवड, अनुकूलता असेल त्यानं ती भक्ति करावी व अंततो गत्वा परम सत्यात विलीन व्हावं.. तिथेच त्याचं आत्मनिवेदन व्हावं! तीच खरी विद्वत्ता! तीच भक्ती, तीच उपासना, तीच विद्वता आपल्या मुखावर खरी शोभा.. खरं मंडन.. खरं तेज आणील!!

 श्रीपादजी केळकर (कल्याण)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post