आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 21 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 21 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya 

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 21

शत्रोर्महाशत्रुतमोऽस्ति को वा?

कामः सकोपानृतलोभतृष्णः!

न पूर्यते को विषयैः? स एव!

किं दुःखमूलं ममताभिधानम् !

आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी...२१

अर्थ..

प्रश्न :- सर्व शत्रूंमधला सर्वात बलवान शत्रु कोणता? उत्तर :- क्रोध, असत्य, लोभ व तृष्णा यांनी वेढलेला काम!

प्रश्न :- अनेक विषय पुरवूनही कुणाची पूर्ति करता येत नाही? उत्तर :- त्याचीच... कामाची!

प्रश्न :- सर्व दुःखांचं मूळ कशात आहे? उत्तर :- ममता..माझेपण या नावाच्या भावनेत!

चिंतन... खरं तर कुणीही कुणाचा शत्रु नसतो वा मित्रही नसतो! कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवोऽपि वा! कोणत्या तरी कारणानं.. निमित्तानं माणसं एकमेकांची काही काळ शत्रु वा मित्र बनतात! राजकारणात तर कुणीच कुणाचा कायमचा शत्रु वा मित्र असत नाही असं नीतीप्रधान राजकारण करणारे पक्षही आजकाल सांगतात! राजकारण.. आजकाल जे चालू आहे ते.. पाहून हा वेश्यांचा खेळ आहे असंच वाटतं व "वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा" हे भर्तृहरीचं विधान अधिकाधिकपणे स्पष्ट होत चाललंयसं, पटत चाललंयसं दिसतं!

पण शत्रूंचे मित्र होणं व मित्रांचे शत्रु होणं हे जे काही चालतं त्याचं एकच कारण "काम"! समानशीलव्यसनेषु सख्यम् । ज्यांचं समान व्यसन (मराठीतल्या अर्थानंही!) संकट आहे वा ज्यांचे समान स्वभाव आहेत अशांमधे मैत्री होते.. असं एक सामान्य निरीक्षण नोंदवणारं वचन आहे! तिथेही सख्य जुळायला "काम"च कारणीभूत होतो. मैत्री एकवेळ कुणाशी जुळली नाही तरी चालेल पण शत्रुत्व कुणाशीही नसावं!

क्षुद्र विषयांवरून झालेले हलकेसलके सामान्य शत्रु परवडतात कारण कालांतरानं ते शत्रुत्व विसरतात! पण महाशत्रु जन्मोजन्मी वैर सांभाळून ठेवणारे असतात! तेही एकवेळ परवडले.. ते जर ऐहिकातलंच नुकसान करणारे असले तर!! पण महाशत्रुतम... जे जन्मोजन्मी भगवत्प्राप्तीपासून जीवाला दूर लोटतात.. ठेवतात.. ते कधीच परवडण्यातले नसतात! कारण हे शत्रुत्व क्रोधसमन्वित कामातून आलेलं असतं!

काम एष क्रोध एषः रजोगुणसमुद्भवः।

महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्।।

असा अर्जुनाला गीतेच्या ३ अध्यायात श्रीकृष्ण भगवान उपदेश करतात व यांच्या पासून सावध रहायला सांगतात! काम व क्रोध हे महाखादाड व महापापी असे वैरी असल्याचं स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात! १६व्या अध्यायात तर या पुढचा इशारा ते देतात..

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ।।

ज्ञानेश्वरमाउलीनं यांना व्याघ्र, मांग अशी विशेष दूषणं दिली आहेत... नरकाची तीन द्वारं आहेत.. काम, क्रोध आणि लोभ! त्यांचा त्याग व्हायला पाहिजे! काम एकटा कधीच रहात नाही... पुरवला गेला नाही तर त्याच्या पोटी क्रोध जन्मतो व पुरवला गेला तर लोभ मद मत्सर ही भावंडं जन्माला येतात! अहम् चीच ही सगळी पिलावळ! मोह सर्वात वडील! अहम् ला सुखमोह होऊनच विषयसंग जडून कामादींचा जन्म होतो..

पुढे प्रणाशापर्यंत ती अनर्थपरंपरा जाऊन पोहोचते! कामाच्या पूर्तीसाठी असत्याची.. अनृताची जोड घेतली.. साथ घेतली.. मदत घेतली की अनर्थांच्या खाईतच जीव लोटला जातो... लोभो मूलमनर्थानाम् असं म्हणतात कारण हा लोभच खरं तर विषमतेला जन्म देतो! तृष्णा, पिपासा, क्षुधा, वखवख ही सगळी लोभाचीच विविध रूपं.. सोंगं! कुठून कशी डोकावतील ... प्रकट होतील.. सांगता येत नाही!

कामाचं वैशिष्ट्य म्हणजे कितीही विषय त्याच्या मुखी दिले तरी त्याचं समाधान तर होत नाहीच.. उलट तो अग्नीत तेलतूप घालून तो जसा अधिक उफाळतो.. प्रज्वलित होतो तसा काम वाढतच राहतो!... ययातीला खूप उशीरा कळलं... मुलाकडून आपल्या वार्धक्याच्या मोबदल्यात तारुण्य घेऊन दीर्घकाळपर्यंत बरेच उपभोग घेतल्यानंतर! उपरति झाल्यावर त्यानं निमूटपणे स्वीकारलं की..

न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति।

हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते।।

म्हणून त्यानं आणखी एक सावधानीचा इशारा दिला..

मात्रा स्वस्रा दुहित्रा वा नैकशय्यासनोभवेत् ।

बलवानिंद्रियग्रामः विद्वांसमपि कर्षति।।

नाविविक्तासनो आई, बहीण वा मुलगी कोणीही असो... त्यांच्या बरोबर एका आसनावर.. शय्यासनावर बसू नये... काम हा इतका बलवान असतो की तो विद्वानालाही नात्या - गोत्याचा विचार न करता फरफटत नेतो! काम कसा सतत जीवाला अस्वस्थ, अशांत ठेवतो ते एका सुभाषितातून छान दाखवलंय !

जामाता जठरो जाया जातवेदो जलाशयः ।

पूरिता नैव पूर्यंते जकाराः पंच दुर्भराः ।।

जावई, जठर..पोट, जाया.. पत्नी, जातवेद.. अग्नि, जलाशय हे पाच जकार कधीही पूर्णपणे भरता येत नाहीत.. यातले तीन मानवी जीवनातले स्वभावसूचक तर दोन निसर्गातले दृष्टांतसूचक! पूर्णपणे भरले जाऊ शकत नसल्यानं जावई.. जामाता सदा क्रूर, वाकडा असा कन्याराशीला लागलेला दहावा ग्रह! जाया.. बायको नित्य असमाधानी, अशान्त, नवऱ्याला नाचवणारी आणि जठर..पोट सदैव भुकेनं वखवखलेलं..

किति त्या पोटात रिचवलं गेलं असेल पत्ताही लागत नाही.. तरीही पोटातली भुकेची आग शमवायला काय करायला लागत नाही? असा हा क्रोध लोभ असत्य आणि तृष्णाक्षुधेनं वेढलेला काम अहंताजन्य असतो.. अहंता असते म्हणूनच ममत्व.. ममता यांना अस्तित्व मिळतं. ममत्वानं सर्व वस्तुपदार्थव्यक्तींचा संग्रह करण्याची वृत्ति निर्माण होते.. बरंच काही जवळ असलं तरी त्यातलं थोडंसंही जरी दुरावलं.. गेलं.. नाहीसं झालं तरी जीव व्यथित होतो, दुःखी होतो!

वस्तुतः संसारातला कोणताही पदार्थ, वस्तु, घटना व्यक्ति बाधक नाही, पण ममत्वामुळे जीव त्यांच्याशी बांधला जातो.. परमार्थात आड जर काही येत असेल तर ही ममताच.. हे ममत्वच! ते जीवाला वा जीव त्याला सोडत नाही तोपर्यंत जीव परमात्म्याशी.. परब्रह्माशी जोडला जाणं.. त्यात मिसळून जाणं केवळ अशक्य! अर्थात त्यामुळे सुखानंदाची अनुभूतिसुद्धा अशक्य! जीवशिवाचं ऐक्य न व्हायला हे अज्ञानजन्य ममत्वच कारणीभूत ठरतं व नित्यसुखाचा अधिकारी जीव दुःखभोगांच्या सापळ्यात अडकतो!

श्री.  श्रीपादजी केळकर (कल्याण)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post