संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit
मुहूर्तमपि सप्रज्ञः पण्डितं पर्युपासते!
स वै धर्मं विजानाति जिह्वा सूपरसान्निव!!
सुभाषितरत्नभाण्डागारम्
जिह्वा सूपरसान् इव ( ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते)
(त्याप्रमाणे)
सप्रज्ञः ( बुद्धिमान् माणसानं)
मुहूर्तम् अपि ( क्षणभर जरी)
पण्डितम् ( विचारी माणसाच्या )
पर्युपासते ( सेवा केली, संगतीत राहिला) तर
सः ( त्याला)
धर्मं (योग्य गोष्टी)
विजानाति ( समजतात).
पण्डा म्हणजे बुद्धी. ती ज्याच्याजवळ असते तो पण्डित.
अर्थातच ही फक्त गणिती बुद्धी नाही, तर सारासार विचार. अशा व्यक्तीच्या सहवासात जर प्रज्ञावंत,
बुद्धिमान् व्यक्ती क्षणभर जरी राहिली तरी तिला योग्य काय
आणि अयोग्य काय हे समजते. जिभेकडे
रस ओळखण्याची क्षमता असते तशीच बुद्धिमान माणसाकडे बुद्धी असल्यामुळे पंडितांच्या
वागणुकीतून चांगलं काय आणि वाईट काय ते समजते. उदा. पंडितांच्या घरी सप्रज्ञ माणूस
गेला असताना जर एखादा दुःखी माणूस आला, तो पैशांच्या अडचणीत होता. पंडितांच्या हे समजल्यावर त्याचं
सांत्वन करून त्याला आर्थिक मदत केली. हे जर त्या सप्रज्ञ व्यक्तीनं पाहिलं तर अशा
परिस्थितीत कसं वागावं यांचं ज्ञान त्याला होईल. बुद्धिहीनाच्या ही गोष्ट लक्षातच
येणार नाही. पळीला आमटीची चव कशी समजेल? कारण तिच्याकडे रस ओळखण्याची क्षमताच नाही.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी
===================
सुभाषित दुसरे :-
सुभाषित
रसग्रहण -
वासः खण्डमिदं
प्रयच्छ यदि वा स्वाङ्के गृहाणार्भकम्!
रिक्तं भूतलमत्र नाथ भवतः पृष्ठे पलालोच्चयः!
दम्पत्योरिति जल्पितं निशि यदा चौरः
प्रविष्टस्तदा!
लब्धं कर्पटमन्यतस्तदुपरि क्षिप्त्वा
रुदन्निर्गतः!!
शार्ङ्गधरपद्धति
इदं वासःखण्डं प्रयच्छ ( हा फडक्याचा तुकडा दे ना),
यदि वा ( किंवा)
अर्भकं ( बाळाला)
स्वाङ्के ( स्व + अङ्क आपल्या मांडीवर)
गृहाण ( घे).
नाथ, अत्र ( इथे)
भूतलं रिक्तम् ( जमिनीवर थोडी जागा आहे. )
भवतः पृष्ठे (तुमच्या मागे)
पलालोच्चय:
(गवत गोळा करून ठेवलंय) .
यदा ( जेव्हा)
चौरः ( चोर)
निशि ( रात्री)
प्रविष्टः ( प्रवेशला)
तथा ( तेव्हा)
दम्पत्योः इति जल्पितं ( नवरा बायकोचं रात्रीचं हे संभाषण ऐकून)
अन्यतः लब्धं कर्पटं (दुसरीकडून मिळालेलं फडकं)
तदुपरि ( त्याच्यावर)
क्षिप्त्वा ( फेकून)
रुदन् ( रडत )
निर्गतः ( निघून गेला).
संस्कृत साहित्य राजेरजवाड्यांभोवती फिरत असल्यामुळे
सामान्यतः दारिद्र्याचं वर्णन विरळाच. मृच्छकटिकात गरीब झालेल्या चारुदत्ताच्या
तोंडी'
दारिद्र्याहुनि मजला मित्रा मरण बरे वाटते'
या अर्थाचा श्लोक वगळता दारिद्र्याचं वर्णन नाही. पहिल्या
शतकातली गाथा सप्तशती आणि जातककथा सामान्यांचं जीवन चित्रित करत असल्यामुळे या
ग्रंथांमध्ये गरीब लोकांचं वर्णन येतं. हा श्लोक कुणी लिहिला,
त्याचा संदर्भ काय इ. प्रश्र्नांची उत्तरं अनुत्तरितच
रहातात. परंतु, मन
हेलावून टाकणारं वर्णन केलं आहे.
रात्री चोरी करण्याच्या उद्देशानं चोर एका घरात शिरला.
त्याच्या कानावर नवरा बायकोचं संभाषण पडलं. दोघांमध्ये मिळून अंगावर लाज
झाकण्याएवढंच एकच फडकं. नवरा म्हणतो, "मला ते फडकं दे आणि तू बाळाला मांडीवर घे'.
झोपडीत / गोठ्यात जागा तरी केवढी असणार?
मला मोठा गवताचा भारा कोपऱ्यात ठेवला होता. त्याच्या पुढे
थोडीशी जागा. तिथं बैस असं बायको नवऱ्याला सांगतेय. हे संभाषण कानी पडल्यावर त्या
चोरानं दुसरीकडून चोरून आणलेलं फडकं त्यांच्यावर फेकलं आणि रडत रडत तिथून निघून
गेला.
प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात फक्त सोन्याचा धूर निघत
नव्हता. अन्न्, वस्त्र
आणि निवारा या प्राथमिक गरजाही पूर्ण न होण्यासारखं दारिद्र्य चौदाव्या शतकात
भारतात होतं याचं निदर्शन प्रस्तुत श्लोकात आहे. शार्ङ्धरपद्तीमधले श्लोक १४ व्या
शतकात संग्रहित केले आहेत.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी
(पुणे)