संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya
आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 16
ज्ञातुं न शक्यं च किमस्ति सर्वैः?
योषिन्मनो यच्चरितं तदीयम् !
का दुस्त्यजा सर्वजनैः? दुराशा!
विद्याविहीनः! पशुरस्ति को वा?
आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी.. १६
अर्थ..
प्रश्न :- सर्व लोकांना काय जाणणं अशक्य आहे? उत्तर :- स्त्रीचं मन.. अंतःकरण आणि तिचं चरित्र!
प्रश्न :- सर्व लोकांना कशाचा त्याग करणं अशक्य आहे? उत्तर :- वाईट वासनांचा.. इच्छांचा!
प्रश्न :- पशु कोणाला म्हणावं? उत्तर :-
जो विद्याविहीन आहे.. सद्विद्या न शिकलेल्याला!
चिंतन..
जग अनेक गूढ, गहन, रहस्यमय गोष्टींनी भरलेलं आहे.. पंच महाभूतातल्या प्रत्येक महाभूताला हे लागू आहे!
काही रहस्यांची उकल वैज्ञानिकांनी.. शास्त्रज्ञांनी
केलीसुद्धा आहे.. काहींची उकल व्हायची आहे! भविष्यकाळात होईलही !!
पण आचार्यांना सर्वात रहस्यमय,
गूढ, गहन जर काही वाटत असेल तर ते म्हणजे स्त्रीचं अंतःकरण..
मन आणि तिचं चरित्र!
स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यं देवो न जानाति
कुतो मनुष्यः? असं एक वचन फार पूर्वीपासून ऐकिवात आहे! पुरुषाचं भाग्य व
स्त्रीचं चरित्र देवांनाही दुर्ज्ञेय आहे असं त्या दोन्ही गोष्टींना समान लेखून
म्हटलंय. पण आचार्य स्त्रीच्या मनाला व चारित्र्याला गहनतेच्या
बाबतीत पुरुषाच्या भाग्याहूनही थोरपणाचा मान देतात. मुळात निसर्गतः स्त्री संकोची,
लज्जावती, सहनशील अशीच आहे. तिच्यावर संततिसंभवाची, संततिसंवर्धनाची
अवघड जबाबदारी असल्यानं तिच्या मनाची तशी जडणघडण झाली असेल!
काही संस्कार रक्तातून..
आनुवंशिकतेतून येतात.. काही पूर्वकर्मभोगांसाठी येतात..
काही शिकवावे लागतात तर काही स्वतःच शिकायचे असतात..
व्यक्तिमत्वविकासासाठी!...
स्त्रीकडून अपत्याला काही संस्कार तिच्या व पतीच्या
रक्तातून मिळतात व काही संस्कार तिनं गर्भधारणा झाल्याची जाणीव झाल्या
क्षणापासून.. तिच्या मानसिकतेवर तसंच तिच्या आसपास असणार्या वातावरणातून
मिळतात!...
काही संस्कार मूल स्तनपान करीत असे पर्यंत आपल्या दुधातून व
काही संस्कार ते मूल अंगावरून सुटल्यानंतर त्याला समज येईपर्यंत द्यायचे असतात.
त्यासाठी ती स्वतःसुद्धा संस्कारी असली पाहिजे! ज्या
बीजातून अपत्यसंभव होणार असतो त्यातील संस्कारांना आपलं रक्तमांस देऊन रुजवणं..
वाढवणं.. बळकट करणं हेही स्त्रीलाच करावं लागतं.
यासाठीच तिला स्वतःला फार सावध रहायला लागतं व स्वतःच्या
मनाला नियंत्रणातही ठेवावं लागतं!
मनातले विचार,भावना वाटेल तेव्हा वाटेल त्या पद्धतीनं वाटेल त्याच्यासमोर
प्रकट करून चालत नाही! या दृष्टीनं तिचं अंतःकरण हे समजायला कठीणच असतं.
म्हटलं तर ती गरीब गाय असते पण वेळ आली तर
महिषासुरमर्दिनी.. दुर्गाही होऊ शकते. अपत्याच्या कल्याणासाठी त्या त्या परिस्थितीला आवश्यक व
अनुकूल अशी रूपं तिला घ्यावी लागतात म्हणून तिचं अंतःकरण समजायला कठीण.. गूढ,
गहन असतं! मातृत्व ही स्त्रीत्वाची परिपूर्णता आहे पण मातृत्व व
स्त्रीत्व या दोन्हींचा सांभाळ ही तारेवरची कसरत आहे!
या गोष्टी फेकून देणं बुद्धिवाद,
विज्ञाननिष्ठा, तत्कालीन परिस्थितीची गरज
यांच्यामुळे एकवेळ सोपं असेलही कदाचित पण ते निसर्ग नियमांविरुद्धच असेल...
आणि निसर्ग कधीही आपली सत्ता.. आपला अधिकार सोडत नाही!
कुठल्या तरी बेसावध क्षणी तो उफाळून वर येतोच!
जाणत्या स्त्रीला... ती सुशिक्षित नसली तरी आणि सुसंस्कृत
असेल तर हे नक्कीच ठाऊक असतं! म्हणूनच स्त्रीचं अंतःकरण व तिचं चरित्रचारित्र्य खऱ्या अर्थानं समजणं कठीण असतं!
एकूण स्त्रीजातीच्या संख्येच्या तुलनेत खऱ्या अर्थानं चारित्र्यहीन स्त्रियांची
संख्या नगण्यच असेल...
बऱ्याच
जणींनी आत्मसंरक्षणार्थ वा अपत्य संरक्षणार्थही निरुपायानं हा मार्ग स्वीकारला
असण्याची शक्यता नाकारता येत नाही! कदाचित आचार्यांनी स्त्रीचं मन व चरित्र दुर्बोध,
न उलगडणारं असं मुद्दाम म्हटलं असेल कारण साधक पुरुषाचं
चित्त आपल्या स्वीकृत ध्येप्राप्तीच्या मार्गावरून विचलित होऊ द्यायचं नसावं...
पुरुषाला स्त्रीसंगातून मुक्त करण्यासाठी..
तिच्या मोहापासून परावृत्त करण्यासाठीसुद्धा आचार्यांनी
मुळातल्या वास्तवरूप तिळावर हा काटेरी हलवा चढवला असेल! अर्थात हे साधक
स्त्रीलासुद्धा पुरुषाच्या बाबतीत तितकंच लागू आहे!
मानवी स्वभावातच दुसऱ्याचा उत्कर्ष, त्याची उन्नति, प्रगति सहन न होण्याची प्रवृत्ति असते...
दुसऱ्याबरोबर
आपली तुलना करून आपला उत्कर्ष साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं हे समजण्यासारखं
आहे! पण आपल्यात कोणतंही कर्तृत्व, हुषारी, चातुर्य नाही हे ओळखून दुसऱ्याला त्याच्या मार्गात अपशकुन करणं..
मोडता घालणं ही दुर्वासनाच होय!
सद्वासना, सदिच्छा, सद्भाव एकवेळ मनात ठेवायला नाही जमलं तरी दुर्वासना,
द्वेष, दुराशा यांचा तरी अंगीकार करू नये! एवढं जमलं तरी
प्रगतिपथावर एक पाऊल पडल्यासारखं होईल! पण तेही बर्याच जणांना जमत नाही असं
निरीक्षण नोंदवण्यासाठी आचार्यांनी दुराशेला दुस्त्यजा म्हटलंय.
साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः
पुच्छविषाणहीनः।
तृणं न खादन्नपि जीवमानस्तत् भागधेयं परमं
पशूनाम् ।।...
असंही एक सुभाषित आहे!
साहित्य, संगीत वा अन्य कला ह्याही विद्याच आहेत.. त्या ज्याच्याकडे
नाहीत तो माणसाच्या आकारातला शिंगशेपटीविना पशूच म्हणायला हवा... पशूंचं भाग्य थोर
म्हणून तो गवत चारा वगैरे खाऊन जगत नाही! पण याही विद्या जर आत्म्याची ओळख करून
देत नसतील वा त्यांच्या साह्याने मनुष्य स्वतःतील ब्रह्मत्व जाणू शकत नसेल तर त्या
विद्याही निरर्थक आहेत. काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् असं ही बुद्धिवंतांबद्दल म्हटलंय!
पण तो काल व ते काव्यशास्त्र ईशचिंतनार्थ वळवता येणं हे
बुद्धीचं खरं कौशल्य आहे.. जीवनात वाट्याला येणाऱ्या दुःखद क्षणांनीही काव्यशास्त्रांच्या आधाराने मनाचं विनोदन करून..
त्यांचा आत स्पर्श होऊ न देता भगवच्चिंतन,
नामस्मरण अखंड चालू ठेवणं हे मनुष्यजीवनाचं खरं सार्थक आहे.
पण ते जर जमलं नाही तर पशूंमधे व त्याच्यात काहीच अंतर
राहणार नाही! विद्याविहीन या शब्दातील विद्या हा शब्द अध्यात्मविद्या,
सर्व बंधनातून मुक्ति मिळवून देणारी विद्या या अर्थानं
अभिप्रेत आहे...
आजकालचं सामान्य साहित्य, संगीत, कला ही साधनं बह्वंशी माणसाच्या मनात विकार उत्पन्न करणारीच
असतात,
असलेल्या विकारांना खतपाणी घालून पोसणारी,
वाढवणारीच असतात... पशुत्वाकडेच नेणारी असतात... मानवाचा
दानव करणारीच असतात असंच चित्र आजकाल दिसतं!
आचार्यांना हे असलं साहित्यसंगीतकलादि अभिप्रेत नसून
मानवातलं देवत्व व देवत्वातून परब्रह्मत्व साधून देणारी विद्या देणारं
साहित्यसंगीतकलादि अपेक्षित आहे!
श्री.
श्रीपादजी केळकर (कल्याण)