संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya
आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 18
मूकोऽस्ति को वा? बधिरश्च
को वा?
वक्तुं न युक्तं समये समर्थः ।
तथ्यं सुपथ्यं न श्रुणोति वाक्यं
विश्वासपात्रं न किमस्ति नारी ।।
आद्य शंकराचर्यविरचित प्रश्नोत्तरी... १९
अर्थ..
प्रश्न :- मुका वा बहिरा कोण असतो? उत्तर :- जो योग्य वेळी योग्य ते बोलू शकत नाही व जो सत्य व हितकर ऐकूही शकत नाही!
प्रश्न :- विश्वास ठेवण्यास योग्य कोण नसतं?
उत्तर :- स्त्री!
चिंतन :- केवळ
वैखरी वाणीनं बोलता येत नाही तो मुका व ज्याला कोणताच आवाज ऐकता येत नाही तो बहिरा
ही मुक्याबहिऱ्यांची केवळ
शारीरिक अक्षमतेवर आधारित अशी व्याख्या आहे! खरं तर ज्याला
ऐकता येत नाही तोच मूक म्हटला जातो! कारण शब्द ऐकूच आला नाही तर तोंडून फुटणार कसा? नवविधा
भक्तीतही पहिलं स्थान श्रवणाला आहे मग कीर्तनाला! पण आचार्य
म्हणतात योग्य वेळी योग्य असं जे बोलता आलं पाहिजे ते बोलता न येणं हेच मुकेपणाचं
लक्षण आहे आणि कितीही सत्य, हितकारक असलं तरी ते ऐकण्याची मानसिक तयारी नसणं हे बहिरेपणाचं लक्षण आहे!
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात्
सत्यमप्रियम् ।
प्रियं च नानृतं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ।।
यात बोलणार्या व ऐकणार्या...
दोघांनाही आवश्यक, उपयुक्त
व मार्गदर्शक अशी शाश्वत.. चिरंतन व्यक्तिधर्माची मूलतत्त्वं मांडली आहेत.
जे सत्य आणि ऐकणार्याला प्रिय असेल असंच बोलावं!
सत्यच बोलावं पण ऐकणार्याला त्यावेळी ते अप्रिय असेल तर
बोलू नये! प्रियच बोलावं पण ते त्यावेळी सत्याला धरून नसेल तर बोलू नये!
यत् भूतहितमत्यन्तं तत् सत्यम् ।
सर्व भूतमात्रांचं आत्यंतिक हित ज्यात अंतर्भूत असेल तेच
सत्य अशी सत्याची व्याख्या केली जाते.
जे भूत.. वर्तमान आणि भविष्य या तीन्ही काळी आपली मूळ
स्थिति न बदलता.. ज्यात कोणताही व्यक्तिस्थलस्थित्यनुसार बदल घडत नाही ते सत्य..
तेच त्रिकालाबाधित सत्य!
सत्यमेव जयते हे वचन या अशा सत्यालाच अनुलक्षून केलं गेलंय!
रामायण महाभारत घडलं ते असं सत्य.. योग्य वेळी योग्य न
बोलल्यामुळे, तथ्ययुक्त
व हितकारक, पथ्यकारक
न ऐकल्यामुळेच घडलं हे सर्वविदितच आहे.
श्रीकृष्ण शिष्टाईला दुर्योधनानं मान दिला असता तर नंतर
झालेला नरसंहार व कौरवांची छीः थू टळली असती!
दुर्योधनानं श्रीकृष्णानं सांगितलेलं सत्यतथ्य व हितकारक न
ऐकल्याचाच हा परिणाम!
मंथरेनं अयोग्य गोष्ट अयोग्य वेळी सांगूनही कैकयी तिला
योग्य काय ते सांगू शकली नाही हे तिचं मुकेपणच पुढच्या रामायणीय कथेला कारणीभूत
झालं! हे
असलं मुकेबहिरेपण अज्ञान, स्वार्थ, अहंकार,
मोह अशांमुळे घडतं व पुढे अनर्थाला तोंड द्यावं लागतं!
नैसर्गिक मुकेबहिरेपण कदाचित सुधारता येणार नाही. आधुनिक
विज्ञान कितीही प्रगत झालं तरी कदाचित त्या व्यंग्यांवर मात करताही येणार नाही पण
ऐहिक जीवनात यशस्वी, सुखी,
आनंदी होण्यासाठी वर सांगितलेलं मुकेबहिरेपण सोडणं
अत्यावश्यक आहे!
कारण ते बाहेरून.. विशिष्ट हेतूनं अंगीकारलेलं असतं...
स्वीकारलेलं असतं!
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा...
मना सर्वथा सत्य सोडू नको रे...
मना सत्य ते सत्य वाचे वदावे...
इत्यादि समर्थवचनं ज्या शाश्वत सत्याविषयी सांगतात..
त्यातच मानवी जीवनाचं खरं हित सामावलंय!
तेच मनानं स्वीकारावं असा त्यांचा आग्रह आहे!
आचार्य पुन्हा एक सामान्य जनांच्या सामान्य बुद्धीला व
नवसुशिक्षित, नवपदवीधरांना. तथाकथित आधुनिक विचारवंतांना न पचणारं. न
पटणारं. भारतीय अध्यात्मशास्त्राची, परमार्थ शास्त्राची यथार्थ ओळख नसल्यानं आक्षेपार्ह
वाटू शकणारं विधान करतात! विश्वासपात्र कोण नाही याचं उत्तर ते "स्त्री"असं
देतात!
प्रश्नोत्तरी हा छोटा प्रकरण ग्रंथ प्राधान्यानं आध्यात्मिक
साधनेला लागलेल्या, परमार्थाच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या सर्व साधकांसाठी मार्गदर्शनात्मक आहे! साधनेत,
पारमार्थिक प्रवासात कोणते अडथळे येतात.. येऊ शकतात हे
सांगून त्यापासून सावधगिरीचा इशारा.. सूचना.. मार्ग दाखवण्यासाठीचा
गुरुशिष्यांमधील संवादाच्या रूपात तो लिहिलाय. स्त्रीच्या दृष्टीनं पुरुष व
पुरुषाच्या दृष्टीनं स्त्री हा त्या मार्गात अडथळा कसा ठरतो हे या ग्रंथात
प्रसंगोपात्त दाखवलंय... आचार्यांच्या ठिकाणी स्त्रीविषयक कोणताही द्वेष वगैरे भाव
नसून स्त्री ही पुरुषदृष्टीतून वासनारूप व पुरुष हा स्त्रीदृष्टीतून वासनारूप
दाखवण्यासाठीच त्यांनी स्त्री हा शब्द वापरला आहे. उपलक्षणेनं स्त्रीच्या संदर्भात
पुरुष या शब्दाचाही त्यात अंतर्भाव आहे!
आचार्यांच्या काळात संन्यास हा पुरुषानंच स्वीकारायचा व स्त्रीनं प्रपंच
सांभाळायचा ही सनातन वैदिक धर्माची समाजव्यवस्था रूढ होती म्हणून स्त्रीचा वारंवार
उल्लेख येतो... आजच्या जीवनात ज्याला वा जिला आध्यात्मिक साधना.. परमार्थमार्ग
स्वीकारणे आहे, त्यानं तिनं आपल्या भूमिकेप्रमाणे स्त्रीला..
पुरुषाला विश्वासार्ह मानायचं की नाही ते ठरवावं! लौकिक
जीवनात विश्वासार्ह कोण हे स्थल, काल, परिस्थिति, वस्तु,
पदार्थ, व्यक्ति सापेक्ष ठरतं हे सर्वांनाच
ठाऊक आहे!
या ठिकाणी स्त्रीचं तेच रूप लक्षात घ्यायला हवं जे पुरुषाला
ध्येयप्राप्तीच्या आड येतं.. देहाकर्षणाद्वारे मोहात पाडून भक्तीपासून,
भगवत्प्राप्तीपासून दूर नेतं...
ब्रह्मचर्य, वैराग्य, अनासक्तता या अत्यावश्यक पूर्वअटींची पूर्तता करण्याच्या
मानसिक तयारीला खिंडार पाडतं! ज्या स्त्रिया पैसासंपत्तीच्या मोहानं. आपल्या सौंदर्याच्या
अहंकारानं.. लंपट पुरुषांना भुरळ पाडून देशाच्या संरक्षणविषयीची गुपितं शत्रुराष्ट्राला
फोडतात त्या विश्वासार्ह कशा मानाव्यात?
मागील दोन जागतिक महायुद्धांमधे वा नंतरच्याही काळात शत्रुराष्ट्र एकमेकांची
गुपितं चोरण्यासाठी गुप्तहेरांनी अशाच स्त्रियांना वापरल्याच्या सत्यकथांवर जे
अनेक प्रकारचं ललित साहित्य निर्माण झालंय त्याचा बरेच जण मनोरंजनार्थ चघळून चोथा
करीत आले आहेत. युद्धाच्या रम्यकथा.. गुप्तहेरांची चरित्रं दाखवणारी नाटकं,चित्रपट मिटक्या मारीत लोक पहात आले आहेत...
अशा कलाप्रकारांमधे दाखवल्या गेलेल्या स्त्रिया विश्वासार्ह
कशा मानता येतील? आचार्यांच्या उत्तरातील स्त्री या वर्गातील आहे..
आचार्यांच्या काळातली स्त्री व आजची स्त्री यात वृत्तीचा
फरक नसून तपशीलात फरक असेल इतकंच!
श्री.
श्रीपादजी केळकर (कल्याण)