संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya
आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 19
लघुत्वमूलं च किमर्थितैव । गुरुत्वमूलं यदयाचनं
च ।
जातो हि को यस्य पुनर्न जन्म । को वा मृतो यस्य
पुनर्न मृत्युः ।।19।।
आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी.. 19
अर्थ..
प्रश्न :- लघुता.. लहानपण.. कमीपणा यांचं मूळ कशात आहे?
उत्तर :- याचना, अपेक्षा करण्यात!
प्रश्न :- गुरुता.. मोठेपण यांचं मूळ कशात आहे?
उत्तर :- काहीच न मागण्यात.. अयाचितत्वात!
प्रश्न :- खऱ्या अर्थानं कोण जन्माला आला?
जन्माचं सार्थक कशात आहे? उत्तर :- जो पुन्हा जन्माला आला नाही तो... पुनर्जन्म टाळण्यात!
प्रश्न :- कोण खऱ्या अर्थानं मेला?
चांगलं मरण कोणतं? उत्तर :- जो पुनःपुन्हा मरत नाही तो... पुनःपुनः न मरणं ज्यात घडत नाही ते!
चिंतन. :- उच्चनीचता, जन्ममरण यांबद्दलच्या सर्वसामान्यांच्या कल्पना फारच ढोबळ,
स्थूल असतात. "खूप श्रीमंत, विद्वान, सत्तापदावर विराजमान झालेला, किंवा उच्चवर्णीय असा जो कोणी तो उच्च,
मोठा, थोर व असा जो नाही तो नीच, हलका, कमी प्रतीचा! पांचभौतिक देह घेऊन येणं म्हणजे जन्म व तो देह
सोडावा लागणं म्हणजे मृत्यु!" पण जगात बरेचदा असं दिसतं की तथाकथित उच्चवर्गीय माणसं
प्रत्यक्षात नीचांसारखी वागतात व नीच म्हटली जाणारी उच्च आचारविचारांचे
आदर्श ठेवून जातात.
माणसाला सर्वात कमीपणा आणणारी गोष्ट म्हणजे याचना.. भीक!
ती स्वतःसाठी न मागता समाजकल्याणासाठी,
दुसऱ्यांच्या
उत्कर्षासाठी मागितली तर भिक्षा ठरते... रामदासांनी हे
ब्राह्मणाचं कर्तव्य म्हणून तिचा उल्लेख केलाय... अशी ती भिक्षा जो मागतो तोच
दीक्षादानाला पात्र ठरतो.. अधिकारी ठरतो.. असं त्यांचं सांगणं आहे.
भिक्षा कशी किति कुठे मागावी याबद्दलही त्यांनी महंतांसाठी
काही दंडक घालून दिले आहेत.
याचना करणारा कितीही हलका असला तरी वाराही त्याच्या वार्याला
उभा राहत नाही... त्याच्याकडेही याचक याचना करील या भीतीनं !
तृणादपि लघुस्तूलः तूलादपि च याचकः ।
वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति ।।
सतत दुसर्या समोर याचनेसाठी हात पसरणं हे आपल्या
ना-लायकीचं प्रदर्शन करणंच ठरतं! दुसऱ्यासाठी
हात पसरायचा... याचना करायची तरीही मग्रुरीनं,
उर्मटपणानं बोलून चालत नाही!
उलट तिथेही नम्रता, लघुताच धारण करावी लागते.
विष्णु बलीपुढे लघु होऊन बटु वामन झाले तसे!
देवांसाठीच मागितलं पण ते लघु होऊनच!
कारण याचना ही कुणालाही व सर्वांना लघुत्वच देते,
महत्त्व कमी करते, लघुत्व घ्यायला भागच पाडते.
"याचना हि पुरुषस्य महत्त्वं नाशयत्यखिलमेव तथा हि।"
"सद्य एव भगवानपि विष्णुर्वामनो भवति याचितुमिच्छन् ।।"
लोकशाहीत सर्व समानतेचा कितीही डांगोरा पिटला तरी
लोकप्रतिनिधि म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवाराला मतांचा कटोरा हाती धरून
उमेदवारापुढे नम्र, लघु होऊनच जावं लागतं! तेव्हा खरंच मोठेपण, गुरुत्व, महत्त्व हवं असेल तर देण्याची व त्यातही कधीही कुणापढेही
कसलीही याचना न करण्याची सवय व वृत्ति जडवावी लागेल.
देणारा नेहमी वरच्या पातळी वर असतो व घेणारा नेहमी खालच्या!
देणाराचा हातही उपडा व उंच केल्याशिवाय व घेणाराचा हातही उताणा व खाली केल्याशिवाय
देणंघेणं घडत नाही.. उच्चैः स्थितिः पयोदानां पयोधीनामधः स्थितिः।
ढग उंचावरच व पाणी साठवणारे सागर इ खालीच असायचे!
म्हणूनच विद्यादानी गुरु उच्चासनावर तर विद्याग्राही शिष्य
खालच्या जागी व नम्र असायला हवा!
जीव जायची वेळ आली तरी पर्वा नाही.. बेहत्तर.. पण
कुणापुढेही हात पसरणार नाही.. भीक मागणार नाही ही वृत्तीच थोर आहे... थोरांचीच
असते! "न मागे तयाची रमा होइ दासी" हे अयाचितांचं महत्त्व ठळक करणारेच वचन आहे!
याचना बरेच वेळा संग्रहासाठी केली जाते.. पण संग्रह करायचाच
झाला तर भगवद्भक्तीचाच करावा.. जो जन्ममरणांच्या परंपरेतुन जीवाची सुटका करील.
मनुष्यजन्माचं सार्थक जर कशात काही असेल तर ते पुन्हा
जन्मण्यात नसून पुन्हा जन्माला न येण्यातच आहे! कारण ..
जन्मदुःखं जरादुःख जायादुःखं पुनःपुनः!
अन्तकाले महादुःखं तस्मात् जागृहि जागृहि।।
जन्माला येताना.. जन्मणार्या जीवाला दुःखच भोगावं लागतं.. त्याच्या
आईला प्रसव वेदनांचं आणि तत्पूर्वी गर्भधारणेपासूनचं अनेक प्रकारचं दुःख भोगावं
लागतं आणि बापालाही सुख प्रसूतिविषयक चिंता, आर्थिक विवंचना, भविष्यातील पालनपोषणादिक विषयांच्या तरतुदीचा ताण इ. प्रकारचं दुःख भोगावं लागतच! जन्मल्यानंतरही
यथावकाश प्रारब्धवशात् जायादुःख आहेच... जायादुःखात जायेनं दिलेलं,
जायेमुळे झालेलं व जाया गेल्यामुळे झालेलं अशा तीन्ही
दुःखांचा समावेश होतो.
जरा दुःख तर कुणालाच चुकलं नाही! गरीब श्रीमंत,
सुशिक्षित अशिक्षित, आस्तिक नास्तिक, स्त्री पुरुष इ. जन्मलेल्या सर्वांनाच आहे..
तेव्हा जन्माला येण्याचं सार्थक जर कशात असेल तर पुन्हा
जन्माला न येण्यातच आहे... पुन्हा गर्भवास न होण्यातच आहे!
संत तुकाराम "गर्भवासी
सुखे घालावे आम्हासी" असं भगवंताला सांगतात ते वेगळ्या
संदर्भात... भगवद्भक्तीचा आनंद अखंड मिळावा म्हणून! त्यातही त्यांनी आधी भगवंतालाच
काही अटी घातल्या आहेत. - तुझा विसर न व्हावा, ही मुख्य अट! संतसंग
देई सदा ही दुसरी अट! त्या त्यानं पाळल्याच पाहिजेत कारण त्यामुळेच तर "गुण गाईन आवडी, हेचि
माझी सर्व जोडी"
आणि "न लगे मुक्ति धनसंपदा" हे
घडणार आहे!
जातो हि को यस्य पुनर्न जन्म या अर्धचरणाचा अनुवादच जणु आचार्यांनी पुढल्या अर्धचरणात
दिलाय... कोण खर्या अर्थानं मेला?तर जो पुन्हा मरत नाही तो! पुन्हा पुन्हा मरणं म्हणजे
पुन्हा पुन्हा जन्माला येणंच नव्हे का?
"जातस्य हि ध्रुवो मृत्युः पुनर्जन्म मृतस्य च ।"
या भगवद्गीतावचनात हीच साखळी सांगितली आहे.
जन्माचं सार्थक पुन्हा न जन्मण्यात व खरं मरण म्हणजे पुन्हा
न मरणं.. या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत!
हे नाणं पूर्णपणे हाती यायला हवं असेल तर.. तीच ब्राह्मी स्थिति
प्राप्त व्हायला हवी.. जिच्या बद्दल "नैनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वास्यामन्तकालेऽपि
ब्रह्मनिर्वाणमृच्छति"असं
भगवंतांनी म्हटलंय! त्यासाठी अचंचला भक्ति अत्यावश्यक आहे जी कृष्णकृपेनंच
मिळणं शक्य आहे... जिच्यामुळे "अनायासेन मरणं
विनादैन्येन जीवनम् सुद्धा मिळेल!
"तद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम"असं भगवंत ज्याचं वर्णन करतात तिथे जाणं.. पोहोचणं..
हेच खरं जन्माचं सार्थक व खरं मरणं होय असंच शंकराचार्यांना सांगायचं आहे!
श्री.
श्रीपादजी केळकर (कल्याण)