संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya
आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 17
वासो न संगः सह कैर्विधेयो?
मूर्खैश्च नीचैश्च खलैश्च पापैः!
मुमुक्षुणा किं त्वरितं विधेयं?
सत्संगतिर्निर्ममतेशभक्तिः!
आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..१७
अर्थ. :-
प्रश्न :- सहवास व संग कुणाबरोबर करू नये?
मूर्खाबरोबर.. नीचप्रवृत्ती
बरोबर आणि दुष्टाच्या बरोबर!
प्रश्न :- तीव्र मुमुक्षु माणसानं काय कराव?
सत्संगति.. निर्ममता आणि भगवद्भक्ति!
चिंतन..
सामान्यतः कुणाची संगति धरावी व कुणाच्या सहवासात रहावं
याविषयी काही संकेत आहेत.. आदर्श आहेत.. अपेक्षा आहेत.. कौटुंबिक पातळीवर काही नियमही आहेत.
राजकीय पक्ष सुद्धा सत्तेच्या खेळात कुणाबरोबर रहावं आणि
कुणाची संगत करावी या विषयी चोखंदळ असतात.. धोरणी असतात..
काही गणितं बांधून असतात!
पारिजातकाची ताजी टवटवीत फुलं जिथे पडतात तिथल्या मातीलाही
त्यांचा सुगंध मिळतो व सोन्याला लोखंडाची संगत लाभताच हातोडीचे घावही सोसावे
लागतात!
मूर्खानं हुषारांची संगत धरली तर त्याच्यात काही सुधारणा
घडू शकते! पण हुषार जर नित्य मूर्खांच्या संगतीत राहील तर त्याची बुद्धि गंजून जाईल व
लोकांमधे थट्टामस्करी, टिंगलटवाळकी होईल ती वेगळीच! सहवास हा अधिकतर देहानं घडतो व संग/संगति मनानं!
व्यक्तीच्या अनुपस्थितीत तिच्या विचारभावनांचाही संग..
संगति मनाला घडू शकते व बुद्धिविचारभावनांना प्रभावित करू
शकते!
ताडाच्या सहवासात.. त्याच्या खाली दूध,
पाणी जरी एखादा पीत असला तरी लोक तो ताडी पितोय असंच
म्हणतात... कारण ताडाचा सहवास! मूर्खता ही बुद्धीला चिकटून येते..
नीचता प्रवृत्तीला चिकटून येते,
तर खलत्व.. दुष्टत्व.. दुर्जनत्व अहंकाराला,
स्वार्थाला, लोभाला चिकटून येतं! ज्याला ऐहिक व पारलौकिक उत्कर्ष साधायचाय त्यानं मूर्खाच्या
नादी मुळीच लागू नये कारण तो चुकीचे सल्ले देईल, मार्गभ्रष्ट करील!
नीचवृत्तीचा माणूसही मार्गभ्रष्टच करील,
पण त्याच्या स्वार्थापोटी तसं करील.. नीच माणूस निर्बुद्ध,
मूर्ख नसतो.. तो खूप हुषार असतो.. खेकड्याच्या वृत्तीचा
असतो.. आपल्यापेक्षा इतर कुणाचाही... सख्ख्या भावाचाही उत्कर्ष होता कामा नये या
वृत्तीचा! दुष्टमाणूस त्याचा उत्कर्ष नाही झाला तरी चालेल...
नव्हे स्वतः खड्ड्यात पडला तरी चालेल पण इतरांचा उत्कर्ष
होऊ न देणारा असतो. स्वतःचं नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करण्याच्या वृत्तीचा असतो...
तेव्हा हे तिघेही त्याज्यच..
कधीच ज्यांची संगत धरू नये अशा वर्गातले! मधु
तिष्ठति जिह्वाग्रे हृदये तु हलाहलम् अशा स्वभावाचे नीच व दुष्ट असतात!
man
may smile and smile,but still he may not be your friend ...
"नकली चेहरा सामने आए असली सूरत छुपी रहे" अशा मनोवृत्तीचे हे
नीच व दुष्ट असतात..
"आरंभगुर्वी क्षयिणी क्रमेण अशा दिनस्य पूर्वार्धछायेव"
मैत्री करणारे... आधी मारे धोधो प्रेमाचा धबधबा ओततील पण त्यांचा स्वार्थ
साधला वा साधूच शकत नाही असं लक्षात आल्यावर किंवा तुम्ही त्याच्या स्वार्थाच्या
आड येताय.. स्वार्थ साधून द्यायला तुम्ही असमर्थ आहात असं लक्षात येताच त्यांचा तो
प्रेमाचा धबधबा अचानक आटून, सुकून जाईल.. मूर्खाकडे हेतुतः तुमचं नुकसान करण्याची बुद्धि नसेल,
सामर्थ्य नसेल.. पण नीच व दुष्ट असं सामर्थ्य निश्चित
बाळगून असतात! ते तुमचा जीव सुद्धा घेतील!!
नीच व दुष्ट बाह्यरंगानं ओळखू येत नाहीत,
ते दुसऱ्या वा तिसऱ्या पायरीवर प्रकट होणाऱ्या कर्करोगासारखे असतात. तो जडतो कधी, कसा हे लक्षात येत नाही. अन्य आजारपणांच्या लक्षणातून
त्याच्याविषयी शंकाही घेता येत नाही व कर्करोग उघडकीला आला की जशा तीव्र शक्तीच्या
औषधांचा मारा करावा लागतो, हृदयसंस्थेवरच आक्रमण करणार्या विषाणूंच्या मार्यानं किंवा तीव्र
प्रकाशकिरणांनी कर्करोगबाधित पेशी जाळाव्या लागतात तसं हे नीच व दुष्ट कधी
आयुष्यात शिरतात हे कळत नाही व त्यांच खरं स्वरूप खूप उशीरा प्रकट झाल्यानं
आयुष्याची..
तनामनाची धूळधाण उडल्याशिवाय रहात नाही!
तेच ती उडवतात... जीवनातून उठवतात! म्हणून अशांपासून फार सावधगिरीनं राहावं लागतं!
अध्यात्म, परमार्थ यांच्या मार्गाकडे वळलेल्यानं तर त्यांच्या
सावलीलाही उभं राहू नये! उलट त्याला खरीच परमार्थाची, अध्यात्माची ओढ लागली असेल तर प्रथमतः त्यानं तीव्र
मुमुक्षूवृत्ति धारण करायला हवी. आपण आपल्याच विचारांच्या,
भावनांच्या बंधनात अडकलोय हे ओळखायला हवं...
त्या बंधनांच्या जाचकतेमुळे आपण नित्य व दीर्घकाळ दुःखीच
राहतोय हे मनाशी अनुभवांती निश्चित करून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला
हवा. निराशा
हताशा लपवण्यासाठी वा विसरण्यासाठी मदिरा, मदिराक्षी, द्यूत इत्यादिकांचा
तकलादू व निरुपयोगी संग न धरता संतसज्जनांचा प्रत्यक्ष सहवास,
त्यांच्या सद्ग्रंथवाचनाचा संग,
काही ठोस.. काहीशी उग्र उपासना व सर्वात महत्त्वाचं म्हणजे
सर्वसमर्थ भगवंताची प्रांजळ, निष्कपट, निष्काम भक्ति यांचा आधार घ्यावा!
प्रपंच, वस्तुपदार्थ व्यक्तीघटनांमधलं ममत्व..
त्यांच्यातली भावनिक, मानसिक गुंतागुंत यापासुन बुद्धिपुरस्सर दूर रहायला हवं!
ममत्व हे अहंतेचं अपत्य आहे हे ओळखून ममत्वाचं समूळ उच्चाटन
करायला अहंता मारण्याचा प्रयत्न करायला हवा.. अमानित्वाचा अभ्यास करायला हवा!
परमार्थसाधनेपूर्वीच्या या दोन नकारात्मक व सकारात्मक...
निषेधविधिरूप पायर्या चढणं अत्यावश्यक आहे. त्या परमार्थाच्या पूर्वअटीच आहेत असंही
म्हणायला हरकत नाही!
श्री.
श्रीपादजी केळकर (कल्याण)