संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya
आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 15
विज्ञान्महाविज्ञतमोऽस्ति को वा?
नार्या पिशाच्या न च वंचितो यः!
का शृंखला प्राणभृतां हि? नारी!
दिव्यं व्रतं किं च? समस्त
दैन्यम् !
(आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..१५)
अर्थ..
प्रश्न :- चतुरांमधे महाचतुर कोण? उत्तर :- ज्याला स्त्रीरूप पिशाच्च फसवू शकत नाही तो!
प्रश्न :- प्राणधारींना.. विशेषतः माणसांना जखडून कोण ठेवतं?
उत्तर :- स्त्री!
प्रश्न :- दिव्य व्रत कोणतं? उत्तर :- सर्व प्रकारे स्वतःच्या ठिकाणी दीनत्व भावना...
नम्रता!
चिंतन.. :- विज्ञ म्हणजे
विशेषत्वानं जाणणारा.. चतुर, हुषार! ता
वरून ताकभात जाणणारा... उडत्या पाखरांची पिसं मोजणारा! ज्याला कुणीही फसवू शकत
नाही! उलट तोच कुणाला.. वेळ आली तर.. बेमालूमपणे फसवेल! पण महाविज्ञ
म्हणजे महाचतुर!.. सामान्य बुद्धीच्या माणसांना कोणीही फसवू शकतं! पण अशा चतुरांना
कोण फसवणार?
पण अशा चतुरांची दुखरी नस ठराविक व्यक्तींना बरोब्बर ठाऊक
असते... त्या व्यक्तींच्या एका नेत्रकटाक्षानंही ही चतुर म्हणवणारी मंडळी घायाळ
होतात.. एका स्मित हास्यानंही विरघळतात... त्यांच्या अंगप्रत्यंगातून होणाऱ्या विभ्रमांनी पाघळतात!
त्यांच्या गोडगोड बोलण्यात गुंगून जाऊन फसतात!
त्या सांगतील त्या कामासाठी ही चतुर मंडळी एका पायावर तयार
असतात...
चोरी, लबाडी, भ्रष्टाचार, खून इ. काहीही!
त्या व्यक्ति म्हणजे सुंदर, मोहक, आकर्षक तरुण स्त्री हे लक्षात आलंच असेल!
स्त्रीचा मोह पुरुषाला वेडापिसा करतो.. मतिमंदही ठरवतो..
बोलता बोलता
खड्ड्यात टाकतो!
आचार्यांनी या श्लोकात "नार्या
पिशाच्चा च" असं म्हटलंय... एक तर पिशाच्च हे नारीचं विशेषण असू शकेल किंवा
नारीनं व पिशाच्चांनी दोघांनी असंही त्यांना अभिप्रेत असेल.... किंवा नारीरूप
पिशाच्चांनी किंवा पिशाच्चरूप नारींनी असाही अर्थ होऊ शकेल.
महाविज्ञ... महाचतुर तोच की जो नारीच्या कोणत्याही रूपानं
फसत नाही... त्यांच्या नादी लागून स्वतःचं ध्येय विसरत नाही..
ध्येयप्राप्तीच्या मार्गावरून ढळत नाही!
पिशाच्च म्हणे माणसाच्या मानगुटीवर बसून त्याच्या अतृप्त
वासना पूर्ण करून घेतं... स्त्री पुरुषाच्या डोक्यावर बसून...
त्याला आपल्यासाठी लंपट बनवून जेव्हा आपल्याला हवी ती...
क्वचित् अन्याय्य,अयोग्य ठरू शकणारी कामं...
दुष्कृत्यं त्याच्याकडून करवून घेते तेव्हा ती पिशाच्चरूपच
म्हणावी लागेल!
एरव्ही प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं
सर्वमान्य वाक्य म्हटलं जातं ते वास्तवाचं दर्शन असू शकेलही...
पण एखाद्या कर्तृत्ववान, शहाण्या माणसाच्या बुद्धीचं शेण व्हायला,
चारित्र्याची माती व्हायला स्त्रीच कारणीभूत ठरते..
ठरू शकते असंही अनुभवायला मिळतं.. ऐकू येतं!
स्त्रैणवृत्ति, स्त्रीलंपटता पुरुषाच्या ठिकाणचा सर्व विवेक मारून टाकते..
स्त्री केवळ "बाई" म्हणून नव्हे तर आई,
बहीण, पत्नी, मुलगी, काकू, मामी, आत्या अशा कोणत्याही नात्याच्या संबंधातून समोर येऊन जर पुरुषाला फसवत असेल...
कुकर्माला प्रवृत्त करीत असेल..
त्यानं स्वीकारलेल्या भगवद्भक्तीच्या मार्गात अडसर बनत असेल
तर ती पिशाच्चरूपच मानायला हवी.
जो महाविज्ञ.. महाचतुर असतो वा स्वतःला तसं म्हणवून घेतो
त्याला स्त्री अशा कोणत्याही रूपात येऊन फसवू शकत नाही..
किंबहुना जो असा फसत नाही,ज्याची अशी आत्मवंचना कधीच होत नाही तोच आचार्यांच्या मते
महाविज्ञ होय! माणसाला संसारात करकचून आवळून बांधून
ठेवणारा स्त्रीमोहच असतो.. दूध... त्यातल्या त्यात गाईचं दूध... जितकं पुष्टिकारक,
आरोग्याला चांगलं तितकंच ते नरकप्राय व वाईट असतं, ठरतं.... जर त्याची नीट काळजी घेतली गेली नाही तर! तसंच स्त्री बाबातीतही आहे!
स्त्री जेवढी पुरुषाच्या जीवनाला पूर्णता,
सौंदर्य, अर्थ प्राप्त करून देते.. त्याचं कर्तृत्व फुलवते...
त्याला सत्कार्याला प्रवृत्त करते तेवढीच ती पुरुषाच्या
चरित्रचारित्र्याची माती करायला... त्याला रसातळाला पोहोचवायला कारणीभूत ठरू शकते...
म्हणून सावधगिरीचा इशारा आचार्य देतात की पुरुषाच्या बाबतीत
स्त्री
ही मोठी अवजड बेडी, शृंखला, साखळी
आहे! अर्थात
त्याच न्यायानं पुरुषही स्त्री जीवनात स्त्रीची शृंखला ठरू शकतो!!!
मनुष्यजीवनाचं सार्थक करू शकणारी सामाजिक धार्मिक शैक्षणिक
इ क्षेत्रात अनेक गोष्टी व्रतरूपानं करण्यासारख्या आहेत..
कोणतंही व्रत हे निष्ठेनं..
नियमितपणे व सातत्यानं पाळावं लागतं!
कालान्तरानं त्याची सुमधुर फळंही विविध पुरस्कार,
बक्षिसं, मान सन्मान इ च्या रूपात मिळू लागतात...
पैसा प्रसिद्धि आदरसत्कार इ. मुळे माणसं अहंकारी बनत जातात व शेवटी समाजापासून,
आपल्या माणसांपासून तुटतात!
पण सर्वात कठीण, कठोर व आजीवन, आमरण सांभाळण्यासारखं व्रत
जर कोणतं असेल तर ते दैन्यच होय असं आचार्य म्हणतात.
इथे दैन्य शब्दाचा जो दारिद्र्य,
गरीबी असा रूढ अर्थ घेतला जातो तो अपेक्षित नाही.
दैन्य म्हणजे, आईवडिल, समाजातली विद्वान, कर्तृत्ववान, आदरणीय, सन्माननीय मंडळी, ईश्वर, संत, सज्जन,
सत्पुरुष यांच्या समोर स्वतःच्या ठिकाणी अत्यंत हीनभाव, दीनभाव, नम्रता धारण करणं असा आहे.
मोडेन पण वाकणार नाही, बाणेदारपणा इ. चं ठराविक क्षेत्रात, ठराविक मर्यादेपर्यंत महत्त्व,
उपयोग आहे हे निर्विवादच!
पण खरी.. प्रामाणिक नम्रता, दीनता सर्वकाल सर्वत्र माणसाबद्दल दुसऱ्याच्या अंतःकरणात सद्भाव निर्माण करू शकते.
स्वतःचा विविध प्रकारचा अहंकार हा केव्हाही अनर्थकारकच
असतो... तो बाजूला ठेवणं.. विसरणं हे जितकं कठीण, अशक्यप्राय तितकंच सर्वत्र.. जीवनात अखंडपणे नम्रता बाळगणं
हेही दुर्धर व्रतच आहे.
"ईश्वरस्य अभिमानद्वेषित्वात् दैन्यप्रियत्वात् च ।" या नारदीय भक्तिसूत्राद्वारेही भक्तीला पोषक व
ईश्वरप्राप्तीला पोषक म्हणून नित्य नम्रता, दीनता, दैन्य याचाच महाव्रत म्हणून पुरस्कार केला गेला आहे!
श्री.
श्रीपादजी केळकर (कल्याण)