आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 14 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 14 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya 

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 14

सर्वास्ववस्थास्वपि किं न कार्यम् ?

किं वा विधेयं विबुधा प्रयत्नात् ?

स्नेहं च पापं पठनं च धर्मम्?

संसारमूलं हि किमस्ति चिंता!

(आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी... १४)

अर्थ..

प्रश्न :- सर्व अवस्थांमधे (कशीही अवस्था असली तरी!) असताना काय करू नये? उत्तर :- स्नेहरूप आसक्ति व पाप!

प्रश्न :- शहाण्या.. जाणत्या माणसानं प्रयत्नपूर्वक काय करावं? उत्तर :- सद्ग्रंथांचं पठण..अभ्यास आणि धर्माचरण!

प्रश्न :- संसाराचं (भवचक्राच्या सातत्याचं) मूळ(कारण) कशात आहे? उत्तर :- संसाराच्या चिंतनात! चिंतेत !!

चिंतन.. स्नेह म्हणजे प्रेम, माया, मैत्री, आपलेपणा! दोन जीवांना एकत्र घट्ट बांधून ठेवणारा नाजुक धागा! पारिवारिक, सामाजिक, राष्ट्रीय ऐक्यासाठी परस्परांमधे सामंजस्य निर्माण होण्यासाठी एक आवश्यक भावना! पण एका मर्यादेच्या बाहेर गेलेल्या स्नेहाला आसक्ति म्हणतात. ही आसक्तीच पुढे वाढत जाऊन पापाचरणाला प्रवृत्त करते व प्रोत्साहनही देते.

आसक्तिविरहित प्रपंच हाच परमार्थ ठरतो व आसक्तिपूर्ण परमार्थ प्रपंच! ऱ्या स्नेहात अहंकार नसतो.. स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यासाठी काही करण्यासाठी मन धावत असतं, पण आसक्ति अहंकारातून जन्माला येतो व स्वतःसाठी दुसऱ्यांना राबवते. स्नेहानं दुसऱ्याला आपल्याशी सुखद बंधांनी बांधून घेता येतं, पण आसक्ति माणसाला स्वतःलाच जाचक बंधनात अडकवून टाकते... करकचून आवळते! सामान्य स्नेह जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवणार नाही पण आसक्ति निश्चितच अडकवेल. ही आसक्तीच पापाचरणाला प्रवृत्त करून जन्ममरणचक्रात सतत भ्रमण करायला लावते.

म्हणून आसक्तीत परिणत होणारा स्नेह व त्यातून जन्मणारं पाप हे सदा सर्वदा... सर्वच अवस्थांमधे जवळ करू नये...  यातून जो पूर्णतः बाहेर पडेल तो सुज्ञतेच्या.. शहाणपणाच्या.. जाणतेपणाच्या मार्गावर पाऊल ठेवायला पात्र ठरेल. खरा शहाणा जाणता तोच जो सद्ग्रंथांचं नित्य नियमानं पठण, पाठण करील.. वाचन, मनन, निदिध्यासन करील आणि त्यातून उलगडत जाणारा धर्माचरणाचा.. स्वकर्तव्यपालनाचा मार्ग चोखाळत परमेश्वर ओळखायचा..मिळवायचा.. त्याच्या तनामनानं विरघळून जायचा प्रयत्न करील.. पोकळ विद्वत्ता, पांडित्य, पदव्या,  उच्चविद्याविभूषितता या देवाच्या दरबारी शून्य ठरतात...

त्या पदव्या फक्त माणसाचा अहंकार, दंभ वाढवतात. पण या संसारचक्राच्या सातत्याला खरं कारणीभूत कोण आहे, काय आहे, कसं आहे हे त्यातून नाही उमगत. त्या गोष्टी माणसाला समाजात काही काळ पद, प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती, मानमरातब देतील.. त्यातून पुन्हा आसक्ति वाढेल... मिळालेलं टिकण्यावाढवण्यासाठीच चिंताचिंतन सुरू होऊन पुन्हा पापाकडे प्रवृत्ति वाढेल... त्यातून पुनरपि जननं पुनरपि मरणं हेच हाती येईल.

जन्म घेणे लागे वासनेच्या संगे या न्यायानं त्या गोष्टींच्या आसक्तीनं व पापकर्मांच्या फलानुसार विविध जन्म घ्यावे लागतील! अनादि असलेला संसार व्यक्तीच्या दृष्टीनं सान्त व्हायला संसारचक्राचं नव्हे तर त्या चक्राच्या केंद्राचं... केंद्रस्थानी असलेल्याचं.. संसारचक्राच्या प्रवर्तकाचं चिंतन करायला पाहिजे. त्यासाठी स्नेह आसक्ति पापाचरण सोडून सद्ग्रंथांचं वाचन, पठण, अनुष्ठान, चिंतन, मनन, तदनुकूल धर्माचरण, कर्तव्यदक्षता, स्वकर्मनिरतता सातत्यानं व नियमित हवी! आचार्यांना या श्लोकातून हाच बोध अभिप्रेत असावा!

श्री. श्रीपादजी केळकर (कल्याण)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post