संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya
आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 13
विषाद्विषं किं विषयाः समस्ताः
दुःखी सदा को विषयानुरागी ।
धन्योऽस्ति को यस्तु परोपकारी
कः पूजनीयः शिवतत्त्वनिष्ठः ।।
आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी...१३
अर्थ..
प्रश्न :- सर्वात अधिक प्रभावी..विखारी विष कोणतं?
उत्तर :- सर्व विषय!
प्रश्न :- सदासर्वदा दुःखी कोण असतो? उत्तर :- नित्य विषयासक्त!
प्रश्न :- जीवनात धन्य कोण? उत्तर :- जो परोपकारी असतो!
प्रश्न :- पूजनीय कोण? उत्तर :- जो ब्रह्मविद्या आणि परब्रम्हनिष्ठ आहे !
चिंतन. :- विष प्राणघातकच असणार हे सर्वज्ञातच आहे.. पण काही विषं ही मंद
असतात काही तीव्र असतात.. काही विषारी साप डसले असता तत्काल मृत्यु येतो तर काही
प्राण्यांचं विष शरीरावर मनावर मंद पण निश्चित दुष्परिणाम करतं.. विषाचे अनेक प्रकार
आहेत. पण सर्वात घातक विष जर कोणतं असेल तर ते विषय! नाना
प्रकारचे विषय!! जे माणसाला एकदा त्याची चटक लागली की अजिबात सोडत नाहीत.. त्या विषयांच्या
प्राप्तीसाठी मनुष्य कोणत्याही पापाचरणाला प्रवृत्त होतो..
पापं कृत्वा दुर्गतिं यान्ति मूढाः या न्यायानं अभुक्त
पापकर्मांच्या भोगासाठी पुन्हापुन्हा विविध पापयोनींमधे भरकटत राहतो!
विशेषेण सिनोति... नाम बध्नाति इति विषय: अशी विषय शब्दाची
व्युत्पत्ति सांगितली जाते! मन कधीच निर्विषय होऊ शकत नाही... तसं ते जर झालं तर
मनुष्य मुक्तच होईल... उपलब्ध विषय इंद्रियांच्या शक्तीच्या मर्यादेत, विहित
व्यवस्थेला / रीती.. पद्धतीला अनुसरून उपभोगले तर त्यात काही गैर वा आक्षेपार्ह
काही नाही. पण सर्व विषय सर्व काळी मलाच उपभोगायला मिळाले पाहिजेत...
इंद्रियांची शक्ति नसली तरी, मला माझ्या बळावर मिळवता आले नाही तर ते मिळवून देण्यासाठी
इतरांनी राबलंच पाहिजे, किंवा इतरांना माझ्यासारख्याच अधिकारानं प्राप्त झालेले विषय मी बळकावून
त्यांना त्यापासून वंचित ठेवणं... या साऱ्या विकृति आहेत ज्या समाजस्वास्थ्याला बाधक आहेत.
या सर्वांच्या मागे एक ठाम व चुकीचा समज असा आहे की विषय
सुख देतात. वस्तुतः विषय जड असल्यानं ते सुख देऊच शकत नाहीत.
विषय उपलब्ध असले तरी ते भोगणार्या इंद्रियांच्या मागे
जीवाची भोक्तृत्व शक्ति व मनाची इच्छा असल्याशिवाय त्यातून सुखप्राप्तीचा आभासही निर्माण होणार नाही.
दुसरं म्हणजे सुख व विषय यात कार्यकारणसंबंधही नाही...
म्हणजे सुख या कार्याचं विषय हे कारण नाहीत...
कारणावाचून कार्य अस्तित्वातच येऊ शकत नाही...
तसं असेल तर विषयरूप कोणतंही कारण झोपेमधे अस्तित्वात
नसताना व सर्व इंद्रिये कृतिशून्य असताना झोपून उठल्यावर सुख वाटल्याचं मनुष्य कसं
काय मान्य करतो? तेव्हा
विषय नसूनही सुखानुभव येतो.. पण जीव स्वतः सुखरूपच असल्यानं विषयातून सुख मिळत असल्याचा
त्याला भास होतो... या भासमान सत्याच्याच आशेनं तो विषयांकडे वळतो..
पण इंद्रिये व विषय यांचा जोपर्यंत संबंध अविच्छिन्न आहे तो
पर्यंतच हा सुखाभास टिकतो... ज्या क्षणी तो संबंध विच्छिन्न होतो त्याच क्षणी दुःखाला
सुरवात होते! कमी वा अतिरेकी सुख नेहमी दुःखालाच कारणीभूत होतं!
पूर्ण सुख.. सर्व सुख.. निर्भेळ,
दुःखरहित सुख इंद्रियविषयांच्या संबंधातून मिळणं केवळ
अशक्य!
ये हि संस्पर्शजाः भोगाः दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ।। (भग. गीता.)
शहाणी , सुजाण (सुशिक्षित, विद्वान, उच्चविद्याविभूषित या अर्थानं नव्हे!)
माणसं अशा इंद्रियविषयजन्य सुखभोगात रमत नाहीत,
गुंतत नाहीत, अडकून पडत नाहीत. (याचा अर्थ ते असे सुखभोग घेतच नाहीत असा नसून कर्तव्याच्या मर्यादेत
ते दुसर्याला सुखभोग देण्यासाठी घेतात इतकंच!)
कारण त्यांना पूर्णपणे ठाउक असतं की..
यत् सुखं साधनाधीनं
तद्दुःखमिति गद्यते । जे सुख साधनांवर अवलंबून असतं त्याला दुःखच म्हटलं जातं!
सामान्य जन हे लक्षात न घेता विषयसुखासाठी आशेनं..
हावरटपणानं लाचार होतात, आक्रमक होतात, आत्मविस्मृत होतात पशुतुल्य, क्रूर वर्तन करतात.. जीवनध्येयापासून विचलित होतात,
पथभ्रष्ट होतात!
माणसातली माणुसकी मारणारं सर्वात जहाल विष जर कोणतं असेल तर
हे सुखाभास दाखवणारे सर्व विषय. अशा विषयांमधे आसक्त असल्यानंच ते न मिळाले, कमी मिळाले की माणसं दुःखी होतात.
आई, वडिल,
बायका, मुलं, मित्र, परिवार,
नोकर, चाकर इ. जिवंत व्यक्तींनाही आपल्या सुखाचे विषय
बनवणं.. मानणं हे त्यांना जडत्व देण्यासारखंच आहे!
ही मंडळी आपल्याला अपेक्षित असलेलं सुख हवं तेव्हा,
हवं तसं, हवं त्या प्रमाणात देऊ शकली नाही किंवा त्यांनी सुख देण्यास
नकार दिला की माणसं आधी दुःखी होतात व नंतर क्रोधाविष्ट होऊन अविवेकानं त्यांना
आपल्या जीवनातून.. या जगातूनही हद्दपार करतात व अधिक दुःखात बुडतात!
पण विषयांवर सुखासाठी अवलंबून न राहता आपल्या अंतरात
नांदणारा अनंत सुखकंद असलेला अनंत..भगवंत आठवून जेव्हा एखादा दुसऱ्यांना
खरं सुख देण्यासाठी धडपडतो, परोपकारार्थ आपलं जीवन व्यतीत करतो व अशा रंजलेल्या.. गांजलेल्या
गरीबांच्या डोळ्यातली उपकाराची जाण, आठवण पाहतो, त्यांचे ते कृतज्ञता व्यक्त करणारे डोळे पाहतो..
समाधानानं फुललेले त्यांचे चेहरे पाहतो तेव्हा त्याला जी
धन्यता अनुभवायला मिळते त्याचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य!
अशी माणसामधे भगवंत पाहणारी, चराचरातून परम सत्याचा.. परब्रह्माचा... ब्रम्हविद्या तत्त्वाचा अनुभव घेणारी माणसं
हीच खरी पूजनीय!
निर्गुण निराकार असून
सगुण साकार झालेल्या परब्रम्ह श्रीकृष्ण भगवंतांवर नितांत प्रेम करणं... त्याची भक्ति करणं हे मानवी स्वभावाला धरून असलं तरी अशी
उपासना,
भक्ती, साधना, करताना माणुसकी विसरणं हे स्खलनच होय.
पण जे स्खलित न होता अशी भक्ति करतात ते निश्चित आदरणीय,
वंदनीय व पूजनीय आहेत.
अर्थकामांना प्राधान्य देऊन धर्म मोक्ष या पुरुषार्थद्वयीला
पूर्ण वाळीत टाकण्याच्या वाढत्या प्रवृत्तीच्या काळात दुःखविरहित,
ताणतणावशून्य व शांतसमाधानी आनंदी जीवन जगायचं असेल तर
आचार्यांचा हा श्लोक चुकूनही विस्मरणात जाता कामा नये!
श्री. श्रीपादजी केळकर (कल्याण)