आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 12 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 12 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya 

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला 

प्रश्न - 12 

शूरान्महाशूरतमोऽस्ति को वा ?

मनोजबाणैर्व्यथितो न यस्तु ।

प्राज्ञोऽथ धीरश्च समस्तु को वा ?

प्राप्तो न मोहं ललनाकटाक्षैः ।।

(आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी... १२)

अर्थ :-

प्रश्न :- शूरातला सर्वश्रेष्ठ शूर कोण? उत्तर :- जो मदनबाणांनी व्यथित होत नाही तो!

प्रश्न :- सर्वात बुद्धिमान धैर्यवान व समदृष्टि कोण? उत्तर :- जो स्त्रियांच्या नेत्रकटाक्षांनी विरघळत नाही..मोहित होत नाही तो!

चिंतन :- चोर, दरोडेखोर किंवा गुंडांबरोबर दोन हात करणं, हिंस्र पशूंच्या हल्ल्यात त्यांच्यावर मात करण्यासाठी लागणारं शौर्य वेगळं तसंच मनातल्या कामक्रोधादि षड्रिपूंशी लढून त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी लागणारं शौर्यही वेगळं.

    आणि असत्याशी, भ्रष्टाचाराशी, अनाचाराशी, अत्याचाराशी, अन्यायाशी लढून सत्याचा, सदाचाराचा, न्यायाचा विजय मिळवण्यासाठी लागणारं शौर्य आणखीनच वेगळं. हे सर्व शौर्य एका बाजूच्या पारड्यात एकत्रित करून ठेवलं व दुसर्‍या बाजूच्या पारड्यात तरुण स्त्रीच्या कामुक, मादक,

    आव्हानात्मक नेत्रकटाक्षांनी विह्वळून न जाण्यासाठी.. घायाळ न होण्यासाठी.. उलट त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, त्यांची उपेक्षा करून, ते हल्ले परतवून केवळ पूर्व निर्धारित जीवनध्येयाच्या प्राप्तीसाठी निवडलेल्या वा गुरुदर्शित मार्गावर अखंड, अविरत चालण्यासाठी लागणारं शौर्य ठेवलं तर नव्व्याण्णव पूर्णांक नव्व्याण्णव शतांश टक्के लोकांच्या बाबतीत दुसर्या बाजूच्या पारड्यात  ठेवलेलंच शौर्य भारी पडेल!

    काम या षड्रिपूतल्या पहिल्या रिपूत अनेक विषयांचा समावेश होत असला तरी स्त्रीविषयक देहसुखाची इच्छा (आणि तशीच, तितकीच स्त्रीलासुद्धा पुरुषविषयक देहसुखाची इच्छा!) हा विषय प्रधान गणला जातो. इतर इच्छांवर, वासनांवर, हव्यासांवर मात करणं..  विजय मिळवणं तुलनेनं सोपं.. सहज असलं, वाटलं तरी स्त्रीपुरुषांमधल्या शरीरसुखाच्या आकर्षणावर विजय मिळवणं खूप कठीण.. जवळजवळ अशक्यच! साधकाची, भक्ताची, उपासकाची, तापसाची खरी परीक्षा तिथंच होते.

    पुराणांमधूनही आसन डळमळित व्हायला लागल्यावर ऋषिमुनींचा तपोभंग करण्यासाठी इंद्राकडून अप्सरा पाठवल्या गेल्यावर चळलेल्यांच्या कथा बर्याच प्रमाणात मिळतात. सामान्य माणसं हे त्यांच्यापेक्षा निकृष्ट दर्जाचे जीव! ती तर अशा बाबतीत खूपच तीव्र संवेदनशील आणि स्खलनशील! बरेच विद्वान, उच्चविद्याविभूषित, मनोवैज्ञानिक, मानसोपचारतज्ज्ञ basic/ natural instict या नावा खाली या गोष्टीचं उदात्तीकरणही करताना दिसतात. ललित साहित्यात या विषयावर विनोदी, गंभीर, मनोविश्लेषणात्मक,समस्याप्रधान कथा कादंबऱ्या कविता इ. लेखन भरपूर होतं.

    ऐहिक जीवन सुखसंपन्नतेनं जगण्यासाठी एका विशिष्ट मर्यादे पर्यंत याला महत्त्वही आहे..हे सुख उपभोगण्यासाठी समाजस्वास्थ्य बिघडू न देता, माणसांमधे गुंतागुंत निर्माण होऊ न देता काही व्यवस्था, नीतिनियम, बंधनमर्यादा, पद्धति, ऱ्हा. ची योजना सुद्धा अस्तित्वात आहे... धर्माच्या वा सामाजिक सलोख्याच्या नावाखाली! स्त्रीपुरुषांकडून अमर्याद, अनिर्बंध, स्वैराचारी, अनाचारी, अत्याचारी पद्धतीनं हे सुख लुटलं जाणं, ओरबाडून घेतलं जाणं यातून शारीरिक अस्वास्थ्य, मानसिक विकृति.. असंतुलन, संकरित प्रजोत्पादन इ. अनेक विघातक गोष्टी घडू शकतात!

    पण ज्याला ऐहिक, लौकिक, पारलौकिक यांच्या पलिकडे जाऊन शाश्वत, निरतिशय, निर्भेळ एकमेवाद्वितीय आनंदाच्या प्राप्तीसाठी झटायचंय त्याला यात अडकून चालत नाही, गुंतून चालत नाही! पण असा क्वचितच मिळतो..विरळाच सापडतो.. बरेचसे कामिनीच्या कामुक नेत्रकटाक्षांनी विद्ध होऊन सैरभैर झालेलेच आढळतात.. मोरोपंतांनी एका आर्येत म्हटलंय...

उतरविती मंत्रबळे मांत्रिक चढल्या विषा नसांवरती

परि जे स्त्रीनयनांनी डंखित ते बा कधी न सावरती ।।

    परब्रह्मज्ञानामृताची ज्यांना ओढ लागली आहे त्या स्त्रीपुरुषांना परस्परांबद्दलचं देहाकर्षण हे विषच आहे.. त्यापासून दूर राहण्यासाठी अतिशय तल्लख बुद्धिमत्ता, बुद्धिचातुर्य, मनात फार मोठं धैर्यबळ आणि समस्त स्त्रीपुरुषांकडे बघण्याची.. बघून विचार करण्याची विलक्षण समदृष्टि लागते.

    मोह हा आपल्याहून भिन्न असलेल्यांबद्दलच होतो... वर्तमानात मिळत असलेल्या सुखोपभोगांबद्दलच होतो... कर्तव्य म्हणून दिल्याघेतलेल्या भोगापासून लगेच अलिप्त होणं वा ते देतघेत असतानाही ही ईश्वरेच्छा असं समजून त्यात न अडकणं हा मोहावरचा विजयच आहे!

    काहीच उपलब्ध नसताना मोहावर विजय मिळवला असं म्हणणं हे हास्यास्पद आहे, पण विकार, इच्छा निर्माण होण्यासारखी परिस्थिती असताना, देहसुख उपलब्ध असताना, स्वेच्छेनं देहसुख देणारा(री) उपलब्ध असताना त्या मोहापासून लांब राहण्यासाठी वेगळंच मनःसामर्थ्य, धैर्य, शौर्य, प्रज्ञाचातुर्य लागतं.. समदृष्टि लागते! विवेकानंदांनी अशा प्रसंगात त्याचं दर्शन घडवल्याचं त्यांच्या चरित्रात आढळतं.. म्हणून ते आदर्श, आदरणीय, पूज्य ठरले... अन्यथा सामान्यच ठरले असते!

    मनात काही उच्च ध्येय ठेवलेलं असलं की त्याच्या प्राप्तीच्या मार्गावरून चालताना असे जे अनेक मोहाचे प्रसंग येतात ते परीक्षा घेण्यासाठीच असतात. मार्गभ्रष्ट करण्यासाठीच असतात, कस बघणारेच असतात... आचार्यांनी हा इषारा, सावधानतेची पूर्वसूचना म्हणून ही प्रश्नोत्तरी दिली आहे.

श्रीमान श्रीपाद जी केळकर कल्याण

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post