आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 11 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 11 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 11 

संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya 


विद्या हि का? ब्रह्मगतिप्रदा या

बोधो हि को ? यस्तु विमुक्तिहेतुः ।

को लाभ? आत्मावगमो हि यो वै

 जितं जगत् केन? मनो हि येन ।।

आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..११

अर्थ..

प्रश्न :- विद्या कोणती (खरी)? उत्तर :- जी परब्रह्म प्राप्त करून देईल तीच!)

प्रश्न :- बोध कोणता (खरा)? उत्तर :- जो मोक्ष.. मुक्ति मिळवून देतो तोच!

प्रश्न :- लाभ कोणता (खरा)? उत्तर :- जो आत्मज्ञान.. आत्मप्राप्ति करून देतो तोच!

प्रश्न :- जग कोणी जिंकलं(असं म्हणता येईल)? उत्तर :- ज्यानं स्वतःचं मन जिंकलं त्यालाच!

चिंतन :- या चार प्रश्नोत्तरात कळीचं प्रश्नोत्तर चौथ्या क्रमांकाचं आहे! ज्यानं आपलं मन जिंकलं त्यानंच खरं तर सर्व जग जिंकलं! कारण चंचल असलेलं मन कुठेही एका ठिकाणी स्थिरावत नाही व अशा चंचल मनानं कोणताच विषय पूर्णपणे अवगत करून घेता येत नाही...

भोगता येत नाही.. विषयभोगाचा आनंद मिळत नाही! मन थाऱ्यावर नसणं म्हणजे सगळंच विस्कटणं! पण मन एकाग्र केलं.. स्थिर केलं की जगातला कोणताही विषय अगम्य रहात नाही! ब्रह्मगति, विमुक्ति व आत्मावगम या तीन्ही गोष्टी मन जिंकता आलं तर सहज शक्य आहेत!

पण बुद्धिला विचार करायला.. निर्णय घ्यायला मनानं वाव द्यायला हवा ना! तेव्हा कुठे चित्तात त्या विषयाचं चिंतन सुरू होईल! इंद्रियांना कोणत्याही विषयाची चटक लागली तरी त्यांना आवरायचं.. तिथून परावृत्त करायचं काम व सामर्थ्य मनाकडेच असतं... ज्याचा मनोनिग्रह भक्कम तो खरा पुरुषोत्तम! (पुरुषोत्तम शब्दात स्त्रीपुरुष.. दोघांचा समावेश आहे बरं का!)

मनो हि जन्मान्तरसंगतिज्ञम् असंही मनाबद्दल म्हटलं जातं! माणसाच्या मनाला बुद्धीच्या.. तर्काच्या बळावर जसं भविष्यात डोकावता येतं तसं स्मृतींना मागे रेटत रेटत.. मागे जात जात.. पूर्वींच्या अनेक जन्मांमधेही जाता येतं व तिथल्या घटना मनश्चक्षूंसमोर पाहता येतात! मन मनास उमगत नाही असं जरी असलं तरी मनाचा थांग लागण्यासाठीही मनच उपयोगी पडतं अन्य साधनं नव्हेत!

पांच भौतिक देहाचं आरोग्य टिकवण्यासाठी मनाचा इंद्रियांवर संयम जसा आवश्यक तसंच मनाची एकाग्रता आवश्यक! अनेक विषयांचं जुजबी ज्ञान जरी मिळवायचं झालं तरी मनाची एकाग्रता आवश्यकच असते... पण असं अर्धवट ज्ञान अनर्थालाही कारणीभूत होऊ शकतं!

एकाच विषयात जरी मन एकाग्र करून परिपूर्णता साध्य करता आली तरी असं मन नंतर अन्य विषयांकडेही वळवून त्यातलं किमान आवश्यक ज्ञान मिळवता येईल! किंबहुना मनाला अधिकाधिक ताजंतवानं.. क्रियाशील ठेवायलाजीवनात सर्वांगानं यशस्वी व्हायला त्याची मदतच होईल. मनाचं हे सामर्थ्य, त्याचे सर्व गुणावगुण जाणूनच रामदासांनी उपदेश केला तो मनालाच!

संत तुकाराम सांगतातच ना, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ! ।।

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।

बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ।।

या मनानंच ठरवलं... निश्चय केला तर कोणतीही विद्या मिळवता येईल... ऐहिकात, भौतिकात रममाण करविणारी आणि विविध विषयसुख भोगण्यासाठी उपयुक्त साधनं निर्माण करू शकणारी विद्या.. जी सांसारिक,प्रापंचिक विषयांमधे अडकवून  ठेवत राहते व संसारचक्रामधे भरकटवते..

माणसाला असुरही बनवू शकते! पण संसार दुःखसागरातून बाहेर काढून संसाराच्या प्रवर्तकाकडे नेणारी... त्याच्याशी एकरूपता साधून देणारी... संपूर्ण चराचर सृष्टीचा, अखिल ब्रह्मांडाचा निर्माता.. स्थितिपालक.. संहर्ता जो सगुणसाकार परमेश्वर वा सर्वातीत असं जे परब्रह्म तिथपर्यंत घेऊन जाणारी... नव्हे नव्हे त्याच्यातच जीवाला मुरवून टाकणारीही विद्याच! ब्रह्मप्राप्ती करवणारी म्हणजेच दुःखमुक्त करणारी, सुखदुःखादि द्वंद्वांच्या पार नेणारी, सत्त्वरजतमांच्या मुळाशी नेणारी, गुणातीतात मिसळवणारी जी ती खरी विद्या...

सा विद्या या विमुक्तये!

अशी विद्या प्राप्त झाली की ती शब्दांची कवचं फोडून आतला बोधाचा गर मनात भरून देते. तदितर विषयांबद्दल "न किंचित् वांछति" अशी अवस्था मिळवून देते! अन्य सर्व विषयांच्या हवेनकोपणापासून.. तज्जन्य बंधनांपासून मुक्ति देते व मग स्वतःच त्या बोधाच्या गरात मन विरघळवून आपला आपल्याला लाभ करून देते!पहावे आपणासी आपण या समर्थांच्या उक्तीतलं "पहावे" म्हणजे "जाणावे" असं हे!

तोच उत्तम लाभ असून तेच समर्थांनी मनाला सांगितल्याप्रमाणे

"माधवीं वस्ती "

करणं आहे.

यल्लाभान्नापरो लाभो यत्सुखान्नापरं सुखम् ।

यज्ज्ञानान्नापरं ज्ञानं तद् ब्रह्मेत्यवधारयेत् ।।..

याचा अंगुलिनिर्देशही तिकडेच आहे!

"कोऽहम्" चा सारखा धोशा लावत "दासोऽहं, " यापर्यंत येणं व मी परमेश्वराचा दास आहे अनुभूति मिळवणं हाच सर्वात मोठा व खराखुरा लाभ आहे!

अर्थात हा लाभ कुठूनही बाहेरून उचलून आणायचा नसून.. अप्राप्य वा अप्राप्त नसून आपल्या जवळच नित्यप्राप्त, नित्य उपलब्ध आहे... मन इतस्ततः भरकटत असल्यानं आपल्याला त्याची ओळख होत नाही..रहात नाही! प्राप्ताची प्राप्ति करण्याचा प्रयत्न हा अध्यात्मात..तत्त्वज्ञानात दोष आहे. जे नित्यप्राप्त नित्य उपलब्ध आहे त्याला ओळखणं हा महत्त्वाचा विषय आहे..

तो संत शिकवतात, प्राप्ताची ओळख करून देतात.. म्हणून अमृतराय म्हणतात...

ओळखिला देव संतकृपे ज्यांनी।

धन्य त्यांची जननी काय वानू?

हे देव ओळखणं.. स्वतः परब्रह्मरूप आहोत हे ओळखणं मन जिंकल्याविना सर्वथैव अशक्यच आहे. पण ज्यानं मन जिंकलं त्याला  (ब्रह्माकडून आलेली) ब्रह्मगति मिळेल व (ब्रह्माकडे जाण्यासाठीही) ब्रह्मगति मिळेल.. ती विद्या मिळेल. मनोविजयाद्वारेच विमुक्तीला कारणीभूत होणारा बोध मिळेल व आत्मावगम करविणारा.. आपलीच आपल्याला भेट घडवून आणणारा... आपल्याच खांद्यावर आपल्याला बसवणारा... आपल्याच हातांनी आपल्याला कवेत घेणारा... घट्ट मिठीत धरून ठेवणारा लाभ होईल!

श्रीपाद जी केळकर (कल्याण)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post