आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

दिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला

को वा ज्वरः प्राणभृताम् हि? चिन्ता!

मूर्खोऽस्ति कः? यस्तु विवेकहीनः!

कार्या प्रिया का? श्रीकृष्णभक्तिः!

किं जीवनम्दोषविवर्जितं यत् !

आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..१०

अर्थ.. 

प्रश्न :- प्राण्यांना चढणारा ज्वर कोणता? उत्तर :- चिंता!

प्रश्न :- मूर्ख कोण? उत्तर :-जो विवेकहीन आहे तो!

प्रश्न :- सर्वात प्रिय कार्य कोणतं? उत्तर :- श्रीकृष्ण भगवंतांची भक्ति करणे !

प्रश्न :- जीवन कशाला म्हणावं? उत्तर :-जे निर्दोष आहे ते!

    चिंतन :- भूतकाळातल्या गोष्टींबद्दलच्या शोकावर एकवेळ नियंत्रण मिळवता येईल, पण भविष्यकाळात काय काय घडू शकेल याचा काहीच अंदाज बांधता येत नसल्यानं त्यांच्याबद्दलची  चिंता व भय या दोन गोष्टीमाणसाला वर्तमानकाळात खूप अस्वस्थ करतात. प्राणभृताम् शब्दानं जरी सर्व सामान्य प्राणी असा अर्थबोध होत असला तरी आचार्यांना इथं केवळ मनुष्यप्राणीच अभिप्रेत असावा.

    कारण मनुष्येतर प्राण्यांमधे भविष्यकाळातील गोष्टींची चिंता करण्याइतकी बुद्धि नसते. माणसं चिंता नेहमी ज्या गोष्टी आपल्या हातातल्या नसतात वा आपल्या नियंत्रणातल्या नसतात त्यांचीच करतात... त्यामुळे हाती काही लागत तर नाहीच पण मनस्ताप मात्र होतो! चिंता व चिता यात एका बिंदुमात्राचाच फरक आहे पण दोघींचं कार्य एकच आहे.... जाळणे!

    सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिता. एवढाच काय तो फरक! पण चिंता व चिंतन यात जरी चित्तच वापरण्यात येत असलं तरी चिंतेमुळे व्यर्थ कालापव्यय होतो व चिंतनातून काही मार्गदर्शन होऊ शकतं! थोडं अतिरेकी, अतिशयोक्त वाटलं तरी... विवाह व्हायच्या आधीच विवाहानंतर मूलबाळ झालं तर त्याच्या शिक्षणासाठी चांगली शाळा कुठे शोधायची, बाकीची व्यवस्था कशी करता येईल अशा चिंता जशा निरर्थक असतात तसंच मुलामुलींच लग्न व्हायच्या आधीच सून जावई चांगले मिळतील का, सून मुलाला मुठीत ठेवून आपल्याला वृद्धाश्रमात तर ढ (हा!) कलणार नाहीत ना किंवा जावई, सासू सासरे मुलीला जिवंत जाळणार नाहीत ना, सुखात ठेवतील ना, चांगली नांदवतील ना अशा निरर्थक चिंतांनी माणसाला तापच होतो!

    चिंतांनी मन पोखरून त्याचे दुष्परिणाम देहावर उमटायला लागतात. शारीरिक ताप काही उपायांनी उतरवता येतात पण चिंतांमुळे चढणारा मानसिक  उतरवायचा तर चिंतनक्षमता वाढवणे एवढा एकच उपाय आहे.. फक्त चिंतन कुणाचं करायचं हा मात्र विवेकावर सोडायचा प्रश्न आहे!

    चिंतनासाठी अनेक विषय जरी उपलब्ध असले तरी त्यातील कोणता विषय निवडायचा ज्यामुळे चिंता समूळ नष्ट होतील याचा  सर्वांगानं विचार करून तो निवडणं यालाच विवेक म्हणतात! असा विवेक जमला नाही.. केला गेला नाही तर ते बुद्धिहीनतेचं.. कोत्या बुद्धीचं लक्षण आहे.. मूर्खत्वाचंच लक्षण आहे!

    बुद्ध्याविहीनाःपशुभिः समानाः! या विवेकानंच चिंताविनाशार्थ व पर्यायानं चिंताज्वर घालवण्यासाठी कोणतं सर्वात प्रिय कार्य केलं जावं याचा निर्णय करता येईल व तो म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांची भक्ति करणं हाच होय.

    आद्य शंकराचार्यांचं मुख्य कार्य सनातन वैदिक धर्मात शिरलेल्या विघटनवादी व अहंकारजन्य सांप्रदायिक भेदांना दूर करून त्यात पंचायतनपूजेचा पुरस्कार करून इतस्ततः विखुरलेल्या सर्वांना एकत्र आणणं हे होतं व वैदिक धर्मावर होणार्या बौद्ध जैन चार्वाक इ अवैदिकांच्या आक्रमणाला थोपवणं हे होतं..

    मृतप्राय सनातन वैदिक धर्माला संजीवनी देणं... आत्मविस्मृत समाजात जागृति आणणं.. धर्मतेजाचा स्फुल्लिंग चेतवण्यासाठी वर जमलेली राखेची पुटं उडवून देणं हे होतं! श्रीकृष्ण भगवंतांची भक्ति ही चिंतानिर्मूलनकारी असून जीवन परस्पर सामंजस्यानं.. सहकार्यानं.. स्थीर मतित्वानं आनंदपूर्ण जगता येईल.

श्रीपाद जी केळकर (कल्याण)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post