बोधकथा - लोभामुळे बुद्धी भ्रष्ट होते - Bodhakatha lobhamule buddhi bhrasht hote
मधु
नावाचा एक गरीब मनुष्य कामाच्या शोधात इकडे तिकडे चकरा मारून, काम न मिळाल्याने निराश होऊन घरी परतायला
निघाला तेव्हा मागून कुणीतरी त्याला आवाज
दिला...
‘‘अरे भाऊ! थांब
जरा, इथे कुणी मजूर असतील का?’’
मधुने मागे वळून
पाहिलं तर त्याला एक म्हातारा कंबरेला धोतर पक्के गुंडाळून तीन
गाठोडे घेऊन येताना दिसला.
तो म्हणाला ‘हो सांगा बाबा, काय काम आहे? मी
स्वतःच काम करीन. मला पैश्यांची गरजही आहे.
म्हातारा म्हणाला, ‘‘मला
देवगीरीला जायचे आहे’’ यातले दोन गाठोडे मी उचलू शकतो
पण तिसरे गाठोडे जरा जड आहे, तर तू हे गाठोडे उचलून माझ्यासोबत
देवगीरीला घेऊन चल मी तुला दोन मोहरा देईन. तुला हे मान्य आहे का?’’
मधुला आनंद झाला. एकच गाठोडे घेऊन जायचे
होते आणि मोबदल्यात दोन मोहरा मिळत होत्या. तो म्हणाला, ‘‘ठीक आहे. तुम्ही म्हातारे आहात. तुम्हाला मदत करणं हे मी माझं कर्तव्य मानतो.’’ असे म्हणत मधुने गठ्ठा उचलून डोक्यावर ठेवला.
पण गाठोडे खांद्यावर ठेवताच त्याला त्याचा जडपणा जाणवला. तो म्हाताऱ्याला म्हणाला - ‘‘हे
गाठोडे खूपच जड दिसतेय?’’
‘‘होय... त्यात एक
रूपयांची नाणी आहेत.’’ म्हातारा जवळजवळ
कुजबुजत हळुच म्हणाला.
ते ऐकून मधु विचार करू
लागला, हे गाठोडे म्हाताऱ्याला फसवून घेऊन पळून जावे, पण फक्त एक रूपयांची नाणी, याने
माझं काय होणार? आणि ही नाणी किती काळ टिकतील?
असा विचार करत असताना त्याच्या लक्षात आले की, म्हातारा त्याच्याकडे निरक्षून पाहत आहे, बारीक लक्ष ठेवून
आहे. मधुला वाटले की, हा म्हाताराही विचार करत असेल, ‘गाठोडे घेऊन हा कुठेतरी पळून तर जाणार नाही ना?’ पण माझा अशा अप्रामाणिकपणावर आणि चोरीवर अजिबात विश्वास
नाही. नाण्यांचा अभिलाष करून मी कोणाशीही बेईमानी करणार
नाही. हे सर्व विचार मधुच्या मनात सुरू होते.
दोघे जात होते, वाटेत
एक नदी लागली. मधु घाईघाईने नदी पार
करण्यासाठी पाण्यात उतरला. पण म्हातारा नदीकाठीच उभा होता. मधुने म्हातार्याकडे पाहून विचारले - ‘‘काय झाले? तुम्ही का थांबलात?’’
‘‘ अरे भाऊ ! मी
म्हातारा आहे, माझी कंबर वरून वाकलेली आहे. दोन गाठोड्यांचं ओझं मला सहन होत नाही... हे
गाठोडे घेऊन मी पाण्यात उतरलो तर नदीत बुडून जाईन. तू अजून एक गाठोडे उचल. पैशांची काळजी करू नकोस मी तुला आणखी एक मोहरा देतो.’’
‘‘ठीक आहे आणा’’
मधु म्हणाला.
मधुची तत्परता पाहून म्हातारा म्हणाला
‘‘पण तू पळून जाणार ना?’’
‘‘ अहो! बाबा मी कशाला
पळून जाईन?’’ मधु म्हणाला.
‘‘भाऊ आजकाल कुणावरच भरवसा करता येत नाही? आणि या गाठोड्यात चांदीची नाणी आहेत. म्हणून शंका वाटते.’’
मधु मोठ्याने म्हणाला, ‘‘ओ, मी तुम्हाला असा बेईमान चोर दिसतो का? काळजी करू नका, चांदीच्या नाण्यांच्या लोभाने
कोणाचीही फसवणूक करणारा मी नाही. द्या ते गाठोडे’’ असे म्हणत मधुने दुसरे गाठोडे
घेऊन नदी पार केली. चांदीच्या नाण्यांचा लोभही त्याच्या मनाला
शिवू शकला नाही. हे पाहून म्हातारा थोडा प्रसन्न झाला.
थोडं पुढे गेल्यावर समोर एक
टेकडी आली. ती टेकडी पार करताना मधु हळू हळू टेकडी चढू लागला.
पण म्हातारा मात्र अजूनही तळाशीच उभा होता. ते पाहून मधु
म्हणाला.. ‘‘बाबा तुम्ही पुन्हा का थांबलात?’’
‘‘मी म्हातारा आहे, मला नीट चालता येत नाही. वरून कमरेवर गाठोड्याचं
ओझं आणि त्यातही समोर डोंगराची
दुर्दम्य चढाई, मला हे शक्य नाही. तू हेही गाठोडे घेतलेस तर बरे होईल.’’
मधु पुन्हल खाली उतरला आणि म्हणाला ‘‘काळजी
करू नका. हे गाठोडेही मलाही द्या, अर्थात याची जास्तीची मजुरीही दिली नाही तरी चालेल.’’
‘‘ अरे, पण हे मी कसे
देऊ? यात तर सोन्याची नाणी आहेत आणि ती
घेऊन तू पळून गेलास तर मी म्हातारा तुझ्या मागे धावू शकणार नाही.’’
यावर
मधु जरा चिडूनच म्हणाला, ‘‘म्हटलं ना, मी तसा
माणूस नाही. मला प्रामाणिकपणामुळे हे जड काम करावे लागते आहे,
नाहीतर मी एका सेठजींच्या जागी अकाउंटंट म्हणून काम करायचो. हिशोबात
घोळ करून लोकांची फसवणूक करण्यासाठी तो सेठ माझ्यावर नेहमी
दबाव आणायचा. पण मी तसे
करण्यास नेहमीच नकार दिला आणि शेवटी नोकरी
सोडली.’’ असे म्हणत तो फक्त आपला खानदानीपणा दाखवण्यासाठी
हसला.
‘यावर म्हातारा म्हणाला, ‘‘तु खरे बोलत आहेस की नाही हे मला माहीत नाही. तीर
पण मी तुझ्यावर विश्वास ठेऊन सोन्याच्या नाण्यांचे हे तिसरे गाठोडे तुझ्या हाती देत आहे. तू माझ्या आधी टेकडी पार कर, आणि पलीकडे थांब आणि
माझी वाट पाहा, मी हळुहळु येतो.’’
सोन्याच्या नाण्यांचे गाठोडे घेऊन मधु कनाकना निघाला.
म्हातारा खूप मागे होता. आणि आता
मात्र मधुचे मन डगमगले, त्याच्या मनात लोभ आलाच, तो विचार करू
लागला. ‘ यात सोन्यांच्या मोहरा आहेत, मी पळून गेलो तर हा म्हातारा
मला पकडू शकणार नाही आणि मी एका दिवसात श्रीमंत होईन. आणि
माझ्या दारिद्य्रावर हसणारी, रोज मला शिव्या घालणारी माझी बायको या
मोहरा पाहिल्यावर किती आनंदी होईल? सहज मिळवता येणारी संपत्ती नाकारणे मूर्खपणाचे आहे. मी क्षणार्धात श्रीमंत
होईन. पैसा असेल तर मला सन्मान-राख-आराम सर्व मिळेल काहीही करता येईल’ असा त्याच्या मनात लोभ आला आणि मागे वळून न पाहता तो गाठोडे घेऊन पळून गेला.
तीन गाठोड्यांचा
भार उचलून धावत असताना त्याला खुप दम लागला. घरी
आल्यावर त्याने गाठोडे सोडले आणि पाहिले तर त्याने डोक्याला हात मारला गाठोड्यांमध्ये
नाण्यांच्या जागी फक्त मातीचे ढेकळं होते. पण त्याला प्रश्न पडला की, म्हाताऱ्याने असे नाटक
करण्याची काय गरज होती?
मग त्याच्या पत्नीला
मातीच्या नाण्यांच्या ढिगाऱ्यातून एक कागद सापडला ज्यावर लिहिले होते...
‘‘या राज्याच्या तिजोरीचे रक्षण करण्यासाठी
प्रामाणिक सुरक्षा मंत्री शोधण्यासाठी हे नाटक करण्यात आले. परीक्षा घेणारा
म्हातारा दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष राजेसाहेब होते. तू
पळून गेला नसता तर तुला अर्थमंत्रिपद आणि सर्व
मानसन्मान मिळाला असता.’’
मधुला
खुप पश्चाताप झाला, पण आता काही उपयोग नव्हता, मजुरीचे पैसेही गेले होते, आणि मंत्रीपदही
गेले होते. म्हणून मित्रांनो! आपण सर्वांनी लोभाला बळी न पडता
खुप सतर्क असले पाहिजे. देव आपली परीक्षा कधी
घेईल? कशी घेईल हे सांगता नाही. म्हणून
प्रलोभनाला बळी न पडता आपल्या तत्वांना धरून
राहणे हे दूरदृष्टीचे असते..!!