आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 25 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 25 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya 

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 25

के दस्यवः सन्ति? कुवासनाख्याः!

कः शोभते? यः सदसि प्रविद्यः!

मातेव का? या सुखदा सुविद्या !

किमेधते दानवशात्? सुविद्या !

आद्य शंकराचार्यविराजित प्रश्नोत्तरी..२५

अर्थ..

प्रश्न :- चोर.. भामटे कोणास म्हणावं? उत्तर :-  वाईट वासनांना!

प्रश्न :- (सभेमधे) कोण शोभून दिसतो? उत्तर :-  सद्विद्यायुक्त विद्वान!

प्रश्न :- आईप्रमाणे सुखदायी कोण? उत्तर :-  सद्विद्या!

प्रश्न :- दिल्यामुळे काय वाढतं? उत्तर :-  सद्विद्या!

चिंतन..

चोर, भामटे लोकांच्या पैशाची.. सामानाची चोरी करतात, लोकांना लुटतात, फसवतात.. आपली कुकर्म यशस्वी होण्यासाठी लोकांना भ्रमित करतात. पण त्यांच काम केवळ ऐहिक, भौतिक जगतापुरतंच मर्यादित राहतं.. चोरी, दरोडे, फसवणूक यामुळे थोडंसं दुःख होऊनही त्यातून डोकं वर काढता येतं.. अधिक चांगल्या स्थितीसाठी! पण माणसाला खऱ्या अर्थानं पूर्ण फसवते.. भ्रमित करते ती दुर्वासना.. वाईट इच्छा!

यः परस्य विषमं विचिन्तयेत्

प्राप्नुयात् स कुमतिः स्वयं हि तत् ।..

जो दुसऱ्याचं वाईट चिंतितो त्यालाच ते मिळत असतं. दुसर्‍याला गाडण्यासाठी खणलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतो. असं अनेकदा अनुभवायला येऊनही माणसं दुर्वासनांचा त्याग करत नाहीत. त्या सतत फसवण्याचंच काम करतात. माणसाच्या अंगच्या सहज सत्प्रेरणांना वर येऊच देत नाहीत आणि केले तसे भरावे या न्यायानं माणसांच्या वाट्याला दुःखच येतं.

पुराणातल्या पूतना, दुर्योधन, कंस, या व्यक्तिरेखांसारखी अनेक दुष्प्रवृत्त, दुर्वासनायुक्त माणसं आजही अवतीभंवती सापडतील.. त्यांच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे! विशेषतः लहान मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवलं पाहिजे!! अशा प्रवृत्तींचा प्रतिकार दोन प्रकारे करता येतो. एक तर "दूरतो वा विसर्जयेत्"  किंवा "उपाह्नन्मुखभंगः" (पायातल्या वाहाणेनं ठेचणं, अन्य शस्त्राचा धाक दाखवून गप्प बसवणं.. इ..)

मतपरिवर्तन, मनपरिवर्तन हा अहिंसक उपाय त्यावर अवश्य आहेपण त्याला यश किति मिळेल व किति कालापव्यय केल्यानंतर ते मिळेल हे सांगणं कठीण आहे. आपल्या पुरता दुर्वासनांचा त्याग करण्याचा वा त्या चित्तात उद्भवूच नयेत याचा विचार करायचा झाला तर अखंड भगवन्नामस्मरण, सद्ग्रंथांचं वाचन चिंतन मनन निदिध्यासन हाच प्रभावी उपाय आहे!

"मधु तिष्ठति जिह्वाग्रे हृदये तु हलाहलम्" अशी माणसं  वेळीच ओळखण्याची, सज्जनांची पारख करण्याची बुद्धि विकसित करणं हाही एक उपाय आहे..  एक वेळ उघड्या नागड्या, निर्वस्त्र, सहजपणे प्रकटणाऱ्या दुर्वासना परवडल्या.. त्यांचा वेळीच प्रतिकार तरी करता येईल! पण त्या बऱ्याच प्रसंगी सद्वासनांचे कपडे घालून समोर येतात. तेव्हा त्यांना ओळखणं कठीण असतं व त्याच माणसाला लुटतात! सत्संस्कारांची चोरी करतात. सद्वासनांवर दरोडा घालतात! तेव्हा सद्वासनावेष्टित दुर्वासना ओळखता आल्या पाहिजेत..

वरकरणी सुसंस्कृत भासवणारी अनेक सुविद्य, सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित, विविध कलासंपन्न मंडळीसुद्धा दुर्वासनायुक्त असू शकतात! आपण सावध राहिलं पाहिजे. दुर्वासनांप्रमाणेच लौकिकातल्या सद्वासनाही भगवत्प्राप्तीच्या मार्गातले अडसर बनू शकतात. पापात्मक पुण्य, पुण्यात्मक पाप, पापात्मक पाप किंवा चोख. शुद्ध पुण्य याचीही चर्चा विविध ग्रंथांतून केली गेली असून ती मुळातूनच अभ्यासण्यासारखी आहे!

निर्द्वंद्व, त्रिगुणातीत, एकमेवाद्वितीय भगवंताकडे ज्ञान, भक्तियोग वा अन्य कुठल्याही मार्गानं जाण्यासाठी सर्वच वासनांपासून लांब राहिलं पाहिजे..  हेच तर इहामुत्रफलभोगविराग या साधनचतुष्टयातील दुसऱ्या साधनाचं इंगित आहे! एवं च, दुर्वासनांपासून लांब राहण्याचं, दुर्वासनांचा समूळ नाश करण्याचं शिक्षण देणारी विद्या हीच माणसाला विविध सभांमधे शोभायमान करणारी खरी गोष्ट आहे! एकवेळ रूप, धन, बळ, व्यावसायिक शिक्षण इत्यादि कमी असलं वा नसलंही तरी चालेल पण संतसत्पुरुषांकडूनच किंवा सद्ग्रंथातूनच शिकायला मिळणारी ही सद्विद्याच माणसाची खरी शोभा आहे...

इतर गोष्टीतून मिळणारी शोभा वरवरच्या वर्खासारखी केव्हाही उडून जाणारी व आतील पितळ उघडं पाडणारी असते! शेवट पर्यंत उपयोगी पडणारी केवळ सद्विद्याच आहे! आई ज्या प्रमाणे आपल्या बाळाचा काळजीपूर्वक.. प्रेमानं सांभाळ करते, सदैव त्याच्या हिताचा.. खऱ्या सुखाचा विचार करते, सतत त्यासाठी प्रयत्नशील व कार्यरत असते तशी सद्विद्या, तिला ज्यानं अंगीकारलं त्याच्यासाठी काम करते!

सामान्यतः एक समज असा आहे की द्रव्यजमीन -  जुमलापशुधन वा अन्य कोणतंही भौतिक धन दुसर्‍याला दिल्यानं घटत जातं, कमी होत जातं व शेवटी संपतंच! पण सामान्य विद्या दुसऱ्याला  दिल्यानं कधीच कमी होत नाही. सद्विद्या. अध्यात्मविद्या तर दुसर्याला दिल्यानं कधीच कमी होत नाही उलट नित्य वाढत राहते!

व्यये कृते वर्धत एव नित्य, । विद्याधनं सर्वधनप्रधानम् । ती ना कधी चोरांकडून लुटली जाते ना तिच्यावर भाऊबंद हक्क, अधिकार सांगून वाटणी करून घेऊ शकत! तिच्यावर ना कुठलीही राजसत्ता, प्रशासक कोणत्याही प्रकारचा कर लादू शकत ना ती कुणावरही भार होऊ शकतं नाही! उलट ती आपल्याला व आपल्या बरोबरच इतरांनाही मुक्त करते..

सा विद्या या विमुक्तये... दुःख शोक भय चिंता मोह ईर्ष्या द्वेष यांची बंधनं तोडून माणसाला सर्वतः मुक्त करणारी अशी ती सद्विद्या आहे! सर्वांनी तिचाच आश्रय घ्यावा  जेणे करून जीवन दुःखाची लवक्षणमात्रही भेसळ नसलेल्या शुद्ध चोख सुखानंदानं ओथंबून, भरभरून रहावं अशीच आचार्यांची इच्छा आहे!

श्री. श्रीपादजी केळकर (कल्याण)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post